Jan 26, 2022
सामाजिक

सौभाग्यवती 6

Read Later
सौभाग्यवती 6

आपण मागील भागात पाहिले की सागर आणि सुमनचा संसार अगदी व्यवस्थित चालला होता.. त्यांच्या संसार वेलीला प्रिया आणि सेजल अशी दोन फुले आली होती.. त्याचा संसार छान फुलला होता.. पण त्यांच्या त्या सुखी संसाराला जणू कोणाची दृष्टच लागली होती.. सागरचा अॅक्सिडेंन्ट होऊन त्याचा मृत्यू झाला.. आता पुढे..

सागरचा अॅक्सिडेंन्ट होऊन त्याचा मृत्यू झाला.. सुमन दवाखान्यात शून्यात जाऊन बसली.. तिला काहीच कळेना.. दवाखान्यातील सगळी प्रोसेस करून सागरला घरी नेले.. घरी गेल्यावरही सुमन शून्यात पाहत होती.. ती रडणं गरजेचं होतं.. सगळे तसे प्रयत्न करत होते.. पण ती रडतच नव्हती.. तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते.. कांद्याचा वास देत होते.. हलवून उठवण्याचा प्रयत्न करत होते.. तरीही ती शांतच होती.. शून्यात होती..

थोड्या वेळाने तिच्या दोन मुली येऊन तिच्या मांडीवर बसल्या.. त्या मुली तिच्या गालावरून हात फिरवत होत्या.. त्या चिमुकल्यांचा हात लागताच तिच्यातील आई जागी होऊन ती भानावर येते.. पाहते तर काय समोर सागरचा मृतदेह होता.. त्याच्याकडे बघून सुमनने एकच हंबरडा फोडला.. ती रडू लागली.. मुलींना कवटाळून बसली.. खरंच खूप हृदयद्रावक घटना होती..

सुमनचे सौभाग्य तिला सोडून गेले होते.. तिच्यावर वैधव्याचा डोंगर कोसळला होता.. किती ते दुर्दैव.. तिचा फुलणारा संसार आता लयाला आला होता.. सगळं संपलं.. तिचं आयुष्यच संपलं होतं जणू.. सगळे रडू लागले.. सुमनचे आईबाबा तिच्याजवळ होते.. तेही खूप रडत होते..

सुमन त्या घरात सागरची सौभाग्यवती म्हणून आली होती.. आता ती सागरची विधवा झाली.. आता तिचं जीवन सागर विना व्यर्थ वाटू लागले.. भरपूर पाहुणे, शेजारीपाजारी, मित्रमंडळी सगळी जमलेल होते.. प्रत्येक जण हळहळत होता.. सुमन आणि तिच्या मुलींविषयी सगळ्यांना वाईट वाटत होते.. आता सुमनचे पुढे काय असा प्रश्न सगळ्यांच्या मनात घोळत होता..

आता सागरचे सगळे सोपस्कार आटोपून पै पाहुणे आपापल्या घरी गेले.. प्रत्येक जण हळहळत घरी जात होता.. सगळे गेल्यावर सुमन तिच्या घरीच म्हणजे सासरीच राहिली.. कारण तिला लहानपणापासून हेच माहित होते की मुलगी लग्न होऊन सासरी गेल्यावर तिचं सासरच तिचं हक्काच घर असतं.. तिने तिचं सारं आयुष्य त्याचं घरात घालवायचं असतं.. अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिने सासरला सोडायचं नसतं.. म्हणून तिने सासरीच राहण्याचा निर्णय घेतला.. सागर नंतर थोड्याच दिवसात सागरच्या बाबांचा मृत्यू झाला.. आता तर पूर्णच कोलमडली..

काही दिवस गेल्यावर सुमनचे आईबाबा येतात.. सुमनला पुनर्विवाहाविषयी विचारतात..
"बाळा सुमन, तू दुसरे लग्न कर.. आयुष्यच्या संध्याकाळी सोबत हवीच ग.." सुमनचे बाबा

"नाही बाबा, सागर माझ्या मनात आहे.. मी त्याच्याशिवाय इतर कोणाचाही विचार करू शकत नाही.." सुमन

"तसे नाही ग.. मुलींना वडीलांचे प्रेम मिळायला हवे.. वडीलांची माया मिळायला हवी.. म्हणून आम्ही सांगतोय.. आम्ही तुझ्या भल्यासाठी सांगत आहे.." सुमनचे बाबा

"बाबा, मला सांगा.. मी जर एखाद्या मुलाशी लग्न केले.. तर तो कधीच मरणार नाही याची शाश्वती तुम्ही मला द्याल का?? मग अशा अमर मुलाशीच मी लग्न करेन.. जो कधीच मरणार नाही.." सुमन

"अगं तू काय बोलतेस तुझं तुला कळतंय का?? असे कधी होईल का??" सुमनची आई

"हो ना.. मग माझ्या लग्नाविषयीचा हट्ट सोडा.. आणि मला पुढील वाटचालीसाठी शुभ आशिर्वाद द्या.." सुमन

"आमचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी कायमचं आहेत बाळा.. पण तरीही तुझी काळजी वाटतेच ना ग.." सुमनचे बाबा

"पण मी फक्त सागरची होते आणि सागरचीच राहणार.. फक्त आधी त्याची सौभाग्यवती होते आणि आता त्याचीच विधवा बायको आहे.. आणि राहणार.." सुमन

"बरं, तू खूप हट्टी आहेस.. तुला समजावून उपयोग नाही.. मला सांग तू काय ठरवलेस.. मुलींचे भवितव्य कसे घडवणार आहेस??" सुमनचे बाबा

"सध्या तर काहीच ठरवलं नाही.. पुढे बघू काय होतंय ते??" सुमन

"मग तू आमच्यासोबत चल.. तिथेच काहीतरी कर.. आमची सोबत होईल.." सुमनचे बाबा

"नको बाबा.. माझं सासरच माझ्यासाठी असेल.. सगळे चांगले आहेत.. त्यामुळे सध्या तरी मी तो विचार करत नाही.. मी सासरीच रहायचं ठरवलं आहे.." सुमन

"सगळं तुच ठरवलेस.. आमचा काही अधिकार नाही का??" सुमनची आई थोडी रागातच बोलली

"आहे ग आई.. पण माझं मला थोडं धडपडू दे ना.." सुमन

"बरं बाई कर.. पण एक लक्षात ठेव.. कधीही गरज लागली तर आमचे दरवाजे कायम तुझ्यासाठी उघडलेले आहेत.. आईबाबांकडे यायला संकोच बाळगू नकोस ग.." सुमनची आई

"हो आई.. तुमच्याशिवाय मला तर कोण आहे??" सुमन

सुमनचे आईबाबा निघून जातात.. सुमन नेहमीप्रमाणे तिचे काम आवरून मुलींच्या संगोपनात दक्ष होती.. ती ना कुणाच्या अध्यात ना मध्यात.. तिचे काम भले ती भले असे तिचे चालू होते..

पण सागरच्या मृत्यूनंतर तिचं सगळं आयुष्यच बदललं नाही तर तिच्या सभोवतालची लोकं आणि त्यांचं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.. कारण आता ती एक विधवा होती.. सागर होता तेव्हा सगळे तिच्याशी आपुलकीने बोलत असत.. चांगली वागणूक देत असत.. आता साधं तिच्याकडे कोणी बघत सुध्दा नाही..

एखाद्या समारंभात जर ती गेलीच तर ती अपशकुनी म्हणून तिची अवहेलना केली जाई.. हळदी कुंकूच्या कार्यक्रमात तिला साधं कोणी बोलवत देखील नव्हतं.. तशी ती सागर गेल्यापासून कुठे जात नसे.. पण मुलींच्या हट्टासाठी जर कुठे गेलीच तर तिच्याशी धड कोणी बोलत देखिल नव्हतं..

उलट बायकांमध्ये कुजबूज होत असायची.. ही कशाला आली?? शुभ कार्यात अपशकुनी चेहरा कशाला?? हिचे काय काम आहे आता?? बोलावलं म्हणून लगेच आली.. काय निर्लज्य बाई आहे?? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या कानावर ऐकू येत होते..

तिला याचा खूप त्रास होत होता.. मनातून ती झुरत होती.. आतल्या आत जणू ती मरतच होती.. तिला सागरची आठवण येत नव्हती असे नाही.. तो तर तिच्या मनातच होता.. मग आठवण यायचा प्रश्नच नाही.. मग तिने त्याच दुःखाला किती दिवस कवटाळून बसायचं?? तिला मन नाही का?? तिला भावना नाहीत का?? तिला जगायचा अधिकार नाही का??
क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..