सौभाग्यवती 5

Marathi story

आपण मागील भागात पाहिले की सागर आणि सुमनच्या घरच्यांनी त्यांच्या प्रेमाला संमती दिली.. आणि त्या दोघांचे धुमधडाक्यात लग्न करून दिले.. सुमन आता सौभाग्यवती सुमन म्हणून नव्याने आयुष्य जगायला तयार झाली.. ती सागरच्या आयुष्यात त्याची पत्नी म्हणून प्रवेश करते.. आता पुढे..

सुमन आणि सागरचे लग्न झाले.. सुमन भविष्यातली भरपूर स्वप्न घेऊन तिने त्याच्या घरात प्रवेश केला.. गृहप्रवेश अगदी थाटामाटात झाला.. आणि त्या दोघांच्या संसाराला सुरूवात झाली.. दोघांचा अगदी राजा राणीचा संसार सुखाने चालू होता..

हळूहळू त्यांचा संसार खुलत चालला होता.. लग्नाआधी जी स्वप्न दोघांनी मिळून पाहिली होती.. ती आता दोघे मिळून पूर्ण करत होती.. सुमनने लग्नानंतर जाॅब न करता घर आणि संसारात जास्त लक्ष दिले.. तिने संसाराला पहिलं प्राधान्य दिले.. संसारात स्वतःला झोकून दिले..

सागर आणि सुमनची संसारवेल वाढत चालली.. आणि लवकरच त्या संसारवेलीला सुंदर फुल येऊ लागले.. सगळ्या घरात आनंदाचे वातावरण पसरले होते.. त्यांच्या नात्याला आणखी एक नाव मिळालं होत.. आईबाबा या रूपाने ते जणू परमेश्वराचे दर्शन घडवणारे होते..

सुमनला दिवस गेले होते.. सागरच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.. त्याला तर स्वर्ग चार बोटं राहिले होते.. सुमनला कोठे ठेवू कोठे नको असे झाले होते.. घरात आनंदाचा क्षणच आला होता..

सुमनचे दिवस भरले आणि तिला एक गोड मुलगी झाली.. घरात नन्ही परी आली.. तिचे गोड कौतुक चालले होते.. सगळ्यांना प्रिय म्हणून तिचे नाव प्रिया ठेवले.. प्रियाचे टकामका बघणे, दुडुदुडु घरभर चालणे, चालताना पायातली छुमछुम वाजणारी पैंजण, तिचे नखरे.. सारं काही पाहून घर भरून येई.. सागर तर लेकीच्या कौतुकात डुबुन गेला होता..

लेकीने जरा काही केलं की त्याला खूप कौतुक होई.. तो सगळ्यांना कौतुकाने सांगत होता.. प्रियाचे कौतुक करताना त्याला भरून येई.. लाडाची लेकच होती ती.. प्रिया आल्यापासून तर त्यांचे प्रेम आणखी बहरू लागले.. तिच्या कौतुकाने त्यांचा दिवस कसा जातो हे समजतच नव्हतं..

प्रिया आता थोडी मोठी झाली.. आणि सेजलचा जन्म झाला.. दोन्ही मुलीच झाल्या म्हणून ते अजिबात हिसमुरले नाहीत.. सुमनची सासू मात्र थोडी नाराज झाली.. तिच्या मुलगा होईल या अपेक्षेला धक्का बसला होता.. पण सागर आणि सुमन मात्र खूश होते.. दोन्ही मुली म्हणजे माझ्या लक्ष्मी असे सागर नेहमी म्हणत होता.. त्याला दोन्ही मुलीचं खूप कौतुक होते..

दिवसामागून दिवस जात होते.. प्रिया चार वर्षाची आणि सेजल फक्त एक वर्षाची होती.. एक दिवस सागर नेहमीप्रमाणे जाॅबला गेला होता.. सुमन मुलींसमवेत घरात होती.. तिचे सासरे पण घरात होते.. बाकी कुणी घरात नव्हते.. थोड्या वेळाने जेवण झाल्यावर सुमन मुलींना झोपवण्यासाठी रूममध्ये जाते.. तोच एक आवाज येतो..

सुमन घाबरून बाहेर गेली तर तिचे सासरे खाली पडले होते.. त्यांच्या छातीत जोरात कळ आली होती.. सुमन खूप घाबरली होती.. तिला काहीच सुचेना.. कुठे जावे काय करावे??.. घरी कुणीच नव्हतं.. मग तिने सागरला फोन केला.. तिच्या फोननंतर सागर पण खूप घाबरला आणि लगेच घरी जायला निघाला.. सागरची बराच वेळ वाट बघून सुमन मुलींना शेजारी ठेऊन सासर्यांना दवाखान्यात नेते..

दवाखान्यात गेल्यावर सगळ्या ट्रिटमेंट सुरू झाल्या.. सासर्यांना हार्ट अटॅक आला होता.. सर्जरी करणे जरुरीचे होते.. डाॅक्टरांच्या सल्याने औषध वगैरे चालू होते.. पण सर्जरी करणे आवश्यक होते.. सुमनने सागरला फोन केला पण त्याचा फोन लागेना.. भरपूर वेळा फोन करूनही फोन लागला नाही.. म्हणून सुमनने परस्पर ऑपरेशनचा निर्णय घेतला.. डाॅक्टरांनी काही रक्कम भरायला सांगितल्यावर तिने भावाकडून काही रक्कम मागवून घेतले आणि ऑपरेशन झाल्यावर उरलेली रक्कम भरेन म्हणून सांगितले..

ऑपरेशनला सुरूवात झाली.. सुमनच्या जीवात जीव नव्हतं.. तिने ऑपरेशनचा खूप मोठा निर्णय एकटीने घेतला होता.. त्यामुळे तिला टेन्शन आलं होतं.. ती फक्त देवाचा धावा करत होती.. त्याचबरोबर तिचं काळीज धडाधड वाजत होते.. तिला समजत नव्हते असे का होत आहे??

थोड्या वेळाने सुमनची सासू, दिर आणि जाऊ दवाखान्यात आले.. शेजारी सांगितल्यामुळे ते त्या दवाखान्यात आले होते.. तिथे येऊन सुमनची सासू रडू लागली.. सुमन आणखीनच घाबरली.. तिला काहीच समजेना.. नंतर डाॅक्टर येऊन ऑपरेशन व्यवस्थित पार पडले म्हणून सांगितले तेव्हा कुठे सगळ्यांच्या जीवात जीव आला..

सुमनचा दिर दवाखान्यात राहिला आणि बाकी सगळे घरी गेले.. घरी गेल्यावर सुमन मुलींना घेऊन घरी गेली.. तिचं सगळं आवरून स्वयंपाक करून तिने मुलींना भरविले.. अजून सागर आला नाही म्हणून तिला काळजी वाटत होती.. सासरे चक्कर येऊन पडले आहेत असे सांगूनही हे कसे आले नाहीत.. म्हणून ती चिंतातूर झाली होती..

सुमन सागरला फोनवर फोन करत होती.. पण त्याचा फोन लागेना.. तिची चिंता आणखीनच वाढली.. थोड्या वेळाने सुमनला एका वेगळ्या नंबरवरून फोन आला.. फोनवर बोलतानाच तिच्या हातातून मोबाईल घसरून खाली पडला.. तिच्या सासूबाई तिला हलवून हलवून विचारू लागल्या.. "सुमन काय झालं?? कोणाचा फोन होता??" सुमन काहीच बोलेना.. शेवटी तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणले..

शुध्दीवर आल्यावर सुमनने सागरचा अॅक्सिडेंन्ट झाल्याचे सांगितले.. ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.. सगळे दवाखान्यात गेले.. त्याला आय. सी. यू. मध्ये ठेवले होते.. डाॅक्टरांनी शाश्वती सोडून दिली.. आम्ही काही सांगू शकत नाही.. जे काही असेल ते परमेश्वरावर अवलंबून आहे.. हे ऐकून सुमनच्या पायाखालची जमीनच सरकली..
देवा तुझ्या गाभार्याला उंबराच न्हाई
सांग कुठं ठेऊ माथा कळना च काही
देवा कुठं शोधू तुला मला सांग ना
प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी

जणू या गाण्याप्रमाणे तिची अवस्था झाली होती.. काहीही सुचत नव्हते.. ती एका जागी स्वस्थ बसून होती.. देवाला प्रार्थना करत होती.. देवाला विनवत होती.. सागरची तब्बेत सुधारण्यासाठी ती जणू सावित्री बनायचा प्रयत्न करत होती..

पण नियतीने काही वेगळेच वाढून ठेवले होते.. थोड्या वेळाने डाॅक्टर येऊन सांगितले की साॅरी.. मी त्यांचे प्राण वाचवू शकलो नाही.. हे ऐकून सुमन धपकन खाली पडली.. ती शून्यात गेली.. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला..
क्रमशः 

🎭 Series Post

View all