Jan 23, 2022
सामाजिक

सौभाग्यवती 10

Read Later
सौभाग्यवती 10

आपण मागील भागात पाहिले की सुमन तिची मुलगी प्रिया उशीरा आली म्हणून सुमन तिला ओरडली.. मग तिच्या मुली सुमनला ओरडण्याचे कारण विचारताच तिने त्यांचं बोलणं ऐकल्याचे सांगते.. मग प्रिया मोहनला सुमन आवडत असल्याचे सांगते.. साधना प्रियाला भेटायला बोलावले.. आता पुढे..

सकाळी सुमन ऑफिसला गेल्यावर तिच्या मुली साधनाला भेटायला जातात.. साधना त्या दोघींना एका बागेत बोलावते.. म्हणजे तिथे त्यांना मनमोकळे बोलता येईल.. तिघीही तेथे गेल्यावर थोडा वेळ शांतच होत्या.. मग साधनानेच बोलायला सुरुवात केली..

"कशा आहात ग तुम्ही?? खूप दिवस झाले तुम्हाला भेटून.." साधना

"आम्ही छान आहोत मावशी.. तू कशी आहेस?? आणि आम्हाला असे इथे का बोलावलेस??" प्रिया

"हो.. थोडं महत्वाचे बोलायचे होते.." साधना

"बोल ना मावशी.. काय बोलायचं होतं??" प्रिया

"तुम्ही सुमनला मोहनबद्दल का सांगितलं?? मी तुम्हाला सांगू नका म्हणून सांगितले होते ना.." साधना

"अगं पण ती आमच्याशी बोलत नव्हती.. आणि आम्ही सांगितलं तर काय झालं ग?? तिला पण कळायला हवंच ना.. आणि कोण तो मोहन काका?? या वयात असली थेर का करावी त्याने?? त्याला आमची आईच दिसली का?? त्याला हे असलं आताच का सुचावं??" प्रिया थोडी रागातच बोलली

"अच्छा, म्हणजे तुम्ही करता ते प्रेम आणि हे करतात ती थेर.. कुठल्या जमान्यातल्या मुली आहात ग तुम्ही?? आईचं भल करायचं की नावं ठेवायचं.. ती बिचारी तुमच्यासाठी स्वतःच्या सुखाचा विचार न करता तुमच्या सुखाचा विचार करत राहिली.. आणि तुम्ही असे बोलताय.. आज तुम्ही माझ्या मनातून उतरलात.." साधना थोडी चिडूनच बोलली.. खरं तर मुली सुमनला सपोर्ट करतील अशी तिला आशा होती पण त्या तर नावच ठेवत होत्या.. त्यामुळे ती थोडी चिडली..

"तसे काही नाही ग मावशी.. आम्ही पण तिचाच विचार करतो.. पण तो मोहन काका असे करायला नको होतं त्याने.. त्याचा संसार, मूलं वगैरे असतीलच की.." सेजल

"त्याचा संसार सुरूच झाला नाही तर मूल कुठून येणार??" साधना

"म्हणजे??" दोघी एकदमच म्हणाल्या

"मोहनची परिस्थिती थोडी गरिबीची होती.. घरची जबाबदारी पेलताना लग्नासाठी थोडा उशीरच झाला.. आणि आता कोण करणार त्याच्याशी लग्न??.. मग त्याची आणि सुमनची ओळख झाली.. त्याला सुमनबद्दल सगळं मी सांगितले.. मग तो सुमनच्या प्रेमातच पडला.. इतक्या जिद्दीने सगळा गाडा चालवायचा सोपी गोष्ट नाही..मग हळूहळू तो तिच्या प्रेमात पडला.. हे काही लगेच बघितलं आणि प्रेमात पडलो असे झाले नाही.. दोघेही खूप मॅच्युअर आहेत.. त्यांचेही त्यांना कळते... तुम्ही इतक्या मोठ्या झालात काय त्यांनाच नावं ठेवायला.." साधना

"अगं आम्ही नावं ठेवत नाही ग.. पण हे असे या वयात.." प्रिया

"या वयात म्हणजे?? प्रेम करायला वयाचे कोणते बंधन असते का ग?? प्रेम ही गोष्ट कधीही आणि कोणीही कुणावरही करू शकतो ना ग?? मग तू असा का विचार करतेस??" साधना

"अगं बरोबर आहे.. पण आईचं काय??" प्रिया

"तिचं काय म्हणजे?? तुला हा प्रश्नच कसा पडू शकतो?? तुम्ही आहात ना तिला समजवायला.." साधना

"पण मावशी आम्हाला हे मान्य नाही.. आमचं मन तयार होत नाही.." सेजल

"अगं तुम्ही अशा कशा ग?? उलच तुम्ही आजच्या जमान्यातल्या मुली... तुम्ही तुमच्या आईला समजावून सांगितलं पाहिजे.. तिला पटवून दिलं पाहिजे.. तुम्ही लग्न करून नांदायला गेल्यावर तिला कुणाची ग सोबत.. आता एक ठिक आहे.. जाॅब आहे काम आहे मन रमत.. पण उद्या भविष्यात रिटायर झाल्यावर जेव्हा ती एकटी पडेल तेव्हा तिला कोण ग?? म्हातारपण खूप वाईट असतं ग.. आपलं माणूस लागतच तेव्हा.. तुम्ही काय तुमच्या करियरमध्ये बिझी असणार.. पण तिचं काय?? हा विचार कधी केलाय?? म्हातारपणी बोलायला आधार द्यायला आपल्या माणसांची गरज लागतेच... तुम्ही फक्त तुमचा विचार न करता तिचा थोडा विचार करा.. तिने एकटीने असे किती दिवस रहायचे?? शेवटी साथ ही कुणाची तरी हवीच ना.." साधना सुमनच्या मुलींना समजावत होती..

"मावशी तू हे काय बोलतीस?? मान्य आहे आम्ही नविन पिढीचे आहोत.. अगं पण आपण ज्या समाजात राहतो ना त्या समाजाला धरून जायला लागतं.. आणि हे समाज कधीही मान्य करणार नाही.. मग आपण काय करायचं ग?? प्रवाहासोबतचा प्रवासच सुखकर असतो.. नाहीतर कष्टच भोगावे लागतात.." प्रिया

"समाज म्हणजे नक्की कोण ग?? तुम्ही आम्ही आपण सगळेच ना.. मग सगळेच असे म्हणत बसलो तर कधी सुधारणा होणार.. आणि विधवा बायकांनीच का गप्प बसायचं ग.. जर तुझ्या आईच्या जागी तुझे बाबा असते तरीही तू हाच विचार केली असतीस का?? बाबांच्या सुखासाठी प्रयत्न केली असतीसच ना... मग आईच्या बाबतीत हा दुजाभाव का?? आणि हो सुरूवात स्वतःपासून करावी.. समाजाच म्हणशील तर असेही बोलतील आणि तसेही बोलतीलच.. मग तुम्हीच ठरवा काय करायचं ते??" साधना

"हो मावशी तुझं म्हणणं पटतय बघ.. पण भीती वाटते ग.. समाज आणि आपलं मन काहीसं.. मन घाबरत ग.. समाजातून आपल्याला कायमचं दूर करतील.. म्हणून सुरूवात करायला पण भीती वाटते ग.." साधना

"अगं याची सुरूवात खूप आधी झालेली आहे.. समाज सुधारकांनी अथक परिश्रम घेतले होते तरीही तुम्ही आजची पिढी ते स्विकारू शकत नाही.. म्हणजे त्यांचे सगळे कष्ट वायाच गेले ग.. समाज सुधारकांना त्यावेळी खूप त्रास सहन करावा लागला तरी ते हसत हसत समाज बदलवण्यासाठी प्रयत्न करत होते.. आणि आपणच समाजाला कवटाळून बसायचे का?? आपल्यात इतकी धमक नाही का?? परिवर्तन कायम आपल्या स्वतःपासून करावे ग.. हे म्हणजे शिवाजी जन्मावा पण शेजार्यांच्या घरात असे झाले.. म्हणून मी सांगते ते ऐका.. आईसाठी इतकं करा.." साधना

"हो मावशी, तुझं पटलं ग.. आम्ही बदलणार.. आईसाठी.. तिच्या सुखासाठी.. ती लगेच तयार होणार नाही.. पण आम्ही तिला समजावून सांगू.. हवे तर काहीही करू.. पण तिला साथीदार मिळवून देऊ ग.." प्रिया

"माझ्या गुणाच्या ग मुली.. यात मी सुद्धा तुम्हाला मदत करेन.." साधना

"हो मावशी तुझी मदत तर लागणारच आहे.." प्रिया

तिघीही अशाप्रकारे चर्चा करतात.. साधना सुमनच्या काळजीपोटी तिच्या मुलींना समजावून सांगते.. शेवटी एक नवा अध्याय घडवायचा असतो ना.. कुठून तरी अशी सुरुवात व्हायला लागते..
क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..