सुखामागे दडलेले दुःख

About Happy Life




आज आपल्या जीवाभावाच्या मैत्रीणीचे कविताचे लग्न होते. म्हणून सविता खूप आनंदात होती. पण आज कविता सासरी गेल्यानंतर आपण एकटेच राहू... या विचाराने तिचे मन उदास ही होते.

अगदी लहानपणापासून म्हणजे काही समजत ही नव्हते त्या वयापासून बरोबरीने वाढलेल्या, एकत्र खेळलेल्या अशा दोन्ही मैत्रीणी!
दोघांचेही घर शेजारी शेजारी होते. एकमेकांशी चांगले जमत होते. अडीअडचणीला,
सुखदुःखाला त्यांचा एकमेकांना आधार होता.

कविता, सविता सारख्याच वयाच्या होत्या. त्यामुळे शाळेत नाव बरोबरच घातले.एकच शाळा..एकच वर्ग.
घर ही शेजारी ..त्यामुळे कविता, सविता म्हणजे एकमेकांची सावलीच झाल्या. दोघी ही दिसायला छान. अभ्यासातही चांगल्या होत्या. थोडाफार विचारांचा,स्वभावाचा आणि गुणांचा फरक होता पण दोघींचे बॉंडींग चांगले जमलेले होते.
बालवयात खेळणे,हसणे,बागडणे,
रडणे,रूसणे यापासून सुरू झालेली मैत्री पुढे एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करण्याची खात्रीची जागा इथपर्यंत येऊन पोहोचली.त्यांना इतर मैत्रीणी ही होत्या पण दोघींची मैत्री जास्त घट्ट होती.

शाळेनंतर कॉलेजलाही एकाच वर्गात ... शाळेचे दिवस जसे मजेत गेले तसे कॉलेजचे दिवस ही दोघी मस्त एन्जॉय करीत होत्या. दोघीनांही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करण्याची इच्छा होती. पण दोघींच्याही घरातील व्यक्तींचे म्हणणे होते,"नोकरी वगैरे काय करायचे ते लग्नानंतर करा. आम्ही तुमचे लग्न करून आमची जबाबदारी पूर्ण करतो."

आईवडीलांच्या इच्छेनुसार कॉलेजचे शिक्षण पूर्ण होताच घरात लग्नाची बोलणी सुरू झाली.

दोघींच्याही आईवडिलांनी आपल्या परीने आपल्या मुलीसाठी चांगले स्थळ शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. मुलाचे दिसणे,शिक्षण,नोकरी/व्यवसाय, घरातील वातावरण वगैरे या सर्व गोष्टींचा विचार करूनच ते मुले पाहत होते. जेणेकरून आपल्या मुलीला पुढे काही त्रास होणार नाही. ती सुखात रहावी.

कुठे काही गोष्टी आवडत होत्या पण एखादी गोष्ट खटकत असल्याने स्थळ नाकारले जात होते.

मुलीला दुसऱ्या घरी पाठवायचे म्हणजे सर्व गोष्टींचा विचार केलाच पाहिजे असे त्यांच्या आईवडिलांना वाटत होते.

असेच प्रयत्न सुरू होते आणि कविता साठी एका चांगल्या कुटुंबातील मुलाचे स्थळ सांगून आले. मुलगा दिसायला चांगला होता.शिक्षण ही चांगले झालेले होते.स्वकर्तुत्वावर स्वतः चा व्यवसाय सुरू केलेला होता. घरातील माणसे आणि आर्थिक परिस्थिती ही चांगली होती. पण सासरच्या लोकांचे स्पष्ट मत होते. सुनेने नोकरी न करता आपल्या घरच्या व्यवसायात मदत करावी. कविताच्या आईवडिलांना या स्थळात कोठेही ,काहीही चूक काढावी असे वाटले नाही .आपली मुलगी या घरात सुखी राहील असेच वाटले . त्यामुळे ते लग्नाला तयार झाले.

कविताला नोकरी करण्याची इच्छा होती. स्वतःच्या शिक्षणाचा,गुणांचा उपयोग करून स्वतः चे एक वेगळे स्थान निर्माण करायचे होते.

\"लग्नानंतर नवऱ्याला व्यवसायात मदत करून आपण आपल्या गुणांचा उपयोग करू शकतो. \" या विचाराने ती ही लग्नाला तयार झाली.


कवितेला नवरीच्या रूपात पाहून सविता तिला पाहतच राहिली..

"अशी का बघते आहे माझ्या कडे ?"
कविताने सविताला विचारले.

सविता - "बघू नाही तर काय करू ? तू दिसतेस आहे इतकी छान... तुझ्या कडेच बघत रहाव असे वाटत आहे.. पण आता तारीफ करायला हक्काच माणूस भेटलं आहे तुम्हांला.... आम्ही काय आता ..."

कविता- " हो,का ...तुम्ही पण छान दिसत आहात बरं ..
तुमची तारीफ करणारे हक्काचे माणूस पण भेटतीलच लवकर तुम्हांला...."

अशी दोघींची थट्टामस्करी सुरू असताना कविताची आई आली आणि लवकर तयार होऊन लग्नमंडपात येण्याचे सांगून गेली.


कविताचे लग्न छान पार पडले.सर्व कार्यक्रम छान झाले. मुलाकडील आपल्यापेक्षा श्रीमंत असतानाही कविताच्या आईवडिलांनी आपल्या कुवतीप्रमाणे त्यांचा मानपान वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या.

कविता सासरी जात असताना सर्वांना भेटून रडत होती.

सविताही खूप रडत होती. इतक्या वर्षांचा सहवास, प्रत्येक गोष्ट दोघींना एकमेकींना सांगितल्याशिवाय चैन पडत नव्हते. आणि आज कविता सासरी गेल्यावर आपण इकडे एकटे राहू या विचाराने सविता खूप रडत होती. \"आपली सावली च आपल्या पासून दूर जात आहे\" असे तिला वाटत होते.

तर आपल्या सर्व प्रिय व्यक्तिंना सोडून जावे लागत असल्याने कविता रडत होती.

सासर जरी चांगले असले तरी माहेरची आठवण सासरी गेलेल्या प्रत्येक मुलीला नेहमीच येत असते..


कविता हळूहळू आपल्या संसारात रूळली. इकडे सविताचे ही काही महिन्यातच लग्न झाले. मुलाची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती म्हणून सविताचे आईवडिल या लग्नासाठी तयार नव्हते पण सविताला मुलगा खूप आवडला होता आणि ती त्याच्या प्रेमातच पडली होती. त्यामुळे इतर गोष्टींचा तिने जास्त विचार केला नाही. सविताचेही लग्न छान झाले. कविता आली होती लग्नाला. पण तिच्या नवऱ्याला महत्त्वाचे काम होते म्हणून तो आला नव्हता त्यामुळे ती थोडी नाराज होती.

लहाणपणापासूनच्या जीवाभावाच्या मैत्रीणी लग्नानंतर आपल्या संसारात रमल्या होत्या पण आपल्या मैत्रीला कधीही विसरल्या नव्हत्या.

वेळ मिळेल तसा त्या फोनवर एकमेकांशी बोलत असत. माहेरी गेल्या की एकमेकींना भेटत . पूर्वीचे दिवस आठवून खूप खूप गप्पा मारत. मैत्रीचा आनंद घेत असत.

सविताने कविताला विचारले की ," काय म्हणतो संसार ? खूष आहेस ना ? "

कविता म्हणायची " छान! सर्व ठीक आहे. सर्व सुखसोयी आहेत. सर्व गोष्टींची हौसमौज होते. पैशाची आणि इतर गोष्टींची कधी उणीव भासत नाही. पैशामुळे सर्व भौतिक सुखांचा उपभोग घेण्यास भेटत आहे. "

सविता - " मजा आहे ना मग.. अजून काय हवे ? सर्व उपभोगण्याच्या वस्तू तुला भेटत आहे ..खरच खूप सुखी आहे तू.."


कविता-" ते सर्व ठीक आहे गं..पण मला त्यात खरे सुख वाटत नाही...
घरात सर्व सुखसोयी असल्या म्हणजे आपण सुखी असतोच असे नाही... मला तरी तसे वाटत नाही. मी पैशापेक्षा नात्यांचे एकमेकांवरील प्रेम,विश्वास या गोष्टींना जास्त महत्त्व देते.

माझ्या घरात माझ्या मताला काही अर्थ नाही.घरात सासूबाईंचे तर बिझनेसमध्ये सासरे आणि नवऱ्याचे मत चालते. मी कितीही चांगले सांगितले तरी माझे कोणी ऐकत नाही. माझ्या मनासारखे कधीही काहीही होत नसते. मी फक्त सर्वांच्या आज्ञेत राहयचे. नवरा ही कधी मनमोकळे बोलत नाही. घरात ही कायम बिझनेस चाच विषय ...
मला तर छान मनमोकळे, स्वच्छंदी जीवन जगायला आवडते. पण मी तर माझ्या घरात फक्त शोभेची वस्तू म्हणून राहत आहे. खूप घुसमट होत असते... आता तूचं सांग पैसा असणे.. म्हणजे सुख का?"


सविता- " तुझ्या पेक्षा उलट परिस्थिती माझ्या कडे आहे.यांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती म्हणून आईबाबा या स्थळासाठी तयार नव्हते पण माझ्या हट्टापायी ते लग्नाला तयार झाले. मी पण यांच्या प्रेमात वेडी झाली होते त्यामुळे तेव्हा एवढा विचार केला नाही. पण आता संसार करताना पैशाची चणचण भासते तेव्हा खूप त्रास होतो.

नवरा खूप चांगला आहे. माझ्यावर मनापासून प्रेम करतो. मला घरात बोलण्याच,वागण्याच पूर्ण स्वातंत्र्य आहे. सासूसासरे ही खूप चांगले आहेत. पण राहण्यासाठी स्वतः चे अजून घर नाही. सासऱ्यांच्या नोकरीत फक्त त्यांच्या मुला मुलींचे शिक्षण आणि मुलींची लग्ने झाली.आता सर्व जबाबदारी यांच्यावर ..खर्च एवढा होतो की बचत तर होऊच शकत नाही. त्यामुळे सर्व ऍडजस्ट करतांना खूप वैताग येतो.

पुरेसा पैसा असला तर खूप काही गोष्टी आपण करू शकतो. घरात सर्व चांगले आहेत पण पैसा ही तितकाच महत्त्वाचा असतो ना?

मी पण नोकरीसाठी प्रयत्न करीत आहे पण पाहिजे तशी नोकरी नाही मिळत आहे. मी नोकरी करायला लागली की थोडाफार हातभार लागू शकतो संसाराला.

माझा नवरा त्याच्या परीने माझी हौसमौज पुरवीत असतो. पण तो ते सर्व कसे ऍडजस्ट करून करत असतो हे मला जाणवते आणि मग वाईट ही वाटते. आपल्या आनंदासाठी त्याला त्रास होतो म्हणून...

कविता -" तुझ्याकडे पैसा नाही म्हणून तू दुःखी राहते पण तुझी सर्व माणसे चांगली आहेत, तुला स्वातंत्र्य आहे याबाबतीत तू माझ्या पेक्षा खरच सुखी आहे.

माझ्या कडे पैसा आहे पण मला जे हवे,मला जे आवडते ते करण्याच स्वातंत्र्य नाही याचे मला दुःख वाटते. "

सविता -" आपल्या दोघींच्या व्यथा वेगवेगळ्या.. बघू पुढे.. आपण प्रयत्न करत तर राहू ...
आमची पण परिस्थिती सुधारेल हळूहळू ...तोपर्यंत आहे त्यात समाधान मानते.."

कविता -" मी पण करते प्रयत्न . आहे त्यात सुख शोधण्याचा... मी माझ्या पद्धतीने आनंद शोधते आणि हळूहळू घरातील इतरांचे ही मतपरिवर्तन करते..."

सविता - " बघं ना... प्रत्येकाची सुखाची व्याख्या किती वेगवेगळी असते ना? जे आपल्या जवळ नसते त्यात सुख न मानता जे आपल्या जवळ नाही किंवा जे इतरांकडे आहे म्हणून आपण दुःखी होत असतो. "


कविता -" हा तर मानवी स्वभावच आहे म्हणा...
प्रत्येक सुखी चेहऱ्यामागे काही तरी दुःख दडलेले असतेच..
सविता ,
नेहमीप्रमाणे तुझ्याशी बोलून बरे खूप वाटले..., दुःख कमी होऊन जाते...आपण असाच आपल्या मैत्रीचा आनंद घेत राहू ..."

सविता-" अगदी बरोबर आहे तुझे... जे आपल्या हातात आहे तेवढे आपण करु शकतो...

तुझ्यासारखी मैत्रीण मला मिळाली हे मी माझे भाग्यचं समजते...तुझ्या शी बोलले की मी पण माझी सर्व व्यथा विसरून जाते आणि प्रसन्न वाटते.
आपण आपल्या मैत्रीचा हा अमर्याद आनंद आयुष्यभर घेत राहू..."