डोंगराएवढं दु:ख

Her sorrow

डोंगराएवढं दु:ख

कॉलेजमधे फ्रेंडशिप डे होता. मुलंमुली एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधत होती. सेटीनच्या रिबिनींनी भरलेले दोन्ही हात मुलंमुली मिरवत होती. तळहातापासून ते मनगटापर्यत इनिशियल्सने प्रत्येकाचे हात भरले होते.

 रिया मात्र दोन लेक्चर अटेंड करुन तडकाफडकी निघून गेली होती. तिच्यासोबत असणाऱ्या तिच्या मैत्रिणीला, नैनाला तिचा खूप राग आला होता. 

दुसऱ्या दिवशी रिया नेहमीप्रमाणे गाडीला आली. रिया व नैना दोघी सोबतच कॉलेजला गेल्या पण नैना रियाशी बोलत नव्हती. रियाला नैनाचा अबोला सहन होईना.

 दुसऱ्या पिरियडचे सर आले नव्हते. रियाने नैनाला ओढतच लेडीज रुममधे नेलं. लेडीजरुममधे काहीजणी नवी हेअरस्टाईल ट्राय करत होत्या,काहीजणी नोट्स कंपलीट करण्यात गुंग होत्या तर एकदोघी नुकत्याच पाहिलेल्या सिनेमाची स्टोरी सांगण्यात गुंग होत्या. 

रिया नेहाला घेऊन एका बेंचवर बसली. रिया नैनाला म्हणाली.."रागावलीस माझ्यावर?"

"आपल्या माणसावर रागावतात. तू थोडीच मला आपलं मानतेस!"

"अगं मी फ्रेंडशिप बँड बांधला तुला आणि नैना मला नाही वाटत आपली मैत्री फक्त एका बँडपुरती मर्यादित आहे."

"अगं पण रिया तू का नाही थांबलीस सेलिब्रेशनला. तू अशीच आहेस,सेलफिश. मला गेल्या वर्षीच्या मुलींनी सांगितलेलं की तू फक्त कामापुरती दोस्ती करतेस पण मी दुर्लक्ष केलं होतं त्यांच्या बोलण्याकडे. आता मला तुझं खरं रुप कळालं. तू फक्त कंपनी म्हणून माझा वापर करतेस. बरोबर नं."

"एक एक मिनिट नैना, तू तुला वाटलं ते बोललीस. आता माझं म्हणणं ऐकून घे. तुला वाटत असेल.. तुलाच काय बऱ्याच जणांना वाटतं, मी फक्त पुस्तकातला किडा आहे..मी स्वार्थी आहे,मी स्वतःच्या स्वार्थापुरती मैत्री करते वगैरे वगैरे. मी कुणालाच माझ्या भूमिकेचं,माझ्या वागण्याचं स्पष्टीकरण दिलं नाही किंबहुना मला कधी तशी गरज वाटली नाही पण आज तुला देते.
नैना मी तेव्हा सहावीत होते. वयाप्रमाणेच अल्लड. अगदी कानात वारं भरलेल्या वासरासारखी. माझं मन अभ्यासापेक्षा खेळातच रमे. माझा पाय घरात टिकत नसे. वाचन,पाठांतरामधे मला अजिबात रस नव्हता. कशीबशी  पास व्हायचे. 

 एके दिवशी माझा सहामाहीचा निकाल लागला होता. मी नापास झाले होते. मी नापास होण्याची ती पहिलीच वेळ होती. माझ्या मम्मीला खूप राग आला होता माझा. तिने माचिसची काडी पेटवली व ती जळती काडी माझ्यापुढे धरत म्हणाली,"तू अभ्यास करणार की नाही ते सांग नाहीतर मी स्वतःला जाळून घेते."
 मला काही समजत नव्हतं. मी ठोंब्यासारखी उभी होते. मम्मी परतपरत तेच वाक्य बोलत होती. माझ्याकडून काहीच प्रतिसाद येत नाही म्हंटल्यावर ती रागाने बेभान झाली आणि.. आणि ते काडं तिच्याही नकळत तिच्या साडीला लागलं. साडीने पेट घेतला. मी खोलीचं दार उघडून बाजूच्यांना हाक मारली. तिच्यावर ग्लासने पाणी ओतत होते. पण ती बरीच भाजली होती. शेजारच्यांनी तिच्यावर ब्लँकेट घातलं. ताबडतोब इस्पितळात नेण्यात आलं. ती भरपूर भाजली होती. सारखी पाणी मागत होती. इस्पितळात नेल्यावर एका तासात सगळं संपलं होतं.

मम्मी गेल्यानंतर पप्पांनी दुसरं लग्न केलं नाही. घरात काम करायला बाई ठेवली. पण पप्पा त्यानंतर माझ्याशी कधी नीट बोलले नाहीत की मला कधी त्यांनी प्रेमाने जवळ घेतलं नाही.

 मी मात्र त्यानंतर पार बदलले. दिवसरात्र स्वतःला अभ्यासात बुडवून घेतलं. दहावीत नव्वद टक्के मिळवले. तो निकाल मम्मीसमोर ठेवला. तोच काय प्रत्येक वर्षाचा निकाल मम्मीच्या फोटोसमोर ठेवते व तिला सांगते,"मम्मी बघ गं माझे मार्क्स. मला फक्त एकदा माफ कर आणि ये परत माझ्याजवळ. मम्मी मला तू हवी आहेस..तू मला हवी आहेस मम्मा." 

रियाच्या डोळ्यातून अश्रुधारा वहात होत्या आणि नैना तिचे दोन्ही हात गच्च धरून रडत होती..म्हणत होती,"सॉरी रिया..आय एम एकस्ट्रीमली सॉरी. मी किती वेड्यासारखं बोलले तुला आणि तू..तू किती सहन करत आली आहेस. माझ्या कल्पनेच्यापल्याड आहे तुझं दु:ख डोंगराएवढं. एक प्रॉमिस देते मात्र आजपासून तुझं दु:ख हलकं करण्यासाठी तुला हक्काचा खांदा देईन."

दोघींनी एकमेकींना प्रेमाची झप्पी दिली जी हजारो फ्रेंडशिपबँड्सच्या पलिकडली होती.

(सत्यकथा)

-----सौ.गीता गजानन गरुड.