सून हवी की तिची कमाई? (भाग २)

सुनेने माहेरी केलेली मदत सासरच्यांना पटत नाही.


अनन्याची मंथली इनकम जवळपास लाखाच्या घरात होती. त्यामुळे तिने एकाच अटीवर लग्न करण्याचे ठरवले.

"लग्नानंतर मी माझा अर्धा पगार माझ्या आईला देणार. आणि हे असे शेवटपर्यंत सुरू राहणार. याव्यतिरिक्त तिचे आजारपण आणि म्हातारपण या दोन्ही गोष्टीमध्ये अनिश इतकीच माझीही जबाबदारी कायम असेल. आणि जो मुलगा या अटींसह माझ्याशी लग्नाला तयार होईल त्याच्याशीच मी लग्न करेल. बाबा असते तर गोष्ट वेगळी होती. पण आता आई आणि अनिश ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहेत."

"हे जर तुम्हाला मान्य असेल तरच मी लग्न करेल अन्यथा मी लग्नच करणार नाही." अनन्याने आईला आणि मामाला तिचे मत ठामपणे सांगून टाकले.

"आता ही एवढी मोठी अट कोण मान्य करणार?" याची चिंता माधवीला सतावत होती.

"जे होईल ते होईल पण स्थळं पाहायला तर काहीच हरकत नाही." हा विचार करुन अनन्याच्या मामांनी तिच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली.

आजचे हे तिसरे स्थळ येणार होते अनन्यासाठी. पण माधवीला मात्र खूपच चिंता लागली होती. अर्थातच अनन्या काहीही चुकीचे करत नव्हती, हे तिलाही कळत होते. पण मुलाकडच्या मंडळींना ही गोष्ट अजिबात पटणारी नव्हती. त्यामुळे माधवी खूपच टेन्शनमध्ये होती.

या एका गोष्टीमुळे याआधीची दोन चांगली स्थळे हातातून गेली होती. आताही तेच होते की काय? याची भीती माधवीला सतावीत होती.

थोड्याच वेळात पाहुणे आले. मुलगा अनिरुद्ध, त्याचे आई वडील, मोठी बहीण आणि भाऊजी. इतकीच काय ती मंडळी आली होती अनन्याला पाहायला. स्थळ अगदी तिच्या तोलामोलाचे होते. अनिरुद्धही दिसायला अनन्याच्या तोडीस तोड होता. जोडा अगदी लाखात एक शोभून दिसणारा होता.

सगळेजण सोफ्यावर विराजमान झाले. अनन्याचे मामाही होतेच. अनिरुद्ध तर अनन्याला पाहण्यासाठी खूपच आतूर झाला होता. माधवीने सर्वांना पाणी दिले. तिच्या पोठोपाठ अनन्या देखील आली पोह्यांचा ट्रे घेवून.

अनन्या समोर येताच सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. पाहताक्षणी अनिरुद्ध तर तिच्या प्रेमातच पडला. इतकी शिकलेली, हुशार, त्यात दिसायला इतकी सुंदर असलेली अनन्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी होती. वडिलांच्या माघारी मोठ्या हिमतीने संपूर्ण घराची जबाबदारी ती सांभाळत होती. अनिरुध्दलाही अशीच कर्तबगार मुलगी बायको म्हणून हवी होती. त्याने तर मनातून तिला होकारही दिला होता.

यथायोग्य पाहुणचार पार पडला. आता अनन्याशी बोलायला म्हणून तिला समोर बसवण्यात आले. सर्व फॉर्मल चर्चा संपन्न झाली. सर्वांनी आपापल्या परीने तिला प्रश्न विचारले. तिनेही बिंदासपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मुलाकडच्या मंडळींना तर ती केव्हाच पसंत पडली होती.

अनिरुद्धने तर नजरेतूनच होकार सांगितला आई बाबांना.

"आम्हाला पसंत आहे तुमची मुलगी. तुमचाही निर्णय लवकरच कळवा. शुभ कार्याला उशीर नको." म्हणत  अनिरुध्दच्या बाबांनी लगेचच त्यांच्याकडून होकार कळवून टाकला."

माधवीला तर खूपच आनंद झाला.

तितक्यात अनन्या बोलली, "पण मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचे आहे."

अनन्याच्या या वाक्याने क्षणभर घरात शांतता पसरली.

तेवढ्यात अनिरुद्धची बहिण म्हणाली, "बोल की मग,घाबरु नकोस ग."

अनन्याला ही तिच्या शब्दांनी जणू बळ मिळाले.

अनन्याने मग तिची अट सर्वांसमोर मांडली. तिच्या बोलण्याने मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच प्रश्नचिन्ह उमटले.

माधवीला तर आता पुन्हा एकदा एवढे चांगले स्थळ हातचे जाणार, याची खात्रीच पटली जणू.

"काय करावं ह्या मुलीचं? काहीच कळत नाही." तोंडातच माधवी पुटपुटली.

तेवढ्यात अनिरुद्धचे बाबा म्हणाले, आम्ही आमचा निर्णय लवकरच कळवतो.

"झालं, आता पुढे काही बोलायची सोयच नाही. काही वेळापूर्वी त्यांनी दिलेला निर्णय आता नक्कीच ते बदलणार."
माधवीच्या मनात विचारांचे चक्र जोरात धावू लागले.

पाहुण्यांनी निरोप घेतला आणि ते निघाले.

अनिरुद्ध मात्र अनन्याच्या त्या परखड बोलण्यावर अगदीच खुश झाला होता. प्रवासादरम्यान तो तिचाच विचार करत होता.

"खरंच किती बिंदास गर्ल आहे ही. कोणी काही का म्हणेना, पण तिला तिच्या कर्तव्याची जाणीव आहे," ही गोष्ट खूपच अभिमानास्पद होती तत्क्षणी. स्वतःच्या कुटुंबासाठी तितकीच हळवी आणि भावनाप्रिय अशी अनन्या अनिरुद्धला मनापासून आवडली होती.

अनिरुद्धने मनातून तर अनन्याचा बायको म्हणून तेव्हाच स्वीकार केला होता. पण आता आई- बाबा आणि ताई व भाऊजींचे मत खूपच इंपॉर्टन्ट होते त्याच्यासाठी.

सर्वजण घरी पोहोचले, तरी लग्न या विषयावर अजून कोणीही काहीही बोलेना."

क्रमशः

आता काय असेल अनिरुध्दच्या घरच्यांचा निर्णय? अनन्याला होकार देतील की नकार? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all