सून हवी की तिची कमाई? (भाग ४ अंतिम)

सुनेने माहेरी केलेली मदत सासरच्यांना पटत नाही.


अनिरुद्धचे आई बाबा अजूनही अनन्याला आपली सून म्हणून आणायला तयार नव्हते. कारण एकच ते म्हणजे लग्नानंतर होणाऱ्या सूनेने तिचा अर्धा पगार तिच्या आईला देण्याचे जे ठरवले होते. पण आता लेकासाठी त्यांनाही विचार करणे भागच होते.

"हे पहा आई बाबा आपल्याला अनिरुद्धचाही विचार करायला हवा हो. मान्य आहे तो तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही, पण त्यालाही ती मुलगी आवडली आहे." अनिरुद्धची ताई आई बाबांची समजूत घालत होती.

"अगं पण ती अर्धा पगार आयुष्यभर तिच्या आईला देणार म्हणतीये, हे कितपत योग्य आहे? असं डायरेक्ट कोणी मुलाच्या घरच्यांच्या तोंडावर सांगतं का? तिला नाही कळत पण तिच्या आईला तरी कळायला हवं ना. यावरूनच तिचे संस्कार दिसतात. थोडं विचारपूर्वक वागायला, बोलायला नको होतं का तिने? असं उद्धटपणे आणि अविचाराने उत्तर कोणी देतं का? बरं तिला जर माहेरच्या माणसांची एवढीच काळजी आहे तर मग लग्नच कशाला करत आहे ती. आयुष्यभर माहेरचाच आधार बनून राहावं तिने."

बऱ्याच वेळापासून सुरू असलेल्या चर्चेला मात्र अनिरुध्दच्या भाऊजींनी पूर्णविराम लावला.

"रागावू नका, पण मी बोलू का काही?"

"अहो असं काय विचारताय जावईबापू, बोला की. तुमचा तो अधिकारच आहे."

"नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय खरा, पण ती मुलगी मला तरी योग्यच वाटली या घरची सून होण्यासाठी."

"अहो, पण तिच्या चुकाही दुर्लक्षित करुन नाही ना चालणार जावईबापू."

"काय चूक आहे मामी तिची.?"

"म्हणजे तिने जे काही तिचे मुद्दे मांडले त्यांचे समर्थन करता तुम्ही?"

"अजिबात नाही. पण तिचे मुद्दे चुकीचे आहेत असे वाटतच नाही ना मला, मग समर्थन करण्याचा प्रश्न येतोच कुठे? तिला संपूर्ण अधिकार आहे तिचे मत मांडण्याचा. हे ती लग्नानंतर पण करु शकली असती, कोणालाही न सांगता. तेव्हा कोण काय करणार होते? शेवटी नोकरी तिची, पगार तिचा मग त्याचं काय करायचं हा सर्वस्वी तिचाच प्रश्न आहे; असे मला तरी वाटते. कारण लेक जरी परक्याचे धन असले तरी तिच्या कमाईचा विनियोग तिने कसा करायचा? हे ठरविण्याचा अधिकार देखील तिचा तिलाच असायला हवा."

"मुले तर स्वतःचा पगार नाही कधी सासुरवाडीला देत. पण मुली फक्त लग्न या एका अटीवर सर्वस्व बहाल करतात. हे का कोणाला दिसत नाहीये. त्यात लग्न केले म्हणजे आई वडिलांना पूर्णतः सोडून द्यायचे का? स्वतःच्या आई वडिलांना, नात्यांना बाजूला ठेवून तिने आयुष्यभर सासरच्या माणसांसाठीच जगायचे का?"

"बरं मांडले तिने तिचे स्पष्ट मत तर लगेच तिचे संस्कार काढले जातात. हे चुकीचे नाही का? उलट मी तर म्हणेन ज्या अनोळखी व्यक्ती बरोबर, तिला संपूर्ण आयुष्य काढायचे आहे त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी ती निदान अर्धा पगार तरी राखून ठेवण्याचा विचार करते. मग जन्मदात्या आईसाठी तिने तिचा अर्धाच पगार देण्याचे कबूल केले तर त्यात वावगे का ठरावे?"

जावई बापूंच्या बोलण्याने सर्वांना विचार करायला अखेर भाग पाडले होते. पण अजूनही त्यांचे बोलणे सुरुच होते.

"लग्नानंतर मुलींनी माहेर सोडून सासरी यायचं. ज्या आई वडीलांनी त्यांना लहानाचे मोठे केले त्यांचा कायमचा आधारही  त्यांना होता येत नाही. यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती? पण तिचे कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून तिने स्व कमाईतील काही हिस्सा आईला देवू केला तर लगेच तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते आणि आधी तिला होकार देणारेच लोक याच गोष्टीवरून लगेच तिला चुकीचे ठरवून नकारही देतात. वाह! रे न्याय."

"वडिलांच्या माघारी घराचा खरा आधारस्तंभ झालेल्या मुलीला जर तिच्या आईचा आणि भावाचा जर कायमस्वरुपी आधार बनावेसे वाटले तर त्यात गैर काय आहे?"

विनोदरावांच्या परखड बोलण्याचा सगळेचजण विचार करु लागले. आज पहिल्यांदा जावयाचे हे रूप सर्वांनी पाहिले होते.

"मला एक सांग वृषाली आणि मामी तुम्हीही सांगा, तुम्ही एक स्री आहात ना मग तुम्हाला दुसऱ्या स्रीच्या भावना नाही का समजत? उदया तुमच्या माहेरच्यांना जर तुमच्या आधाराची गरज भासली तर तुम्ही नाही का त्यांच्या मदतीला धावून जाणार? त्यात आईला वडिलांचा आधार नाही, अशा परिस्थितीत लेक जर आयुष्यभरासाठी आईचा आधार होवू पाहत असेल आणि त्याबरोबरच सासरची जबाबदारीही घेण्याचे धाडस करत असेल तर तिला आपण सपोर्ट करायचा की तिलाच चुकीचे ठरवायचे?"

भाऊजींचा आवाज ऐकून अनिरुध्द बाहेर आला.

"जावू द्या ओ भाऊजी, ह्यांना सांगून काही उपयोग होईल असे वाटत नाही. शेवटी खरे बोलणाऱ्याला संशयाच्या नजरेने पाहण्याची सवयच लागली आहे सर्वांना. मोठे म्हणतील ते ऐकायचे कारण त्यांचा अनुभव देखील तितकाच मोठा असतो ना म्हणून. पण मग ते कधीच चुकीचे असत नाहीत का?"

"अनिरुद्ध बस कर रे बाबा. आम्हाला आमची चूक समजली आहे. आज जावई बापूंमुळे आमचे डोळे खरंच उघडलेत. मोठेही चुकू शकतात हे त्यांनी आज पटवून दिले आम्हाला."

आता जास्त विचार न करता आणि वेळ न दवडता अनिरुध्दच्या बाबांनी लगेचच अनन्याच्या मामांना फोन करुन त्यांचा होकार कळवला सुद्धा.

अनन्याची अट मान्य करत अनिरुध्द आणि अनन्याचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून दिला घरच्यांनी.

आज एका लेकीचा तिच्या आधुनिक विचारांचा खरा विजय झाला होता. आईचा खरा आधार बनून वडिलांच्या माघारी सासर बरोबरच माहेरची जबाबदारी देखील मोठ्या हिमतीने सांभाळत होती अनन्या. यात अनिरुध्दची उत्तम साथ लाभली होती तिला.

खरंच आजही समाजात मुलीने लग्नानंतर माहेरी केलेली आर्थिक म्हणा किंवा इतर कोणतीही केलेली मदत सासरच्या मंडळींना पटत नाही. चुकून जर तिने तसे केलेच तर नाही नाही ते तिला ऐकवले जाते. पण ज्या आईवडिलांनी तिला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी खस्ता खाल्ल्या, तिला त्यालायक बनवले त्यांचाच अधिकार असू नये तीच्या कमाईवर? ही खूपच खेदाची बाब वाटते. स्वतःच्या कमाईचा काही हिस्सा तीने माहेरी दिला तर बिघडले कुठे?

थोडक्यात आई वडिलांनी लेकीला लहानाचे मोठे करायचे, तिला भरपूर शिक्षण द्यायचे, स्वतःच्या पायावर उभे करायचे. कशासाठी? आणि कोणासाठी? तर फक्त सासरच्या लोकांसाठी. त्यात पण तिने स्वतःहून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केल्या तर ठिक अन्यथा पुन्हा पुन्हा आयुष्यभर फक्त तीच चुकीची ठरणार आणि  ठरतच राहणार. कारण जग कितीही पुढे गेले तरी काही गोष्टींची पाळेमुळे ही इतकी खोलवर घट्ट रुतलेली आहेत की ती मुळासकट नष्ट करणे खरंच खूप कठीण काम आहे. हो ना???

समाप्त

सदरची कथा जरी काल्पनिक असली तरी कुठेतरी सत्य परिस्थितीचे कथन करणारी आहे. कारण लग्नानंतर मुलाने स्वतःच्या आईवडिलांना सांभाळायचे असते आणि मुलींनी स्वतःच्या नाही तर नवऱ्याच्या आई वडिलांना सांभाळायचे असते. थोडक्यात काय तर "लेक म्हणजे परक्याचे धन" या परंपरावादाला घातलेले हे खतपाणी आहे एका अर्थाने, असे नाही का वाटत? परंतु त्यातही काही ठिकाणी अनिरुद्धसारख्या विचारांचे लोक असतील तर मग समजूतदारपणे परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य अभिमानास्पद वाटते. 

हे असे असले तरी या कथेतून कोणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. चुकून जर काही साम्य आढळलेच तर तो निव्वळ योगायोग समजावा.

धन्यवाद

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all