सून हवी की तिची कमाई? (भाग १)

सुनेने माहेरी केलेली मदत सासरच्यांना पटत नाही.


"हे बघ अनु, तुला किती वेळा सांगितले आहे मी, नको त्या गोष्टीसाठी नको ना ग असा हट्ट धरूस."

"आई याला हट्ट नाही म्हणत ग."

"अगं तुझ्या एका हट्टामुळे एक एक करत चांगली स्थळं हातातून निसटून चाललीत ग. आणि त्याबरोबरच तुझे वय देखील. ते नाही ना ग थांबून राहणार बाळा."

"अगं आई , मी काही इतक्यात म्हातारी नाही होणार बरं. आणि मलाही माझे काही विचार आणि मते आहेत ग."

"हो आहेत ना, पण मी कुठे काय म्हणते. फक्त तेवढी एक गोष्ट सोड ना ग."

"हे बघ आई, तू नेहमी नेहमी तेच तेच नको ग सांगू मला. आणि  माझा हट्ट काही जगावेगळा नाहीये ग. का समजत नाहीये तुला?"

"अगं पण तुझ्या या बिंदास बोलण्याचे वेगळेच अर्थ निघतात ना बाई. ते कसं समजत नाही तुला? मला माहितीये तू कशी आहेस. पण समोरचे लोक नाही ओळखत तुला."

"हा मग नाही ना ओळखू दे."

"तुझी अट सांगितली तर, मुलगी उद्धट आहे, आताच जर तिला माहेरची एवढी पडली आहे तर पुढे जावून सासरची किंमतच राहणार नाही तिला. असा अर्थ निघतो ग बाळा त्याचा."

"हे बघ आई, खोटं बोलून,असे विचार लपवून मी एखाद्याला चुकीच्या आशेवर नाही ठेवू शकत."

"धन्य आहे बाई तुझ्या समोर.तू शेवटी तुझेच खरे करणार तर."

"अगं आई अशी एक तरी व्यक्ती असेल ना की जिला माझे विचार नक्कीच पटतील. आणि अशीच व्यक्ती माझ्यासाठी माझ्या दृष्टीने योग्य असेल."

"बरं बाई आवर आता लवकर. पाहुणे यायची वेळ झाली. त्यात तुला समजून सांगणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे.
अनिश चल बाबा हिच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. शेवटी ती तिचेच खरे करणार."

"आई पण मला ताईचे म्हणणे पटतंय. मी सुद्धा उद्या माझ्यासाठी मुलगी पाहताना तिची मते नक्कीच विचारात घेईल. शेवटी मला बायको हवी आहे, एक हक्काची जोडीदार. ना की तिचा पगार."

"हो का, चला हे एक बरं झालं. उंदराला मांजर साक्ष म्हणतात ते काही खोटं नाही. तू कधी सोडणार आहेस का तुझ्या ताईची बाजू? आणि जास्त विचार नको करुस स्वतःच्या  लग्नाचा त्याला अजून खूप वेळ आहे बरं का? आतापासूनच नका लग्नाची स्वप्न पाहू."

"अगं मी फक्त माझं मत सांगितलं ग आई."

"बरं बरं आवरा रे बाबांनो लवकर, पाहुणे कधीही येतील."

माधवी आणि महेशचे छानसे चौकोनी कुटुंब. अनन्या आणि अनिश ही दोन समजूतदार मुले म्हणजे त्यांच्या घराची शान.

सारं काही व्यवस्थित सुरळीत असतानाच महेशचे कर्करोगाचे निदान झाले. साधारणपणे सहा ते सात वर्षे तो कर्करोगाशी झुंज देत होता. मुलांचे शिक्षणही त्यात सुरू होते. उत्तम पगाराची नोकरी हाताशी असल्याने मुलांचे शिक्षण, आजारपण आणि घरखर्च हे सर्व व्यवस्थितरित्या महेश सांभाळत होता.

परंतु, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. साधारणपणे एक दीड वर्षांपूर्वी महेशचे दुर्दैवी निधन झाले.

नशिबाने अनन्याचे शिक्षण पूर्ण होवून महेश गेला त्यावेळी ती नुकतीच एका नामांकित कंपनीत जॉईन झाली होती. त्यामुळे आता माधवीला लेकीचाच काय तो आधार होता. अनिशचे मेडिकलचे शिक्षण मात्र सुरूच होते. आता कुठे तो मेडिकलच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता.

माधवीच्या मनात आले महेश होता तेव्हा गोष्ट वेगळी होती. आता मुलांची संपूर्ण जबाबदारी तिच्या एकटीवर होती. त्यामुळे योग्य वयात अनन्याचे लग्न करण्याचा निर्णय माधवीने घेतला.

परंतु, अजून अनिशचे शिक्षण देखील बाकी होते.

"आई इतक्यात मला नाही लग्न करायचे." या मतावर अनन्या ठाम होती. पण आता पंचविशीच्या घरात असलेली अनन्या लग्नाच्या वयाची झाली होती. त्यामुळे माधवीला काहीही झाले तरी योग्य वयातच तिचे लग्न व्हावे अशी अपेक्षा होती.

माधवीने आणि तिच्या भावाने म्हणजेच अनन्याच्या मामाने कशीबशी तिची समजूत काढून तिला लग्नासाठी तयार केले होते.

पण अनन्याने मात्र त्यासाठी एक मोठी अट ठेवली त्यांच्यासमोर.

क्रमशः

आता काय असेल अनन्याची अट? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all