सून फक्त त्या घरची? अंतिम भाग

सासरी गेल्यावर माहेर विसरणार्या लेकीची कथा


सून फक्त त्या घरची?


सून फक्त त्या घरची? अंतिम भाग

मागील भागात आपण पाहिले की मीराच्या वहिनीला भारी आहेर आणि आपल्याला साधा हे पाहून सुमेधा चिडते. आता पाहू पुढे काय होते ते..


" हे ग काय आई? वहिनीच्या वहिनीला भारीतली साडी आणि मलाही अशी?"
" पहिली गोष्ट तिला साडी मीराने तिच्या पैशाने घेतली. तुला मी माझ्या पैशाने घेतली. तिने त्यांना का घेतले ते तिला विचार.. माझे म्हणशील तर माझ्याकडे जेवढे पैसे होते तेवढ्यात मी आहेर बसवला. तूच म्हणतेस ना जवळची माणसे घेतील सांभाळून.. तसेच तू ही घे की आम्हाला सांभाळून." आपलाच डायलॉग ऐकून सुमेधा गप्प झाली.
" सुमेधा माझे विचारशील तर आईबाबा कितीतरी दिवस आजारी आहेत. दादावहिनी माझी काहीच मदत न घेता एकटेच सगळे करत आहेत. त्यांच्या आजारपणात खूप खर्च होतो आहे म्हणून त्यांनी सगळे वायफळ खर्च कमी केले आहेत. अशावेळेस एक बहिण म्हणून मी एवढे तर नक्कीच करू शकते ना? आणि तसेही माझ्या दादाने माझ्यासाठी खूप केले आहे, करतो आहे. अशावेळेस त्याला अशी नाही तर तशी मदत करणे मला तरी योग्य वाटले. मी केली.."
" आणि हो आपल्याला नको असलेल्या वस्तू माहेरी देण्यापेक्षा काहीतरी नवीन घेऊन दे असे मीच सुचवले तिला.." सुयशने पण आपली खंत बोलून दाखवली..
" तू हे मला बोलतो आहेस का?" सुमेधाने विचारले.
" तू तशी वागतेस का?" सुयशने प्रत्युत्तर केले.
" तू असे बोलतो आहेस.. पण वहिनीने सुद्धा आजच हे केले ना? इतके वर्ष कुठे हे सगळे केले?" सुमेधा नाक उडवत म्हणाली. मीराने सुयशला नको अशी खूण केली. पण सुयश गप्प बसला नाही.
" त्याचे काय आहे सुमेधामॅडम इतके वर्ष मीरा तिच्या आईबाबांच्या हातात पैसे देत होती."
" का? तिचे आईबाबाही तसे खाऊन पिऊन सुखी आहेत की?"
" मीरा, ते खाऊन पिऊन सुखी आहेतच ग. कसं असतं ते बघ. आपण लहान असतो तेव्हा आपले सगळे हट्ट आपले आईबाबा पुरवतात. कधी कधी त्यांना ते परवडत नसताना आपल्यासाठी हवे ते करतात. मग आपण कमावत असताना त्यातलाच एक भाग त्यांना गरज असो वा नसो दिला तर काय हरकत आहे? म्हातारपणी त्यांनाही पैशांची गरज असतेच ना. आता माझी आई घरातच होती. बाबांची प्रायव्हेट नोकरी. त्यामुळे त्यांना पेन्शन नाही मिळत. म्हणून इतके दिवस मी त्यांच्या हातात पैसे देत होते. आता ते पैसे बाहेर जाऊन खर्च करू शकत नाहीत. मी दादा वहिनीला देऊ केले तर त्यांनी घेतले नाहीत. म्हणून हा खटाटोप. "
" हा आजचा कार्यक्रम मला सुनवण्यासाठी आहे का?" सुमेधाने रडवेली होत विचारले.
" आम्ही कोण तुला सुनावणारे. पण दोन गोष्टी तुला सांगेन म्हणते. चालेल ना जावईबापू?" वृंदाताईंनी विचारले. हे काय चालले आहे हे न समजलेल्या शशांकने मान हलवली.
" कसे असते सुमेधा, प्रत्येक आईबाबांना आपली मुले प्रिय असतात. त्यांच्यासाठी करणे हे त्यांचे कर्तव्यच असते. मुले मोठी होतात. त्यांची लग्ने होतात. मुली दुसर्‍या घरी जातात, दुसर्‍या घरातील मुली आपल्या इथे येतात. इथे सुरू होते बाईची खरी कसोटी. कोणतीही दोन घरे कधीच एकसारखी नसतात. एक लहान एक मोठं असायचेच.. या दोघांचाही समतोल राखणं , मान जपणं जमले पाहिजे. सासर माहेरपेक्षा गरीब म्हणून सासरच्यांचा अपमान करणे जेवढे चुकीचे तेवढेच माहेर गरीब म्हणून त्यांना कमी लेखणेही. मीरासारखे तू तुझ्या आईवडिलांना काहीतरी दे असे आमचे म्हणणे नाही पण म्हणून तू एकाला एक आणि दुसर्‍याला दुसरा नियम लावलास तर ते मात्र चुकीचे. त्या दिवशीचेच बघ.. जावईबापू तुम्हाला थोडा राग येईल तरिही ऐका आणि कोणाचे चुकले ते सांगा.. सुमेधा तू तुझ्या दूरदूरच्या सासवांसाठी , त्यांच्या मुलींसाठी भारीतल्या साड्या घेतल्यास पण आमच्या दोघींसाठी साध्या साड्या. का? तर म्हणे पैसे संपले. तू नंतर जाऊन साड्या घेऊ शकत नव्हतीस की इतर वेळेस मिरवणारे क्रेडिट कार्ड तुझ्याकडे नव्हते. प्रश्न साडीचा नाही. कपाट उघडले तर ढीगभर साड्या पडतील आमच्या दोघींच्या. प्रश्न तुझ्या मानसिकतेचा आहे. गरज लागली की माहेराने अडीअडचणीला उभे रहायचे पण करायची वेळ आली की सगळे सासरी करायचे. माझे सोड, मी आई आहे तुझी. पण हे सगळे या दोघांनी का सहन करायचे? आज तुला पहिल्यांदा अशी साडी दिली तर वाईट वाटले. मग गेले दोन वर्ष तू कशी वागते आहेस? हेच जर तुझ्या मुलीने तुझ्यासोबत केले तर?" वृंदाताईंनी विचारले.
" आई, नको ना असे बोलूस.. माझी चूक मला समजली. मी यापुढे हे सगळे नक्की लक्षात ठेवीन. " सुमेधा रडत आईच्या गळ्यात पडत म्हणाली.
" हो.. मी पण.. यापुढे आमचे काहीही चुकले तर नक्की सांगत जा." शशांक म्हणाला.
" आता तुमचे हे सगळे बोलून झाले असेल तर मी आणलेली कुल्फी द्या सगळ्यांना म्हणजे गरम झालेले वातावरण पण थंड होईल आणि डोकेही. " सुरेशराव हसत म्हणाले.
" हो बाबा.." सुमेधा आईच्या कुशीत शिरत म्हणाली.


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर दादर मुंबई

🎭 Series Post

View all