सून फक्त त्या घरची? भाग २

सासरी गेल्यावर माहेर विसरणार्या लेकीची कथा


सून फक्त त्या घरची? भाग २

मागील भागात आपण पाहिले की सासरी खर्च करताना मागेपुढे न बघणारी सुमेधा माहेरी मात्र नेहमीच आखडता हात घेत असते. त्यातून तिच्या माहेरचे दुखावले जातात. बघू आता वृंदाताई यातून कशा मार्ग काढतात.

" मीरा, तुझ्या भावाला आणि वहिनीला पुढच्या रविवारी जेवायला बोलव." वृंदाताईंनी मीराला सांगितले.
"अचानक?" मीराने आश्चर्याने विचारले.
" हो.. माझे काम आहे थोडे." असे म्हणत वृंदाताई मीराच्या कानात कुजबुजल्या. खिन्न झालेल्या मीराचा चेहरा उजळला.
दुसर्‍याच दिवशी वृंदाताईंनी सुमेधाला फोन करून जेवणाचे आमंत्रण दिले.
" अचानक का?" सुमेधाने विचारले.
" अग, आम्ही काय वास्तूशांतीला येऊ शकणार नाही. बाबांना थोडे बरे नाही. या दोघांना सुट्टी मिळेल की नाही माहित नाही. मी एकटी येऊन तरी काय करणार? तरिही म्हटले रीत चुकायला नको. तुझे मानपान तर करायलाच पाहिजे ना?"
यावर जराही आग्रह न करता सुमेधाने होकार दिला. मनात कुठेतरी वृंदाताईंना वाटत होते की सुमेधा म्हणेल तुला जमत नसेल तर मी काहीतरी व्यवस्था करते पण तू तरी येच.. पण तिच्या तोंडून तसा शब्दही बाहेर पडला नाही.. त्यांनी सुस्कारा सोडला.. आणि त्या स्वतःच्या योजनेकडे वळल्या.
रविवारी मीराचे भाऊ भावजय लवकरच आले. येताच मदतीसाठी म्हणून त्या स्वयंपाकघरात गेल्या. मीराने आधीच तयारी करून ठेवली होती. तरिही त्या तिच्यासोबत थांबल्या. बाराच्या सुमारास सुमेधा आणि शशांक आले. सुमेधा आल्यावर दमले करत हॉलमध्येच बसली. तोपर्यंत मीरा आणि तिच्या वहिनीचा सगळा स्वयंपाक झाला होता. वृंदाताईंनी तोवर बाकीची कामे आटोपली होती. पाने वाढायला घेतली. नेहमीप्रमाणे सुमेधा लगेच जेवायला बसली. मीराच्या वहिनीलाही वृंदाताईंनी बसायला सांगितले. त्या नकोच म्हणत होत्या पण आग्रहाने त्यांना जेवायला बसवलेच. सगळ्यांची जेवणे झाल्यावर मीरा आहेर घेऊन आली. सगळ्यात आधी तिने दादा वहिनींना पाटावर बसवले. त्या दोघांना काही कळेचना काय चालू आहे ते.
" आज काय खास? यांना आहेर वगैरे?" सुमेधाने आईला विचारले.
" समजेल.." वृंदाताई तिला थोपटत म्हणाल्या.
" अग हे काय आज मध्येच?" वहिनीने आश्चर्याने विचारले. मीराने काहीच न बोलता पिशवीतील साडी काढली. ती भरजरी साडी बघून वहिनी आणि सुमेधा आश्चर्यचकित झाले..
" मीरा हे काही नको.. साधी ओटी भर फक्त.."
" नाही वहिनी. मी आज तुझे काहीच ऐकणार नाही. तुला हे घ्यायलाच हवे." वृंदाताईंनी सुयशच्या हातात एक डबी दिली. ती त्यांनी मीराच्या दादाला द्यायला सांगितली. त्यात एक सोन्याचा वेढा होता.
" हे सगळे खूपच जास्त होते आहे." दादाही संकोचला. सुयश आणि त्याचे बाबा बघत होते.
" काही जास्त होत नाही. तुम्ही उगाच संकोच बाळगू नका." वृंदाताई म्हणाल्या.
" हो.. ना.. खरे सांगू दादा.. तुला तरी दिवाळी, रक्षाबंधन या निमित्ताने काही ना काही दिले जाते. पण वहिनीसाठी काहीच केले जात नाही.. म्हणून हे खास तिच्यासाठी.." मीराच्या वहिनीचे डोळे पाणावले. तिने पटकन वृंदाताई आणि सुरेशरावांना नमस्कार केला. आणि मीराला मिठीत घेतले.
" खूप छान वाटले.."
" आता आम्ही निघू का? आईबाबा आणि मुले एकटीच आहेत. मुले याच्यापेक्षा जास्त नाही करू शकत त्यांचे."
" मी तोच विचार करत होते पार्थ आणि पिहू का दिसत नाही. " सुमेधाने विचारले.
"बाबा बेडरिडन आहेत आणि आईचे सांधे दुखतात. मी कामाला जाते तेव्हा बाई असतात. आज रविवार म्हणून मग आम्हीच करतो त्यांचे सगळे. मीराने बोलावले म्हणून इथे आलो. आईबाबांना हवे नको ते बघायला मुले घरी थांबली आहेत. हिच्यामुळे आज रविवारी बाहेर पडलो नाहितर फक्त घर आणि ऑफिस एवढेच चालू आहे आमचे सध्या."
" अच्छा.." सुमेधाला आश्चर्य वाटले. त्यांची घाई होती म्हणून ते गेल्यावर वृंदाताईंनी सुमेधाला पाटावर बसवले. तिला एक साधीशी साडी आणि शशांकला चांदीचे छोटे निरांजन. ते बघून सुमेधाला राग आला..


पुढील भागात पाहू सुमेधा यावर कशी वागते. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all