

एका गावात एक गरीब दाम्पत्य राहत होते. बऱ्याच वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. दोघेही खूप आनंदीत झाले. मुलाला कुठे ठेवू नि कुठे नको असे त्यांना झाले. मात्र ती स्त्री अचानक दुःखी राहू लागली. तिच्यातील बदल तिच्या नवऱ्याच्या लक्षात आला. त्याने तिला समजावले व दुःखाचे कारण विचारले. तेव्हा ती स्त्री त्याला सांगू लागली. आपल्याला मूल व्हावं म्हणून मी आपल्या ग्रामदेवतेजवळ नवस बोलले होते .
कोणता तो नवस? मला तर तू या बाबतीत काहीच सांगितले नाहीस. आता तरी सांग मला. त्यावर ती स्त्री म्हणाली आपली जी ग्रामदेवता आहे तिला मी, जर मला मूल झालं तर मी तुला "सोन्याचं टोपडं" वाहीन असा नवस बोलले होते. आता मी हा नवस कसा फेडणार? आपण पडलो गरीब. आता काय करावे?
त्या स्त्रीचा नवरा हुशार. (आजच्या भाषेत स्मार्ट) तो म्हणाला, अरेच्चा एवढेच नां ! अगं बाराव्या दिवशी जेव्हा आपण आपल्या बाळाचं बारसं करू तेव्हा त्याचे नाव सोन्या ठेवू. मग तू त्याचे एखादे टोपडे देवतेला अर्पण करून येऊ.. त्यासाठी कशाला दुःखी होतेस. तिला तिच्या नवऱ्याची गोष्ट पटली.
बाराव्या दिवशी त्यांनी आपल्या मुलाचे बारसे करण्याचे ठरवले. आणि मुलाचे नाव सोन्या ठेवले. त्या मुलाचे म्हणजे सोन्याचे टोपडे ग्राम देवतेला अर्पण करून त्यांनी नवस फेडला आणि आता ते दोघेही आनंदात राहू लागले.
तात्पर्य -
परमेश्वर भावाचा भुकेला असतो म्हणून म्हणतात नां "भाव तिथे देव " त्याला तुमच्या सोन्या नाण्याच्या वस्तूंचा काय उपयोग? आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण असे नवस बोलून एक प्रकारे देवाला ' लाच ' देतो. मनोभावे म्हणजे केवळ अंतःकरणातून दिलेली हाक परमेश्वरापर्यंत पोहोचते. म्हणून मनोभावे परमेश्वराची प्रार्थना करा. काही वस्तू कबूल केल्याचं पाहिजेत असे नाही.
सौ. रेखा देशमुख