सोन्याचा पिंजरा भाग ४

कथा पिंजऱ्यात अडकलेल्या एकीची


पिंजरा सोन्याचा भाग ४


मागील भागात आपण पाहिले की निमिषा बाळंतपणासाठी माहेरी जाणे अखिल एकटा राहिल या काळजीने टाळते. आता बघू पुढे काय होते ते..

" अखिल, अरे हे काय करतो आहेस?"
" जास्त काही नाही.. तुझे सुजलेले पाय फक्त चेपून देतो आहे. बरं वाटतंय का आता?"
" हो.. अखिल मला असे वाटते की आता तरी आईकडे मी जायला हवेच. मला ना खूप कसंतरी होते आहे. आईपण सकाळी येणार होती तोच पाहुणे आले म्हणून राहून गेले. आई ग..." बोलता बोलताच निमिषाला कळा यायला सुरुवात झाली. अखिल खूप घाबरला. पण त्यातूनही त्याने निमिषाच्या घरच्यांना दवाखान्यात यायला सांगितले. तो स्वतः निमिषाला घेऊन दवाखान्यात निघाला. वेदनेने निमिषाचा चेहरा जेवढा पिळवटत होता तेवढेच दुःख अखिलच्या चेहर्‍यावर दिसत होते. तिला होणारे दुःख त्याला सहन होत नव्हते. रात्रभर वेदनेने तळमळणार्या निमिषाशेजारी तो बसून राहिला. निमिषाच्या आईवडिलांना समजेना आत गेलेल्या मुलीची काळजी करायची की बाहेर तडफडणार्या जावयाची. पण सगळ्यांचीच प्रतिक्षा लवकरच संपली.. एका गोंडस बाळाचा जन्म झाला आहे असे सांगत नर्सबाई बाहेर आल्या. ते छोटेसे बाळ हातात घेताना सगळेच हरखले होते.. अखिलची नजर शोधत होती निमिषाला.. आत जाऊन त्याने आधी निमिषाला पाहिले. ती बरी आहे हे बघून त्याच्या जीवात जीव आला.
" तुला जास्त त्रास नाही ना झाला?" अखिलने काळजीने विचारले. निमिषा त्याच्या गालावरून हात फिरवत फक्त हसली. त्याच्या डोळ्यातून पाणी आले. निमिषा घरी गेल्यावरही अखिल बाळाला आणि तिला भेटायला रोज तिच्या घरी जायचा. त्याची तगमग बघून शेवटी बारसे लवकर उरकायचे ठरले. बारशाच्या दिवशी परत अखिलचे सगळेच नातेवाईक आले.
बाळाला बघून सगळेच खुश झाले. पियुला घेऊन सगळे घरी आले. रात्री वहिनी निमिषाच्या खोलीत झोपल्या. अखिलचा खोलीतून पाय निघत नव्हता. पण एकाच दिवसाचा प्रश्न आहे म्हटल्यावर नाईलाजाने तो गेला. पियु झोपल्यावर निमिषाने कडी लावून घेतली. आत दोघीच होत्या. वहिनींचा नील बाहेर झोपला होता.
" वहिनी एक विचारू?" पियुच्या अंगावर पांघरूण घालताना निमिषाने विचारले.
" बोल ना.."
" तुम्ही.." वहिनींनी तोंडावर बोट ठेवले. त्या हळूच दरवाजाजवळ गेल्या. दरवाजा उघडला. " पाणी राहिले वाटते." असे म्हणत बाहेर गेल्या. दरवाजातच दादा उभे होते. वहिनींना अचानक बघून ते दचकले.
" काय झाले?"
" पाणी संपले होते.." वहिनी रिकामी बाटली दाखवत म्हणाल्या.
" बरं.." दादा गुरगुरले.
वहिनी बाटली भरून आत आल्या. अंथरूणावर पडल्या.
" आता हळूच बोल, जे बोलायचे ते."
" तुम्ही काही सांगणार होता का मला डोहाळजेवणाच्या दिवशी?" वहिनी आधी थोड्या घाबरल्या पण मग धीराने बोलायला लागल्या.
" जास्त वेळ नाही आपल्याकडे.. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव.. बाहुली बनून राहू नकोस.. एकदा या पिंजऱ्यात अडकलीस ना तर बाहेर पडणे मुश्किल होईल तुझे."
" काय ते स्पष्ट सांगा ना?" निमिषाने विनवले. वहिनी पुढे काय बोलणार तोच दरवाज्यावर हलकी थाप पडली. वहिनींनी तिला डोक्यावर पांघरूण घेऊन झोपायला सांगितले.
" कोण?" असे म्हणत त्यांनी दरवाजा उघडला. बाहेर सासूबाई होत्या.
" झोपली का पोर?"
" हो.. निमिषा पण झोपली. मी पण झोपतच होते."
" तेच बघायला आले होते. बाळाचा आवाज आल्यासारखा वाटला. झोप तू पण. आपल्याला उद्या लवकर जायचे आहे."
" हो सासूबाई.." वहिनींनी दरवाजा लावून घेतला. निमिषाने तोंडावरचे पांघरूण काढले. ती काही बोलणार तोच वहिनींनी नकोची खूण केली. बाहेर हलकेच शिंकण्याचा आवाज आला.. दोघीही नाईलाजाने झोपायला गेल्या.. दुसर्‍या दिवशी निमिषाने वहिनींना एकटे गाठायचा खूप प्रयत्न केला पण त्यांना कोणीच एकटे सोडेना. निघताना वहिनी फक्त म्हणाल्या, " मी बाळासाठी जे सांगितले ते विसरू नकोस.."
सगळे गेल्यावर निमिषाचे नवीन आयुष्य सुरू झाले. अजून चार महिने तरी तिला ऑफिस नव्हते. अखिलने सगळ्या कामांसाठी बाई लावली होती. ऑफिसमधून आल्यावर तो स्वतः बाळाला घेऊन खेळवायचा. निमिषाला कसलाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यायचा. निमिषाला त्याच्या या प्रेमाने अगदी भरून यायचे.. दिवस उलटत होते. तीन महिन्यांनी निमिषाने विषय काढला..
" अखिल मला वाटते आपण आता बाळाला थोडा वेळ आईकडे ठेवूयात."
" का ग?" बाळाला खेळवणाऱ्या अखिलने विचारले.
" अरे मला पुढच्या महिन्यापासून ऑफिस नाही का सुरू करायचे. हळूहळू पियुला पण त्यांची सवय व्हायला हवी ना.."
" तुला ऑफिसला जायलाच हवे का?" अखिलने विचारले..


काय असेल निमिषाचा निर्णय? अशी कोणती गोष्ट आहे जी तिला समजून नये अशी अखिलच्या घरातल्यांची इच्छा आहे. बघू पुढील भागात..

🎭 Series Post

View all