सोन्याचा पिंजरा

फक्त श्रीमंतीला भुलून लग्न केलेल्या मुलीच्या आयुष्याच्या वाताहतीची कथा.

आज शनिवार मुलांनी पार्कमध्ये जायचा हट्टच केला होता, म्हणून ज्योती ऑफिसमधून लवकरच घरी जायला निघाली. ज्योतीच्या ऑफिस पासून घरी जायच्या वाटेवरच राकेशचे ऑफिस होते. ऑफिस मधून निघताना तिने राकेशला घ्यायला येतेय म्हणून फोन केला होता, त्याने सुद्धा हातातले काम लवकर संपवले आणि लगेच निघाला. ज्योती आणि राकेश घरी पोहोचले, तेव्हा मुलांनी बाहेर जायचं म्हणून गोंधळ घालायला सुरुवात केली. ज्योती आणि राकेश भोवती फेर धरून नाचायला सुरुवात केली.


सात वर्षाची स्वरा आणि पाच वर्षाचा शिव, ज्योती आणि राकेश यांच्या संसार वेलीवरील दोन गोड फुलं उमलली होती. घर कसे भरल्या गोकुळासारखे वाटत होते. आपल्या मुलाचा असा सुखी संसार बघून राकेशच्या आईवडिलांचे काळीज सुपा एवढं झालं होतं.

ज्योती आणि राकेश पटकन फ्रेश होऊन बाहेर आले. तेवढ्यात बाहेरून जोरजोरात हॉर्नचा आवाज यायला लागला. बघितलं तर मुलं गाडीमध्ये जाऊन बसली होती आणि हॉर्न वाजवून आई-बाबांना बोलवत होती. ते बघून दोघांना हसायला आलं. आज खूप दिवसानंतर त्यांना मुलांसोबत मोकळा वेळ घालवायला मिळणार होता. एरवी दोघं ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त असायची.

मुलांचा आवाज ऐकून राकेश पटकन ड्रायविंग सीटवर जाऊन बसला. गाडी सुरू करणार तेवढ्यात स्वराने फर्माईश केली, "मम्मा आज तू गाडी चालवायची, डॅडा तु बाजूला बस."

"ओके गं माझी लाडकी प्रिन्सेस!" असं म्हणत राकेश बाजूच्या सीटवर जाऊन बसला. ज्योतीने गाडी सुरू केली आणि थोड्याच वेळात सगळे पार्कमध्ये पोहोचले. मुलं लगेचच खेळण्यासाठी पळाली.

बाजूच्या झाडाखाली चटई टाकून ज्योती आणि राकेश मुलांकडे कौतुकाने बघत बसले होते. तेवढ्या ज्योती लक्ष समोरच्या बाकड्यावर बसलेल्या एका स्त्री कडे गेले,
"कोण बरं असावी ही? हिला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते."
ज्योती मनातच विचार करत होती.

तेवढ्यात तिला आठवलं,
"अरे ही तर मोहित्यांची रेवा आहे. आम्ही एकाच तर कॉलनीत राहायचो. एवढंच काय, आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. तशी आमची फारशी घट्ट मैत्री नव्हती, पण शाळेमध्ये रेवा खूपच हुशार होती. तिने पहिला नंबर कधीच सोडला नाही. सुंदर सुंदर रांगोळ्या काढायची, सुंदर चित्र रेखाटायची, एकदम ऑलराऊंडर होती. बापरे! तिला अगदी दहा वर्षानंतर बघतीये."
ज्योती तिला बघत आपल्याच विचारात हरवली होती.

समोरची बाई एकटक आपल्याकडे बघते आहे, हे बघून रेवा सुद्धा ज्योतीच्या दिशेने बघायला लागली. ते बघून ज्योतीने आपला हात उंचावत हलवला, इकडून रेवाने सुद्धा हात हलवत तिला प्रत्युत्तर दिले.

एवढा वेळ ज्योतीचे निरीक्षण करत बसलेला राकेश ज्योतीला म्हणाला,
"काय गं, कोण आहे ती?तू तिला ओळखतेस का?"

"अरे हो, ही रेवा, माझी क्लासमेट होती. आम्ही एकाच कॉलनीत राहायचो, बस एवढंच."

"अरे मग लांबूनच काय हात हलवते? तुझी मैत्रीण आहे म्हणतेय ना, जाऊन भेट मग."

"अरे हो, आलेच हा."
ज्योती उठून रेवाकडे गेली.

"तू रेवा ना? मोहिते काकांची?" ज्योतीने विचारले
रेवा म्हणाली,
"हो आणि तु ज्योती बरोबर?"

ज्योती म्हणाली,
"हो रेवा, किती बदलली आहेस तू? सुरवातीला मी तुला ओळखू शकले नाही."

यावर रेवा म्हणाली,
"हो, तू पण किती बदलली आहे, पण छान गोड दिसतेस."

"थँक्यू! एकटीच आलीस?" ज्योतीने विचारले

रेवा म्हणाली,
"अगं नाही, मुलाला घेऊन आलेय. तो बघ समोर खेळतोय, माझा मुलगा ध्रुव."

ज्योती म्हणाली,
"अरे वा! खूप गोड आहे गं, अगदी तुझ्यासारखाच. ती घसरगुंडी खेळत आहेत ना, ती माझी मुले स्वरा आणि शिव आणि झाडाखाली चटईवर बसला आहे ना तो माझा नवरा राकेश. तुझे मिस्टर नाही आले का?"


"अगं नाही, त्यांना ऑफिसमध्ये खूप कामं असतात, वेळच नसतो. ध्रुवची इच्छा होती, म्हणून मीच त्याला घेऊन आले. बरं, ते जाऊदे, तुमची खूप गोड फॅमिली आहे गं. तुला भेटून खूप छान वाटलं." रेवाने सांगितले.

"हो गं, मला खूप छान वाटलं. माहेरचं कोणी तरी भेटलं की आनंद होतो नाही. बरं ऐक, हा घे माझा पत्ता, रविवारी मिस्टरांना घरी घेऊन ये." रेवाला कार्ड देत ज्योतीने तिला घरी येण्याचे निमंत्रण दिले.

रेवा म्हणाली,
"अगं नको, त्यांना काम असतात, रविवारी सुद्धा वेळ नसतो. त्यापेक्षा तूच माझ्याकडे ये ना. तुझ्याशी खूप बोलायचं आहे, खूप गप्पा मारुयात."
ज्योती म्हणाली,
"मला पण तुझ्याशी खूप बोलायचं आहे. ठीक आहे, मी रविवारी तुझ्याकडे येते."

एवढे बोलून दोघींनी हसतच एकमेकींचा निरोप घेतला. रेवा भेटून गेल्यापासून ज्योतीला तिला भेटण्याची खूप उत्सुकता लागली होती.

पार्क मधून परत येताना ज्योती आपल्याच विचारात हरवली होती, तिला तिचे लहानपणीचे दिवस आठवत होते.

लहानपणापासूनच रेवा खूप हुशार आणि दिसायला एकदम सुरेख होती. गोरी गोरी, कुरळे कुरळे केस, निळेशार डोळे, ती अगदी परीसारखी दिसायची. अभ्यासातही ती खूप हुशार होती. शाळेतल्या सर्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायची, एवढंच नाहीतर जिंकायची सुद्धा. कॉलनी मध्ये मुलांसोबत क्रिकेट खेळायची. सगळ्यांना तिचं किती कौतुक होतं. तिची आई तर अभिमानाने सगळ्यांना सांगायची माझी रेवा लाखात एक आहे.

ज्योती मात्र त्याउलट होती. दिसायला काळीसावळी, कपळावर उतरेल एवढं तेल लावून केसांच्या दोन वेण्या घालणारी, तेलकट चेहऱ्याची, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा असलेला, अगदी गबाळ ध्यान दिसायची ज्योती. ती कशीबशी बी.कॉम झाली होती. दिसण्यावरून, तिच्या सावळ्या रंगावरून तिला नेहमीच चारचौघात टोमणे मारले जायचे, घालून पाडून बोलले जायचे, त्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी झाला होता.

रेवाला कुठलंतरी स्थळ चालून आलं होतं, नवरा मोठा सरकारी अधिकारी होता. गावाकडे जमीन-जुमला होता. अगदी तालेवार कुटुंब होतं. नवरा सुद्धा रेवाला साजेसा अगदी राजबिंडा होता. रेवाच्या घरच्यांनी अगदी आनंदात लग्न लावून दिलं. काय थाट होता त्या लग्नाचा, अहाहा! अगदी नवरा नवरीला घरी न्यायला हेलिकॉप्टर आलं होतं.

ज्योतीला मात्र कितीतरी स्थळं येत होती आणि बघून गेले की,नकार देत होते. आत्मविश्वास गमावलेली ज्योती, तिची कुठे नोकरीही टिकत नव्हती. ३७ स्थळांनी नाकारल्यानंतर शेवटी राकेश ज्योतीला बघण्यासाठी आला होता. उंचापुरा देखणा राकेश एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत होता. एवढे नकार पचवल्यानंतर आता हा होकार देईल का, याची साशंकता होती. एवढा देखणा मुलगा मला होकार देणारच नाही, असं ज्योतीच मत होत. पण झालं नेमकं उलटं, राकेशने ज्योतीला बघताक्षणी होकार दिला. राकेशच्या आईला आणि बहिणीला मात्र ज्योती पसंत पडली नव्हती. त्यांनी आडकाठी घालण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु राकेश त्याच्या मतावर ठाम राहिला. त्याचा बाह्यसौंदर्यापेक्षा मनातील सौंदर्यावर खूप विश्वास होता. ज्योतीने काढलेली सुंदर पेंटिंग, दारापुढे रेखाटलेली रांगोळी, ओले खोबरे घालून केलेले पोहे, तिच्या सुगरणपणाची साक्ष देत होते.

"अरे पण राकेश, चारचौघांमध्ये तुला बायको शोभून दिसायला पाहिजे ना?" राकेशच्या बहिणीने विचारले.

"दिसेल गं तायडे, तिच्या जाड भिंगाच्या चष्म्यामागील पाणीदार डोळे खूपच बोलके आहेत." राकेशने उत्तर दिले.

राकेशला ज्योती मनापासून आवडली आहे, हे बघून घरच्यांनी लग्नाला होकार दिला. राकेश आणि ज्योतीचं लग्न धुमधडाक्यात पार पडलं.

लग्नानंतर राकेशचा टापटीपपणा बघून हळूहळू ज्योतीने स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणायला सुरुवात केली. राकेशने ज्योतीला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. राकेशच्या सहवासामध्ये हळू हळू ज्योतीमध्ये आत्मविश्वास यायला लागला. राकेश मुद्दाम ज्योतीला पार्टी किंवा मित्रमैत्रिणींना भेटायला घेऊन जायचा. चार लोकांमध्ये गेल्यानंतर छान रहायलाच हवे, म्हणून ज्योती हळूहळू सगळ्यांचं बघून फॅशन शिकायला लागली, सुंदर सुंदर कपडे घालायला लागली, आत्मविश्‍वासाने चार लोकांमध्ये वावरायला शिकली. हे करत असताना राकेशने मात्र तिच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही किंवा तिला कुठेच कमीपणाची वागणूक दिली नाही. म्हणून ज्योती क्षणाक्षणाला परत राकेशच्या प्रेमात पडत होती. ज्योती सी.ए झाली. स्वतःचं ऑफिस सांभाळायला लागली होती. राकेश ही नेहमी तिच्या पाठीशी उभा होता आणि कौतुक म्हणजे सासुबाईंनी सुद्धा विशेष साथ दिली होती. ज्योतीने आपल्या गोड स्वभावाने घरातील माणसांचं मन जिंकून घेतलं होतं. हळूहळू संसार बहरत गेला. आणि त्यांच्या संसाररुपी वेली वर दोन गोजिरवाणी फुले उमलली. बघता बघता दहा वर्षाचा काळ उलटून गेला होता.


राकेशने गाडीचा ब्रेक दाबला तशी ज्योती तंद्रीतून बाहेर आली. लहानपणी पाहिलेली रेवा आणि आजची रेवा यांच्यामध्ये खूपच फरक होता. तिच्या डोळ्यात कुठेतरी गडद दुःख लपलंय असे ज्योतीला वाटत होतं. तिने या गोष्टीचा शोध घ्यायचा ठरवलं.
दुसऱ्या दिवशी रविवारच होता, म्हणून ज्योतीने रेवाची भेट घ्यायचं ठरवलं. तशी तिने राकेशला कल्पना दिली. सकाळी लवकरच आवरून ज्योती रेवाने दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. एका आलिशान सोसायटीमध्ये रेवाचा फ्लॅट होता. ज्योती फ्लॅट समोर येऊन उभी राहिली. बेल दाबणार तेवढ्यात आत मधून जोरजोरात कुणातरी माणसाचा ओरडण्याचा आवाज येत होता. ज्योती क्षणभर स्तब्ध झाली. थोडा वेळ थांबून तिने बेल वाजवली. पाच मिनिटानंतर दरवाजा उघडला गेला, रेवाने हसून ज्योतीचे स्वागत केले. पण रेवाचे रडून लाल झालेले सुजलेले डोळे, ज्योतीला बरंच काही सांगून गेले. तेवढ्यात रेवाचा नवरा बेडरूममधून बाहेर आला आणि ज्योतीशी एकही शब्द न बोलता तडक बाहेर निघून गेला.

ज्योतीने रेवाकडे बघितलं, उसणं हसू चेहऱ्यावर आणत रेवा ज्योतीला म्हणाली, "अगं आत ये ना, बस. खूप छान वाटलं तू आलीस ते."

"रेवा, हे कधीपासून चालू आहे?"

"काय गं? काय बोलतेस तू?"

"तुला समजले आहे, मला काय बोलायचे ते."

रेवा चेहऱ्यावर काही न समजल्यासारखे भाव आणत ज्योतीकडे बघत होती.

ते बघून ज्योतीने जरा दरडावून विचारले, "कधीपासून सहन करते सगळ?"

"अगं, बाईच्या जातीला सहन करावच लागतं. पावसाने झोडपलं आणि नवऱ्यानं मारलं, तर तक्रार कोणाकडे करायची?"

"रेवा, तू बोलतेस हे? अगं तू किती बदललीस? तू कसली डॅशिंग होतीस. तुला बघून आम्हा मुलींना हेवा वाटायचा गं आणि आज..." बोलता बोलता ज्योती शांत झाली.

त्यावर रेवा खिन्नपणे हसली.
"काय आणि किती सांगू बोल? श्रीमंत स्थळ आलं म्हणून आई-वडिलांनी माझं लग्न करण्याची घाई केली. मोठं घर, देखणा नवरा भेटत आहे म्हणून मी पण लग्नाला होकार दिला. हातातला चुडा नाही उतरला तोवर, \"बायको ही पायातली चप्पल असते आणि तिने पायातच राहावं लागतं\" हा नवीन धडा मिळाला.
लग्न करण्यापूर्वी वचन दिलं होतं की, मला पुढे शिकवणार, नोकरी करू देणार. परंतु लग्नानंतर सांगितले, की घरी एवढं सगळं असताना शिकायची आणि नोकरी करायची काय गरज आहे, त्यापेक्षा संसारातील चार गोष्टी शिकून घे, पुढे कामाला येतील. त्याला मोठा अधिकारी असल्याचा प्रचंड अभिमान. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बायको सदानकदा सेवेत हवी. आणि मग सेवा करण्यात कुठे थोडीशी जर कसूर झाली तर मार ठरलेलाच."


"तू हे माहेरी नाही सांगितले?"

"सांगितले ना, नवीन नवीन लग्न झाले होते तेव्हा आईला सगळं सांगायचे. आई म्हणायची, सहन कर, एक मूल झालं की सगळं ठिक होते. बाईच्या जातीने दिल्या घरीच राहावं लागतं, नाहीतर समाजात नावं ठेवली जातात, बाईला तुच्छ लेखले जाते, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो, प्रश्न उभे केले जातात, सासरचा उंबरठा पण नवऱ्याच्या खांद्यावरून ओलांडायचा, असेच घरून वेळोवेळी सांगण्यात येत होते. हळूहळू मलाही सवय होत गेली गं, आणि आता माझी तक्रार करण्याची सुद्धा इच्छा उरली नाही."

"असं काय बोलतेस? रेवा बाहेर पड, स्वतःच्या पायावर उभे रहा, असं गुलामगीरीच जीन कुठपर्यंत जगणार आहेस तू?"

"बाहेर पडणे जमेल काय,माहीत नाही ज्योती."

"अगं तुझं पण लाईफ आहे, तुझं पण अस्तित्व आहे, तुला पण आनंदाने, तुझ्या मनाने जगण्याचा अधिकार आहे."


"तुला आठवते ज्योती, आपल्या मानसशास्त्राच्या बाई एक गोष्ट सांगायच्या, एका बेडकाला कढईतील पाण्यात ठेवलं जातं. हळूहळू कढई खाली आग लावली जाते. जसजसे पाण्याचे तापमान वाढेल, तसतसा बेडुक स्वतःच्या शरीराला पाण्यामध्ये अड्जस्ट करत जातो. शेवटी जेव्हा पाणी उकळायला लागत तेव्हा त्याच्या शरीरात बाहेर पडण्याची ताकदच उरलेली नसते गं. माझी पण अवस्था याच बेडकासारखी आहे गं, स्वतःला ॲडजस्ट करताना एवढी ताकद खर्च केली, की आता माझ्यात बाहेर पडण्याची सुद्धा ताकद नाहीये."

यावर ज्योती म्हणाली,
"रेवा, तुला यातून बाहेर पडण्याची इच्छाच होत नाहीये का? तू स्वतःलाच शिक्षा का देत आहेस?"

"माझं मुल? परिवार? घरचे काय म्हणतील? हा समाज….." रेवा बोलता बोलता चूप झाली.

"काय? समाजाचं काय? ते दोन्हीकडून बोलतात, ज्यांना नावंच ठेवणं येतं, ते वाईटच बोलतात. आणि या फालतू लोकांच्या विचारांवर तू तुझं आयुष्य कसं जगायचं, हे ठरवणार आहेस?"

"ज्योती, तुला माझ्याबद्दल इतकं काही वाटलं, हे ऐकून छान वाटलं. तुला जा असं सांगताना खूप वाईट वाटत आहे, पण तू इतक्या वेळ इथे थांबली आहे, हे जर माझ्या नवऱ्याला कळलं, तर रात्री पुन्हा मार खावा लागेल."

ज्योती काही न बोलता, उदास मनाने रेवाच्या घराबाहेर पडली. ज्योतीने त्या दिवसानंतर रेवासोबत संपर्क करण्याचा बराच प्रयत्न केला, पण रेवासोबत तिचा काहीच संपर्क होत नव्हता. रेवाचा फोन पण बंद येत होता. तिच्या घरी जावे, पण तिच्या नवऱ्याला आवडत नाही, आपल्यामुळे रेवाला मार खाऊ लागू नये, काही त्रास होऊ नये म्हणून तिने तिच्या घरी जाणे टाळले.


जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यावर एके दिवशी ज्योती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन त्याच पार्कमध्ये गेली होती. मुलं पार्कमध्ये खेळत होते, ज्योती एका बाकड्यावर मुलांकडे बघत बसली होती.

"मावशी, मावशी…" आवाज देत एक लहान मुलगा ज्योती जवळ येत अक्षरशः तिला बिलगलाच.

"अरे ध्रुव, तू? कसा आहेस बाळा? तुझी मम्मा कशी आहे?" म्हणत ज्योतीने त्याला उचलून घेत आपल्या मांडीवर बसवले.

"ध्रुव बाबा…" आवाज देत एक मध्यम वर्षीय बाई त्याच्या मागे मागे आली.

"ध्रुव बाबा असे अनोळखी लोकांजवळ जाऊ नये, तुम्हाला कितीदा सांगितले आहे." ती बाई म्हणाली.

"मी अनोळखी नाही, ध्रुवच्या आईची मैत्रीण आहे." ज्योती म्हणाली.

"ध्रुव बाबा, चला आपल्याला घरी जायचं आहे, मॅडम कार जवळ वाट बघत आहेत." ती बाई म्हणाली.

"मला घरी नाही जायचं, मला ती मम्मा नाही आवडत, मला ती नकोय." ध्रुवने ज्योतीच्या गळ्याभोवती आपल्या हातांचा वेढा घट्ट केला.

"मॅडम रागावतील, चला ध्रुव बाबा." ती बाई धृवला समजावत म्हणाली.

ज्योतीला तर या दोघांचे बोलणे काहीच कळत नव्हते, त्यात ध्रुव असा घाबरून तिला बिलगला होता. ती कारच्या दिशेने बघत होती, तर तिला तिथे एक रेवापेक्षा थोडी लहान वयाची बाई फोनवर बोलताना दिसली.


"त्या कोण?" ज्योतीने विचारले.

"ध्रुव बाबाची मम्मी आहेत."

"काय? ही, धृवची आई? काही काय बोलत आहात? याची आई माझी मैत्रीण आहे, मी तिला चांगलं ओळखते. उगाच खोटं नाही बोलायचं हा, नाहीतर पोलिसात देईल." ज्योती थोडी धमकावत म्हणाली. ते ऐकून तिला तर धक्का लागला होता.

"ध्रुव बाबाला विचारा." ती बाई म्हणाली.

"ध्रुव, ती कोण आहे?" ज्योतीने त्याला प्रेमाने गोंजारत विचारले.

"ती नवीन मम्मा आहे. पण मला ती आवडत नाही. ती मला खूप रागावते." ध्रुव खूप केविलवाणे बोलत होता. ते ऐकून तर ज्योतीच्या पायाखालची जमीनच सरकली.

"क….काय..काय झालं? आणि तुम्ही कोण आहात?" ज्योती त्या बाईला अनेक प्रश्न विचारू लागली.

"मी सरिता, ध्रुव बाबाला सांभाळते. दिवसभर त्यांच्याच घरी राहते." ती बाई म्हणाली.

"रेवा… रेवा कुठे आहे?" ज्योतीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता.

"ध्रुव, बाबा तो बॉल घेऊन या, आपण तिघे बॅट बॉल खेळू." ती बाई म्हणाली तसे ध्रुव आनंदाने उडी मारत बॉल आणायला गेला. तो गेलेला बघून ती बाई पुढे बोलायला लागली.

"पाच महिन्यांपूर्वी रेवा मॅडमची तब्येत थोडी खराब राहत होती, म्हणून त्यांनी मला त्यांच्या घरी कामाला ठेवले होते. ध्रुव बाबा पण माझ्या जवळ चांगले राहत, तर मग त्यांनी मला यांना सांभाळायला ठेऊन घेतले होते." ती बाई म्हणाली.

"तब्येत? तब्येतीला काय झालं? मी तिला भेटले होते, तेव्हा तर ती बरी होती, तिला काही आजार पण नव्हता." ज्योती.

"त्या एकट्याच बसून राहत. कोणाशी काही बोलत नव्हत्या. कधी कधी त्यांच्या अंगावर मारल्याचे व्रण दिसायचे. कुठलीतरी ट्रीटमेंट, हा ते काय म्हणतात ते दिस्प्रेशन की काय ज्यात व्यक्ती पागल सारखा वागतो, पागल होतो.."

"डिप्रेशन?"

"हा हा हेच, हेच शब्द मी साहेबांच्या तोंडून ऐकले होते, ते मॅडमला पागल पागल.." बोलता बोलता सरिता चूप झाली.

सरिताचे एक एक शब्द ऐकताना जीव ज्योतीच्या कंठाशी येत होता.

"रेवा कुठे आहे? हा ध्रुव काय बडबडत करतोय?"

"त्या दिवशी मी ध्रुव बाबाला खाली फिरवायचे म्हणून बिल्डिंगच्या खाली घेऊन आले होते. आम्ही थोडे पुढे जातच होतो की खाली काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज आला, बघितले तर रेवा मॅडम रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. सगळे म्हणत होते, चौदाव्या मजल्यावरून मॅडमने उडी घेतली. ध्रुव बाबा माझा हात सोडून मम्मा मम्मा करत जवळ गेला, आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांना उठवत होता. पण मॅडम उठल्या नाही."

ज्योती सोबत एवढे बोलून सरिताने ध्रुवला कडेवर उचलले आणि त्याला घरी जायला म्हणुन कारच्या दिशेने घेऊन जाऊ लागली. ध्रुव मात्र घरी जायचं नाही म्हणून पाय आपटत रडत होता.

रेवाला एक भयाण शांतता जाणवत होती. तिचे डोकं एकदम सुन्न पडले होते, डोळ्यातील अश्रू गालांवर ओघळत होते.


"जर त्या दिवशीच रेवासाठी मी काही केलं असतं तर? जर थोडी हिंमत दाखवून मी रेवला पुन्हा भेटायला गेले असते तर? जर मी रेवाला डिप्रेशन नामक दलदलीतून बाहेर काढायचा प्रयत्न केला असता तर? ज्या हिंमतीबद्दल रेवाला सांगून आले होते, तीच थोडी हिंमत मी रेवासाठी दाखवली असती तर?" आणि शेवटी शेवटी ज्योतीला असचं वाटलं की "जर रेवा मला भेटलीच नसती तर? आज मला एवढं वाईट वाटलं नसतं.. "


पण \"जर\" आणि \"तर\" वर हे आयुष्य पुढे जात नसतं.

समाप्त

©®खुशी कांबळे