सोनेरी पक्षी भाग२ विषय भूतकाळात डोकावताना जलद कथा लेखन स्पर्धा

एक प्रेम कथा


विषय…भूतकाळात डोकावताना.
सोनेरी पक्षी भाग २

जलद कथा लेखन स्पर्धा 
मागील भागावरून पुढे…


आज रवी घाईघाईने स्वप्नगंधाची शिकवणी संपण्यापूर्वीच कालच्या ठिकाणी जुईच्या मांडवाशेजारी येऊन उभा राहिला.

खरंतर विशाल…रवीचा जिगरी दोस्त त्याला बाहेर चालण्यासाठी आग्रह करत होता.एरवी रवी विशाल बरोबर गेला ही असता पण आज त्याला स्वनगंधाला भेटायला जायचं होतं.

चवीसाठी स्वप्नगंधा महत्वाची होती.विशालचं काम महत्वाचं नव्हतं.

रवी सारखा घड्याळाकडे बघत होता.तसं त्याला येऊन आत्ताशी पाचच मिनीटात होत होती पण त्याला किती तास आपण इथं उभं आहोत असं वाटतं होतं.तो स्वप्नगंधा येण्याच्या वाटेकडे डोळे ताणून ताणून बघत होता तितक्यात त्याला लांबवर स्वनगंधा येताना दिसली.

रवी तिला बघून उत्तेजीत झाला. त्याने आल्या आल्याच स्वप्नगंधासाठी जुईची फुलं वेचून ठेवली होती. त्या जुईच्या स्पर्शाने आणि स्वप्नगंधाच्या आठवणीने तो मोहरून गेला.

स्वप्नगंधाला रवी दिसताच खूप आनंद झाला पण तेवढंच लाजायलाही झालं. तिला रवीचा सहवास आवडायला लागला होता. दोघांच्याही डोळ्यात एकमेकांना भेटायची ओढ दिसू लागली. स्वप्नगंधा तिथे पोचताच रवीने तिच्यासमोर फुलांची ओंजळ केली. जुईची फुलं बघून स्वप्नगंधा खूप आनंदीत झाली.

" थॅंक्स." फुलांचा सुगंध घेत स्वप्नगंधा म्हणाली.

" थॅंक्स कसले. आपल्या आवडत्या माणसासाठी काही करतांना आनंद होतो."

रवीच्या या बोलण्याने स्वप्नगंधा मनातून खूप आनंदली.
लाजेने तिचा चेहरा आरक्त झाला. तिची मान आपोआप खाली झुकली.तिच्याकडे बघत रवी म्हणाला,

" तुम्हाला राग नाही आला नं?"

हे विचारताना रवीचा आवाज घोगरा झाला. त्याच्या मनात प्रेमाचे इतके तरंग उठले की तो गोंधळून गेला.
"तुम्ही माझ्यासाठी जुईची फुलं वेचलीत.मी कशाला रागाने?"

" आज बोलणार नं माझ्याशी?"

" हो.." राज्यच स्वप्नंगंधा म्हणाली.
" त्या बाकावर बसूया?" रवीने विचारलं

क्षणभर स्वप्नगंधा ला काय उत्तर द्यावं कळलं नाही.

रवीला समजेना आपलं काही चुकलं का?

" तुमची इच्छा नसेल तर नाही बसू." रवी म्हणाला.

" नाही असं काही नाही.बसूया."

दोघंही एकमेकांपासून थोड्या अंतराने चालत होते.दोघही गप्प होते.

अचानक धसक्याने स्वप्नगंधा बसल्या जागी सीटवर उसळली आणि भानावर आली.

आत्तापर्यंत ती ज्या विचारात रमली होती ते आठवताच स्वप्नगंधाच्या चेह-यावर हसू उमटलं. मघाशी बसस्टॅंडवर एकमेकांशी चिवचिवत असलेल्या त्या दोघांना बघताच स्वप्नगंधाला आपलं ते नाजूक वय आठवलं.

किती काळ लोटला या गोष्टीला. निरागस भावनेत गुंतलेलं दोघांचं मन आता कुठे तसं राह्यलय.स्वप्नगंधा स्वतः किती बदलली होती.
भूतकाळात डोकावताना स्वप्नगंधाला क्षणभर वाईट वाटलं.ज्याच्यामुळे तिची प्रेमाशी ओळख झाली,प्रेम म्हणजे नेमकं काय असतं ते कळलं.आजमात्र ती प्रेमाच्या नाही व्यवहारी जगात वावरतेय.

याचा अर्थ तिचा नवरा प्रबोध तिच्यावर प्रेम करत नाही असं नाही पण प्रबोधच्या प्रेमाची जातकुळीच वेगळी आहे.प्रबोध आपल्याला भेटला तेव्हा तो परीपक्व वयातला होता.रवीसारखं निरागसपणे बघण्याची प्रबोधला नाही जमलं.

रवी वेगळाच होता.किती गोड ,प्रेमळ नजरेनं आपल्याकडे बघायचा. त्याच्या बघण्यात फक्त प्रेम असायचं. कोणते ताण किंवा कसली अपेक्षा नसायची.

कधी कधी त्याची साथ सुटली कळलंच नाही.क्षणभर स्वप्नगंधाच्या चेहे-यावर विषण्णता पसरली.तेवढ्यात कोणीतरी काहीतरी विचारल्याने ती भानावर आली.

स्वप्नगंधाने मान वळवून बघीतले तर एक स्त्री तिला विचारत होती,
" या सीटवर कोणी बसलय का? तुमच्या बरोबर कोणी आहे का?"
स्वप्नगंधाने मानेनेच नकार दर्शवला.
ती स्त्री त्या बाजूच्या सीटवर बसली.
स्वप्नगंधा पुन्हा भूतकाळात पोचली.
__________________________________
क्रमशः सोनेरी पक्षी भाग २
स्वप्नगंधाला अजून काय आठवलं असेल?
बघू पुढील भागात
© मीनाक्षी वैद्य

🎭 Series Post

View all