सोनेरी पक्षी भाग १.विषय भूतकाळात डोकावताना.जलद कथा लेखन स्पर्धा

एक प्रेम कथा.
विषय…भूतकाळात डोकावताना

सोनेरी पक्षी भाग १

ती…वयाची अठरा वर्षं नुकतीच पूर्ण केलेली… भाबडी…डोळ्यात तरल स्वप्न पक्षी उडताना बघणारी. जागेपणीपण त्यांच मन मोहरून टाकणा-या विचारांच्या तंद्रीत असणारी.

हळव्या मनाचं फुलपाखरू होती. कोणाची चाहूल लागताच पटकन स्वप्नांच्या दुनियेतून वास्तवात परत येणारी. मग भिरभिरत्या नजरेने आजूबाजूला बघणारी. आपली चोरी पकडली तर नाही नं कोणी! या भितीने स्वतःवर नियंत्रण मिळवत स्वतःला कशीबशी सावरणारी.

तुम्हाला प्रश्न पडला असेल…नमनाला एवढं घडाभर तेल ओतून ती आहे कोण हे अजून सांगीतलंच नाही.
सांगते…सांगते…धीर धरा…

सर्वसामान्य घरातील नुकतंच उमलून येणारी ही कळी आहे स्वप्नगंधा नावाची एक गोड मुलगी…

ही गोड मुलगी सध्या स्वतःला सतत सावरण्याचा प्रयत्न करतेय कारण तिच्या आयुष्यात स्वप्नांची रांगोळी रेखाटताना एक समवयस्क तरुण आला आहे.
रवी त्यांचं नाव…तो स्वप्नगंधाच्या भारावलेल्या डोळ्यात बघून हरवून जायचा.

एकदा स्वप्नगंधा जुईच्या मांडवाखाली फुलं वेचताना रवीने बघीतले. किती तन्मयतेने ती फुलं वेचत होती. रवीने चटकन दोन चार फुलं वेचली आणि तिच्या समोर येऊन उभा झाला.

अचानक रवीला बघून स्वप्नगंधाच्या अंगावर रोमांच उठला ती स्वतःला सावरू शकली नाही. लाजेने तिचे डोळे आपोआप खाली झुकले.

" हे घ्या जुईची फुलं"

आपल्या हाताच्या ओंजळीत गोळा केलेली फुलं स्वप्नगंधाच्या समोर करत रवी म्हणाला.

" थॅंक्यू…" स्वप्नगंधा हळूच लाजून म्हणाली.

" थॅंक्यू कशाला? तुम्हाला जुईची फुलं वेचताना बघतो मी. तुमच्याशी ओळख करून घ्यायची होती म्हणून ही फुलं गोळा करून दिली."

एवढं बोलून रवी हसला.

"फारच चत्रा आहे हा." स्वप्नगंधा मनातच म्हणाली.तिला त्याचा चत्रेपणा आवडला.ती अजूनही गालात हसत मान खाली घालून उभी होती.

" तुम्ही जास्त बोलत नाही का?" रवीने विचारलं.

" नाही…असं काही नाही." भानावर येत स्वप्नगंधा म्हणाली.

" मघापासून मीच बोलतोय.तुम्हाला माझ्याशी मैत्री करायला आवडेल का?"

रवीने असं विचारताच स्वप्नगंधाने दचकून वर बघीतलं
ती काही बोलत नाही बघून रवी म्हणाला,

" ठीक आहे निघतो मी."

रवी जायला वळला तशी स्वप्नगंधा गडबडली…

" अहो …बोलते मी"

एवढं बोलूनही तिला धाप लागली.

तिचं बोलणं ऐकून रवी गर्रकन मागे वळला.

" थॅंक्स " तिच्याकडे बघून हसत म्हणाला.

" इश्श…थॅंक्स कसले त्यात."

" थॅंक्स तर द्यायलाच हवेत.कारण तुम्ही जुई सारख्याच लाज-या बुज-या आहात.मला मैत्री करायची नाही असं तुम्ही म्हणता की काय अशी मला भीती वाटत होती."

रवीचं हे बोलणं ऐकून आत्ता ज…रा हिमतीने स्वप्नगंधा मान वर करून बोलली.

" मी लाजरी आहे.मला सगळ्यांशी बोलणं नाही जमत.कसं बोलायचं तेच कळत नाही.म्हणून मी नाही बोलले तुमच्याशी."

स्वप्नगंधाचं बोलणं ऐकून रवीच्या चेह-यावर हसू उमटलं.

" आता नाही घाबरणार नं माझ्याशी बोलायला? आपली ओळख झाली आहे.माझं नाव रवी.तुमचं?"

" माझं नाव स्वप्नगंधा."

" वा! किती छान नाव आहे.नावाप्रमाणच तुम्ही स्वप्नात रमता. हो नं?" रवीने विचारलं.

यावर काय बोलावं हे न कळून स्वप्नगंधा गडबडली.रवी हसत म्हणाला,
" नाही सुचत बोलायला तर असू द्या. तुम्हाला घरी जायची घाई नाही नं?" रवीने विचारलं.

" अरे हो मी विसरलेच होते आईने लवकर घरी बोलावले होते शिकवणीनंतर. मी या जुईच्या नांदी लागले आणि विसरले."

" मग कधी भेटूया? तुम्हाला आवडेल का पुन्हा मला भेटायला?"
" हो…उद्या भेटू नं इथेच." असं लाजून उत्तर देत झर्रकन घराच्या दिशेने निघाली.

रवी पाठमो-या स्वप्नगंधाकडे बघत हळूच हसला आणि तोही घरी निघाला.

________________________________
क्रमशः सोनेरी पक्षी भाग १
उद्या खरच  स्वप्नगंधा भेटेल रवीला की लाजून येणारच नाही.
बघूया पुढील भागात.
©. मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all