सोनाली कुलकर्णी यांचे वक्तव्य आणि त्यातील तथ्य

Indian Women Are Lazy

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी नुकतेच एक वक्तव्य केले आहे त्यावरून सोशल मीडियावर निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या वक्तव्यामागे किती तथ्य आहे? आणि हे विधान बरोबर आहे की चुकीचे याबद्दल माझे काही मत मांडू इच्छिते.

सोनाली कुलकर्णी यांच्या मते भारतीय स्त्रिया आळशी आहेत, त्यांना असा नवरा हवा असतो ज्यांच्याकडे घर असेल, आर्थिक सुबत्ता असेल.

पहिली बाजू:
एका अर्थाने त्यांचे मत अगदी बरोबर आहे. लग्न करतांना आजही समाजात मुलीकडचे मुलाची आर्थिक स्थिती, त्याची प्रॉपर्टी याला महत्व देतात. आणि मुलगा आपली आर्थिक बाजू भक्कम व्हावी यासाठी खूप प्रयत्न करतो. समाजाने हेच बिंबवले आहे की मुलीला चांगल्या घरी दिलं तर ती सुखी होईल आणि मुलाच्या मनावर बिंबवले जाते की चांगल्या नोकरीला लागलास की मग चांगली बायको मिळेल. आज नोकरी करायला मिळावी यासाठी धडपडत असलेल्या मुली जितक्या आहेत तितक्याच मला नोकरी नको म्हणणाऱ्या मुलीही आहेत. मुलींकडे पर्याय असतो, शिकले तर चांगलं..नाही शिकले तर नवरा आहेच. शिकून कमवायलाच हवं असा काही आग्रह नाही. याउलट मुलांपुढे पर्याय नसतो. त्यांना काहीही झालं तरी सेटल व्हावच लागतं. आजही स्त्रिया नवऱ्याशी भांडताना दिसतात, की अमुक एकीचं लग्नानंतर कसं चांगलं झालं, ती कशी राणीसारखी राहते वगैरे. पण मुली असा विचार का करत नाही की राणी बनण्यासाठी राजाचीच गरज का भासावी? आयुष्यात जी स्वप्न पाहिली आहेत, ज्या ईच्छा मनात आहेत त्या स्वतःच्या जीवावर पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांना का वाटत नाही? आपल्या संसाराच्या आर्थिक स्थितीला एकटा माणूस कसा कारणीभूत ठरू शकतो? कित्येक ठिकाणी घरातील मंडळी आणि पुरुष स्त्रियांना बाहेर पडण्यासाठी, शिकण्यासाठी प्रोत्साहन देतात. पण तरीही महिलांना ते नको वाटतं, स्वतःहून काहीतरी करण्याची ईच्छा मनात नसते. मग अश्यावेळी घर, मुलं, संसार अशी कारणं देऊन त्या स्वतःहून मागे राहतात. प्रत्यक्षात घरकामाला बायका असतात, फावल्या वेळात या स्त्रिया सिनेमा, सिरीयल, पार्टीज मध्ये वेळ घालवतात.वेळ आली की आपला नवरा कसा मागे राहिला, त्याने कशी प्रगती केली नाही यावर बोट ठेऊन मोकळे होतात.

दुसरी बाजू:
आपण पहिली बाजू पाहिली, महिला स्वतःहून पुढे जाण्यास तयार नाही..पण काही महिला अशाही आहेत ज्यांना लहानपणापासून काहीतरी बनण्याची ईच्छा असते, आपला नवरा कितीही श्रीमंत असला तरी तो पैसा आपल्या मेहनतीचा नाही या ओझ्याखाली त्या जगतात. आई वडिलांनी जुन्या विचारांच्या आधीन होऊन अश्या महिलांना केवळ लग्न करण्याकरिता एक नवरी म्हणून तयार केलं..तिच्या स्वप्नांना महत्व दिलं नाही..तिने कितीही विरोध केला तरी जुन्या विचारांचा समाज तिचं जगणं असह्य करतो, अश्यावेळी ती विचार करते की स्वप्न महत्वाचं की आयुष्य? ती आयुष्याचा विचार करते. लग्नानंतर तरी किमान काहीतरी करता यावं यासाठी धडपडत असते, पण तिचं शिकणं, नोकरी करणं हे घरी मान्यच नसतं. सासू सासऱ्यांनी ती 24 तास घरात, अर्धवेळ किचनमध्ये हवी असते. तिला अगदी तासभर बाहेर जायचं असेल तर घरच्यांना चार दिवस उपाशी असल्यासारख्या भुका लागतात. एवढं करूनही तिने विरोध केला आणि आपल्या स्वप्नांच्या मागे ती लागलीच तर आरोप, प्रत्यारोप, ईर्षा, द्वेष, टोमणे या सर्व अग्निपरीक्षेतून चालतांना तिला नकोसं होतं आणि ती मागे खेचली जाते. आणि अगदीच या अग्निपरीक्षेतून पार पडलीच तर पुढे "बाळाचं काय?" या प्रश्नापुढे तिला उभं करतात आणि तिच्या स्वप्नांना पूर्णविराम लागतो. आजही अनेक स्त्रियांना स्वकमाई करायची इच्छा आहे, घर स्वतःच्या जीवावर चालवायची ईच्छा आहे..आणि त्या कमी अधिक प्रमाणात प्रयत्नही करतात. तिच्या स्वप्नांना बळ देण्यापेक्षा तिला चूल अन मूल मध्ये अडकवून ठेवण्यात आपल्या समाजाच्या जुन्या विचारांचा पगडा कारणीभूत आहे. यातून बाहेर पडायला खूप वेळ लागेल. तुम्ही निरखून बघा, समाजात मुलाला काय प्रश्न विचारला जातो? "जॉब कुठे करतोस?" आणि मुलीला विचारलं जातं की "जॉब करतेस का?"
या दोन्ही प्रश्नांमधला फरक आपल्या लक्षात आलाच असेल. मुलाने कमावणे must आहे आणि मुलगी कमावत असेल तर एक छंद म्हणून बघितलं जातं. मुलाला नोकरी नाही असं समजल्यावर समाज ज्या विस्फारलेल्या डोळ्यांनी बघतो त्याच डोळ्यांनी मुलीला नोकरी नाही हे कळल्यावर बघतो का? ज्या दिवशी समाज हे बघायला लागेल तेव्हा समाज खऱ्या अर्थाने सुधारला असं समजेल.