सौर ऊर्जा - फायदे...

Solar System

सौर उर्जेचा प्रार्थमिक खर्च बराच असतो पण ऊर्जा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. दिवसातील बरेच तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. रात्री आपण सौर ऊर्जेची विजेर्यात साठवण करून ती आपल्या पाहिजे तेव्हा उपयोगात आणू शकतो यासाठी खर्च सुद्धा जास्त होत नाही.

सुर्यापासून मिळणारी सौरऊर्जा आपला दिवस व वेळ बदलत नाही. म्हणून बदलत्या काळानुसार आपण जास्तीत जास्त प्रमाणत सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास शिकले पाहिजे.

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर नाहीत. किमती नियंत्रणात ठेवतानाच पेट्रोलियम इंधनांच्या बरोबरीने अन्य पर्यायांचा विचार होणे, सध्याच्या परिस्थितीत खूप आवश्यक आहे. बायोडिझेलचा पर्याय हा त्यापैकी एक आहे. उस गाळपा नंतर तयार होणारे बायप्रॉडक्ट इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून वापरण्याबाबत तेल कंपन्यांनी सुरुवात केली होती. मात्र इथेनॉलचा वापर ऐच्छिक असल्याने या कल्पनेला फार प्रोत्साहन मिळू शकले नाही. दरवर्षी सुमारे काही कोटी लिटर इथेनॉल तयार होते. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतल्यास पेट्रोलचे दर कमी होऊ शकतील.

देशातील निम्म्याहून अधिक वीज कोळशाद्वारेच तयार होते. कोळसा खाणींतील भ्रष्टाचार, उपलब्धतेकडील दुर्लक्ष आणि पर्यायी स्रोतांचा अभाव देशातील वीज निर्मिती प्रक्रियेवर विपरीत परिणाम करतात आणि विजेची मागणी आणि पुरवठा यांतील तफावत गुणोत्तर गतीने वाढते. विजेची मागणी आणि पुरवठा यांतील तफावतीमुळेच ग्रिडमधून वीज चोरीचे प्रकार बऱ्याच वर्षांपूर्वी काही राज्यांनी केले आणि त्याचा विपरीत परिणाम काही राज्यांना अंधाराचा सामना करण्यात झाला. याचा राज्यांवर आर्थिक आणि सामाजिक परिणाम झाला तो वेगळाच.

देशात वीजनिर्मितीच्या क्षमतेत सतत वाढ होऊनही विजेचा तुटवडा कायम आहे. देशाची ऊर्जेची गरज तीन ते साडेतीन टक्क्यांनी वाढत असून विजेची मागणी ग्राहकांकडून आठ टक्क्यांनी दरवर्षी वाढते अशी सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीच्या वार्षिक अहवालातील आकडेवारी सांगते. आजही भारतातील काही गावे, घरे आणि काही कोटीच्या घरातील माणसे विजेपासून वंचित आहेत.

कोळसा व खनिज इंधनांपासूनची वीजनिर्मिती ७०%, जलविद्युत २०%, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर आधारित वीजनिर्मिती १० ते १२% आणि अणु-वीजनिर्मिती जेमतेम २ ते ३% असे वीजनिर्मितीच्या स्रोतांचे प्रमाण आहे. देशातील एकूण वीजनिर्मितीपैकी अर्ध्याहून अधिक वाटा एकटया कोळशाचाच आहे. कोळशाला पर्याय औष्णिक वीजनिर्मिती आणि दुसरा स्रोत म्हणजे नैसर्गिक वायू. मात्र, या स्रोतातून सध्या उपलब्ध होणारी वीज कमी आहे आणि वायुसाठे सापडत असले तरी ते वीजनिर्मितीच्याच कामी येतील याची शाश्वती नाही.

देशातील इंधनाचा जटील प्रश्न सोडविण्यासाठी अणु-वीजनिर्मितीचा पर्याय आहे. पण तो वादग्रस्त आहे. पर्यावरणात निमार्ण होणाऱ्या असतोलामुळे स्थानिकांचा विरोध, पुनर्वसन, भूसंपादनाच्या भरपाईचे न सुटलेले प्रश्न, अणुइंधनाच्या पुरवठय़ातील आणि तंत्रज्ञान मिळण्यातील अडथळे, अणु-वीजनिर्मितीचा खर्च व सुरक्षिततेचे प्रश्न, या जंजाळात अणु-वीजनिर्मितीचा पर्याय अडकलेला आहे. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा हे दोन अन्य पर्याय पर्यावरणनिष्ठ मानले जातात. वीजगळती पूर्णतः थांबणे. या सगळ्या पर्यायी स्रोतांचा पुरेपुर वापर केला तर इंधनाचे प्रश्न सोडविण्यात काही अंशी सफलता मिळेल.

वेळीच सरकार आणि देशातील जनतेने आपल्या समोरील इंधनाचा यक्ष प्रश्न विचारात घेऊन सौर उर्जेचा विचार करणे ही काळाची गरज ठरणार आहे.