सोळा सोमवार, त्याचे अंतिम भाग

महादेव पावणार आणि व्रताचे फळ सुद्धा गोड मिळणार

सोळा सोमवार,"त्याचे" अंतिम भाग

मागील भागात आपण पाहिले की मावशीने शब्दात अडकवून परेशला व्रत करायला तयार केले. आता पाहूया पुढे.


परेश खूप चिडला होता पण स्वतः च बोलून बसल्याने आता इलाज नव्हता. मावशी आणि आई गप्पा मारत असताना त्याने गुगल वर सगळे सर्च केले.

आता उपवास करायचा म्हणजे भारी अवघड काम होते.
तेवढ्यात आई आतून म्हणाली,"बघ बाबा परेश,तुला नसेल जमत तर राहू दे. मी काय बापडी मुलासाठी करत असते."

नाही जमत म्हणाले की मुद्दाम करणार ह्या परेशच्या सवयीचा आईने पुरेपूर फायदा उठवला.

तो आवेशात म्हणाला,"असे कसे जमणार नाही? सांग काय काय करायचे आहे?

मावशी म्हणाली,"उपवास कडक आहे. पण तुला काही पदार्थ खाता येतील. सकाळी पूजा होईपर्यंत मौन. देवळात दर्शनाला जाताना कोणाशी बोलायचे नाही. सोळा सोमवार झाले की उद्यापन."

परेश म्हणाला,"मावशी आता माझीही एक अट आहे. जर हे व्रत संपेपर्यंत लग्न ठरले नाही तर पुढे मला असले काहीच सुचवायचे नाही."

आई आणि मावशी हो म्हणाल्या.


त्यानंतर पहिला सोमवार उगवला. परेश उठला तेवढ्यात आईने समोर कागद लावला होता,"पहिला सोमवार. पूजा होईर्यंत मौन,पांढरे कपडे."

परेश अंघोळ करून आला तर आई तयारच होती. तिने खुणेने चल असे सांगितले.

परेशने हाताने नाष्टा? असे विचारले. आईने कागद दाखवला. दोघे जवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात पोहोचले. परेश पायऱ्या चढून गेला आणि पुढे एक मुलगी उभी होती.

परेश दर्शन घेऊन वळला आणि खाली सांडलेल्या पाण्यावरून पाय घसरला तशी पूजेची थाळी उडाली आणि कुंकू वर उडाले ते नेमके त्या मुलीच्या अंगावर आणि ती मागे वळली.

मोकळे काळेभोर केस, हलकी लिपस्टीक,पांढरा ड्रेस, त्यावर शोभणारे कानातले. ती पाहताच बाला कलिजा खलास झाला.

तिने खुणेनेच रागावले आणि काही बोलणार तेवढ्यात आवाज आला,"प्रिया,पूजा करायची आहे लवकर ये."

तिचे नाव ऐकताच परेशने मनात उडी मारली. इकडे प्रिया मात्र वैतागली होती. कारण आता घरी जाऊन कपडे बदलावे लागणार होते. तिकडे फोन सतत कोकलत होता.


पूजा संपवून घरी आला तरी परेश मनातून तिथेच होता.त्याच्या मनात एकच गाणे वाजत होते,"शोधू मी कसे? कुठे? प्रिया तुला"

गडबडीत आवरून तो निघाला. त्याला प्रिया आवडली होती. पण तिला शोधायचे कसे. इकडे अख्ख्या बँकेत परेश करत असलेल्या व्रताची बातमी पसरली.

सौ.जोशी म्हणाल्या,"किती क्युट ना. तुला छान गोड बायको मिळेल बघ."

तशी नाडकर्णी नाक उडवत म्हणाली,"मी पण केलेले उपवास.काय पडल पदरात?"

प्रत्येकजण सल्ले देत होता. तेवढ्यात अचानक सिस्टीम बंद पडली.

मॅनेजर म्हणाले,"अरे त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला फोन करा."

तशी मिस लीना म्हणाली,"सर सकाळपासून वीस कॉल केले. घेत नाही."

एवढ्यात एक स्कूटी बाहेर थांबली. तिने हेल्मेट काढले आणि परेश ओरडला,"आयला!"


सगळ्यांनी चमकून पाहिले तसा तो गप्प बसला. प्रिया आता आली.

परेशला पाहताच तिचा तोल सुटला,"ओ मिस्टर, सकाळासूनच माझा पाठलाग करतात ना? आधी देवळात? आता बँकेत? असे अनेक मजनू पाहिलेत."

आता परेश सुद्धा भडकला,"ओ,तुम्ही समजता कोण स्वतः ला? अशा छप्पन पोरी मागे लागतील माझ्या."

प्रिया चिडली,"त्या छप्पन मध्ये मी येत नाही समजले."

तेवढ्यात लीना तिला आत घेऊन गेली.


परेश उपवास करत होताच. पण त्याच्या मनात प्रिया होती फक्त. आता सोळावा सोमवार आला आणि आई चिंतेत पडली. तेवढ्यात जाधव काकांचा फोन आला.


त्यांनी एक स्थळ सुचवले होते. परेश कसेबसे हो म्हणाला. आता बॉसला अर्धी रजा मागावी लागणार.

तो विचारायला गेला तर मॅनेजर म्हणाले,"परेश,बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये केलेले बदल समजून घ्यायला आजच जायचे आहे."


परेश चिडून निघाला. आता उशीर होणार आणि आई ओरडणार.

तिकडे प्रियाची अवस्था सेम झालेली. प्रियाने पाहिले की बँकेने परेशला पाठवले आहे.

ती माहिती घाईत देत असलेले पाहून परेश म्हणाला,"तुम्हाला कुठे जायचे आहे का? घाईत दिसताय?"

तसे प्रिया नाईलाजाने म्हणाली,"मला जरा लवकर जायचे आहे. नाही गेले तर आई घरातच घेणार नाही."

परेश ओरडला,"सेम हिअर. एक सुचवू का?" तुम्ही मला गाडीत समजवा सगळे. तुम्हाला घरी सोडून मग मी जाईल."


परेशने आईने दिलेले लोकेशन टाकले आणि निघाला.

प्रिया म्हणाली,"स्थळ पहायला वाटत?"

परेश म्हणाला,"आता ह्या मुलीने नकार दिला तर आई परत रडारड करेल."

प्रियाने लोकेशन पाहिले आणि गालात हसत म्हणाली,"समजा,ती हो म्हणाली तर?"

परेश नाराज होऊन हळूच म्हणाला,"मग महादेव नाही पावला असे समजेल."

पुढे गप्पा मारत प्रिया त्याला रस्ता सांगत होती. परेश तिच्याकडे नुसते पहातच होता.


प्रिया म्हणाली,"थांबा,लोकेशन आले."

खाली उतरताना हसून म्हणाली,"महादेव पावला आहे बर. तुम्हाला मान्य असेल तर उद्यापन एकत्र होईल."

एवढे बोलून प्रिया घरात शिरली आणि परेश मनात हसत म्हणाला,"महादेवा, सोडवले रे आईला चिंतेतून आणि मला गुंत्यातून.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all