सोहळा.. दि इव्हेंट..

सोहळा आयुष्याचा..

लघुकथा


सोहळा.. दि इव्हेंट..


      "नले, काय कमाल झाली ग तुझी? ह्या वयात तू ही त्या पोरांसोबत खुशाल गाण्यावर थिरकली काय,.. परवा त्या मेहंदीच्या कार्यक्रमात हाताभर मेंदी काढलीस,..शोभत का आपल्याला ह्या वयात? आणि काल तर नातू म्हणतोय आजी अशी पोज दे तर लगेच त्याच्या मैत्रिणींसोबत काढलास तसा तोंड माकडासारखे करून फोटो.. कमाल आहे हं तुझी..”


म्हणत सुशीने नेहमी प्रमाणे नलीला सुनावलंच पण या वेळी नेहमी प्रमाणे नली गप्प नव्हती. तिने सुशीला हात धरत कालच्या टेरेसवर नेलं. जिथं काल मेंदी प्रोग्रॅम रंगला होता. तिथं नलीने बनवलेल्या लोकरीपासून बनवलेले लटकन सगळीकडे वाऱ्यावर डोलत होते. त्यात अडकवलेल्या बारीक घंटा वाऱ्याने किणकिण करत होत्या. नलीच्या माहेरचं ताब्यांच जड घंगाळ लक्ख करून त्यात दिवे सोडलेले होते पाण्यावरचे. भोवती मोगऱ्याची टपोरी फुल त्या मिणमिणत्या प्रकाशासोबत मंद सुगंध पसरवत होती. नलीने सुशीला त्या घंगाळजवळ बसवलं. आपला थरथरता हात त्यावर फिरवत म्हणाली,


"तुला आठवतं.. हे आईने हट्ट करून मला रुखवंतात दिलं होतं. काही दिवस ते सासरी मिरवलं हळूहळू काळवंडायला लागलं. तसं सासुबाई त्याला घासण्यासाठी माझ्या मागे लागायच्या. सगळ्यांच्या अंघोळी झाल्या की एक दिवस त्याला तासभर घासत बसावं लागायचं. जीव चिडायचा. वाटायचं.. कशाला दिलं आईने हे त्रासदायक घंगाळ मला? पुढं लेकरं बाळ आयुष्यात आली. हळूहळू त्या घंगाळाला माळ्यावर टाकलं कधी तरी डोळ्यासमोर दिसलं की वाटायचं मोडीत घालू मग परत आई आठवायची. हट्टाने ते घेणारी. मग स्टील, प्लास्टिक असं काय काय येत राहिलं तरी त्याच महत्व मनात होतं कायम पण त्याच्या स्वछतेपायी त्याला दूरच ठेवलं. सुनबाई म्हणाली, " नकोच त्या हमाल्या." म्हंटल, नको तर राहू दे, आपल्यालाच नाही जमलं तर ह्यांना कुठे बळजबरी करता?”


         नलीला मध्येच अडवत सुशी म्हणाली,


"अग मी तुला दोन दिवसांपासून तू इतकी ह्या पिढीसोबत मोकळी ढाकळी वागलीस त्याबद्दल विचारलं तर तू हे काय इतिहास सांगत आहेस मला?"


  नली हसून म्हणाली,


"अग तेच सांगते, वर्षानुवर्षे माळ्यावर अडगळ होऊन पडलेलं घंगाळ ती इव्हेंट मॅनेजमेंट वाली पोरगी घेऊ का? म्हणून मला विचारायला आली. मी हो म्हणताच ते खाली काढून तिने त्याला स्वच्छ करून नकली फुलांची माळ गुंडाळली त्यात पाणी सोडलं आणि हे कमळाचे दिवे हि मोगऱ्याची फुलं.. मला म्हणाली,


"आजी जून असलं तरी नव्याने त्याला जगू देऊ या.. माझ्या टेबलावर पडलेल्या लोकरीच्या फुलांची माळ तिने ह्या रिकाम्या कागदाच्या ग्लासात अडकवली. 

मला म्हणाली,


"जगणं तेच फक्त त्याला लूक नवा दयायचा म्हणजे आंनद मिळतो.”


मी सहज ते सगळे लटकन बघितले तर खरंच माझीच लोकरीची फुलं इतक्या दिवसांपासून त्या कोपऱ्यात पडून राहिलेली आज मस्त वाऱ्यावर डुलत होती. जणू मोकळा श्वासच घेत होती. हे हल्ली इव्हेंट इव्हेंट म्हणतात ते फार काही दुसरं नाही गं.. तर आहे तो कार्यक्रम आनंदाने साजरा करणं. त्यासाठी हि सजावट पडीक वस्तूतूनही किती छान करता येते हे त्या मॅनेजमेंट वालीने दाखवलं आणि मग मनात वाटलं,


“आपण सुद्धा आयुष्याचा इव्हेंट करायला हवा. आनंदी मॅनेजमेंटने. आपण नाही वापरलं ते घंगाळ.. ती फुलं तशीच तशीच तर पडून आहेत.. मनातल्या उत्साहाची फुलं देखील तशीच पडू दिली आपण. नाही वाऱ्यावर डोललो कधी.. मोकळेपणाने आणि अजूनही नाही तर मग कधी? आयुष्य तर असंच गंजून जाईल त्या माळ्यावर पडलेल्या घंगाळा सारखं कोणी येईल आणि लक्ख करेल ही वाट कशाला बघायची? आपल्या आयुष्याचा इव्हेंट मॅनेज आपणच करावा. हे नाही आलं आजपर्यंत लक्षात पण हि पिढी शिकवतीये ना मग घेऊ या शिकून. त्याक्षणी जगून घेणं.. तो क्षण आठवणीत राहील असा साजरा करणं..”

   

“सुशे.. तुला आपले लग्नकार्य भांडण आणि रुसण्याशिवाय काय आठवतं ग? ह्या उलट काल आमच्या मेंदीत लेक आणि सून मला मध्ये घेऊन फोटोसाठी उभे राहिले तेंव्हा नातू म्हणाला,


"आजीला जवळ घ्या बाबा.. आणि लेकानं मला जवळ घेतलं तेंव्हा काय सांगू काय भरून आलं गं! एरवी आपल्याला बोलायला वेळ नसणारी माणसं ह्या इव्हेंटने एकमेकांना स्पर्श करताहेत गं.. सुनेनी नातवानी जवळ घेऊन भरपूर फोटो काढले तेंव्हा वाटलं आपणही कधीच आपल्या सासूला असा हात लावला नव्हता. लेकीने तरी कुठे ग असे गळ्यात प्रेमाने हात टाकले? फक्त आदर आदर ह्याच्या नावाखाली हे एकमेकांना प्रेमानं जवळ घेणं.. आपण विसरायला लागलो ते ह्या इव्हेंटमध्ये सापडलं गं मला.. ह्या लख्ख झालेल्या घंगाळासारखं आणि मग मनातही मोगरा फुलला.. क्षण जगून घ्यावा हा विचार आतमध्ये ह्या कमळाच्या पाकळ्यांसारखा उमलत गेला. म्हणून मी आता ठरवलंय.. आयुष्य आता इव्हेंट करून जगायचं अगदी सुंदर आणि आंनदी.."


          सुशी नुसतीच हसली कारण नलीच्या वाक्यावर वरची लटकणारी फुलच डोलत आपल्या किणकिण घंट्या वाजवत ह्या सगळ्या बोलण्याला दुजोरा देत होती..


समाप्त..

©स्वप्ना मायी(मुळे)औरंगाबाद.



वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा. असेच blogs वाचण्यासाठी swapna blogs ह्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आणि अश्याच कथांचे पुस्तक हवे असल्यास 7038332429 ह्या नंबरवर मॅसेज करा. पुस्तक मूल्य 150 आणि शिपिंग.

©स्वप्ना मायी(मुळे)औरंगाबाद.