सौदामिनी 9

सौदामिनीच्या संघर्षाची कथा


सकाळी घरातले सगळे आवरून दुपारी ती शेतामध्ये काम करून पुन्हा संध्याकाळी घरातील आवरून सौदामिनी खूप थकून जायची. रोज रोज तेच काम करून तिला कंटाळा येत होता. तिचे स्वप्न काही वेगळेच होते आणि घडत काही वेगळेच होते. या सगळ्यामुळे ती खूप त्रासली होती. शारीरिक त्रास तर होतच होता, पण मानसिक त्रासही खूप होत होता. जरी एखाद्या व्यक्तीला शारीरिक कष्ट भरपूर पडले तरी मानसिक दृष्ट्या सक्षम असेल तर ती व्यक्ती काहीही करू शकते पण दोन्ही बाजूने जर त्रास असेल तर ती व्यक्ती कोलमडून पडते. तिला आयुष्यामध्ये नवीन काही साध्य करावे अशी इच्छा राहत नाही. सौदामिनीचेही तसेच झाले होते. शारीरिक कष्ट तर होतेच, शिवाय सासूबाईंचा त्रास हा वेगळाच होता. या सर्वातून जाताना तिला खडतर प्रवास करावा लागत होता.

नवी नवी नवरी शेतात काम करत होती म्हटल्यावर आजूबाजूचे लोक काहीबाही बोलणारच, पण सौदामिनी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती. आपल्या वाट्याला आलेले काम ती निमूटपणे करत होती. या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेले काम करणे तिने पसंत केले होते. उगीच इतरांची उणीधुनी काढण्यात तिला काडीचाही इंटरेस्ट नव्हता. तेवढेच तोडकेमोडके लोकांशी बोलायचे आणि आपले स्वतःचे काम पूर्ण करायचे या मताची ती होती, त्यामुळे गावातील आजूबाजूचे लोकही तिच्याशी बोलायला जात नसत.

नवरा इथे नसतानाही सौदामिनी अगदी धाडसाने शेतामध्ये काम करत होती, ते पाहून गावातील काही बायकांना तिचे कौतुक वाटत होते. नवीनच लग्न होऊनही कोणतेही काम करायला हिच्या अंगात धाडस आहे असे त्या म्हणत होत्या. शेजारील एक दोन बायका तिच्याशी आपुलकीने बोलायला यायच्या, पण त्या जेवढे बोलतील तेवढेच सौदामिनी त्यांच्याशी बोलत होती. उगीच वायफळ बोलण्यात काही स्वारस्य नाही असे तिला वाटत होते. त्यापेक्षा दोन कामे जास्तीची होतात शिवाय तिच्या सासूबाईंनाही सौदामिनी इतरांशी बोललेले आवडत नव्हते त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जाऊन सौदामिनीसुध्दा स्वतःहून कोणाशी बोलली नाही. ती फक्त स्वतःचे काम अगदी व्यवस्थित पार पाडत होती.

राजनच्या विरहामुळे ती आणखीनच दुःखी झाली होती. मानसिक आणि शारीरिक त्रास ती कसेही सहन करू शकली असती, पण तिला राजनची साथ हवी होती. राजन तिच्यापासून दुरावला होता त्यामुळे ती खुप दुःखी झाली होती. त्याच्या वाटेकडे तिची नजर नेहमीच असायची, तो कधी येईल यासाठी तिचे डोळे आसुसलेले असायचे, त्याच्या प्रेमासाठीच, त्याच्या स्पर्शासाठी ती आसुसलेली होती. खूप दिवस झाले त्याच्याशी बोलणे झाले नव्हते त्याला फक्त पाहण्यासाठी तिचे डोळे तरसले होते. त्याच्या आठवणी तिला छळायच्या, तो त्रास नको म्हणून सौदामिनी स्वतःला कामात झोकून द्यायची पण रात्री झोपताना का होईना त्याची आठवण तिला यायची.

तिला असे काम करताना पाहून आजूबाजूचे लोक तिचे कौतुक करायचे पण घरातील कुणी एक अवाक्षरही काढत नव्हते. काही दिवसांनी सौदामिनीची आई तिला भेटण्यासाठी आली. तिच्या आईला पाहून सौदामिनीच्या सासुबाईंना सुरूवातीला वाटले की, या सोनेच घेऊन आल्या आहेत. पण जेव्हा त्या फक्त भेटायला आल्या आहेत असे समजले तेव्हा त्या टोमणे मारू लागल्या.

"लग्न होऊन बरेच दिवस झाले तरी काही देण्याघेण्याचे लक्षात राहिले की नाही काय माहीत? आता काय म्हणणार? तर मुलगी खपली म्हणून निवांत सर्व बसलात तर याद राखा. वर्ष झाल्यानंतर तुम्ही उरलेले सोने घालणार आहात असे कबूल केले आहात. मी फक्त वर्ष होण्याची वाट पाहत आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही उरलेले सोने द्यायला हवे. जर दिला नाही तर तुमची मुलगी तुम्ही परत घेऊन जाऊ शकता." राजनच्या आईचे हे बोलणे ऐकून सौदामिनीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. या जगात इतके स्वार्थी लोक असू शकतात याची तिला कल्पना त्यावेळी आली. अर्थात कोणत्याही परिस्थितीत आपण उरलेले सोने द्यायचेच तेही वेळेच्या आधी असे तिने ठरवले. ती त्यासाठी प्रयत्नही करत होती पण नशीब तिला साथ देत नव्हते.

सौदामिनीच्या लग्नानंतर तिच्या आईच्या शारीरिक तक्रारी सुरू झाल्या. तिच्या दवाखान्याच्या फेर्‍या वाढल्या आणि त्यातच आलेला पैसा जाऊ लागला. तिची सरकारी नोकरी असल्यामुळे महिन्याला पगार येत होता पण त्यातून शिल्लक काहीच राहत नव्हते. दवाखान्यातच जास्त पैसा जात होता. ती तरी बिचारी काय करणार? आधीच लग्नासाठी थोडे कर्ज काढले होते आता पुन्हा कर्ज काढले तर हप्ते फेडण्यासाठी जास्त रक्कम भरावी लागणार, त्यापेक्षा आधीचे कर्ज फेडून पुन्हा कर्ज घेऊन सोने करावे असे सौदामिनीच्या आईने ठरवले होते. आता लेकीला भेटायला येताना तिने रव्याचे लाडू, चिवडा, चकली, बर्फी असे बरेच काही पदार्थ आणले होते. तिने ते स्वतः बनवले होते. पण सौदामिनीच्या सासूला त्याचे काहीच नव्हते. तिला फक्त सोन्याची चिंता होती. त्यांनी त्यातील एक बर्फी उचलली आणि म्हणाल्या,

"हे आमच्या खाण्याच्या लायक नाही. आमच्या शेतातील गडीसुद्धा याच्यापेक्षा छान बनवतात. आमच्याकडे भरपूर साजूक तूप घालून बर्फी बनवली जाते. त्यापेक्षा काही आणले नसते तर बरे झाले असते." राजनच्या आईचे हे बोलणे ऐकून सौदामिनीला आणि तिच्या आईला खूप वाईट वाटले. सौदामिनी तिला काही उत्तर देणार इतक्यात तिच्या आईने तिला अडवले आणि ती शांत झाली. थोडावेळ बसून सौदामिनीची सासू रूममध्ये गेली. मग बाहेर फक्त मायलेकी गप्पा मारत बसल्या होत्या.

"सौदामिनी, बाळा कशी आहेस? तब्येत खूप उतरली आहे ग. खूप कामाचा लोड होतो का?" सौदामिनीची आई काळजीने तिची चौकशी करत होती.

"काही नाही आई, मी खूपच सुखात आहे. तू काहीच काळजी करू नकोस." आईला टेन्शन येऊ नये म्हणून सौदामिनीने काहीच सांगितले नाही.

"बाळा, तुझा चेहरा देखील खूप सुकला आहे. जावई बापूंचा काही फोन वगैरे आला होता का? कधी येणार आहे ते?" सौदामिनीची आई म्हणाली.

"आई, ते लवकरच येणार आहेत. परवा त्यांचा फोन आला होता तेव्हा सासुबाई त्यांच्याशी बोलताना मी ऐकले." सौदामिनी म्हणाली.

"तुझ्याशी काही बोलले का ते? तू बोललीस का त्यांच्याशी फोनवर?" सौदामिनीची आई म्हणाली.

"हे काय आई? तू काय बोलत बसली आहेस. चल बघू. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते. चल आपण स्वयंपाक घरात जाऊ." असे म्हणून सौदामिनी विषय टाळू लागली. पण तिच्या आईला ते समजले.

"तू विषय तर टाळत नाहीस ना?" सौदामिनीची आई म्हणाली.

"नाही ग आई, तू चल बघू." असे म्हणून सौदामिनी आत गेली आणि तिच्या पाठोपाठ तिची आई देखील गेली.

"सौदामिनी, तू माझ्यासोबत चार दिवस चल. तिथे गेल्यावर तुला बरं वाटेल." सौदामिनीची आई सौदामिनीला माहेरी येण्यासाठी विचारत होती.

"नको आई, मी तिकडे आल्यावर हे इथे आले तर.. उगीच घोळ नको. आता हे जाताना मला घेऊनच जाणार आहेत. तेव्हा सगळं व्यवस्थित होईल. तू काहीच काळजी करू नकोस." सौदामिनी आईची समजूत घालत होती.

"ठिक आहे." म्हणून सौदामिनीची आई थोड्या गप्पा मारत बसली. बराच वेळ लेकीच्या घरात बसल्यावर ती जायला निघाली. आई होती तोपर्यंत सौदामिनी खूप आनंदात आणि निवांत होती. आई गेल्यावर पुन्हा तिच्या कामाचा पसारा सुरू झाला. ती पुन्हा सासूबाईंच्या तडाख्यात सापडली.

दुसऱ्या दिवशी अंगण लोटून सडा-रांगोळी करताना तिला शेजारी कोणीतरी उभा असल्याचा भास झाला. तिला थोडी भीती वाटली. ते दबकत येणारे आवाज तिच्या कानावर पडले. ती थोडी सावध झाली. सावधगिरीने रांगोळी काढण्यास बसली. आजूबाजूला अंधार होता. थोड्या लाईटच्या प्रकाशात ती रांगोळी काढत होती. आवाज आणखीनच जवळून येत असल्याचे तिला जाणवले. तिला आणखीनच भीती वाटू लागली. पण धाडसाने ती उठली आणि हातातील मुठीत धरलेली रांगोळी त्या येणाऱ्या व्यक्तीवर फेकली. ती व्यक्ती सौदामिनीला पकडणार इतक्यात तिने टाकलेली रांगोळी डोळ्यात गेल्यामुळे ती व्यक्ती डोळे चोळू लागली.

ती व्यक्ती कोण होती? तिथे का आली असेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all