सौदामिनी 4

कथा सौदामिनीच्या प्रगतीची, संघर्षाची


अखेर लग्नाचा दिवस उजाडला. सगळी तयारी करण्यासाठी सगळेजण लवकर उठले होते. सगळीकडे पाहुण्यांची लगबग सुरू होती. कुणी आंघोळ करत होते, तर कुणी चहा पाण्याचे पाहत होते, कुणी आवरत होते तर कुणी जाण्यासाठीचा पसारा गोळा करत होते. ही सगळी गडबड गोंधळ सुरू असताना सौदामिनी मात्र एका खुर्चीत निवांत बसून होती. तिला तिच्या बालपणीच्या आठवणी छळत होत्या. आता हे घर आपण सोडून जाणार याचे तिला वाईट वाटत होते. तिचे सगळे सामान भरून झाले होते. फक्त साडी नेसायची तेवढीच बाकी होती. सगळीकडे गोंधळ गडबड सुरू असतानाही ती शांत खुर्चीत बसून होती.

मेहंदी काढून झाली होती. हात मेहंदीने छान रंगला होता. तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या. पण ही मात्र वेगळ्याच विचारात होती. हळदीचा कार्यक्रम लग्नादिवशी होणार होता, कारण लग्न अगदी थोड्या लोकांना घेऊन अगदी साध्या पद्धतीने करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे सकाळी हळदी आणि दुपारी अक्षता असा त्यांचा कार्यक्रम ठरला होता. ज्यांना बोलावले होते ते सगळे पाहुणे आदल्या दिवशीच आले होते. फक्त मुलाकडची मंडळी तेवढी येण्याचे बाकी होते. लग्न सौदामिनीच्या आईनेच करण्याचे ठरले होते त्याप्रमाणे तिने सगळी तयारी केली होती. दारासमोरील अंगणामध्येच मांडव घातला होता. घराला तोरण लागले होते. दारात मोठी रांगोळी काढली होती. आंब्याच्या डहाळ्या आणि झेंडूच्या फुलांनी मस्त घर सजवले होते. थोड्याच लोकांनी साधेच लग्न करायचे असल्याने सौदामिनीच्या आईने घरासमोरच मांडव घालून लग्न करण्याचे ठरवले होते. यामध्ये बराच पैसा वाचणार होता.

सगळेजण इकडे तिकडे लगबगीने तयारीला लागले होते. सौदामिनीला तसेच शांत बसलेले पाहून तिची आई तिच्याजवळ गेली. आपली लेक इतकी मोठी झाली आणि आता ती तिच्या सासरी जाणार असे वाटूनच सौदामिनीच्या आईच्या डोळ्यातून पाणी ओघळत होते. पण लेकीसमोर जर आपण रडू लागलो तर ती आणखी रडेल या विचाराने ती शांत झाली आणि लेकीजवळ जाऊन तिने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आईचा तो झालेला स्पर्श पाहून सौदामिनीचे मन भरून आले. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिने आईकडे पाहिले तर आईचे डोळे देखील भरले होते. मग तिने आईला मिठी मारली आणि हुंदके देऊन रडू लागली.

"आई, मला खूप भीती वाटत आहे ग. मी तुम्हां सर्वांना सोडून पहिल्यांदाच जात आहे. नवीन लोकांमध्ये राहायची मला अजिबात सवय नाही. तिथे गेल्यावर माझे कसे होणार? मला तुम्ही पुन्हा कधी भेटणार?" असे म्हणून सौदामिनी रडू लागली. तिचा आवाज ऐकून घरातील सारे जण तिच्या जवळ आले.

"शांत बस बाळा, प्रत्येक मुलीला सासरी जावेच लागते. तू काही रडू नकोस. तिथे तुला आई आणि वडील दोघेही मिळतील. तुला न मिळालेले वडिलांचे प्रेम मिळेल. सासू सासरे हे आई वडील समजून त्यांच्यावर माया कर. तुझा नवरा तुझ्यासोबत असेलच. आता बघ तू सासरी रमलीस तर तुला इकडची अजिबात आठवण येणार नाही. तू तिकडेच रमशील आणि पुढच्या वेळेस तुझ्या छोट्या बहिणीला देखील चार गोष्टी सांगशील." असे म्हणून सौदामिनीची आई हसली

"आई, कितीही काहीही झाले तरी तुमची सर कशालाच येणार नाही ग. तुम्ही माझे आयुष्य आहात." सौदामिनी

"प्रत्येक मुलीला असेच वाटत असते. आम्हाला देखील वाटायचे आणि आता उद्या बघ तुझ्या मुलीला देखील तसेच वाटेल, त्यामुळे आता शांत हो. तुझे आवर. तू जेवढ्या लवकर आवरशील तेवढ्या लवकर कार्यक्रम सुरु होईल." सौदामिनीची आई म्हणाली.

आईच्या सांगण्यावरून सौदामिनी आवरण्यास गेली. तिने मस्त लाल रंगाची साडी नेसली होती. त्या साडीमध्ये ती खूपच खुलून दिसत होती. तो रंग तिच्यावर खूप खुलून दिसत होता. रंगाने जरी सावळी असली तरीही सौदामिनी लग्नाच्या वेशात खूप छान दिसत होती. सौदामिनी तिचे सारे काही आवरून बाहेर आली. ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिची आई तिच्याकडेच न्याहाळत उभी होती. आपली लेक इतकी मोठी झाली असे वाटून तिचे डोळे पुन्हा पाणावले होते. तेव्हा सौदामिनीच्या आईने सौदामिनीची दृष्ट काढली.

\"आपली लेक आज सासरी जाणार. तिच्या आनंदाच्या, नव्या आयुष्याचा क्षणी तिचे बाबा असायला हवे होते. ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, त्यानी तिचे खूप कौतुक केले असते, नव्या संसारासाठी तिला भरभरून आशीर्वाद दिला असता, तिचे सारे हट्ट पुरवले असते.\" असे वाटून सौदामिनीच्या आईला सौदामिनीच्या बाबांची आठवण झाली. सौदामिनीला देखील बाबांची आठवण येत होती, पण आई पुढे ती काहीच बोलली नाही.

मोजक्याच लोकांच्या समवेत हे लग्न पार पाडायचे होते, त्यामुळे घरासमोरील मांडवात अगदी मोजकीच लोकं जमली होती. त्या सगळ्यांचा पाहुणचार सौदामिनीची आई अगदी व्यवस्थितरित्या करत होती. मुलाकडील मंडळीदेखील येऊन बसली होती. त्यांचे आदरातिथ्य सौदामिनीची आई एकटीच करत होती. सगळे काही विधी पार पडत होते. आता फक्त अक्षता तेवढ्याच पडायच्या बाकी होत्या. हळदीचा कार्यक्रमदेखील त्या दिवशीच पार पडला. नवरा नवरीने एकमेकांना हळद लावली. हळदीच्यावेळी सौदामिनीला तिच्या आईनेदेखील हळद लावावी अशी खूप इच्छा असूनदेखील पूर्ण होऊ शकली नाही. त्यावेळी मुळात ते कोणी मान्यच केले नसते. सगळे विधी पार पडून आता अक्षताची तयारी सुरू होती. तेवढ्यात सौदामिनीच्या आईला काहीतरी आठवले म्हणून ती पटकन बाहेर गेली.

\"आपण तर इतके सोने घालू शकणार नाही हे मुलाकडच्या मंडळींना सांगितलेच नाही आता काय करावे? अक्षता पडल्यानंतर सांगावे की अक्षता पडायच्या आधी सांगावे? अक्षता पडल्यानंतर सांगितले तर फसवणुकीचा आळ येईल आणि पडायच्या आधी सांगितले तर लेकीचे लग्न होईल की नाही याची खात्री नाही.\" अशा मोठ्या धर्म संकटात सापडलेली सौदामिनीची आई एका ठिकाणी स्तब्ध उभी होती. तिला पुढे जावे की मागे जावे हेच कळत नव्हते. तेवढ्यात तिचा दादा तिथे आला.

"अगं ताई, काय झाले? तू अशी का उभी आहेस? चल ना. अक्षताची तयारी सगळी झाली आहे. तुझी लेक आता सासरी जाणार आहे." सौदामिनीचे मामा म्हणाले.

"अरे दादा, पण आपण त्या मंडळींना खरे काय? ते सांगितलंच नाही." सौदामिनीची आई म्हणाली.

"कशाबद्दल?" सौदामिनीचे मामा म्हणाले.

"सोन्याबद्दल. आपण जेवढे सोने घालणार होतो तितके तर बनवलेच नाहीत. मी जेवढे बनवले आहे ते तरी खरे खरे सांगू या. नाहीतर उगीच फसवणुकीचा आळ येईल." सौदामिनीची आई म्हणाली.

"ऐक ताई, तू आता सांगितलेस तर ते लग्न मोडतील. तुझी मुलगी कायमची घरी घेऊन बसणार आहेस का? त्यापेक्षा हे लग्न होऊ दे. आपण निवांत सांगू." सौदामिनीचे मामा म्हणाले.

"नको दादा. नंतर माझ्या लेकीला त्रास झालेला मला चालणार नाही. नंतर फसवणूक केली म्हणून लेकीला त्रास देऊ लागले तर माझी लेक तो त्रास सहन करत बसेल. त्यापेक्षा जो काही त्रास आधी मला व्हायचा आहे तो होऊ दे. पण नंतर माझ्या लेकीला झालेला त्रास मला सहन होणार नाही." सौदामिनीची आई म्हणाली.

"ठीक आहे. तुझी इच्छा. चल सांगूया. काय म्हणतात ते पाहू?" सौदामिनीचे मामा म्हणाले.

सौदामिनीची आई आणि तिचे मामा दोघेही मुलाच्या आई-बाबांना सोने कमी घातले आहे हे सांगण्यास गेले. त्यांनी या दोघांना स्पष्ट सांगितले की, आम्ही आमच्या लेकीला आठ तोळे सोने घालू शकलो नाही. अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करूनही फक्त चार तोळे सोने आम्हाला जमले आहे, तेव्हा आम्ही पुढच्या वर्षी उरलेले सोने घालू. आमची चूक तुम्ही पदरात घ्या.

सौदामिनीच्या आईने सोने कमी घातले म्हणून तिचे लग्न मोडेल का? पुढे काय होईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all