Login

सौदामिनी 40 अंतिम

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


बाहेर कोण आले आहे हे पाहण्यासाठी सौदामिनी तिथे गेली. तिने पाहिले तर तिच्या सासुबाई आल्या होत्या. सासूबाईंना पाहून ती अवाक् झाली होती. इतक्या वर्षांनी तिने तिच्या सासूबाईंना पहिले होते. त्या आता खूप खचल्या होत्या. हातामध्ये काठी घेऊन चालत होत्या. डोळ्याला भिंगाचा चष्मा होता. शिवाय खूप वाकून चालत होत्या. बहुतेक त्यांची तब्येत बरी नसावी असे सौदामिनीने ओळखले. तिने फक्त राजनकडे एक कटाक्ष टाकला आणि ती सगळे सामान आत घेऊ लागली.

"सासुबाई तब्येत कशी आहे?" असे सौदामिनीने विचारताच तिची सासू तिच्याकडे न पाहताच मुलाच्या पाठीमागून आत गेली. तिने साधे सौदामिनीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. इतके वय होऊनही आधीची त्यांची उर्मी काही गेली नव्हती. सौदामिनीने देखील असू दे म्हणून विषय सोडून दिला आणि ती तिच्या कामाला लागली.

राजन तिच्या आईला रूममध्ये घेऊन गेला आणि तिचे सामान ठेवले. त्याने आईला बेडवर झोपवले आणि पाण्याचा ग्लास घेऊन तो आईसाठी पाणी घेऊन गेला. हे सगळे सौदामिनी दुरूनच पाहत होती. तिला या कोणत्याच गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. \"त्या इथे अशा अचानक कशा आल्या? आता त्यांचे वय झाले आहे. त्या माझे तोंड पाहणार नव्हत्या आणि यावेळी तिथे कशाला आल्या? इथे राहणार आहेत की दवाखान्याला दाखवण्यासाठी आले असतील?\" असे सौदामिनीच्या मनात एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. राजनला या गोष्टीबद्दल विचारावे असे तिने ठरवले. तो अजुनही आईच्या खोलीत होता. तो बाहेर येण्याची वाट पाहत सौदामिनी तिथेच बसून राहिली.

"आई, ती बाई कोण आहे ग? आणि बाबा तिच्याशी इतका वेळ काय बोलत आहेत? ती इथे अचानक कशी काय आली? सांग ना." मुलीच्या या प्रश्नाने सौदामिनी गोंधळात पडली कारण तिच्या मुलाला आणि मुलीला त्यांची आजी कोण आहे हे माहीत नव्हते. ते कधी आजीला भेटलेच नाहीत. शनिवारी-रविवारी राजन फक्त आईला भेटण्यासाठी एकटाच जात होता. त्याने त्याच्या आईला मुलगी झाल्याचे सांगितले पण त्याच्या आईला तिचे तोंड पहावयाचे नव्हते त्यामुळे आपसूकच मुलांची आणि तिची दोघांची भेट झाली नाही.

राजन बाहेर आल्यावर सौदामिनीने त्याला विचारले, "या आत्ता इथे अशा अचानक कशा काय आल्या? दवाखान्याला दाखवण्यासाठी आले आहेत का?" सौदामिनीच्या या प्रश्नाने राजनने मान खाली घातली.

"ती इथे कायमची राहण्यासाठी आली आहे. सौदामिनी, माझ्या आईला थोडं समजून घे. मी आता काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. ती आता म्हातारी झाली आहे शिवाय तिचे जे काही होते ते लहान भावाने आपल्या नावावर करून घेतले आहे आणि आता तिच्याकडे सगळे दुर्लक्ष करत आहेत. तिला धड दोन वेळचे पोटाला जेवणही मिळत नाही. मला तिची परिस्थिती पाहवली नाही म्हणून मी तिला इकडे घेऊन आलो आहे. तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना?" राजन म्हणाला.

"अजिबात नाही. सासूची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे. माझ्या आईने मला शिकवण दिली आहे ती कर्तव्यात कधीच कसूर करायची नाही. मी हे कर्तव्यदेखील अगदी चांगल्या पद्धतीने निभावेन." असे म्हणून सौदामिनी स्वयंपाक घरात गेली आणि तिने छान सून बनविले. सूप बनवून ती सासूबाईंच्या खोलीत गेली आणि तिने आपल्या हाताने तिच्या सासूबाईंना सूप पाजविले. ते सगळे पिऊन होईपर्यंत सौदामिनीच्या सासुने बाजूला तोंड फिरवले होते. ती एक क्षणही सौदामिनीच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकली नाही. तिला सौदामिनीकडे पाहण्याची लाज वाटत होती, तेव्हा ती शरमल्यासारखी होती. तिचे तिलाच काही समजत नव्हते. ती खाली मान घालून शांत बसली होती. सौदामिनी जेव्हा बाहेर आली तेव्हा तिची मुलगी तिला म्हणाली,

"आई, हीच ना तुझी सासू जिने तुला खूप त्रास दिला होता. मला बाबांनी सगळे काही सांगितले आहे. पण तिने इतका त्रास देऊनही तू तिची इतकी सेवा का करत आहेस?" सौदामिनीची मुलगी म्हणाली.

"बाळा, ती माझी सासू आणि तुझी आजी आहे. कशीही असली तरी तुझी आजी आहे. आपण आपले कर्तव्य नेहमी पार पाडायचे असे माझ्या आईने मला शिकवले आहे. त्या कर्तव्यासाठी मी त्यांची सेवा करत आहे. ती तुझ्या बाबांची आई आहे आणि त्यांना काही हवे नको ते पाहणे माझे कर्तव्य आहे म्हणून मी सगळे करत आहे. तूसुद्धा एकदा त्यांना भेटून ये. तुला लहानपणापासून आजीची माया कधीच मिळाली नाही, पण आता ती आली आहे. तिच्याजवळ बसून चार शब्द बोलून घे. त्या आता खूप थकल्या आहेत त्यांचं वय झालेलं आहे. आपण त्यांच्याशी प्रेमाने वागायला हवं." सौदामिनी तिच्या मुलीला समजावत होती.

"ती कशीही वागली तरी?" सौदामिनीची मुलगी म्हणाली.

"हो. कारण आपण त्यांच्याप्रमाणेच वागू लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? आपण आपली पायरी कधीही सोडायची नाही. आपण नेहमी मर्यादेने राहायचे. संयम धरायचा. संयम केल्याने सर्व काही व्यवस्थित होते. बघ एकदा प्रयत्न करून." सौदामिनी म्हणाली.

"आई, तुझ्यासारखे मला काही जमणार नाही. पण मी थोडा प्रयत्न करून पाहते. फक्त तुझ्यासाठी आणि बाबांसाठी." असे म्हणून सौदामिनीची मुलगी तिच्या आजीला म्हणजे राजनच्या आईला भेटण्यास रूममध्ये गेली. तिथे जाऊन तिने बोलण्यास सुरुवात केली. राजनची आईदेखील तिच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलू लागली. तेव्हा त्या मुलीला बरे वाटले. आजीमध्ये झालेला बदल पाहून ती सुखावली. पण आता बराच वेळ निघून गेला होता. अगदी शेवटी का होईना ती सुधारल्याचे तिला समाधान वाटले.

एक दिवस सौदामिनी सकाळचा नाश्ता घेऊन सासूबाईंच्या रूममध्ये गेली आणि तिने त्यांना नाष्टा दिला. ती चहा आणण्यासाठी बाहेर येत होती.

"सुनबाई, थोडं बोलायचं होतं." राजनची आई म्हणाली.

"हो सासुबाई, बोला ना. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते अगदी मनमोकळेपणाने बोला. तुम्हाला आणखी काही हवं आहे का? नाष्टासाठी दुसरा पदार्थ हवा आहे का? काही हवं असेल तर मनमोकळेपणाने सांगा." सौदामिनी म्हणाली.

"मला काही नको ग. पण मला महत्त्वाचे बोलायचे आहे. तू थोडी इकडे येऊन बसशील का?" असे म्हणताच सौदामिनी तिथे जाऊन बसली.

"बोला सासुबाई" सौदामिनी म्हणाली.

"माझं चुकलं. मला क्षमा कर. खरंतर क्षमा मागण्याच्या लायकीची सुद्धा मी नाही. मी तुला खूप त्रास दिला, तुला खूप कष्ट सहन करावे लागले. तुला जर जमत असेल तर मला माफ कर. माझ्यामुळे तुला घर सोडावे लागले, तुझ्या नवऱ्यापासून पाच वर्षे वेगळे व्हावे लागले, नवरा-बायकोच्यात खूप भांडणं झाली. या सगळ्यास मी कारणीभूत आहे. पण खरी कमाल तुझ्या जिद्दीची. तुझ्या जिद्दीमुळे तू चांगले करत आलीस, तू यश मिळवलेस आणि तुला मोठा पुरस्कारदेखील मिळाला. खरंच तुझ्या ह्या जिद्दीला सलाम." सौदामिनीची सासू म्हणाली.

"अहो सासूबाई, तुम्ही कशाला माफी मागताय. खरंच या माझ्या जडणघडणीमध्ये तुमचा सगळ्यात मोठा वाटा आहे. तुम्ही जर असे केला नसता तर आज मला हे यश मिळाले नसते, आज मी इथंपर्यंत येऊन पोहोचले नसते. खरंतर या यशाचे खरे भागीदार तुम्ही आहात. तुमच्यामुळेच हे सगळे झाले आहे." सौदामिनी म्हणाली.

"खरंच सौदामिनी, तुझे मन खूप मोठे आहे. इतके सगळे होऊनही तू मला या घरामध्ये स्थान दिलेस आणि माझी इतकी सेवा करत आहेस. मी तुला ओळखायला खूप उशीर केला. खऱ्या माणसाची पारख ही उशीराच होते म्हणतात ते काही खोटं नाही. पण आज मला तुझा खूप अभिमान वाटतो. उशिरा का होईना मला खऱ्याची जाणीव झाली." सौदामिनीची सासू म्हणाली.

"सासुबाई तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असू दे. आम्हाला बाकी काही नको." सौदामिनी म्हणाली.

"माझा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. सौदामिनी, तू मला आई म्हटलंस तरी चालेल." सौदामिनीची सासू म्हणाली.

"आई" असे सौदामिनी म्हणताच तिच्या सासूने दोन्ही हात पुढे केले आणि सौदामिनी तिच्या मिठीत विसावली. हे दृश्य लांबूनच राजन आणि सौदामिनीची मुलगी दोघेही पाहत होते. हे दृश्य पाहून ते खूप आनंदित झाले आणि त्यांना समाधान वाटले.

सौदामिनीने आतापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज झाले. सौदामिनीने तिचे कर्तव्य आयुष्यभर पार पाडले आणि तिने संयम धारण करून आयुष्यात सुख, शांती, आनंद, समाधान, मान, सन्मान, चांगले कुटुंब, पैसा, पद सारे काही मिळवले.

अशाप्रकारे सौदामिनी तिच्या आयुष्यात सुखी झाली. सौदामिनी ही कथा एका सत्यघटनेवर आधारित आहे. तुम्ही सर्वांनी या कथेवर प्रेम केलेत त्यामुळे तुमचे मनापासून आभार. सुरूवातीपासून ही कथा वाचून अभिप्राय देणाऱ्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
समाप्त.

🎭 Series Post

View all