त्यांचा संसार खुलत जात होता. आता त्यांच्या संसारवेलीवर एक छानशी कळी सुटली होती. त्यांना एक गोड मुलगी झाली होती. सौदामिनीला मुलगी झाली म्हटल्यावर तिच्या आईला खूप आनंद झाला. राजनच्या आनंदाला तर पारावार उरला नव्हता. सौदामिनी तिचे काम जसे व्यवस्थित करत होती तसाच संसार देखील व्यवस्थित करू लागली. आणखी थोड्या दिवसांनी त्यांना एक मुलगा झाला असे त्यांचे चौकोनी कुटुंब खूप छान पद्धतीने राहू लागले. सौदामिनीला तिचे काम आणि मुलांना सांभाळणे याची सांगड घालताना सुरुवातीला खूप त्रास व्हायचा पण राजनने तिला खूप मदत केली.
सुरुवातीला सौदामिनीला मदत करण्यासाठी तिची आई आली होती, पण ती तरी मुलीच्या घरात किती दिवस राहणार? म्हणून मुले थोडी मोठी झाल्यावर ती तिच्या घरी जायला निघाली. सौदामिनी तिला आणखी काही दिवस राहण्यासाठी सांगत होती पण ती काही केल्या ऐकत नव्हती.
"आई, रहा ना ग अजून थोडे दिवस. इतकी का गडबड करतेस?" सौदामिनी म्हणाली.
"अगं, रहा रहा करत तू मला पाच वर्षे ठेवून घेतलेस. मग अजून किती दिवस राहू? एक ना एक दिवस मला घरी जावेच लागणार ना?" सौदामिनीची आई म्हणाली.
"नको ना आई, तू इथेच रहा. इथे तुला काय कमी आहे?" सौदामिनी म्हणाली.
"अगं, जावयाच्या घरात असे राहून चालत नाही. लोकं नावं ठेवतात. जावयाच्या घरात राहणे शोभत नाही शिवाय माझे तिथे घर आहे ना? माझी पेन्शन देखील येते, मग मला कशाची अडचण असणार आहे? मला कशाची कमी नाही मी तिथे निवांत राहीन. पुन्हा अजून मधून तुम्हाला भेटायला येतच राहीन. तू इतकी कशाला काळजी करतेस?" सौदामिनीची आई म्हणाली.
"तसे नाही ग आई, तुला तिकडे राहून एकटीला कंटाळा येईल. इथे मुलांना सांभाळणे देखील होईल आणि तुला तितकेच रमेल म्हणून सांगतेय. मला नोकरी करत मुलांना सांभाळणे थोडे जड जाईल, मला खूप त्रास होईल. त्या सगळ्यांचे सांगड घालण्यास मला जमेल का? यातून मी पुन्हा राजनसाठी वेळ देऊ शकेन का? याची मला चिंता लागून राहिली आहे म्हणून तुला म्हणते की तू इथेच राहायला ये." सौदामिनी म्हणाली.
"तू सौदामिनी आहेस. तुला सगळे काही जमणारच. सुरुवातीला थोडा त्रास होईल पण नंतर सारे काही जमून घेशील. तुला आठवतंय तुम्ही दोघी लहान असताना मी एकटीने तुमच्या दोघींचा सांभाळ केला होता. तेव्हा तर तुझे बाबादेखील नव्हते. आता राजन आहेत ते थोडा भार उचलतील. त्यांची तुला खूप मोठी मदत होते त्यामुळे तू काहीच काळजी करू नकोस. सुरुवातीला त्रास हा होणारच नंतर तुला सवय होऊन जाईल. शिवाय तुझ्या सासूला सोडून मला जर इथे आणले तर लोकं आणखी नावे ठेवतील. तू सासूला सोडून येथे आली आहेस आणि आईला जवळ करु पाहतेस तेव्हा तुलाच नव्हे तर राजन यांना देखील लोकं नाव ठेवतील. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. कोणतीही गोष्ट मनात आणली कि मनाप्रमाणे घडायलाच हवी असे होत नाही. तू सगळ्याचा विचार करून पहा मग तुला माझे वाक्य आठवतील. आणखी एक लक्षात ठेव आपल्या कर्तव्यात कधीच कसूर करायची नाही. आपले कर्तव्य आपण करत राहायचे." सौदामिनीची आई म्हणाली.
आईचे वाक्य ऐकून सौदामिनी विचारात पडली. तिला प्रत्येकवेळी आई अशाप्रकारे सावध करत होती. सौदामिनीने सगळा विचार करून पाहिला तेव्हा आईचे सगळे बोलणे पटले. \"आता आपला संसार हा आपल्यालाच करायचा आहे. इथे आपल्या मदतीला कोणीच येणार नाही. आपले चौकोनी कुटुंब आपण सावरायचे आहे, त्यांना वेळ द्यायचा आहे तसेच आपण आपले कर्तव्य बजावायचे आहे. हे सगळे करताना सुरुवातीला त्रास हा होणारच; पण नंतर त्यातून मार्ग काढावा लागणार.\" असे मनात ठरवून तिने आईला निरोप दिला.
सौदामिनीची आई गेल्यानंतर सौदामिनीला खूप त्रास झाला. दोन मुलांना सांभाळून संसार करणे सोपे नाही, त्यात ती नोकरी करत होती तीदेखील पोलिसाची. कधी इमर्जन्सी केसेस येत होत्या तेव्हा राजन तिला सावरून घेत होता. तिच्या ऑफिसमधले सगळे तिला सांभाळून घेत होते. जास्त कामाचा भार तिच्यावर पडू नये यासाठी ते तिची काळजी घेत होते. दोन मुलांना सांभाळून ती सारं काही करत होती. सुरुवातीला तिला त्रास होत होता पण नंतर त्याची सवय होऊन गेली. आता तिला काहीच अवघड झाले नाही. हळूहळू मुले शाळेत जाऊ लागली आणि ती मोठी होऊ लागली.
मुले शाळेत जाऊ लागली. आता ती थोडी मोठी झाली होती, त्यांची कामे ते स्वतः करत होती. त्यामुळे सौदामिनीचा कामाचा भार थोडा हलका झाला होता. राजनदेखील तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचे देखील तिच्या कुटुंबावर खूप प्रेम होते. आता संसारातील सर्व जबाबदारी थोडी कमी झाली होती, त्यामुळे तिला कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जात होते. सौदामिनी हळूहळू तिच्या कामात गुंतत चालली होती. मुलांमुळे आणि घरच्या जबाबदारीमुळे तिला काम करणे थोडे कठीण जात होते. संसाराच्या जबाबदारीमुळे ती कामात थोडी मागे पडली होती. पण आता ती पूर्वपदावर येत होती.
सौदामिनी आधीप्रमाणे कामे करू लागली. ती आता कामात लक्ष घालत होती. आधीप्रमाणे वेगवेगळे केसेस अगदी चुटकीसरशी सोडवत होती. तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत होते. मोठमोठे अधिकारी तिच्या कामाचे कौतुक करत होते. सौदामिनीने तिच्या मुलीलादेखील पोलिस होण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिनेदेखील अभ्यास सुरू केला. सौदामिनीची मुलगीदेखील सौदामिनीप्रमाणे खूप हुशार होती. तिने आईचा पायंडा उचलला होता. तिच्या मुलीने देखील अगदी थोड्याच दिवसात या परीक्षेमध्ये यश मिळवले होते. तिचे सर्वत्र कौतुक होत होते. आईच्या पावलावर पाऊल टाकत तिच्या मुलीने देखील या क्षेत्रात पदार्पण केले होते. तिचा मुलगा मेडिकल क्षेत्रात उतरला होता. तो एक चांगला डॉक्टर म्हणून कार्य करत होता. सौदामिनीची दोन्ही मुले वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत होती. आता तिला कशाची चिंता नव्हती. दोन्ही मुले आपापल्या मार्गाला लागले आहेत म्हणून तिने आणि राजनने स्वतःला कामात झोकून दिले. राजनची देखील उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि तो त्या ऑफिसचा अधिकारी बनला. सुख आणि यश त्यांच्या पायाशी लोळण घेत होते. इतक्या कमी कालावधीत सौदामिनीचे सारे स्वप्नं साकार झाले होते.
सौदामिनीने इतके छान कार्य केले असल्यामुळे तिचा सत्कार करण्यात आला होता. तिला खूप मोठा अवॉर्ड दिला जाणार होता त्यामुळे सगळेजण आनंदात होते.
"अहो, उद्या माझ्या आयुष्यातील खूप मोठा आणि आनंदाचा क्षण आहे. तुम्ही तिथे नक्की यायला हवं. माझ्या कुटुंबासमवेत मी तो अॅवाॅर्ड घेणार आहे." असे सौदामिनीने राजनला सांगितले. त्यानेदेखील त्यास होकार दिला. पण त्याला खूप महत्त्वाचे काम आले असल्याने तो काही फंक्शनला हजर राहू शकला नाही. त्यामुळे सौदामिनी रूसून बसली होती.
यापुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा