सौदामिनी 37

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


सौदामिनी रोज सकाळी स्वयंपाक वगैरे आवरून नोकरीसाठी जात होती. तिथे तिला बरीच कामे असल्याने घरी येण्यास उशीर व्हायचा. एखाद्या वेळेस इमर्जन्सी केस आली किंवा मिटिंग असेल तर तिला यायला रात्रच व्हायची. गणेशोत्सव असो की नवरात्र, दसरा असो की दिवाळी तिला एकही दिवस सुट्टी मिळत नव्हती. सणावाराला तिला डबल काम असायचे.

राजनला मात्र त्या सगळ्या सणांना सुट्टी असायची. तेव्हा तो त्रासून जायचा. घरात एकटा कंटाळून जायचा, सौदामिनीची वाट पाहून थकून जायचा. त्याला तो सणासुदीचा दिवस नकोसा वाटायचा. एकट्याला काही करमत नसे. शिवाय त्यावेळी सौदामिनीला लवकर जावे लागत असल्याने सणासुदीला पोळ्या वगैरे करणे तिला जमत नव्हते. ती शिरा वगैरे झटपट होणारे गोडाचे पदार्थ बनवून ड्युटीला जात होती. या सगळ्यामुळे राजन त्रासला होता. सौदामिनीसोबत येऊन चूक केली का? आई जे म्हणत होती ते बरोबर होते का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घोळत होते.

बरेच दिवस त्याला ही गोष्ट खटकत होती म्हणून त्याने ही गोष्ट सौदामिनीला बोलून दाखवायचे ठरवले. तसे त्याने आज धाडस करून मनातील सर्व गोष्टी बोलून दाखवल्या. सौदामिनी काय म्हणेल? तिला काय वाटेल? याचा त्याने विचारही केला नाही. ती कधी माझा विचार करते का? मग मी का तिचा विचार करायचा? असा विचार करून त्याने मनातील बोल तिला स्पष्टपणे सांगितले.

राजनचे बोलणे ऐकून सौदामिनी थक्क झाली. ती संभ्रमात पडली. \"खरंच, आपण चुकलो का? आपण फक्त आपले कर्तव्य बजावत राहिलो पण इकडे संसारात लक्ष द्यायचे विसरून गेलो. सगळ्या केसेस अगदी चुटकीसरशी सोडवलो पण संसाराचा गाडा ओढायला मात्र विसरून गेलो. यामध्ये आपली चूक नेमकी काय? नोकरीमुळे संसारात पुरेसा वेळ देता येत नाही, पण मी माझी सर्व कर्तव्य व्यवस्थित बजावत होते. त्यातूनही काही चूक घडू नये म्हणून दक्ष रहायचे. आज राजन असे का बोलतायत मलाही कळेना? तेसुद्धा नोकरी करतातच आम्ही एकत्र जातो. पण यायला मात्र एखाद्या दिवशी मला थोडा उशीर होतो. आता एवढे यांनी समजून घ्यायला नको का? प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे कशी घडणार?\" सौदामिनीच्या मनात कालवाकालव सुरू होती.

"तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? मी घरची सगळी कामे अगदी व्यवस्थितरित्या करून जाते. पुन्हा येऊन आणखी उरलेली कामे करते. तुम्हाला कोणतेही काम सांगत नाही. माझ्या पद्धतीने सारे काही व्यवस्थित करून जाते. मग तुम्हाला काय अडचण आहे?" सौदामिनी म्हणाली.

"एखाद्या वेळेस कामे राहिली तरी चालतील. पण मला वेळ देत जा. माझ्याशी प्रेमाने दोन शब्द बोलत जा. आता आपण प्रेमात आहोत पण ते जाणवून दे. हे वय आपले फिरण्याचे मजा मस्ती करण्याचे आहे. मग काय म्हातारपणी एकमेकांना फक्त सांभाळून घ्यायचे. तोपर्यंत प्रेमाने दोन शब्द तरी बोलत जा. तुला सुट्टी नसते तेव्हा घरात एकटा बसून माझा जीव मेटाकुटीला येतो. एक तर घरात मी एकटाच असतो. टिव्ही पाहून तर किती पाहणार? आजूबाजूला कोणी बोलायला नसते मला काही करमतच नाही. आपण दोघे राजा राणी सुखाचा संसार करायला येथे आलो आहोत. पण माझ्या वाट्याला ते सुख काही मिळेना. तू मला जास्त महत्त्व न देता तुझ्या नोकरीसाठी महत्व देत आहेस. मला एकदा वाटते की आई जे म्हणत होती ते तितकेच खरे होते. निदान इथून पुढे तरी तू माझ्यासाठी थोडा वेळ देत जा. रविवारी सुट्टी असते पण त्यावेळी तुझे एक्स्ट्राचे काम असते. मला मान्य आहे की तुला नोकरी महत्त्वाची आहे मी त्यासाठी त्याला परवानगी दिली आहे पण त्यातूनही तू अगदी थोडासा वेळ माझ्यासोबत घालवलेस तर मला आनंद होईल. फक्त एकदा माझ्या जागी राहून तू विचार कर. मग तुला समजेल." राजन म्हणाला.

"मी तुम्हाला वेळ देण्याचा खूप प्रयत्न करते पण या कामामुळे मला वेळच नाही मी तरी काय करू? एक झाले की दुसरी केस लगेच येते. सकाळी सगळे आवरून जायलाच मला उशीर होतो. रोज ऑफिसला लेट मार्क पडतो. संध्याकाळी येण्यास उशीर होतो आणि संध्याकाळची कामे अशात दिवस कसा जातो तेच कळत नाही. मी माझे कर्तव्य करत असताना तुमच्याकडे माझे दुर्लक्ष होते हे मला कधी समजलेच नाही. मी घरी आले की तुम्ही आनंदित दिसता म्हणजे तुमचा दिवस नक्की चांगला गेला असेल असे मला वाटते आणि मग मी माझ्या कामाला सुरुवात करते. पण जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा रात्र रात्र तुमच्या उशाशी बसून असते, तुम्हाला काही औषध पाणी हवे नको ते सगळे पाहते ते तुम्हाला दिसले नाही. बाईने कितीही केले तरी ते दिसत नाही, पण तिची चूक मात्र लगेच दिसून येते." सौदामिनी म्हणाली.

"तसं नाही ग सौदामिनी, पण मला याक्षणी खूप एकटं वाटतंय. मला तुझी खूप गरज आहे. तू माझ्याशी बोल. तू फक्त माझ्यासाठी वेळ काढावा असे मला सारखे वाटते. मी तुला आधी बोललो तर तू माझ्यावर राग राग करशील किंवा तुझ्या कामात दिरंगाई करशील असे मला वाटले म्हणून मी कधी तुला हे बोलून दाखवले नाही. पण आता माझ्या हे सहन करण्याच्या पलीकडे जात आहे म्हणून तुला बोलून दाखवत आहे." राजन म्हणाला.

"खूप सॉरी, इथून पुढे मी माझ्या कामातील लक्ष थोडे कमी करेन आणि तुमच्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न नक्की करेन. आपण आता एकमेकांसोबत वेळ घालवायला हवा. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले आहे याची मला जाणीव आहे. आपण दोघेही आपला संसार आता चांगला उभारू. दोघेही दोघांसाठी नक्की वेळ काढू. मी वेळ काढण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला जेव्हा एकटे वाटते तेव्हा मला सांगत जा मी आहे त्या परिस्थितीत तुमच्याजवळ हजर राहीन, मग तेव्हा फक्त आपण दोघेच. मी कधीच तुम्हाला अंतर देणार नाही. सौदामिनीच्या या वाक्याने राजनने लगेच सौदामिनीला मिठीत घेतले. बऱ्याच दिवसांनी तो तिच्या मिठीत विसावला होता.

"खूप थँक्यू सौदामिनी, मला खरंतर हेच अपेक्षित होतं. आता तसेही आपण आयुष्यात जे मिळवायचे ते मिळवलेलं आहे. आता फक्त एन्जॉय करायचं बाकी आहे. आता तारुण्यात काम काम करत राहिलो तर मग आयुष्याचा आनंद कधी घ्यायचा? कामाच्या गराड्यात स्वतःला झोकून दिलं तर जे जगायचं आहे ते सगळे राहूनच जाईल, म्हणून मला वाटते तू एक चार दिवस सुट्टी काढ आणि आपण मस्तपैकी कुठेतरी फिरायला जाऊया. एकमेकांसोबत वेळ घालवण्यात, एकमेकांना आणखी समजून घेऊया. काम करण्यासाठी अख्खे आयुष्य पडले आहे. तुला काय वाटते? तू तुझ्या कामातून वेळ देऊ शकशील का? फक्त चार दिवस. माझ्यासाठी." राजन म्हणाला.

राजनचे हे वाक्य ऐकून सौदामिनी आनंदित झाली. "हो हो नक्कीच. आपण दोघे कुठेतरी फिरायला जाऊया. तसेही मला तेच तेच काम करून खूप कंटाळा आलाय. मी तुम्हाला म्हणणार होते पण तुम्हालाच वेळ नसेल म्हणून मी शांत बसले. पण आता आपण नक्की कुठे जायचं? काय काय घेऊन जायचं? काय काय करायचं? फक्त दोघेच मग गाडी करून जाऊयात ना?" सौदामिनीची लिस्ट सुरू झाली.

"अगं, हो. जाऊयात ना. जायचं म्हटलं तर किती आनंद झालाय तो. हाच आनंद मला तुझ्या चेहऱ्यावर पहायचा होता. नेहमी त्या मरगळलेल्या चेहऱ्याने तू घरात येतेस तेव्हा मला तो चेहरा पाहवत नाही म्हणून मी हसऱ्या चेहऱ्याने तुझ्याकडे पाहतो. निदान माझ्याकडे पाहून तरी तुला उत्साह येईल." राजन म्हणाला.

"मला तुमच्या भावना समजत आहेत. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला समजले आहे. आता आपण आयुष्यात फक्त आनंदी राहायचं. एकमेकांसाठी वेळ घालवायचा. आपण फिरायला महाबळेश्वरला जाऊयात का? तिथे खूप छान वातावरण असते मस्त चार दिवस एन्जॉय करू. मी आजच रजा टाकते. सुरुवातीला तुम्ही असे बोललात तेव्हा मला खूप वाईट वाटले पण तुम्ही असे का बोललात हे आता मला समजले. हे आयुष्य आपल्या दोघांचे आहे. संसार म्हणजे दोन चाके. त्यातील एक चाक नादुरुस्त झाले तर दुसऱ्या चाकाने त्याला सावरायचे असते. तसेच आपण एकमेकांना सावरत संसार खुलवूयात." सौदामिनी म्हणाली.

यापुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all