Login

सौदामिनी 36

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


"आई, तू आमचे काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाहीस. मला सौदामिनीसोबत संसार करायचा आहे आणि तू सुद्धा हवी आहेस. अशा धर्म संकटात मी अडकलो आहे पण मी सध्या सौदामिनी सोबतच जाणार. तू काहीही म्हण, हवे तर नावे ठेव. पण माझे सौदामिनीवर मनापासून प्रेम आहे आणि मी तिच्यासोबत जाणारच. आता राहिला तुझा प्रश्न तर आठवड्यातून दोन दिवस शनिवारी आणि रविवारी मी तुझ्यासोबत इकडे तुला भेटण्यास येत जाईन." राजन म्हणाला.

"तुम्हाला जे मनाला येईल ते तुम्ही करा. मी आता तुमच्या मध्यात येणार नाही. तसेही ही सौदामिनी आता पोलीस झाली आहे. तिच्या हातामध्ये सगळा कारभार आहे तर मी काय बोलणार? तू सुद्धा आता तिच्या अधीन झाला आहेस. तुमचा संसार आहे आणि तुम्ही दोघे आहात. मला त्याचे काहीच करायचे नाही. तुमचा आणि माझा संबंध संपला. राजन तुला मला भेटावेसे वाटत असेल तर हवे तेव्हा येत जा जर नको वाटत असेल तर येऊ नकोस मला काही देणे घेणे नाही. तुम्ही आता मोकळे झालात. तुम्हाला जे करायचे ते करा." असे म्हणून राजनची आई आत गेली.

"थांब सौदामिनी, मी माझे सामान घेऊन तुझ्या सोबत येतो. आपण दोघेही एकत्र जाऊयात." असे म्हणून राजन आत गेला आणि तो त्याचे सामान घेऊन बाहेर आला. ते दोघेही कोल्हापूरमध्ये गेले. तिथे सौदामिनीला एक खोली मिळाली होती. तिथे त्या दोघांनी संसार थाटला.

दोघे राजा राणीच्या संसाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. सौदामिनी इतक्या मोठ्या पोस्टवर असूनही तिने कधीच त्याचा दबदबा केला नाही. मी इतक्या मोठ्या पोस्टवर आहे असा गर्वही कधी केला नाही. ती या पदावर येऊनही तिच्या सासूबाई तिला छळत होत्या, त्रास देत होत्या, नोकरी सोडण्यास सांगत होत्या पण सौदामिनीने अगदी नम्रपणे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. कितीही केले तरी ती नवऱ्याची आई आहे ना? त्यांचा मान सन्मान राखणे तिला समजत होते. आता या पदावर आले म्हणून नात्याचा अवमान करणे तिला कधीच आवडत नव्हते, म्हणून ती त्यावेळी शांत बसून राहिली. आपण कितीही मोठ्या पदावर गेलो तरीही नात्याचा सन्मान राखणे हे तिचे मुख्य धोरण होते. संयम राखला तरच पुढच्या गोष्टी ह्या कळतात. जर संयम धारण केला नाही तर ते नाते तिथेच मोडकळीला येते हे तिला चांगलेच ठाऊक होते. म्हणून तिने संयम धरला होता. सौदामिनीवर चांगले संस्कार झाले होते. तिच्या आयुष्यात तिच्यावर चांगले संस्कार असल्यामुळे प्रत्येकवेळी रौद्र रूप धारण करायचे नाही, नात्यांमध्ये कधीच भेळ मिसळ करायचे नाही, प्रत्येक नाते आपुलकीने प्रेमाने जपायचे, काहीही झाले तरी संयम धारण करायचा हे सगळे संस्कार तिला तिच्या आईकडून मिळाले होते. जन्मापासूनच हे संस्कार असल्यामुळे तिच्यामध्ये लग्न झाल्यानंतरही काही फरक पडला नाही आणि या पदावर आल्यानंतरही तिच्यामध्ये फरक पडला नाही.

मुळात पोलिस वेशामध्ये इतका नम्रपणा चांगला नव्हे. यामध्ये समोरच्या आरोपीला कठोर शिक्षा द्यावे लागते. पण समोरची व्यक्ती ही मुळातच वाईट नसते परिस्थितीमुळे ती वाईट बनत असते हे तिला चांगलेच ठाऊक होते आणि त्याच धोरणाने ती समोरच्या आरोपीचे आकलन करून त्याला शिक्षा करत होती. जर आरोपीची खूप मोठी चूक नसेल तर त्याला सुधारण्याची एक संधी देत होती. तिच्यामध्ये दयाळूपणा हा उपजतच होता.

त्या दोघांचा संसार अगदी व्यवस्थितरित्या सुरू होता. त्या दोघांनी सुरूवातीपासून संसाराची मांडणी केली. सगळे सामान व्यवस्थित लावून घेतले. घर स्वतःच्या मनाप्रमाणे सजवले. सौदामिनी तिच्या कामासाठी बाहेर पडत होती आणि राजनदेखील त्याच्या कामासाठी बाहेर पडत होता. सकाळचा जो काही वेळ होता तो दोघेही एकत्र घालवत होते. पण नंतर नंतर सौदामिनीला कामातून वेळच मिळत नव्हता. कधी कधी तिला घरी यायला उशीर व्हायचा. एखादी केस अचानक आली की तिकडे तिला जावे लागे. अशा परिस्थितीत राजन एकटाच घरी राहत होता. त्यावेळी त्याला घरामध्ये करमत नव्हते. एकट्याने घरात काय करायचे? असा प्रश्न त्याच्यासमोर होता.

सौदामिनी अमरच्या केसनिमित्त राजनच्या ऑफिसमध्ये जायची. तेव्हा त्या दोघांची भेट व्हायची. तिथूनच ते दोघे बाहेर कॉफी पिण्यास जात होते. तोच त्या दोघांनी एकत्र घालवलेला वेळ. नाहीतर सकाळच्या कामांमध्ये सौदामिनी बिझी असायची आणि संध्याकाळी दमून भागून घरी यायची. तेव्हा त्या दोघांना एकांत असा मिळत नव्हता.

सौदामिनी अमरच्या केसमध्ये गुंतून गेली होती. तिला लवकरात लवकर या केसचा निकाल लावायचा होता. एक दिवस अचानक काही चौकशी करताना तिला साक्षीपुरावे सापडले आणि तिच्या मनाची शंका खरी ठरली. हा सगळा घोटाळा सुजितने केला होता. जो अमरसोबत ऑफिसमध्ये अकाऊंटचे काम पाहत होता.

सौदामिनीने सगळे साक्षीपुरावे घेतले आणि ती तडक ऑफिसमध्ये गेली. तिथे सरांना तिने सगळे साक्षीपुरावे दाखवले आणि अमर हा चुकीचा नसून तो ऑफिसचे काम अगदी प्रामाणिकपणे करतो हे तिने सिद्ध केले. सुजितने कंपनीचा सगळा घोटाळा केला आहे हे तिने सिद्ध केले. तेव्हा कंपनीने सुजितला कामावरून काढून टाकले. तो रजेवर नव्हताच. त्याला अमरच्या कम्प्युटरचा पासवर्ड माहित होता आणि त्याचाच वापर त्याने करून कंपनीमध्ये घोटाळा केला होता. त्याचा सगळा आरोप अमरवर घातला होता. पण सौदामिनीने अगदी कसोटीने आव्हान पूर्ण केले. अमर तिचे आभार मानू लागला. पण त्याने सौदामिनीला त्या वेळी मदत केली होती हे जाणून त्याची परतफेड म्हणून सौदामिनीने त्याला मदत केली होती. अर्थातच हे तिचे कर्तव्य होते. कर्तव्यात कसूर करायची नाही अशी तिच्या आईची शिकवण होती आणि त्याप्रमाणे ती वागत होती.

एक केस पूर्ण झाली नाही तोपर्यंत दुसरी केस तिच्या हातामध्ये आली. त्या सगळ्या कामांमध्ये ती व्यस्त राहू लागली आणि इकडे राजनचे आयुष्य मात्र एकाकी पडत गेले. तो आठवड्यातून दोन दिवस शनिवारी आणि रविवारी त्याच्या आईला भेटण्यासाठी जात होता. आईसोबत त्याचा वेळ कसा जात होता हे त्याचे त्याला समजत नव्हते. पण इकडे कोल्हापूरमध्ये आला की तो एकटा पडायचा. सौदामिनी त्याच्या वाट्याला येतच नव्हती.

"सौदामिनी, मला कंटाळा आलाय. आपण एकत्र असूनही तू माझ्या वाट्याला येतच नाहीस. माझा एकट्याचा जीव इथे घुसमटतोय. तू थोडेतरी संसाराकडे लक्ष दे ना. मला माहित आहे तुला खूप कामं आहेत. त्या कामाचा तुला लोड होतोय. पण थोडं माझ्याकडेही लक्ष दे. माझी कामे मी माझा मी करून घेईन पण दिवसातून थोडावेळ तरी माझ्याशी प्रेमाने बोलत जा, मला वेळ देत जा. तुझे फक्त तुझ्या करियरकडे आणि कामाकडे लक्ष आहे. मी इथे अजिबात पुरुषार्थ दाखवत नाही. पण फक्त कामं आणि कामच करून कसे चालेल? थोडे संसाराकडे लक्ष हवे ना? बघ तुला माझ्या बोलण्याचा राग येईल पण एकदा शांत डोक्याने तू विचार करून बघ. आपण हट्टाने इकडे आलो पण तसे आपण एकमेकांसाठी किती दिवस होतो? एकमेकांसोबत किती वेळ घालवला? तुला काही आठवतंय का?" राजन म्हणाला.

"तुम्ही असे का बोलत आहात? मी माझ्या कामामध्ये व्यस्त आहे. मी तरी काय करू? एकापाठोपाठ एक अशी कामे येत आहेत त्याचा निकाला हा लावावा लागतो. त्याची चौकशी करायला जावे लागते. एखाद्या वेळेस इमर्जन्सी येते तेव्हा जावे लागते. मला यायला वेळ होतो. मी समजू शकते पण या कामाच्या गराड्यात मी इतकी अडकून गेले आहे की तुमच्याकडे पहायला देखील मला वेळ नाही. आता मी काय करू?" सौदामिनी म्हणाली.

"तूच बघ यातून मार्ग कसा काढायचा? मला एकट्याला इथे करमत नाही. मी जास्त दिवस एकटा राहू शकत नाही. एकटा राहिलो तर नाही नाही ते विचार माझ्या मनामध्ये घोळत राहतात. असे झाले तर एक दिवस मी मानसिक रूग्ण बनेन. मला सोबतीची गरज आहे. अजूनही मी तरुण आहे. या यौवनाच्या वाट्यावर असे एकटे राहणे मला जमत नाही. तू मला समजून घे. हवे तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांग. बघ तुला माझे म्हणणे पटते का? मी अजुनही तुझ्याच प्रेमात आहे. फक्त तू मला वेळ दे, मला साथ दे." राजन म्हणाला.

यापुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all