"माझा निर्णय झालाय. यात काहीही बदल होणार नाही. मी जे ठरवलंय तेच होणार. तुम्ही कितीही काहीही म्हणा. मी नोकरी करणारच. भले मला या घरात जागा मिळाली नाही तरी चालेल. पण मी माझे पंख छाटून काढणार नाही. इथंपर्यंत येण्यासाठी मी खूप कष्ट केले आहे. आता त्यावर मला पाणी सोडायचे नाही. आतून मी माझे सामान घेऊन येते आणि निघून जाते. तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा." असे म्हणून सौदामिनी आत जाऊ लागली.
"ए पोरी, तुझे सगळे सामान येथे ठेवले आहे. हे बघ इथे पिशव्या भरून ठेवले आहेत. हे घे आणि आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा. तशीही तुझी या घराला गरज नाही. इतके दिवस तू नव्हतीस तर आमचे सगळे व्यवस्थित सुरू होते. परवा आमच्या आयुष्यात आलीस ते ही इतक्या दिवसांनी आणि आमची सगळी बसलेली घडी विस्कटली. आता तू निमुटपणे जा आणि आम्हाला सुखाने राहू दे. तू आमच्या आयुष्यात एक पणवती बनून आली आहेस. तू गेल्यावर आम्ही सुखाने राहू." सासूच्या तोंडून हे शब्द ऐकताच सौदामिनीला खूप वाईट वाटले.
\"आपण असे काय केले? आपण इतके वाईट आहोत का? आपण सर्वांसोबत सुखाने राहू शकत नाही का? आपला नवरा देखील असाच विचार करत असेल का? हे सगळे असा का विचार करत आहेत? मी तर यांची सगळी कामे पूर्ण केली आहेत. आत्ता मी स्वतःसाठी जगू लागले तर यांना मी वाईट वाटत आहे. सासुबाई तर आधीपासूनच मला पाण्यात बघतात. असे मी काय केले आहे? मला असे का छळतात? याक्षणी मी यांना पोलिस स्टेशनमध्ये नेले असते पण नाते आणि नोकरी यामधील फरक मला माहित आहे. कितीही केले तरी त्या माझ्या नवऱ्याच्या आई आहेत हे मला विसरता कामा नये. जाऊ दे. आपण हे घर सोडून जाऊया. हे सगळे इथे निवांत आनंदाने राहू देत.\" असा विचार करून सौदामिनीने तिच्या सर्व बॅगा बाहेर आणल्या आणि ती जाऊ लागली. जाताना तिने एक कटाक्ष राजनकडे टाकला. तो तिच्याकडे पाहतच उभा होता पण तो बराच वेळ काहीच बोलला नाही हे पाहून सौदामिनीला खूप वाईट वाटले.
"आई, तू अशी कशी करू शकतेस? तुला माझी काळजी नाही का? तू एकदाही माझा विचार करत नाहीस. किमान माझा तरी विचार कर. मी असाच एकटाच आयुष्यभर राहू का? मला जीवनसाथी नको आहे का? मी आयुष्यात सुखी रहावे आनंदी राहावे असे तुला वाटत नाही का? तुला माझी काहीच काळजी नाही. तुला नक्की काय अडचण आहे?सौदामिनीने नोकरी केली तर तुला का चालत नाही? तू एकदा माझा विचार करून पहा." राजन चिडून बोलला.
"मी तुझाच विचार करून बोलत आहे. ही तुझ्या आयुष्यात येणार नसेल तर तू दुसरे लग्न कर. गेली पाच वर्षे मी तुझ्या मागे लागत आहे. पण तू काही केल्या ऐकत नाहीस. हिच्यामध्ये एवढं काय बघितलास काय माहित?" सौदामिनीची सासू म्हणाली.
"आई, यामध्ये माझा फायदा कसा होईल? सौदामिनीपासून दूर राहून मी सुखी राहीन का? माझे सौदामिनीवर मनापासून प्रेम आहे. ती माझी बायको आहे आणि आता आमच्यामध्ये तू ताटातूट करत आहेस. हे तुला शोभते का? तू फक्त एकदा माझा विचार करून पहा. मग तुला समजेल. तू काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच नाहीस." राजन वैतागून म्हणाला.
"बाळा, मी तुझ्या भल्याचाच विचार करत आहे. तूच मला समजून घे. तुला त्रास देऊन मला काय मिळणार आहे? एक आई कधीच आपल्या मुलांचे वाईट करत नाही. पण जर ही नोकरी करणार असेल तर तुला याचा जास्त त्रास होईल. पोलीसाची नोकरी म्हणजे अडचणीच्या वेळी कधीही हजर व्हावे लागते. तेव्हा तू काय करणार?" राजनची आई म्हणाली.
"आई, मला जे काही म्हणायचे आहे ते तुला समजत नाही की तू समजून घेऊ शकत नाहीस. अगं, पोलीसची नोकरी म्हणजे ते आपल्या देशाचे संरक्षक असतात. आपल्याला काही अडचण आली की आपण पोलीस स्टेशनला धाव घेतो. इतके चांगले काम सौदामिनी करत आहे आणि तू तिला त्यापासून वंचित करत आहेस? आपल्या शेतीवाडीसाठी जेव्हा भांडणं, भाऊबंदकीत भांडण सुरू होते तेव्हा तू म्हणाली होतीस ना की, आपल्या खानदानात एखादा पोलीस असावा म्हणून. मग आता सौदामिनी पोलीस झाली आहे तर तुला काय अडचण आहे? तिलाही तू काम करू देत नाहीस. तुला काय म्हणायचे आहे? ते मला अजूनही समजले नाही. तू तुझे विचार तुझ्याजवळ ठेवून घे. मी सौदामिनीसोबत जाणार आहे. ती माझी अर्धांगिनी आहे आणि ती जिथे असेल तिथे मला जावेच लागेल. कारण आजचे तुझे विचार मला अजिबात पटले नाहीत." राजन आईला स्पष्ट म्हणाला.
"हे सगळं या बाईमुळे होत आहे. ही आपल्यामध्ये फूट पाडत आहे. एका मुलाला आईपासून वेगळे केल्याचे पाप कुठे भेटशील ग तू. तू सुद्धा कधी ना कधी आई होशील. तेव्हा तुला समजेल की एका मुलाला आईपासून दूर केल्यानंतर किती वेदना होतात ते. तुला तुझ्या संसारातपेक्षा तुझी नोकरी महत्वाची वाटते? त्या नोकरीसाठी तू एका मुलाला आईपासून दूर करत आहेस. याचे तुला काहीच कसे वाटत नाही? इतकी मोठी फौजदारीन बनली आहेस तू, तर एका व्यक्तीचे दुःख तुला समजू शकत नाही? मग कसली फौजदारीन आहेस तू? तुला आईचं मन कधी कळणार? त्यासाठी आई व्हावं लागतं. असं नोकरी करत फिरणार कधी आणि आई होणार कधी हे परमेश्वरालाच ठाऊक." राजनच्या आईचे हे बोलणे ऐकून सौदामिनीच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. तिला कसेतरीच वाटू लागले.
\"आपण खरंच आई आणि मुलाची ताटातूट करत आहोत का? यामध्ये आपला स्वार्थ आहे का? मी फक्त स्वतःचा विचार करत आहे का? राजनला त्याच्या आईपासून दूर केल्याचे मला पाप लागेल का? एका आईची आणि मुलाची ताटातूट केली त्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे. हे माझ्यामुळे होत असल्यामुळे माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. एकीकडे माझे अस्तित्व आणि दुसरीकडे एका आईचे आयुष्य. यातून कोणते एक कसे निवडायचे? आईची आणि मुलाची ताटातूट कशी करायची. हा दुरावा मी अनुभवला आहे. पण या माऊलीला ते सहन होईल का? नेहमी मुलाच्या भल्याचा विचार करणारी आई आपल्या मुलाला दूर जाताना पाहून सहन करेल का? मी काय करू? किती मोठ्या संकटात मी सापडले आहे.\" अशाप्रकारे सौदामिनीच्या मनात कालवाकालव सुरू होती.
"अहो, तुम्ही इथेच रहा. मी एकटी जाईन. तुमच्या आईला तुमचा विरह सहन होणार नाही. त्या खूप दुःखी होतील. आपल्याला त्यांचाही विचार करायला हवा ना? शेवटी कितीही केले तरी त्या तुमच्या आई आहेत. आपली कोल्हापूरात भेट होईलच. आपण रोज भेटत राहू, पण तुमच्या आईला भेटता येणार नाही. तुम्ही तुमच्या आईजवळ थांबा. मी एकटी जाते. तसेही इतके दिवस आपलं वेगळे होतोच. फक्त आपल्याला आता प्रेमाची किंमत कळली." सौदामिनी राजनला समजावत होती.
राजन सौदामिनीचे ऐकेल का? तो आईसोबत राहील की सौदामिनीसोबत जाईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा