Login

सौदामिनी 34

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


सौदामिनीची सासू सौदामिनीला पुन्हा नोकरीला जायचे नाही असे ठणकावत होती. पुन्हा नोकरीला गेलीस तर या घरात तुला थारा नाही असे ती म्हणत होती. सौदामिनीला तिचा स्वाभिमान हवा होता. इतक्या कष्टाने मिळवलेली नोकरी आपण असेच पाण्यात सोडून द्यायचे हे तिला पटत नव्हते. तिला काहीही करून ही नोकरी करायचीच होती, पण तिची सासू तयार होत नव्हती. घराच्या अंगणात सौदामिनी उभी होती आणि सौदामिनीची सासू आत पायरीवर बसून होती. इतक्यात तिथे राजन आला. त्याला या गोष्टीचा अंदाज आला होता. \"नक्कीच आईने नवीन काहीतरी सुरू केले असेल\" असे त्याने ओळखले होते. तोदेखील बाहेरच उभा राहिला.

"अगं आई, तू हे काय चालवले आहेस? आम्हाला आत येऊ दे. इथे बाहेरच का उभा केले आहेस? काय झालंय? मला सांगशील का?" राजन म्हणाला.

"अरे राजन, घरच्या सुनांनी नोकरी केलेली शोभते का? पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बसायचं, कैद्यांना पकडून आणायचं, चोराला शोधायचे, मारामारी करायची हे सगळं शोभतं का? आता तूच सांग. तुला तरी हे पटतं का? आपल्या गावात अजूनतरी कोणी असे वागले नाही. मग आता लोकं नावं ठेवणार ना?" सौदामिनीची सासू राजनला म्हणाली.

"आई, पण आता काळ बदलला आहे. पूर्वीचे विचार सोडून दे. नवीन विचार कर. आतापर्यंत कोणी झाले नसेल, पण तुझी सून या गावात पहिली महिला पोलीस उपनिरिक्षक झाली आहे. तुझी छाती गर्वाने फुगायला हवी. तुला याचा आनंद व्हायला हवा. आता सगळं बदललं आहे. तुझे विचार देखील बदल. तू वेगळ्या दृष्टीने विचार करून पहा." राजन आईला समजावत होता.

"मला काही समजून घेण्याची गरज नाही. मला फक्त सौदामिनी नोकरी करायला नको आहे. मी तिला सकाळी सगळं काही सांगितलं होतं पण तिने काहीच ऐकून घेतले नाही. नको म्हणताना ती हट्टीपणाने गेली म्हणून तिला बाहेर उभा केले आहे. एक तर नोकरी किंवा घर यापैकी एकाची निवड कर असे तिला सांगितले आहे. जे काही ठरवायचे आहे ते ती स्वतः ठरवू दे." राजनची आई म्हणाली.

"मी तुम्हाला सकाळीच सांगितलंय. मी नोकरी सोडणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी मी नोकरी करणारच. तुम्ही तुमचे विचार बदला. एक स्त्रीने मनात आणलं तर काहीही करू शकते मग नोकरी आणि घर व्यवस्थित का सांभाळू शकणार नाही? तुम्ही माझ्या जागी राहून विचार करा. मी या नोकरीसाठी खूप कष्ट घेतले आहेत आणि आता तुमच्या म्हणण्यानुसार यावर पाणी सोडू म्हणताय. हे कदापि शक्य नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी सगळे व्यवस्थित करेन. आपले दिवस पालटतील. जे शक्य होईल तितके मी करण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडून एकही चूक होणार नाही याची काळजी घेईन. फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघा. मग तुम्हाला फरक जाणवेल." सौदामिनी सुध्दा तिच्या सासूला समजावत होती.

"तुम्ही कितीही समजावले तरी मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. एक तर नोकरी किंवा घर. बाकी मला काही माहित नाही. नोकरी करायची असेल तर आल्या पावली परत जा." राजनची आई म्हणाली.

सौदामिनीची सासू काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तिला कितीही समजावले तरीही ती तिच्या मतावर ठाम होती. आता राजन आणि सौदामिनीला काय करावे समजेना. ते दोघे क्षणभर तसेच ताटकळत उभा राहिले. बराच वेळ विचार करून झाल्यावर सौदामिनी योग्य निर्णयावर येऊन थांबली. ती तिचा निर्णय सांगणार होती.

\"यांना कितीही सांगितले तरी या काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. समजावत बसले तर सगळे पालथ्या घड्यावर पाणी असल्यासारखे होईल. त्यापेक्षा आपणच नमते घेऊया. मला कोणताही एक निर्णय घ्यायचा आहे. इतक्या कष्टाने मी या पदावर येऊन पोहोचले आहे. हे पद आणि माझा संसार हे दोन्ही मला महत्त्वाचे आहेत. पण या क्षणी कोणतीही एक गोष्ट निवडायची असल्यास मी माझी नोकरीच निवडेन. कारण या नोकरीने मला जगण्यास शिकवले. माझ्या आयुष्यात माझ्या साथीला कोणी नव्हते तेव्हा मला त्यांने साथ दिली. आता ही नोकरी माझी काही ओळख आहे. मी आता याच्यामुळेच आहे. तेव्हा ही नोकरी सोडून मला चालणार नाही. पण इतक्या वर्षांनी राजन माझ्या आयुष्यात आला त्याला तर कसे सोडू? अशी द्विधा मनःस्थिती सौदामिनीची झाली होती.

शेवटी तिला कोणताही एकच निर्णय घ्यायचा होता. तिने बराच वेळ विचार केला आणि ती राजनला सांगू लागली, "अहो, माझी नोकरी म्हणजे माझा जीव आहे. तुम्ही सुद्धा मला प्रिय आहा तुम्हा दोघांपैकी कुणा एकाची निवड मी कशी करू शकेन? तुम्ही एकदा विचार करा आणि मी या घरात राहायचं नाही तर मी कुठे जाऊ? पुन्हा आईकडे गेले तर तुम्ही इकडे एकटे राहाल. मला तुमच्यासोबत राहायचे आहे आणि नोकरी सुद्धा करायची आहे. तेव्हा कसे करायचे? अशा द्विधा मनस्थितीत मी आहे. तुम्ही मला साथ देणार होता, माझी मदत करणार होता तर आता तुम्ही कशाप्रकारे माझी मदत कराल?"

सौदामिनीच्या या प्रश्नाने राजन गोंधळात पडला. त्याला आता कोणता निर्णय घ्यावा हे समजेना. तो बराच वेळ विचार करू लागला. सौदामिनीची साथ देणार हे त्याने आधीच कबूल केले होते. आता तिला साथ द्यायचे कसे? एकीकडे बायको आणि दुसरीकडे आई अशा दोघांच्या कचाट्यात तो सापडला होता. जर सौदामिनीला नोकरी करायला परवानगी द्यावी तर आई सौदामिनीला घरात ठेवून घेणार नाही आणि सौदामिनी घरात हवी असेल तर तिने नोकरी करायची नाही. ही कसली जगावेगळी अट. आईचे हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. यातून मार्ग काढायचा कसा? या दोन्ही मधून मधला मार्ग काढायला हवा. जेणेकरून या दोघी सुद्धा आनंदी होतील. पण असा कोणता मार्ग असेल? याचा विचार करत राजन बराच वेळ उभा होता. राजन काहीच बोलत नाही या गोष्टीचा सौदामिनीला खूप राग आला होता.

राजन कोणताच निर्णय पटकन घेत नव्हता. बराच वेळ होऊन गेला, संध्याकाळ होऊन गेली तरीही तो काही बोलेना. तिघेही त्यांच्या जागेवर तसेच उभे होते. या गोष्टीचा सौदामिनीला खूप राग येत होता. राजनने कोणताही एखादा निर्णय घ्यावा आणि तो स्पष्टपणे सांगावा असे तिला वाटत होते. पण तो काहीच बोलत नव्हता.

"आई, आता रात्र होत आली आहे. उद्या सकाळी पाहू. मी तुला काय ते उद्या सकाळी नक्की सांगेन." असे राजन म्हणाला.

"सकाळी बिकाळी काही नाही. जे काही सांगायचे आहे ते आत्ताच सांगायचे. एक तर आत नाहीतर बाहेर. तसेही मी सौदामिनीचे सगळेच सामान बाहेर आणले आहे. आत घ्यायचे असेल तर ते सामान ती घेऊन येईल. बाहेर जायचे असेल तर मी तिला सामान सगळे परत करेन. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तिला घेऊ दे. तू याच्यामध्ये पडू नकोस." राजनची आई म्हणाली.

या सगळ्याचा सौदामिनीने पूर्ण विचार केला. तिने राजन काही बोलत नाही हे पाहिले आणि स्वतःचा निर्णय ऐकवला. "मी काहीही झाले तरी नोकरी करणारच. जर तुम्हाला तुमच्या मुलाचा संसार नको असेल तर तुम्ही माझे सामान मला परत द्या. मी निघून जाईन. एक आईच स्वतःच्या मुलाचा संसार उध्वस्त करायला निघालेली आहे. माझ्यासाठी नाही निदान तुमच्या मुलाचा तरी तुम्ही विचार करा. मी निघून गेल्यानंतर तुमचा मुलगा दुसरे लग्न करणार नाही. शिवाय तो तसाच एकटा राहील. सगळ्या गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित विचार करा आणि मगच निर्णय घ्या. मी कुठेही जात नाही. तुमचा निर्णय होईपर्यंत मी इथेच राहीन. पण मी अगदी शेवटचे तुम्हाला सांगते मी नोकरी सोडणार नाही, हा माझा निर्णय झाला आहे. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा." सौदामिनी स्पष्टपणे म्हणाली.

सौदामिनी इतके बोलल्यावर तिची सासू कोणता निर्णय घेईल. हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all