Login

सौदामिनी 33

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


सौदामिनीच्या सासूने सौदामिनीला हाक मारली. तिला शेताकडे पाठविण्याच्या उद्देशाने तिने हाक मारली. शेतातील बरीच कामे खोळंबली होती आणि ती करण्यासाठी सौदामिनीला तिची सासू पाठवणार होती. सासूबाईंचा आवाज ऐकू आल्याबरोबर सौदामिनीने \"आले\" म्हणून उत्तर दिले आणि लगेच ती आतून बाहेर आली.

सौदामिनी वर्दी घालूनच बाहेर आली होती. ती पोलीस स्टेशनला जाण्यासाठी तयार होत असतानाच सासूचा आवाज आला त्यामुळे ती तशीच बाहेर आली. ती बाहेर आल्याबरोबर तिच्या सासूचा चेहरा वेडावाकडा झाला. तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. तिला काहीच कळायला मार्ग नव्हता. क्षणभर ती सुन्न होऊन फक्त सौदामिनीकडे पाहत होती. हा काय प्रकार आहे? याचा तिला काहीच अंदाज येत नव्हता. पण बऱ्याच वेळाने ती स्वतः सावरली. आता हिला काही बोलावे की नको या संभ्रमात तिची सासू होती.

"ही काय थेर चालली आहेत? हे काय नवीन नाटकं? हा पोशाख काढून ये आणि साडी नेसून जरा शेताकडे जाऊन ये. तिथे बरीच कामे खोळंबली आहेत. आता तुला शेताकडे जावे लागणार आहे. आता ही नाटकं बंद कर. नाटकात काम करायचे सोडून दे आणि नेटका संसार कर." सौदामिनीची सासू म्हणाली.

"सासूबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी नाटकात काम करत नाही तर खरोखरच पोलीस उपनिरीक्षक या पदावर रुजू झाले आहे. रोज कोल्हापूरला पोलीस स्टेशनमध्ये मी काम करण्यासाठी जाते. आता इथे आल्यानंतर चार दिवसांची मी रजा घेतली होती पण आता पुन्हा तिथे जायचा विचार करत आहे. विचार कसला आजपासून मी तिथे जाणार आहे आणि ही त्याचीच तर तयारी केली आहे. थोड्याच वेळात माझी गाडी येईल. त्या गाडीतून मी कोल्हापूरला जाणार आहे. येताना काही आणायचे असेल तर खुशाल सांगा. मला अजून थोडे आवरायचे आहे. ते आवरून घेईन आणि मग आवरल्यानंतर निघून जाईन. स्वयंपाक घरातील सगळी कामे पूर्ण झाली आहेत त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. शिवाय मी नसताना तुमचे सगळे व्यवस्थित चालू होते ना? तशाप्रकारे सध्या मी नाही असे समजून तुम्ही तुमची कामे करत जा." सौदामिनीच्या या बोलण्याने तिची सासू थोडावेळ गोंधळली आणि घाबरली सुद्धा.

"हे कधी आणि कसे घडले? तू तर घरातच होतीस. तुझे बारावी शिक्षण झाले होते. मग हे पुढे कसे घडले?" सौदामिनीची सासू म्हणाली.

"सासुबाई, ही सगळी तुमचीच कृपा आहे. तुमच्यामुळेच मी या पदावर येऊ शकले. मी माहेरात पाच वर्ष होते तेव्हा पुढील शिक्षण घेतले आणि परीक्षा दिली. त्या परीक्षेत पहिल्याच वेळी मी निवडून आले आणि आता या पदावर आहे. राजनची आणि माझी सुद्धा अशीच भेट झाली. आणि त्यांनी मला घरी आणलं. या पाच वर्षांमध्ये इथे काही बदलले नसेल पण माझ्या आयुष्यात खूप काही बदल झाला आहे. आधीची सौदामिनी आता पूर्णपणे बदलली आहे. माझ्या हातामध्ये आता कायदा आहे. तुम्ही माझे काही वाईट करू शकत नाही. तुम्ही मला जर त्रास दिला तर मी तुम्हाला जेलमध्ये टाकू शकते. तिथे तुम्हाला सोडवायला कोणी येणार नाही." सौदामिनी म्हणाली.

"तू मला भीती घालत आहेस काय? तुला दिलेल्या त्रासाचा बदला आता घेणार आहेस काय? घे घे तुला काय करायचं आहे ते कर. पण मी सुद्धा तुझा बघून घेईन. तू ही नोकरी अजिबात करायची नाही. आमच्या घराण्यात कोणत्याही सुनेने आजपर्यंत नोकरी केली नाही. त्यामुळे तू आता राजीनामा दे आणि घरात बस. तुझे बाकी मी काही ऐकून घेणार नाही. जर ते मान्य नसेल तर पुन्हा तुझ्या आईच्या घरी जा." सौदामिनीची सासू म्हणाली.

"मला वाटलंच होतं की तुम्ही या थराला जाल. नोकरी सोडायला सांगाल. पण काही केल्या मी नोकरी सोडणार नाही आणि राजनला सोडून जाणार नाही. तुम्ही काय करायचं आहे ते करा. आता सुद्धा तुम्ही इतके त्रास देत आहात म्हणून तुमची केस नोंदवू शकते, पण तमाशा नको म्हणून मी शांत आहे." सौदामिनी स्पष्टपणे म्हणाली.

"तू मला भीती दाखवत आहेस काय? माझ्यावर दादागिरी करत आहेस. पण माझ्या घरात हे मी खपवून घेणार नाही. तू नोकरी सोडून दे आणि घरात बस. नाहीतर शेतावर कामाला जा. मला तू ही नोकरी केलेली अजिबात चालणार नाही. रोज अशीच जाशील मग घरातील कामे कोण करणार? शिवाय तुझीच दादागिरी घरामध्ये मला चालणार नाही." सौदामिनीची सासू म्हणाली.

\"ही नोकरी करून चार पैसे कमवायला लागली तर माझे स्थान या घरांमध्ये राहणार नाही. ही सौदामिनी सुसाट सुटेल आणि माझे काही ऐकून घेणार नाही. तिचेच वर्चस्व या घरावर राहील.\" अशी भीती सौदामिनीच्या सासूच्या मनात येत होती. त्यामुळे ती सौदामिनीला काहीही करून नोकरी सोडण्यास सांगत होती. पण सौदामिनी देखील हिच्या वरचढ होती. ती इतक्या कष्टाने मिळवलेली नोकरी अजिबात सोडणार नव्हती.

सासू नको म्हणत असतानाही सौदामिनी त्यादिवशी नोकरीसाठी घरातून बाहेर पडली. तिने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आजपासून जॉईन होत आहे याची नोंद केली आणि ती तिच्या कामाला लागली. तिकडे सौदामिनीच्या सासूला प्रचंड राग आला होता. \"हिची इतकी हिम्मत कशी झाली? मला डावलून ही घरातून निघून गेली; आता पुन्हा तिला घरात घेणारच नाही.\" असे तिने मनाशी ठाम ठरवले होते. \"राजन आल्यानंतर त्याला सर्व गोष्टी मी सांगेन आणि हिचे बाहेर जाणे बंद करेन म्हणजे माझे आणखी काम हलके होईल नाहीतर हीच संधी आहे तिला पुन्हा तिच्या माहेरी पाठवून द्यायची.\" असे म्हणत तिने मनात प्लॅन आखला.

संध्याकाळ होण्याची वाट पाहत सौदामिनीची सासू दारातच बसली होती. सौदामिनी येण्याची ती वाट पाहत होती. सौदामिनी आली की तिला बाहेर थांबवायचे आणि बाहेरच्या बाहेर तिला पाठवून द्यायचे असे ठरवले होते. तिच्या सगळ्या बॅगा घेऊन ती बाहेर येऊन बसली होती. बघता बघता संध्याकाळ झाली. सौदामिनी तिच्या गाडीतून तिथे आली आणि ती गाडीतून उतरली. उतरल्यानंतर तिला समोर तिची सासू बसलेली दिसली. तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि ती आत जाऊ लागली.

"कुठे चालली आहेस? तुला सकाळीच सांगितले होते. एकदा सांगितलेलं तुला ऐकू येत नाही का? तुला जर नोकरी करायची असेल तर या घरातून चालती हो. नोकरी करायची असेल पुढे एक पाऊलही टाकायचे नाही." सौदामिनीची सासू म्हणाली.

"अहो सासुबाई, तुम्ही माझे ऐकून तरी घ्या. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीला समजून घेत नाही. काय उपयोग? तुम्ही उलट मला सपोर्ट करायला हवा. माझ्या स्वप्नांना बळ देण्याचा प्रयत्न करायला हवा. तुम्ही तर माझे पंख छाटून काढताय. एक बाई दुसऱ्या बाईला मदत करू शकत नाही. किती ते दुर्भाग्य?" सौदामिनी म्हणाली.

"ए बाई, तुझे लेक्चर ऐकायला मी इथे बसले नाही. तुला ऐकायचे असेल तर आत ये नाहीतर बाहेर निघून जा. इतके सांगू नकोस मी तुझे काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाही. वर्चस्व गाजवायला तू इथे आली आहेस. मला सगळे काही माहित आहे. आल्यापावली तू परत जा नाहीतर मोठा तमाशा होईल." सौदामिनीची सासू म्हणाली.

"मी कोणावरही वर्चस्व गाजवायला आले नाही. आता एक हुकूम सोडला तर गाडी येऊन तुम्हाला घेऊन जाईल, पण तुम्ही माझ्या नवऱ्याच्या आई आहात म्हणून मी शांत बसले आहे. नाहीतर केव्हाच तुम्हाला गाडीत घालून घेऊन गेले असते. आता तुम्ही खडी फोडत तुरुंगात बसला असता." सौदामिनी रागातच म्हणाली.

"हे बघ, तू कशी बोलत आहेस आणि म्हणे वर्चस्व गाजवत नाही. हे वर्चस्व गाजवणं झालं तर काय आहे? सगळा तुझाच हक्क. घरावर हक्क मागायला आली आहेस. येताना फुटकी कवडीसुद्धा घेऊन आली नाहीस आणि आता आमच्यावरच दादागिरी करत आहेस. हे तुझे वागणे मला अजिबात आवडत नाही. गप्प मुकाट्याने काम करायचे सोडून नाही ते फालतूगिरी चालू आहे. माझ्या मुलाला स्वतःकडे ओढवून घेतलेस आणि आता आमच्यावर वर्चस्व गाजवत आहेस. निघून जा इथून. आम्हाला तुझी अजिबात गरज नाही." सौदामिनीची सासू म्हणाली.

या दोघींचे तू तू मै मै सुरू असतानाच राजन तिथे आला. त्याला पाहून दोघी थोडा वेळ शांत झाल्या.

पुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all