सौदामिनी 32

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


सौदामिनी तिच्या सासरच्या अंगणात उभी होती. तिथे तिने पाहिले तिच्या अंगणातील तुळस तिच्याकडे पाहून तिचे स्वागत करत होती. ती छान वाढली होती आणि सौदामिनीकडे पाहून आणखीनच खुलली असावी असे तिला वाटले. सौदामिनी हळूच तिथे गेली आणि तुळशीवरून तिने अलगद हात फिरवला. तिला छान मोठे मोठे मंजिरी आले होते. त्याला तिने हात लावला. मंजिरी पाहून तिला खूप समाधान वाटले. आपण लावलेली तुळस इतकी छान वाढली आहे असे वाटून तिला समाधान वाटले. तेथून ती पुढे गेली. सौदामिनी जेव्हा आत गेली तेव्हा गाय आणि एक बऱ्यापैकी मोठे असलेले वासरू तिला आढळले आणि ती मनोमन सुखावली. तिला पाहताच त्या गाईने एक छानसा हंबरडा फोडला. तिचे छान स्वागत केले. आपण आलो आहोत हे तिने ओळखले असे सौदामिनीला वाटले आणि ती त्या गाईपाशी जाऊन तिच्यावरून हात फिरवू लागली.

"राणी कशी आहेस ग?" गोड आवाजात सौदामिनीने गाईची चौकशी केली. तेव्हा पुन्हा गाईने हंबरडा फोडला. \"जणू तू आलीस घराला घरपण आले.\" असेच ती सांगत असावी. आपण घर सोडून जाताना इथे जसे होते तसेच सगळे आहे याचे तिला समाधान झाले.

राजनने आईला हाक मारली, तेव्हा त्याची आई आतून बाहेर आली.
"आलास बाळ, आज सुट्टी होती ना? मग तू कुठे गेला होतास? कधीपासून तुझी वाट पाहत आहे. एवढा का उशीर केलास? चल, तुला जेवायला वाढते." राजनची आई म्हणाली.

"आई, हे बघ कोण आलंय." असे म्हणून राजनने सौदामिनीकडे बोट केले. तेव्हा त्याच्या आईने तिच्याकडे पाहिले आणि तिचा चेहरा काळाठिक्कर पडला.

"ही अवदसा इथे कशाला आली आहे? हिला इथे यायची कोणी परवानगी दिली? जाताना इतके दिवे लावून गेली आहे ते बास झाले नाही का? की आता पुन्हा इथे आली आहे. आमच्या घराण्याची अब्रू वेशीला टांगण्यासाठी आली आहे की काय?" असे राजनची आई म्हणू लागली.

"आई, तिला काही बोलू नकोस. ती माझी बायको आहे आणि ती इथे कायमची राहण्यासाठी आली आहे. तिला इथे मी घेऊन आलो आहे." हे ऐकताच राजनच्या आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

"काय? हिला तू घेऊन आलास? इथे ज्या काही गोष्टी झाल्या आहेत तुझ्यासमोर सगळे झाले आहेत ना? मग तू हिला कसा काय घेऊन आलास?" राजनची आई म्हणाली.

"आई, मला सगळं काही सत्य समजलेलं आहे. तू आता जास्त विचार करू नकोस. जा स्वागताची तयारी कर." राजन म्हणाला.

"मी काही करणार नाही. यायचं असेल तर तसेच आत येऊ दे. नाहीतर आल्या पावली परत जाऊ दे. मला हिच्याशी काही देणं घेणं नाही." असे म्हणून राजनची आई आत निघून गेली.

हे सगळे पाहून सौदामिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद उतरला. तिला आजच्या दिवशी हे घडणार असे शंभर टक्के वाटले होते. ती थोडी नाराज झाली, पण तरीही ती पुन्हा मोठ्या जोमाने आत गेली. ती आत जाताच तिची आई आणि बहीण गाडीतून उतरून सगळे सामान घेऊन आत आल्या. त्यांचे आदरातिथ्य सौदामिनीने केले. सौदामिनीला एक लहान दीर होता. त्याचेही लग्न झाले होते. त्याची बायको सौदामिनीशी आणि तिच्या घरच्यांशी व्यवस्थित बोलत होती. पण कितीही केले तरी जाऊ ती जाऊच. तिचे गुण ती दाखवणारच. त्यामुळे सौदामिनीची आई आणि बहीण जास्त वेळ न थांबता लगेच तिथून निघाल्या. सौदामिनीच्या घरातून जाताना तिच्या आईचे आणि सौदामिनीचे दोघींचे डोळे पाणावले होते.

"जपून रहा पोरी आणि तसे काही वाटल्यास मला एक फोन कर. मी येऊन जाईन. तू अजिबात घाबरू नकोस. आता राजन तुझ्या पाठीशी आहेत." सौदामिनीची आई म्हणाली.

"आई, आता तूच काही काळजी करू नकोस. कारण कायदा माझ्या हातात आहे. मी आता कोणत्या पदावर आहे हे तुला माहित आहे ना? मग आता घाबरायचे आणि रडायचे तर मुळीच नाही. आत्ता फक्त लढायचे. जे काही होईल ते होईल, पण मी सुखाचा संसार हा नक्की करणार." सौदामिनीचे हे बोलणे ऐकून तिच्या आईला खूप समाधान वाटले. आपली मुलगी आधीच धीटाची होती. आता तिला नवे पाठबळ मिळाले होते म्हणून तिला मुलीचे कौतुक वाटत होते.

आई गेल्यानंतर सौदामिनी खूप एकटे एकटे वाटत होते. इतक्या वर्षांनी त्या घरात ती आली होती त्यामुळे तिला सगळे काही नवीन वाटत होते. इथे आपण राहून गेलो आहोत असे तिला अजिबात वाटत नव्हते. घरातील कोणीही तिच्याशी बोलत नव्हते, राजन तेवढाच बोलत होता. राजन बाहेर गेला की सगळे अनोळखीच भासत होते. सौदामिनीची जाऊ येताना खूप सामान घेऊन आली होती, शिवाय तिला तिच्या माहेरच्यांनी वीस तोळे सोने घातले होते त्यामुळे तिची सासू लहान सुनेचे कौतुक करत होती. सौदामिनीला त्याचे काहीच वाटत नव्हते पण तिच्याशी कोणी बोलत नव्हते याचे तिला खूप वाईट वाटत होते. आजूबाजूला बोलायला जावे तरी खूप बदल झाला होता. गाव चार वर्षात बदलले होते त्यामुळे तिचे तिथे मन रमेना. \"हळूहळू सवय होऊन जाईल. काहीही झाले तरी आपले सासर आहे त्यामुळे आपल्याला इथेच आयुष्य काढावे लागणार आहे\" असे ती पुन्हा मनाला समजावत होती.

दोन दिवसांनी राजन नेहमीप्रमाणे ऑफिसला जाऊ लागला. घरामध्ये फक्त सौदामिनी होती मात्र तिच्याशी कोणीच बोलत नव्हते. तिथेच राहून अमरच्या घोटाळा केसची चौकशी ती करत होती. चार पाच दिवस झाले आपण घरातच बसून आहोत. आता पुन्हा ऑफिस जॉईन करावे असे तिने ठरवले होते. राजननेही तिला सपोर्ट केला होता.
"माझ्यासोबत तू सुद्धा चल. घरात आता बसू नकोस. तुझे ध्येय साकार करणार आहेस ते पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही." असे म्हणून त्याने तिला लढण्यासाठी बळ दिले.

तिकडे राजन नेहमीप्रमाणे ऑफिसला निघाला त्यामुळे सौदामिनीच्या सासूच्या मनात पूर्वीप्रमाणेच विचार येऊ लागले. "कामासाठी आयती बाई मिळाली. शेतकामात मजूर मिळत नाहीत तेव्हा हिला शेतामध्ये काम करण्यास पाठवून द्यायचे. घरातील कामंही ती करेल. तेव्हा आपले काम सोपे होईल." असे वाटून ती आनंदित झाली. उद्या राजन ऑफिसला गेला की हिला शेताकडे पाठवून देऊ. त्याआधी ती घर कामे करून मोकळी होईल. तेव्हा सगळी कामे आपली होऊन जातील. तसेही हा मुलगा काही ऐकणार नाही. तिला काही माहेरी पाठवून देणार नाही शिवाय तो दुसरे लग्न करणार नाही. त्यापेक्षा आपण अशाप्रकारे कामे करून घेऊ. अशी योजना सौदामिनीच्या सासूने आखली होती.

इकडे सौदामिनी ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत होती. तिला पुन्हा पोलिस स्टेशनला जायचे होते. अखेर दुसरा दिवस उजाडला. सौदामिनी तिचे सगळे काही आवरून तुळशीची पूजा करण्यासाठी ती बाहेर गेली. नंतर तिने देवपूजा वगैरे आवरून ती स्वयंपाक घरात गेली. तिने स्वयंपाक घरातील सगळी कामे आवरली. स्वयंपाक घरातील सारे काही आवरून झाल्यावर तिने राजनचा डबा बांधून घेतला आणि स्वतःचाही डबा भरून ती खोलीत घेऊन आली. तिने तिची बॅग भरली आणि आता वर्दी घालण्यासाठी ती सज्ज झाली होती.

सौदामिनीची सगळी तयारी झाली होती. आता फक्त ती वर्दी घालणार होती. पण तिला खूप भीती वाटत होती. सासूबाईंनी नोकरी करण्यास अडवले तर? बाहेर जाण्यास त्यांनी बंदी घातली तर? घरातीलच काम कर असे ते म्हणाले तर? अशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनामध्ये काहूर माजले होते. तरीही तिने वर्दी चढवली. आज राजन लवकरच ऑफिसला गेला होता. सौदामिनीला घेऊन जाण्यासाठी गाडी येणार होती. ती तयार होऊन आत बसली होती. गाडी आली की लगेच त्यात बसून जायचे म्हणून ती गाडीची वाट पाहत बसली होती.

इकडे सौदामिनीची सासूने राजन गेल्याचे पाहून सौदामिनीला शेताकडे पाठवून द्यायचे ठरवले. ती सौदामिनी हाक मारून तिला सांगणार होती.

सौदामिनी वर्दीमध्ये बाहेर आल्यावर काय होईल? तिला तसे पाहून तिची सासू काही बोलेल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all