सौदामिनी 31

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


राजनने सौदामिनीसोबत पुन्हा एकदा नव्याने संसार थाटण्याची इच्छा व्यक्त केली. सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला मिळाली होती. आपण जे वागलो ते चुकीचे आहे हे त्याला समजून चुकले होते. आपल्याही आयुष्यात योग्य जीवनसाथी असावा असे त्याला नेहमी वाटत होते. जीवनसाथीच्या रूपात सौदामिनी त्याच्या आयुष्यात आली असली तरीही काही कारणास्तव ती त्याच्यापासून दूर गेली होती, पण आता त्याला त्याची उणीव जाणवत होती. सौदामिनीला आपल्या आयुष्यात येण्यास तो विनवत होता. पुन्हा त्रास देणार नाही, पुन्हा असे काही होणार नाही याची शाश्वती तो देत होता. मी नेहमी तुझ्या सोबत राहीन असे आश्वासनही त्यांने दिले होते. पण सौदामिनीचे मन काही केल्या तयार होईना.

\"पुन्हा त्याच घरात, पुन्हा त्याच लोकात आणि पुन्हा तोच त्रास आता नको झाले आहे. एवढ्या हिंमतीने मी हे यश मिळवले पण हे सगळे थांबले तर.. सासूबाईंना आहे काही आवडले नाही आणि ज्यांनी सगळे सोडून घरची कामे कर असे बजावले तर.. तेव्हा मी काय करू? इतक्या मेहनतीने मिळवलेले हे सारे काही सोडून पुन्हा त्यात कचाट्यात जाऊ का? पुन्हा ते सगळे बघायला तिथे जाऊ का? त्यापेक्षा न गेलेलेच बरे. आपण आपल्या आईच्या घरी राहून आनंदीच राहू\" असे ती मनात म्हणत होती.

पण अशा एकट्याने संसार होतो का? संसार दोन चाकांवर चालत असतो. जर दोन्ही चाके वेगळी झाली तर संसार पुढे जाणार कसा? या रहाटगाडग्यातून मार्ग काढूनच पुढे जावे लागते तरच संसार सुखाचा होतो. या सगळ्या गोष्टीतून काही ना काही मार्ग काढून मला नक्की पुढे जायचे आहे. राजनची आई काही वाटेल ते बोलू दे, पण तिकडे आपण लक्ष द्यायचे नाही. आपण आपला संसार करत राहायचं. पुढे नक्की एक दिवस त्यांना पटेल, आपल्या चुकीची जाणीव होईल, पण आपण नेहमी धैर्याने सामना करायचा असे तिने ठरवले. अशी सगळी तिच्या मनाची घालमेल सुरू असतानाच तिच्या डोळ्यात पाणी येत होते. तिला कोणता मार्ग निवडू हे समजत नव्हते. ती फक्त आणि फक्त रडत होती.

\"एवढ्या मोठ्या पदावर जाऊनही सौदामिनी जशी होती तशीच आहे\" असे राजन मनात म्हणाला आणि ती रडत असताना तिचे डोळे त्यांने पुसले. राजनच्या स्पर्शाची जाणीव होताच सौदामिनी त्याच्या मिठीत विसावली आणि त्याच्या मिठीत जाऊन ती खूप रडली. त्या झालेल्या त्रासाची तिला त्यावेळेस जाणीव होत होती पण आता राजन साथ देईल अशी तिला आशादेखील होती.

"सौदामिनी, आतापर्यंत केलेली चूक मी पुन्हा करणार नाही. इथून पुढे मी कोणतीच चूक करणार नाही. मी तुला नक्की साथ देईन. आता मला पोस्ट मिळणार आहे. माझे प्रमोशन थोड्या दिवसातच होईल. माझाही आता पगार वाढेल. आपल्या हातामध्ये आणखी पैसे येतील. मग आपण कोल्हापूरमध्ये एक छान घर बांधून तिथे राहायला जाऊ. आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपण राहायला असलो की जाण्यायेण्याचा वेळ ही वाचतो आणि त्याबदल्यात आणखी कामं करता येतील. आपल्याला ते सोयीस्कर होईल. काही विचार करू नकोस. फक्त माझ्या हातामध्ये विश्वासाने हात दे. मी तुला आयुष्यभर साथ देईन." राजन म्हणाला.

सौदामिनीने राजनचा हातामध्ये हात दिला आणि ती त्याच्यासोबत येण्यासाठी स्वतःची संमती दिली, राजनला खूप आनंद झाला. कधी एकदा सौदामिनी आपल्या आयुष्यात येईल असे त्याला झाले होते. आता त्यांचे आयुष्य पूर्णत्वाकडे वाटचाल करण्यासाठी सज्ज झाले होते. यामध्ये सौदामिनीची साथ त्याला मिळाली होती. आता ते दोघेही पुढील भविष्याचा विचार करत होते. त्यांची दोघांचीही स्वप्ने खूप मोठी होती आणि ती साकार करण्यासाठी त्यांना एकमेकांच्या आधाराची गरज होती. आता तो आधार त्यांना मिळणार होता पण त्याच्या घरी जाण्यासाठी सौदामिनीला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटत होती. ती म्हणजे राजनच्या आईची.

राजनची आई आता काही बोलेल का? ती पुन्हा मला घरात घेईल का? अशा अनेक प्रश्नांच्या गर्तेत सौदामिनी तिच्या आईच्या घरी गेली. घरी गेल्यानंतर तिने तिच्या आईला घडलेली सर्व गोष्ट सांगितली तेव्हा सौदामिनीच्या आईला खूप आनंद झाला. त्याचबरोबर सौदामिनीच्या आईने सौदामिनीलाही एक आनंदाची बातमी सांगितली. तिच्या छोट्या बहिणीसाठी एक खूप छान स्थळ आले होते. सौदामिनीच्या बहीणीनेही बीएस्सी पूर्ण केले होते. आता तिला देखील योग्य अशी स्थळे येत होती. \"माझ्या दोन्ही मुलींचे आयुष्य मार्गी लागणार\" याचे सौदामिनीच्या आईला समाधान वाटत होते. ती खूप आनंदात होती आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून दोन्ही मुलीदेखील खूप आनंदात होत्या. सौदामिनी जरी आनंदात असली तरी तिच्या मनात एक भीती होतीच. या सर्वांसाठी त्याला सामोरे जावे लागणार होते.

\"राजनची आई कितीही आणि कशीही वागली तरी कायदा हा माझ्या हातात आहे त्यामुळे ते आता माझ्याशी वाईट वागू शकत नाहीत. तिने आता मनात ठरवले तरीही ती माझ्याशी वाईट वागू शकत नाही. तेव्हा आम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही. इतक्या मोठ्या संकटाशी इतक्या मोठ्या ध्येयासाठी मी लढले. दिवस-रात्र एक करून माझे ध्येय साध्य केले. आता पुढे जाण्यासाठी, संसाराचे ध्येय साध्य करण्यासाठी मला पुन्हा एकदा संकटाला सामोरे जायचे आहे. एकदा का ते संकट सरले की आयुष्यभर माझ्यासारखी मीच सुखी असणार आहे\" असे सौदामिनीला वाटत होते.

सौदामिनीच्या आईने सौदामिनी जाणार म्हटल्यावर तिच्यासाठी काही गोडाधोडाचे पदार्थ बनवले होते. करंज्या, लाडू, चकली, चिवडा असे अनेक प्रकारचे पदार्थ तिने सौदामिनीसाठी बनवले होते. तिच्यासाठी काही साड्यांची खरेदी केली होती. आता सौदामिनीचा पगार आणि तिच्या आईचा पगार असा मिळून काही पैसे शिल्लक राहत होते. त्या शिल्लक पैशांतून लहान बहिणीच्या लग्नासाठी तिने काही रक्कम बाजूला काढून ठेवली होती त्यामुळे तिला लहान मुलीच्या लग्नाची अजिबात चिंता नव्हती. सौदामिनीची थोडीफार चिंता होती तीदेखील आता मोकळी झाली. सौदामिनीसाठी जे काही हवे नको ते ती पाहत होती. सौदामिनी तिच्या कामात व्यस्त असल्यामुळे तिच्या आईने तिच्या सगळ्या बॅगा भरल्या होत्या. तिला लागणारे सगळे सामान, कपडे आणि इतर काही पदार्थ असे मिळून तिने सारे काही सामान बॅगेत भरले होते.

सौदामिनीला घेऊन जाण्यासाठी राजन येणार होता पण सौदामिनीची आई, बहीण यादेखील सौदामिनीला सोडण्यासाठी तिच्या सासरी जाणार होत्या. सौदामिनी राजनच्या गाडीवरून पुढे जाणार होती आणि या मायलेकी दोघी भाड्याने गाडी करून घेऊन जाणार होत्या. सौदामिनीने सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव केली होती. ती सासरला जाताना साडी नेसून जाणार होती. इतक्या वर्षांनी आपण सासरी जाणार आहोत या गोष्टीने तिच्या मनात धाकधूक सुरू होती. तिला एक प्रकारची भीती वाटत होती. पण जे होईल त्या सर्वाला ती सामोरे जाणार होती. असे घाबरून आपल्याला अजिबात चालणार नाही. जे काही असेल त्याला सामोरे जायचे असे तिने ठरवले होते.

अखेर तो दिवस उजाडला. सकाळी सकाळीच राजन सौदामिनीला घेऊन जाण्यासाठी आला होता. तो दिवस रविवारचा असल्यामुळे दोघांनाही सुट्टी होती. सौदामिनीने काही दिवसांची रजा घेतली होती आणि नंतर ती पूर्ण आपल्या कामामध्ये रुजू होणार होती. राजनने मात्र फक्त दोन दिवसांची सुट्टी घेतली होती. सौदामिनी सासरी जाणार होती. तिच्या मनाची घालमेल सुरू होती पण काही केले तरी आपल्याला जावे लागणार होते असे तिने स्वतःला समजावले. ती राजनच्या गाडीवर बसली आणि सासरी जायला निघाली.

संसाराच्या वाटेवरून चालताना
तू मला साथ देशील ना?
प्रत्येक काटेरी पावलावर
तू माझ्या सोबत राहशील ना?
अशी ती राजनला म्हणत होती. तिचे सासर म्हणजे तिला कैद्याचा पिंजरा वाटत होता. सासू कशी वागेल? ती मला घरात घेईल का? माझा स्वीकार करेल का? अशा असंख्य प्रश्नांनी ती वाट चालत होती (अर्थातच गाडीवरून).

सौदामिनी सासरी गेल्यावर काय होईल? तिथे काय घडेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all