Login

सौदामिनी 30

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


"तुमचीच बायको बाहेर उभी आहे ना? जिच्याशी तुम्ही सध्या संसार करत आहात. पण तुम्हाला एक सांगू. हे कायद्याने गुन्हा आहे. एक बायको असताना दुसरी बायको करणं म्हणजे कायद्याने गुन्हा आहे. तसेही मी तुमच्यावर केस करू शकते, पण आता जाऊ दे. आपल्या वाटा वेगळ्या आहेत. तुम्ही तुमच्या मार्गाने जा आणि मी माझ्या मार्गाने जाईन. आता मला माझे आणखी पुढचे ध्येय साध्य करायचे आहे. मला खूप मोठं व्हायचं आहे. माझ्या नावासोबत माझ्या माझ्या बाबांचे नाव मला मोठे करायचे आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या मार्गाने जाऊ शकता. मी तुम्हाला कोणतेच बंधन घालत नाही, शिवाय आत्तापर्यंत कोणते बंधन घातले ही नाही आणि मलाही तुमच्या बंधनात अडकायचे नाही. मी मुक्त होते, मुक्त आहे आणि मुक्तच राहणार. मला कुठल्याही बंधनात राहिलेले आवडत नाही. तेव्हा मी तुम्हाला घटस्फोटाची फाईल रितसर पाठवून देते. तुम्ही त्यावर सही करून द्या. म्हणजे रितसर आपल्या वाटा मोकळ्या होतील. उगीच जीवाला हुरहुर नको." सौदामिनी म्हणाली.

"अगं सौदामिनी, तू हे काय बोलत आहेस? मला माहित आहे की तुझ्या मनामध्ये अजुनही माझ्याबद्दल प्रेम, आपुलकी आहे. मी जे काही वागलो ते गैरसमजातून वागलो. आता माझा गैरसमज दूर झाला आहे. मी आयुष्यभर तुला साथ देईन असेही तुला माहित आहे. पण तू सध्या हे असे अभद्र बोलू नकोस." राजन म्हणाला.

"बोलू नको तर काय करू? सध्या तुम्हाला दुसरी बायको आहे. एक स्त्री एवढे दिवस नवरा नसताना नवऱ्याला सोडून राहू शकते तर पुरुष का नाही राहू शकत? पुरुषांची जातच तशी. मला हे तुमचे वागणे अजिबात आवडले नाही. माझा सध्या तुम्हाला असे बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही. एवढ्या दिवसांच्या विरहानंतर आज तुम्ही भेटला. तुमच्याशी बोलून मन मोकळे झाले. तुमच्या मनातील सगळ्या शंकांचे निरसन झाले पण मला तुमची ही गोष्ट खटकली. मला खूप वाईट वाटत आहे. तुम्हाला माझी वाट पहावी असे एकदाही वाटले नाही." सौदामिनी म्हणाली.

"अगं सौदामिनी, माझं ऐकून तरी घे. तू काही ऐकून न घेता असे बोलू शकत नाहीस. हा संसार आपल्या दोघांचा आहे. आपण अजून रितसर वेगळे झालो नाही. अजूनही माझा तुझ्यावर तितकाच हक्क आणि अधिकार आहे. त्या हक्काने मी तुला बोलू शकतो, तुझ्यावर रागावू शकतो." राजन म्हणाला.

"किती निर्लज्ज आहात तुम्ही. तुम्हाला गोड शिराही हवा आणि लाडूही हवे. दोन्ही एकत्र खावे म्हणताय पण ते कसे शक्य आहे? एक घ्यायचे असेल तर दुसर्‍यातून मुक्त व्हावे लागेल आणि आताच तुमच्या आयुष्यात दुसरी कोणी असेल तर मी येणे शक्य नाही. मला पुन्हा त्याच गोष्टी करावयाच्या नाहीत. तुमच्या दुसऱ्या बायकोसोबत तुम्ही सुखाने संसार करा. मी तुमच्यामध्ये अजिबात येणार नाही. मी तुम्हाला रितसर फाईल पाठवून देते, तेवढ्या सह्या करा." असे म्हणून सौदामिनी तिथून उठून जाऊ लागली. तेव्हा राजनने तिचा हात पकडला. पाच वर्षांनी राजनच्या हाताचा स्पर्श होताच सौदामिनी मोहरली, तिचे अंग शहारून गेले. ती जरी एवढ्या मोठ्या पदावर गेली असली तरीही ती एक स्त्री होती. तिच्या मनामध्ये प्रेम भावना उत्पन्न होणे हे नैसर्गिकच होते. सौदामिनीला राजनचा राग येत असला तरीही मनाच्या कोपऱ्यामध्ये त्याच्याविषयी प्रेम हे होते. राजन हा त्याच्या आईमुळेच असा वागत होता हे तिला आधी सुद्धा समजले होते आणि आता सुद्धा समजत होते. त्याने जर माफी मागितली आणि तिला आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतला तर सौदामिनी काय निर्णय घ्यावे? या विचारात ती होती. पण आता दुसरी बायको असताना तिला आयुष्यातून काढून पुन्हा पहिल्या बायकोला आपल्या आयुष्यात स्थान द्यावे हे किती चुकीची आहे असे तिचे मन म्हणत होते. इतक्या खालच्या पातळीला राजन जाईल असे तिला आयुष्यात कधीच वाटले नव्हते.

"सौदामिनी, तू माझे पूर्ण काही ऐकून न घेता मला असे अर्ध्यावर सोडून जाऊ शकत नाहीस. तुला मी सांगतोय अजूनही ऐक. माझे पूर्ण बोलणे ऐकून घे. याआधी मी जी चूक केली ती चूक तू करू नकोस. माझे बोलणे ऐकून घे आणि मगच तू पुढचा निर्णय घे." राजन म्हणाला.

"ठीक आहे. सांगा. तुमचा निर्णय काय सांगणार आहात? तुम्ही पटकन सांगा. मला इथे जास्त वेळ थांबता येणार नाही." सौदामिनी म्हणाली.

"का थांबता येणार नाही?" राजन म्हणाला.

"कारण बाहेर तुमची बायको तुमची वाट पाहत उभी आहे. एक स्त्री म्हणून मला तिची काळजी वाटत आहे. आपल्याला येऊन दीड तास होऊन गेला तरी ती बिचारी एकटीच बाहेर उभी आहे. म्हणून तुम्ही आता जावे असे मला वाटते." सौदामिनी म्हणाली.

"सौदामिनी, तू माझ्यासोबत चल. मी तुला माझ्या बायकोशी भेट करून देतो." राजन म्हणाला.

"अजिबात नाही. माझी इच्छा नाही तिला भेटण्याची. तुमचे तुम्ही निघून जा." सौदामिनी म्हणाली.

"इच्छा नाही की तुला वाईट वाटत आहे." राजन म्हणाला.

"तुम्हाला जे काही समजायचे ते समजा. पण मी तिला भेटणार नाही." सौदामिनी म्हणाली.

"ते तिला भेटणार आहेस आणि तिच्यासोबत मी तुला फिरायला घेऊन जाणार आहे. तेव्हा तू यायचंच. हा माझा आग्रह आहे." राजन म्हणाला.

"माझ्या मनाविरुद्ध तुम्ही काहीच करू शकत नाही. माझी वर्दी आहे आणि कायदा माझ्या हातात आहे. त्यासमोर तुमचे काही चालणार नाही. नाहीतर मला राग आला तर मी काहीही करू शकते हे तुम्हाला चांगलंच माहित आहे." सौदामिनी म्हणाली.

सौदामिनी असे म्हणताच राजनने तिचा हात हातात घेऊन तिला बाहेर घेऊन गेला. बाहेर जात असताना सौदामिनी फक्त त्याच्याकडेच पाहत होती. त्यावेळी तिला त्याचा हात धरुन सप्तपदीच्या फेऱ्या घालतानाचे दिवस आठवले. \"असाच हात हातात धरून आम्ही सप्तपदी घेत होतो आणि आता या माणसाने माझा हात सोडून दुसऱ्या एका स्त्रीला स्वतःच्या आयुष्यात स्थान दिले आहे. किती चुकीचे आहे हे. एक बायको असताना दुसरी बायको करणे हे याला शोभते का? एकदाही मला न भेटता, न विचारता खुशाल लग्न करून हा मोकळा झाला. एकदाही माझा विचार याच्या मनामध्ये शिवला नसेल?\" अशा विचारांच्या गर्तेत सौदामिनी त्याचा हात धरून गेटपाशी गेली.

गेटच्या बाहेर गेल्यावर तिने आजूबाजूला पाहिले पण तिथे तिला रस्त्यावर कोणीच दिसले नाही. मग तिने पुन्हा राजनला विचारले, "कुठे आहे तुझी दुसरी बायको?" तेव्हा राजनने त्याच्या गाडीकडे बोट करून दाखवले. सौदामिनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली.

गाडीजवळ जातात राजनने गाडीला हात लावले व तो म्हणाला, "ही माझी दुसरी बायको. माझ्या कमाईतून मिळवलेली माझी हक्काची साथीदार. आता तरी पाहिलेस ना तू हिला? आता तू मला सोडून जाणार का?" तेव्हा सौदामिनीने शरमेने मान खाली घातली. \"आपण याच्याबद्दल किती वाईट विचार केले.\" असे वाटून तिचा चेहरा लाजिरवाणा झाला होता.

पुन्हा सौदामिनीचा हात हातात घेऊन राजन म्हणाला, "सौदामिनी, तू माझ्यापासून दूर गेलीस आणि माझे अस्तित्वच कोणीतरी हिरावून घेतले असे मला वाटत होते. तुझ्याविना मी अधुरा आहे. हे पाच वर्षे माझे कसे गेले आहेत हे माझे मलाच माहीत. मला आता पुन्हा त्या मरणयातना तू देऊ नकोस ग. तुझ्याविना मी अधुरा आहे. आता तूच मला पूर्णत्वास नेऊ शकतेस. जसे एका स्त्रीला पुरुषाची गरज असते तसेच पुरुषाला देखील एका स्त्रीची नितांत गरज असते. तू पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये येऊन माझे आयुष्य पूर्णत्वाला नेशील का? तू मला आयुष्यभरासाठी साथ देशील का? माझ्या उरलेल्या संसाराला पूर्ण योग्य आकार देशील का? यापुढे मी आनंदाने तुला सपोर्ट करीन. तुझ्या ध्येयपूर्तीसाठी मी तुला मदत करीन. तुझा हात हातात घेऊन मला पुन्हा हा संसाराचा चक्र चालवायचा आहे. तू माझ्या आयुष्यात पुन्हा येशील का?" असे राजन म्हणताच सौदामिनी पुन्हा विचारचक्रामध्ये गुंग झाली.

सौदामिनी राजनला माफ करेल का? ती पुन्हा त्याच्या आयुष्यात जाईल का? ती आयुष्यात गेल्यानंतर पुढे काय होईल? तिची सासू तिला पुन्हा घरात घेईल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all