सौदामिनी 29

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


राजनचे वाक्य ऐकून सौदामिनी भूतकाळात गेली. त्या दिवशी ती कॉलेजमध्ये उशिरापर्यंत अभ्यास करत बसली होती. त्यानंतर बऱ्याच वेळाने तिला समजले की कॉलेज सुटून बराच वेळ झाला आहे. तेव्हा ती ग्रंथालयातून बाहेर पडली. ती बाहेर आल्यावर तिला तिथे दोन मुले दिसली. अर्थातच ती तिच्या वर्गातील होती. हे सगळे तिच्या नजरेसमोरून गेले.

"म्हणजे? त्यादिवशी तुम्ही तिथे आला होता?" सौदामिनी आश्चर्याने म्हणाली.

"हो. अगदी सकाळपासून तुझी वाट पाहत तिथे एकटाच बसलो होतो. भर उन्हात तुझ्यासाठी तिथे थांबलो होतो. इकडे तिकडे सगळीकडे तुला शोधले तरी तू कुठे दिसली नाहीस. कॉलेज सुटले तरीही तू आली नाहीस तेव्हा मला वाटले तू गार्डनमध्ये असशील म्हणून तिथे जाऊन पाहिलो तर तिथेही तू नव्हतीस. म्हणून पुन्हा एकदा कॉलेजच्या ग्राउंडवर पहावे आणि तिथून निघून जावे असा विचार करुन मी निघालो होतो. तेव्हा तू मला दोन मुलांसमवेत दिसलीस. ते पाहून मला आणखीन राग आला आणि मी तसाच निघून गेलो. तेव्हाच मी ठरवले की तुला पुन्हा कधीच भेटायचे नाही. पण चार वर्षे झाली आणि आज हा योग आला. तुला सगळे प्रश्नं विचारण्यासाठी मी इथे बोलावले आहे." राजन म्हणाला.

"कदाचित तुम्ही आत येऊन त्यावेळीच मला जाब विचारला असता तर माझ्यावर येणारे घोर संकट टळले असते." सौदामिनी म्हणाली.

"म्हणजे? जे काही बोलायचे आहे ते स्पष्ट बोल." राजन म्हणाला.

"ती मुले माझ्या वर्गातीलच होती हे सत्य आहे. पण ते माझे मित्र नव्हते. त्यांनी खांद्यावर हात ठेवला होता तेवढेच तुम्ही पाहिलात आणि पुढे गेलात. पण कोणत्या दृष्टीने हात ठेवला होता हे तुम्हाला दिसले नाही." सौदामिनी म्हणाली.

"म्हणजे? मला काही समजले नाही." राजन म्हणाला.

"न समजण्याइतके तुम्ही लहान नाही. ती मुले माझी छेडछाड करण्यासाठी तेथे आले होते. अभ्यासात मी हुशार असल्याने कॉलेजमध्ये टॉपर येईन म्हणून ते दोघे अशाप्रकारे त्रास देत होते. त्यांचा तो त्रास मला सहन होत नव्हता. रोजच्या रोज काही ना काही कारण काढून ती मुले मला असा त्रास देत होते. कितीही प्रयत्न केला तरी यांनी माझा पाठलाग सोडला नाही. मी टाॅप येऊ नये म्हणून त्यांनी केलेला हा एक प्रकारचा छळ होता." सौदामिनी म्हणाली.

"अरे बापरे! तू मला तेव्हाच का नाही सांगितलेस?" राजन म्हणाला.

"तुम्ही मला कधी भेटलात? त्यादिवशी सुद्धा आला होता तर मला भेटायचं ना? न भेटताच निघून गेला. म्हणून मी म्हणते की जे दिसतं तसं नसतं. जर तुम्ही मला भेटला असता तर त्यावेळी त्या दोघांना समज देता आली असती. ती मुले शांत बसली असती. नंतर मी त्याच वेळी सरांना सांगितले. पण काही उपयोग झाला नाही. म्हणून डायरेक्ट प्राचार्य मॅडमकडे गेले. तेव्हा त्या दोघांना मॅडमनी समज दिली आणि तेव्हा माझी सुटका झाली. त्यानंतर बरेच दिवस माझ्या मनातून तो त्रास जात नव्हता. पण तरीही मी अभ्यासावर फोकस केला आणि त्या वर्षी कॉलेजमध्ये टॉप आले. हे माझ्यासाठी मुळीच सोपे नव्हते. खूप अवघड होते. यात साथ फक्त आईची होती. इतर कोणीही मला साथ दिली नाही. पण माझ्या जिद्दीने मी अभ्यास पूर्ण केला आणि आज या पदावर आहे. ही पाच वर्ष माझ्या आयुष्यातील खूप खडतर प्रवास होता. लग्नानंतरच्या झालेल्या त्रासापुढे हे काहीच नव्हते. माझ्या मनात जगण्यासाठी एक प्रकारची जिद्द होती. त्यामुळे मी वाटचाल करत होते. शेवटी माझे ध्येय साध्य केले. ते ध्येय साध्य झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली. हे खरच खूप मोठे दुर्भाग्य आहे." सौदामिनी म्हणाली.

"खरंच सौदामिनी, मी खूप वेळा तुला भेटण्याचा प्रयत्न केला. मनामध्ये खूप इच्छा होती. पण त्या दोन गोष्टी घडल्यामुळे मला काहीच सुचले नाही. खरंच, मी एवढा बाद आहे की तुझ्या या जडणघडणीच्या काळात मी तुझ्यासोबत नव्हतो. मी तुला साथ द्यायला हवी होती पण त्यावेळी आईने माझ्या मनामध्ये खूप काही भरवले होते की मला तिचेच बोलणे खरे वाटत होते. कारण दिसताना तुझीच चूक दिसत होती त्यामुळे माझा राग अनावर झाला. माझं चुकलं माफ कर सौदामिनी." राजन म्हणाला.

"आई सांगत होत्या ते ठीक आहे. पण तुम्ही त्याची पडताळणी करून पाहायला हवे होता. आईच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलात हीच तुमची चूक होती. त्यांना एक प्रकारची भीती होती की तुम्ही माझे ऐकून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर.. मी आल्याने त्यांचे त्या घरातील अस्तित्व कमी होईल असे त्यांना वाटत होते; त्यामुळे त्यांनी माझे महत्त्व कमी करण्यासाठी तुम्हाला मुद्दाम खोटे सांगितले." सौदामिनी म्हणाली.

"तू एकदा तरी या गोष्टी बोलून दाखवली असतीस तर इतका त्रास झाला नसता. तुझ्यापासून मी दूर गेलो होतो पण एक दिवस सुद्धा असा गेला नाही की तुझी आठवण मला आली नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला तुझी आठवण येत होती. प्रत्येक क्षणाला सुखद दुःखद क्षणी पहिल्यांदा तू आठवायचीस. दुःखाच्या क्षणी तुझ्याकडे यावे आणि तुझ्या मिठीत जाऊन ओक्साबोक्सी रडावे असेही काही क्षण वाटत होते. पण काय करणार? माझा नाईलाज होता आणि या गैरसमजातून झालेला आपला दुरावा यापुढे मी काहीच करू शकत नव्हतो. मी रोज देवाला प्रार्थना करत होतो की कधी ना कधी सौदामिनी मला भेटावी आणि मी तिच्याशी सारे काही बोलून मोकळे व्हावे. तेव्हा देवाने पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आत्ता तुझी भेट घडवून आणली. बाय द वे, तू आज साडी नेसून आलीस मला खूप बरे वाटले. तुला पाहताक्षणीच मी अचाट झालो. तू माझे ऐकशील की नाही असे वाटत होते, पण तरीही मी धाडसाने तुला साडी नेसून येण्यास सांगितले. कारण त्या वर्दीपुढे मी इतके बोलू शकलो नसतो. सो खूप थँक्यू." राजन म्हणाला.

"तुम्ही सांगितलंत म्हणून मी साडी नेसले नाही. तर मी आज साडी नेसूनच येणार होते. आज गुढीपाडवा आहे. मराठी महिन्याचा पहिला दिवस. या सणाला मी दरवर्षी साडी नेसते. शिवाय आज सकाळी मी नथ घातली होती पण इतके नटून-थटून इथे येण्यास मला आवडत नाही. म्हणून मी सगळा श्रृंगार उतरवून फक्त साडी नेसून इथे आले." सौदामिनी म्हणाली.

"कोणत्यातरी निमित्ताने का असेना पण माझे म्हणणे खरे ठरले. सौदामिनी माझे खूप चुकले. मला क्षमा कर. तू क्षमा केलीस तर मी निवांत जगेन. आपले आयुष्य पुन्हा मार्गी लागेल." राजन म्हणाला.

"आता काय उपयोग? मी क्षमा केले अगर न केले तरी तुम्हाला जे करावयाचे आहे ते तुम्ही केलेत. आता याचा काहीच उपयोग होणार नाही. आपले आयुष्य इथेच थांबले." सौदामिनी म्हणाली.

"तू असे का म्हणत आहेस? अजून आपले आयुष्य खूप आहे. इथपर्यंत आपला दुरावा होता. इथून पुढचा काळ आपल्यासाठी खूप सुखकर जाणार आहे. तू काहीच काळजी करू नकोस. आता नकारात्मक काही विचार करायचा नाही फक्त सकारात्मक विचार करत पुढे वाटचाल करायचे." राजन म्हणाला.

"पण आता कशाचाही उपयोग होणार नाही. मला नाही वाटत याच्यापुढे काही घडेल." सौदामिनी म्हणाली.

"तू असं का बोलत आहेस? मला तुझ्या बोलण्याचा काहीच अर्थ लागत नाही. जे काही बोलायचे आहे ते स्पष्ट बोल." राजन म्हणाला.

"तुम्ही दुसरे लग्न केले आहात तर आता माझा तुमच्या जीवनात येण्याचा काय फायदा? मी तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी माफ करू? इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि तुम्ही माझ्याकडून माफी मागत आहात?" सौदामिनी म्हणाली.

"तुला कोण सांगितलं की मी दुसरं लग्न केलं आहे ते. अमर काही बोलला का?" राजन म्हणाला.

"मगाशी तुम्हीच तर बोलला होता की तुमची दुसरी बायको बाहेर उभी आहे आणि आता निर्लज्जासारखे म्हणत आहात की तुला कसे समजले याचा अर्थ काय? इथल्या इथे तुम्ही माझी फसवणूक करत आहात मग आयुष्यभर साथ काय देणार?" सौदामिनी म्हणाली.

"माझी बायको होय." राजन म्हणाला.

यापुढे काय होईल? राजन त्याच्या बायकोची आणि सौदामिनीची भेट घडवून देईल का? यापुढील भाग वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all