सौदामिनी 28

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


सौदामिनी संभ्रमात पडली. आमच्या निखळ भावाबहिणीच्या नात्यावर असा संशय घेतलेला तिला आवडले नाही, त्यावेळी सुध्दा आवडले नव्हते. पण यामध्ये राजनची काय चूक? त्याला यातील काही माहित नव्हते. त्याचा गैरसमज झाला होता, नाही गैरसमज केला होता. पण एक स्त्री आणि पुरुष बोलले तर त्या दोघांमध्ये प्रेमाचेच नाते असते का? एक निखळ मैत्रीचे किंवा भाऊबहिणीचे नाते नसावे का? असा विचार कोणी का करत नाही. त्यांच्याकडे नेहमी वेगळ्या दृष्टिकोनातून का पाहिजे जाते? स्त्री आणि पुरुष असे का पाहिले जात नाही? याची चीड सौदामिनीला आली होती. पण यावेळी ती शांत होती. खरंच आता बदलायला हवे. अशा विचारांच्या व्यक्तीपासून दूर राहिलेलं बरं. असे ती मनात म्हणत होती.

"आम्हा दोघांमध्ये कोणते नाते असावे? असे तुम्हाला वाटते. या गोष्टीला आता पाच वर्षे झाली तरीही तुमच्या मनामध्ये आमच्या नात्याविषयी इतके घाणेरडे आरोप आहेत याचे मला खूप वाईट वाटत आहे. आपल्या नात्यावर तुमचा कधीच विश्वास नव्हता आणि आताही नाही याचे मला खूप दुःख होत आहे. माझ्या नवऱ्याचा माझ्यावर विश्वास नाही, मी इतकी व्यवस्थित वागूनही तुम्ही कधीच माझ्यावर विश्वास दाखवला नाही, नेहमीच अविश्वास दाखवत आलात याचे मला अजूनही वाईट वाटत आहे. आपल्या नात्यामध्ये इतकी पारदर्शकता होती की कुणीही कितीही सांगितले तरी आपण त्यावर विश्वास ठेवणार नव्हतो. मग तुम्ही या गोष्टीवर विश्वास कसे ठेवलात? काय एक स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये निखळ मैत्री किंवा भावा बहिणीचे नाते असू शकत नाही का? ते दोघे बोलत उभा राहिले तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, तुमचाही बदलला याचे मला वाईट वाटते." सौदामिनी राजनला खूप बोलत होती.

"सॉरी सौदामिनी, माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला. पण त्यावेळची परिस्थिती तशीच होती. एकीकडे आई आणि दुसरीकडे तू. कोणाचे ऐकावे मला काहीच समजले नाही. आणि आईने इतके तुझ्याबद्दल सांगितले होते की जे डोळ्यांना दिसते त्याच्यावरच मी विश्वास ठेवला. आणि तसेही घडले होते ना तू आणि अमर एक एकमेकांशी हसत आणि हातात हात देत बोलत होतात की, माझ्या मनात संशय उत्पन्न होणारच. तू माझ्या जागी उभा राहून विचार कर. तुझ्याही मनात दोन सेकंदासाठी का होईना तसा विचार आलाच असता. मला खूप वाटत होते की, तुला काही बोलू नये पण तेव्हा तुम्हा दोघांना तशा अवस्थेत पाहून मला काय झाले होते समजलेच नाही. माझा पारा चढला आणि रागाच्या भरात मी तुला वाटेल ते बोललो. तुझ्यावर खूप विश्वास होता त्या विश्वासाला तडा जाणार नाही यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करत होतो, पण ती वेळ अशी आली की माझा स्वतःवरील ताबा सुटला. यासाठी सर्वस्वी मी जबाबदार आहे. आज पाच वर्षे झाली. तू माझ्यापासून विभक्त राहतेस. या सर्व गोष्टीला मी जबाबदार आहे सौदामिनी." राजन म्हणाला.

"झालेल्या गोष्टीमध्ये सुधारणा करता यायला हवी. आता खूप उशीर झालाय. चूक समजली तरी आता काही उपयोग नाही. आमच्यातील नाते काय आहे? हे समजून घेण्याआधीच तुम्ही एकटेच निर्णय घेऊन मोकळे झालात. त्यावेळी मी तुम्हाला खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही काही ऐकून घेतले नाही. आता मी या पदावर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली आहे याचा अर्थ काय? लग्नानंतर मी जर म्हटले असते की मला पोलीस अधिकारी वगैरे व्हायचे आहे तर तुम्ही होऊ दिले असते का? नाही ना? मग आता मी या पदावर असताना तुम्हाला लगेच तुमच्या चुकांची जाणीव कशी काय होऊ शकते?" सौदामिनी मनातील राग व्यक्त करत होती.

"तुला जे काही बोलायचे आहे, तुझ्या मनात जे काही आहे ते एकदा बोलून घे. तुझ्या मनात काही ठेवू नकोस. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी द्यायला समर्थ आहे, कारण मी तुझा गुन्हेगार आहे. तुला वाटत असेल की तू या पदावर आल्यानंतर, मला तुझी गरज आहे म्हणून, मी तुझा उपयोग करून घेण्यासाठी तुझी माफी मागत आहे किंवा मला पश्चाताप होत आहे. पण तसे काही नाही. तू परवा ऑफिसमध्ये आली होतीस तेव्हा अमरने तुला ताई म्हणून हाक मारली. तेव्हाच मला माझी चूक समजून आली. पण मी काही बोललो नाही. तुमच्यातील नेमके काय आहे? हे मला आधी समजले नव्हते. त्यावेळेचे तुझे वागणे संशयास्पद होते; तरीही मी तुझ्यावर संशय घेतला नसता, पण त्या सायंकाळी तुम्हा दोघांना हातात हात घातलेले पाहून माझा राग अनावर झाला आणि त्या रागातच मी काही-बाही बडबडलो." राजनने त्याची बाजू स्पष्ट सांगितली.

"तुम्ही फक्त त्या रात्रीचे तेवढेच पाहिलेत, पण त्याआधी काही घटना घडल्या होत्या त्याचा तुम्ही विचार केला आहे का? त्याची पडताळणी कधी केली आहे का? तुमच्या मनात असा संशय कधीच आला नाही कि हि त्याच्याशीच का बोलते? तो माझा भाऊ आहे, तो सुध्दा मला बहीण मानतो. तुम्ही जेव्हा नोकरीसाठी बाहेर पडत होता तेव्हा तुमची आई मला खूप त्रास देत होती. शेतामध्ये अगदी ओझं उचलायचं कामसुद्धा मी केले आहे. तेव्हा तुम्ही तिथे नव्हता आणि कोणी मदतीला येत नव्हते. अमर माझ्या मदतीला धावून आला. ते तुमच्या आईला बघवले नाही. एकदा तर माझ्या पायाला खूप दुखापत झाली होती. अगदी पायातून रक्त वाहत होते. तरीसुद्धा तुमच्या आईला माझा कळवळा आला नाही. अमरने येऊन माझ्या पायाच्या जखमेला मलमपट्टी केली. अर्थातच त्याची बायको सोबत होती. तेव्हापासून तो मला बहीण मानतो." सौदामिनी म्हणाली.

"भाऊ-बहीण असाल. आता हातात हात देण्याचे कारण काय होते? ते मला अजूनही समजले नाही." राजन म्हणाला.

"म्हणजे अजूनही तुमची संशयी वृत्ती आहे म्हणा. त्यादिवशी त्याला एक गोड मुलगी झाली होती. त्याच्या बायकोच्या प्रेग्नेंसीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स होते. मीच तिची काळजी घेतली होती कारण तिला माहेर म्हणून नव्हते आणि सासरीसुद्धा तिच्या कोणीच नव्हते. मीच तिला स्वयंपाक वगैरे करून देत होते. शिवाय तिला दवाखान्यात घेऊन गेले होते. त्यादिवशी तुम्ही ऑफिसमधून येणार म्हणून मी लवकरच घरात आले. पण त्यादिवशी तुम्ही उशिरा आलात. तो त्याला मुलगी झाली ही बातमी देण्यासाठी आला होता आणि मी त्याचे अभिनंदन करत होते. इतकी साधी, सरळ आणि सोपी गोष्ट होती. घरात लक्ष्मी आली म्हणून तो खूप आनंदात होता आणि त्याची बायको, मुलगी अगदी व्यवस्थित होत्या म्हणून मी आनंदात होते. या गोष्टीचा तुम्ही असा अर्थ घ्याल असे मला कधीच वाटले नव्हते." सौदामिनी म्हणाली.

"मला याची काहीच कल्पना नव्हती. तू शेतामध्ये काम करत होतीस हे आत्ता समजले." राजन आश्चर्याने म्हणाला.

"कसे समजणार? तुमच्या आईचे प्लॅनिंग एवढे जबरदस्त होते की तुम्हाला यातील काहीच समजले नाही. तुम्ही येण्याअगोदर घरी येऊन मला स्वयंपाक करायला सांगायच्या आणि अमर बद्दलची गोष्टसुद्धा त्यांनी तुमच्यापासून लपवून ठेवली होती. मी तुम्हाला सांगावे तर आपले असे किती बोलणे होत होते? तुम्ही रात्री येऊन जेवून लगेच झोपी जाणार. आपल्यात बोलण्याचा अभाव होता. संवाद असा कधी घडलाच नाही; तर माझ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा समजणार? संवाद नसला की काही गोष्टी समजत नाहीत आणि मग ते नाते दृढ होण्याआधीच त्याच्यामध्ये गैरसमज निर्माण होऊन दुरावा येतो. त्यामुळे दोन नात्यामध्ये संवाद हवाच. म्हणूनच तुमच्याशी बोलण्यासाठी मी आज येथे आले आहे. काही गोष्टींची गुंतागुंत बोलून सोडवलेले बरे." सौदामिनी म्हणाली.

"तू गेल्यानंतर मला करमेना. कशातच मन रमेना. तुझ्याकडे मन धाव घेत होते. सारखी तुझी आठवण येत होती. माझी चूक मला तेव्हाच समजली होती. खरंच खूप साॅरी." राजन म्हणाला.

"मग तुम्ही मला भेटायला का आला नाही?" सौदामिनी म्हणाली.

"आलो होतो." राजन म्हणाला.

"कधी? कुठे?" सौदामिनी आश्चर्याने म्हणाली.

"काॅलेजमध्ये. तू पुढे शिकत आहेस असे समजले. तेव्हा तुला भेटण्यासाठी काॅलेजवर आलो होतो." राजन म्हणाला.

"मग मला भेटला का नाही?" सौदामिनी म्हणाली.

"तू दोन मुलांसमवेत दिसलीस. ते बहुतेक तुझ्या वर्गातीलच होते. त्यांनी तुझ्या खांद्यावर हात ठेवला होता. ते पाहून माझा पारा चढला आणि आल्या पावली मी परतलो.

हे ऐकल्यावर सौदामिनी कशी व्यक्त होईल? यामागे काय सत्य असेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all