Login

सौदामिनी 26

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


राजनचे बोलणे ऐकून सौदामिनीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तू नक्की येणार याची खात्री होती याचा अर्थ काय? मी याला अशी कशी वाटले? माझ्या मनाचा तरी याने विचार करावा. मी अशी तशी मुलगी वाटले की काय? या पदावर येऊन सुद्धा, इतके दिवस होऊन सुद्धा हा काही सुधारला नाही. याच्या विचारात थोडातरी बदल झाला असेल असे वाटत होते. पण त्याच्यामध्ये काहीच बदल झाला नाही. तेव्हाही असाच होता आणि आताही असाच आहे. या माणसाशी बोलून काहीच फायदा नाही. हा फक्त माझा अपमानच करणार आहे. मला कधी किंमत देणार नाही. आता काय याने लग्न केले ही असेल. हा जरी नको म्हणत असला तरी याची आई काही ऐकणाऱ्यातली नव्हती. राजनचे मस्त चालले असेल, पण मी याला काही बोलले होते का? त्याने स्वतःहून हा विषय का काढावा? मी कोणासाठी कधीही कशी येईन? आता याक्षणी त्याचा माझ्यावर कोणताच अधिकार नाही. मग याने मला का बोलावे? अशा विचारचक्रात सौदामिनी होती. इतक्यात तिथे अमर आला.

"ताई, तुमच्यासाठी चहा वगैरे मागवू का?" असे अमर म्हणताच राजन अवाक् होऊन त्याच्याकडे पाहू लागला. कारण त्याच्या तोंडातून सौदामिनीसाठी ताई हा शब्द त्यांने पहिल्यांदाच ऐकला होता. \"आता ताई झाली होय. याच्या आधी तिथे गुलगुल्या मारत बसत होते तेव्हा. आता सगळे सगळ्यांना ताईच म्हणतात.\" असे तो मनात म्हणाला सौदामिनी मात्र त्याच्याकडेच पाहत उभी होती.

सौदामिनीने चहासाठी नकार दिला आणि थोडीफार चौकशी करून ती पुन्हा पोलीस स्टेशनकडे गेली. तिथे गेल्यानंतरही राजनचा विचार तिच्या मनातून काही केल्या गेला नाही. खूप दिवस झाले तरीही त्याच्यामध्ये काडीचाही बदल झाला नाही. त्याचे विचार इतक्या खालच्या पातळीचे असतील असे तिला कधीच वाटले नव्हते. इतक्या दिवसाच्या विरहानंतर तरी तो बदलला असेल असे तिला वाटत होते, पण आज तिला खरे समजले.

राजनच्या मनाचे मात्र परिवर्तन झाले. अमरच्या तोंडून ताई हा शब्द ऐकल्यानंतर काही वेळातच त्याचे विचार बदलले. \"खरंच, हा सौदामिनीला ताई मानत असेल तर? एक बहीण म्हणून तिला मदत करत असेल तर? तिची मदत घेत असेल तर? आणि मी मात्र या भावा-बहिणीच्या नात्यावर संशय घेतला. मी किती पापी आहे. पवित्र बंधन हे भावा बहिणींच्या नात्याचे असते. त्यांचे नाते भावा बहिणीचे असेल तर मी जे काही वागलो ते चुकीचे होते. पुढचा मागचा विचार न करता मी सौदामिनीशी खूप वाईट वागलो. इतके दिवस तिला माझ्यापासून दूर ठेवले. त्याचा तिला किती त्रास झाला असेल? तिच्या त्रासाचा विचार देखील केला नाही. आज इतक्या दिवसांनी ती माझ्यासमोर आली पण तरीही मी तिला टोचूनच बोललो. मी सौदामिनीचा खूप मोठा गुन्हेगार आहे. मी त्याच्याशी खूप वाईट वागलो हे माझ्या मनाला आत्ता समजले तर याची शिक्षा काय घ्यायची.\" असा विचार राजन करत बसला होता.

\"पण हे नक्की खरे आहे का? त्या दोघांचे बहीण भावाचे नाते आहे का? हे पडताळून पहायला हवे. जर नसेल तर आपण हा विषय कायमचाच मनातून काढून टाकायचा आणि जर असेल तर कदाचित विचार करून तिची माफी मागायला हवी. त्या दोघांचे नाते काय आहे हे मला कसे समजणार? यासाठी सौदामिनीला भेटावे का?\" असाही विचार तो करत होता.

\"जर भेटलो तर बोलणे होईल, मनातील भाव समजतील. बोललो नाही तर दुरावा आणखी वाढत जाईल. पण तिच्याशी बोलावे कसे? विषय कुठून सुरू करायचा? आधीच माझ्यामुळे तिला खूप त्रास झाला आहे, त्यात आणखी त्रास होता कामा नये. यावर मला काहीतरी उपाय करायला हवा. सौदामिनीशी कसेही करून बोलायला हवे. तिच्याशी संवाद हा घडायला हवा नाहीतर आयुष्यभर माझे मन मलाच खात राहील.\" राजन पुन्हा विचार करू लागला.

ऑफिसमधील दुपारच्या सुट्टीत तो पोलीस स्टेशनकडे गेला. त्याचे ऑफिस सुद्धा कोल्हापूरमध्ये आणि पोलीस स्टेशन सुद्धा कोल्हापूरमध्येच असल्याने त्याला तिथे जाणे लवकर घडले. पोलिस स्टेशन जवळ तो गेला खरा; पण आत जायचे त्याचे धाडस झाले नाही. शेवटी सगळे बळ एकवटून तो आत गेला. दरवाज्यापाशी गेला आणि त्याला समोर सौदामिनी दिसली. तो पुन्हा मागे वळला. आणखी प्रयत्न करून तो आत जाऊ लागला, पण समोर सौदामिनी दिसताच पुन्हा मागे वळला. असे तीन चार वेळा झाले तरी आत जाण्याचे त्याला धाडसच झाले नाही.

बराच वेळ तो बाहेर तसाच उभा राहिला. आता त्याची सुट्टी संपत आली होती. \"आत गेलो तर सौदामिनीशी भेट होईल नाहीतर इथंपर्यंत येऊन काय उपयोग? आणि आत्ता बाहेरच्या बाहेर गेलो तर पुन्हा तिच्याशी बोलण्यासाठी इथे यावे लागेल; तेव्हा आता एवढ्या लांब आलोच आहोत तर तिच्याशी बोलून जावे.\" असा विचार करतच तो बाहेर उभा होता.

राजन बाहेर उभा असताना तिथे एक पोलीस आले आणि त्यांनी राजनला तिथे का उभा आहेस? असा जाब विचारला.

"तुमचे काही काम आहे का? बराच वेळ मी पाहतोय आत येताय आणि बाहेर जात आहात. काही काम असेल तर आत येऊन बोला, नाहीतर इथून निघून जा. बराच वेळ झाला पाहतोय इथे उभा आहात. काही हवं आहे का? आणि पोलीस स्टेशनमध्ये काय मिळणार आहे?" हा त्यांचा आवाज ऐकून पोलीस स्टेशनमधील सगळेजण बाहेर आले.

"काही नाही साहेब, सॉरी. मी पुन्हा असे करणार नाही. मला सोडा. मी जातो." असे राजन म्हणाला. कारण पोलिसांच्या भारदस्त आवाजाने तो घाबरला होता.

"काय चालले आहे इकडे? काय गोंधळ चाललाय?" सौदामिनी लगेच बाहेर येऊन म्हणाली आणि तिने एक कटाक्ष राजनकडे टाकला.

"मॅडम, हा माणूस मगासपासून इथे उभा आहे. आत वाकून पाहतो आणि बाहेर येतो. याचे काय चालले आहे? मला समजले नाही, म्हणून मी त्याला विचारण्यासाठी इथे आलो; तर आता म्हणतोय की काही काम नाही. याचा अर्थ काय समजावा?" पुन्हा पोलीस बोलले.

"तुमचे काय काम आहे? तुम्ही इथे कशासाठी आला आहात? तुम्हाला केस विषयीचे काही बोलायचे आहे ते बोला. नाहीतर वायफळ बोलण्यात मला काहीच वेळ नाही. तुमच्यासारख्या माणसांना मी बरोबर ओळखते. टोमणे मारण्यात पटाईत असता. नाहीतर जे काही बोलायचे आहे ते उद्या ऑफिसमध्ये बोला. मी उद्या सकाळी ऑफिसमध्ये येईल. आता तुम्ही जाऊ शकता." असे म्हणून सौदामिनीने राजनला जाण्यास सांगितले.

"नाही नाही. मला तुझ्याशी..." असे राजन म्हणणार इतक्यात सौदामिनीने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले, तेव्हा राजन इकडेतिकडे पाहिला आणि "तुमच्याशी थोडं बोलायचं होतं.. महत्त्वाचं.." असे काचरतच बोलला.

"जे काही बोलायचे आहे ते पटकन बोला. मला काही इतकेच काम नाही. अजून भरपूर कामे आहेत. तुमच्याकडे वेळ द्यायला मला अजिबात वेळ नाही. इतरांची कामे खोळंबली आहेत. बोला पटकन." सौदामिनी म्हणाली.

"ते इथे नाही बोलू शकत. मला फक्त तुमच्याशी बोलायचं आहे." असे म्हणून राजनने इकडे तिकडे पाहिले.

"बोला मग. ही सगळी माझ्या बरोबर काम करणारी माणसं आहेत. यांच्यासमोर बोललात तरी मला काही फरक पडणार नाही आणि तसेही तुम्ही इथे काय बोलायला आला आहात याची मला कल्पना आहे. तुम्ही काहीही म्हणा, मला अजिबात वाईट वाटणार नाही. आता मी धीट झाली आहे. तुम्ही कितीही काहीही बोललात तरी माझे मनाचे खच्चीकरण करू शकणार नाही, तेव्हा तुमच्या बोलण्याचा मला अजिबात फरक पडणार नाही. जे काही बोलायचे आहे ते स्पष्ट बोला, नाहीतर मी इथून निघून जाते." सौदामिनीच्या या बोलण्यावर कसे बोलावे? तेसुद्धा इतक्या लोकांच्यात याचा विचार करत राजन बराच वेळ तिथे उभा राहिला.

इतके बोलूनही राजन काही बोलला नाही म्हणून सौदामिनी रागाने आत गेली आणि तिच्या डेस्कवर जाऊन बसली. तिच्या सोबत जे आले होते तेसुद्धा जाऊन स्वतःच्या जागी बसले. राजनला मात्र फक्त सौदामिनीशी बोलायचे होते, म्हणून तो योग्य संधीची वाट पाहू लागला.

साजन सौदामिनीशी बोलू शकेल का? तो काय बोलणार आहे? आणि यापुढे काय होईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all