सौदामिनी 25

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


सौदामिनी ऑफिसमध्ये चौकशी करण्यासाठी गेली होती. ती तिथे एक एक करत सर्व मेंबर्सचे बारकाईने निरीक्षण करत होती. तेव्हाच दारातून राजन येताना दिसला. त्याला पाहून सौदामिनी ताडकन उठून उभा राहिली. राजनदेखील आश्चर्याने अवाक् होऊन पाहत होता. दोघेही एकमेकांकडे पाहत बराच वेळ उभा होते. जेव्हा अमर ऑफिसमध्ये आला तेव्हा सौदामिनी भानावर आली. ती पुन्हा तिचे काम करू लागली. राजनला हे सगळे अनपेक्षित होते. सौदामिनी असे काही बनेल हे त्याला स्वप्नात देखील वाटले नव्हते.

\"हे कधी घडले? सौदामिनी आणि या वर्दीमध्ये? हे कसे शक्य आहे? घरामध्ये रडत कुढत बसली असेल असे मला वाटत होते, नाहीतर लग्न करून संसार थाटला असेल. पण इथे तर वेगळेच घडले आहे. ती रडत कुढत बसणाऱ्यातली मुळीच नव्हती. नक्कीच तिने लग्न केले असेल असे वाटते की तिच्या नवऱ्याने तिला सपोर्ट केले असेल? आणि ती इथंपर्यंत आली असेल. कोणाच्याही सपोर्टशिवाय हे काम होणार नाही. कोणाचा तरी नक्कीच हात असणार आहे. नाहीतर ती याआधीच पोलीस बनली असती. कोण असेल तो? ज्याने हिला इतकी मदत केली आहे. अमर तर नसणार. मग कोण असेल? याचा छडा लावायलाच हवा. हे मला नक्की शोधून काढायला हवे.\" असा विचार राजन करत होता.

अमर ऑफिसमध्ये आल्याबरोबर डायरेक्ट सौदामिनीकडे गेला आणि तिच्याशी बोलू लागला.
"ताई, तुम्ही इतक्या मोठ्या झालात! खरंच मला हे माहीत नव्हते, मला याची कल्पना नव्हती. पण याआधी मला वाटत होते की, तुम्ही एक दिवस नक्की मोठ्या कोणीतरी व्हाल. तुमच्याकडे बघून अभिमानाने छाती भरुन येते. तुम्ही खरंच ग्रेट आहात. जे मनात येईल ते करून दाखवता, पण तुमचा हा नवरा राजन तुम्हाला कधीच सुख देऊ शकला नाही. त्याला तुमची किंमत कधीच कळणार नाही. मुळात तो तुमच्या लायकीचाच नाही. तुम्ही अजून खूप मोठ्या व्हा." अमर भरभरून बोलत होता.

"अमर भाऊजी, झालेल्या गोष्टी आता उकलत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा आपण भविष्याचा विचार करू. भूतकाळात कितीही गेले तरी भयानकच आहे. आपण ते विसरून जायचे आणि पुढे चालायचे, आपले भवितव्य उज्वल करायचे. भूतकाळातच रडत कुढत बसले तर आपले भविष्य उज्ज्वल होणार नाही. मी माझे भूतकाळ पूर्ण विसरून गेले आहे. भविष्याकडे वाटचाल सुरू आहे. मी भविष्याचा विचार केला म्हणून आज या पदावर आहे. जर भूतकाळात रडत कुढत बसले असते तर आजही त्या चार भिंतीच्या आतच बसले असते. त्यामुळे माझी कोणतीच तक्रार नाही. मी सध्या खूप आनंदात आहे, त्यामुळे तुम्ही तो विषय अजिबात काढू नका." सौदामिनी अमरला स्पष्ट म्हणाली.

"हो नक्कीच. मी आता त्या गोष्टी पुन्हा काढणार नाही. फक्त पुढचा विचार करणार आहे. पण तुम्ही इथे येण्याचे कारण काय? ऑफिसमध्ये कसे काय आलात?" अमर म्हणाला.

"तुमच्यावर जे आरोप लागलेले आहेत ते पुसून काढण्यासाठी इथे आले आहे. तुम्ही इतके निर्मळ मनाचे आहात कि कुणाला मुद्दामून दुखावू शकत नाहीस तर हा घोटाळा करण्याची गोष्ट तर निराळीच. हे काम तुम्ही केले नाहीच. मला नक्कीच खात्री आहे म्हणून मी येथे याचा छडा लावण्यासाठी आले आहे. तसेही याची फाईल माझ्याकडे आली होती. त्या कामासाठी इथे आले आहे." सौदामिनी म्हणाली.

"हो ताई, हे काम मी केलेच नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात तर मला धन्य वाटले. पण माझ्यावर कसा काय आरोप लागला मलाही समजेना? मी अगदी व्यवस्थित कंपनीचे व्यवहार पाहतो. कधीही एक रुपयाचा घोटाळा माझ्याकडून होऊ नये इतके काटेकोरपणे माझे काम असते. पण हे असे कसे झाले? माझे मला हे समजेना. जर मी घोटाळा केला असेल तर माझ्या खात्यात पैसे जमा झाले असते. पण माझ्या खात्यामध्ये एक रुपयाही जमा झालेला नाही, शिवाय माझे दुसरीकडे कुठेही अकाउंट नाही. फक्त एकाच बँकेत माझे व्यवहार होत असतात. हे दुसऱ्या बँकेत खाते आलेच कुठून? मला काहीच समजेना. त्यात हे प्रकरण इतके वाढले आहे की माझ्या शेजारचे, आजूबाजूचे माझ्याकडे संशयाने पाहत आहेत. ते पाहून मला खूप वाईट वाटते. या सगळ्यातून बाहेर निघून मला ताठमानेने चालायचे आहे." अमर म्हणाला.

"हो नक्कीच. मी मदत करणार आहे. तुला मदत करण्यासाठीच मी इथे आले आहे. मला माहित आहे की तुम्ही नक्कीच निर्दोष आहात. पण ते कसे? याचा छडा लावण्यासाठी इथे आले आहे." असे म्हणत सौदामिनी एका डेस्कजवळ जाऊन उभा राहिली. मला सांगा तुम्ही या कंपनीचे सगळे अकाउंट सांभाळता ना? तुम्ही नक्की काय काम करता?" सौदामिनी म्हणाली.

"मी इथले सगळे अकाउंट सांभाळतो. म्हणजे मी एकटा नाही, माझ्यासोबत आणखी एकटा आहे सुजित नावाचा. तो सुद्धा इथे अकाउंट बघतो. आम्ही दोघेही अकाउंटचे काम पाहतो. सगळे देणे-घेणे, नफा-तोटा सारं काही आमच्याकडे असतं. साधी बिलं सुद्धा आमच्याकडे असतात. सगळे सगळे कंपनीचे व्यवहार आम्ही दोघे मिळून पाहतो." अमर म्हणाला.

"मग तो सुजित कुठे आहे? तो दिसत नाही. आला नाही का ऑफिसला?" सौदामिनी म्हणाली.

"हो. तो रजेवर होता. गेल्या महिनाभरात तो ऑफिसला आला नाही. त्याची रजा होती आणि तेव्हाच हा सगळा घोळ झाला. आता सुजित नाही म्हटल्यावर सगळे आरोप माझ्यावरच लागले, कारण महिन्याभरात सगळे अकाउंटचे काम मीच पाहत होतो." अमर म्हणाला.

"तुमचा काॅम्प्युटर कोठे आहे ते दाखव." असे म्हणताच अमरने सौदामिनीला त्याच्या डेस्कजवळ नेले आणि त्याचा कॉम्प्युटर दाखवला.

सौदामिनी काॅम्प्युटर चालू करू लागली पण तिला काही केल्या चालू होईना.
"याला पासवर्ड आहे याचा अर्थ दोघांच्याही कम्प्युटरला पासवर्ड आहे. सुजितचा काॅम्प्युटरचा पासवर्ड काय आहे? सांग." सौदामिनी म्हणाली.

"मला माहित नाही. आमच्या दोघांचाही पासवर्ड एकमेकांना माहित नाही. त्याचे सगळे त्या कॉम्प्युटरला आहेत आणि माझे या कॉम्प्युटरला. एकमेकांना काहीच माहीत नाही." अमर म्हणाला.

"इतकी सिक्युरिटी असूनही हा घोटाळा झालाच कसा?" सौदामिनीच्या मनामध्ये अनेक प्रश्नांनी काहूर माजले होते. वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ती प्रयत्न करत होती.

सौदामिनी सगळीकडे चौकशी करत असतानाच ती राजनजवळ जाऊन पोहोचली. राजन आणि तिची दोघांची नजरानजर झाली. सौदामिनीला बोलण्याचे धाडस होईना. त्याच्यासमोर गेले की, तिला तिचा भूतकाळ आठवू लागला. पण त्याकडे दुर्लक्ष करत ती स्वतःचे कर्तव्य करू लागली. तिला तिच्या आईचे वाक्य आठवले. कितीही काहीही झाले तरी आपले कर्तव्य सोडायचे नाही, कर्तव्यात कोणतीही कसूर करायची नाही हे तिला आठवले आणि ती धडाडीने पुन्हा काम करू लागली.

\"आता या माणसाशी बोलायचे कसे? त्याला प्रश्न विचारायचे कसे? कोणत्या प्रश्नाने सुरुवात करावे? कशी सुरुवात करावी?\" अशा प्रश्नांनी तिच्या मनामध्ये थैमान घातले होते. त्याच्याशी बोलावे तर लागणारच होते, कारण थोडे प्रश्न त्यालाही विचारणे गरजेचे होते. तो फक्त तिच्याकडे पाहत होता आणि त्याच गोष्टीचा सौदामिनीला राग येत होता.

सौदामिनी राजनजवळ काही बोलायला जाणार इतक्यात राजन तिच्या जवळ आला. \"आता हा काहीतरी बोलणार\" असे तिला वाटले होते. \"हा काही पुर्वीचे काढत बसला तर मला काही राहणार नाही. या लोकात त्याचाही अपमान होईल. मला भूतकाळातल्या गोष्टी आता काढत बसायचे नाहीत आणि या माणसाशी बोलायची देखील आता मनःस्थिती नाही. उगीच फाॅर्मॅलिटी म्हणून बोलावे.\" अशा विचारात सौदामिनी असतानाच राजन तिच्या जवळ येऊन थांबला.

"तू नक्की याला सोडवण्यासाठी येणार याची मला खात्री होती, पण या वर्दीमध्ये येशील असे कधी वाटले नव्हते." राजनच्या तोंडून हे वाक्य ऐकताच सौदामिनी एकदम शांत झाली. यावर काय बोलावे? हे तिला समजेना. राजन असा काहीतरी विचार करत असेल याची तिला अजिबात कल्पना नव्हती. \"हा शेवटी जसा होता तसाच आहे.\" असे तिने मनात म्हटले.

राजन आणि सौदामिनीचे व्यवस्थित बोलणे होईल का? राजनने दुसरे लग्न केले असेल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all