सौदामिनी 20

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


ज्या सौदामिनीवर आपण प्रेम केले, जिच्यासाठी आपण दिवसभर इथे येऊन भर उन्हात थांबलो, जिच्यासाठी आपण आईच्या नकळत येथे आलो आहोत, जिच्या प्रेमासाठी आपण काहीही करायला तयार आहोत, ती सौदामिनी इतक्या खालच्या पातळीला जाईल असे स्वप्नात देखील वाटले नाही, असा विचार करत राजन घरी गेला.

कॉलेजच्या ग्राऊंडवर सौदामिनी दोन मुलांसमवेत होती. ते मित्र म्हणावे तर एक मुलगा तिच्या खांद्यावर हात ठेवला होता याचा अर्थ काय? आता ती इतक्या खालच्या पातळीवर गेली का? तिला आता कुणाचीच गरज नाही का? असे अनेक प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर उभे होते. राजन सौदामिनीवर खूप चिडला होता. त्याला तिचा राग येत होता. आता पुन्हा कधीच तिचे तोंड पहावयाचे नाही असे त्यांनी ठरवले होते. कोणत्याही क्षणी तिच्या दारात जायचे नाही आणि तिला घरात घ्यायचे आहे असेही त्याने ठरवले होते. \"मीच मूर्ख ती चांगली असेल या उद्देशाने तिला भेटण्यास गेलो, पण खरे वास्तव काय ते आज समजले. गेलो नसतो तर कदाचित सत्य परिस्थिती कधीच समजली नसती. तिच्या मनात दुसरा कोणी असता तर तिने माझ्याशी लग्न का करायचे? त्याच्या सोबतच लग्न करून संसार थाटायचा. इतका आटापिटा का करायचा?\" असे विचार राजनच्या मनात येत होते.

इकडे सौदामिनीला घरी येण्यास उशीर झाला होता म्हणून तिची आई वाट पाहत बसली होती. कॉलेज तर कधीच सुटले होते पण आज सौदामिनीला येण्यास इतका उशीर का झाला असेल? अशा विचारात ती बसली होती. बर्‍याच वेळाने सौदामिनी घरी आली. ती थोडी घामेघूम झाली होती, थोडी बिथरलेल्या अवस्थेत होती. तिला पाहून तिची आई घाबरुन गेली.

"अगं सौदामिनी, हे काय झाले? तू अशी का आहेस? इतकी घाबरली का आहेस? तुला इतका काम का फुटला आहे?" सौदामिनीची आई काळजीने सौदामिनीला अनेक प्रश्न विचारत होती.

"काही नाही आई, बाहेर खूप ऊन आहे ना? शिवाय बसमध्ये गर्दी असल्यामुळे इतका घाम आला असेल. बाकी काही नाही." असे म्हणून सौदामिनी आत जाऊन बसली.

"सौदामिनी, खरं सांग काय झाले? काही अडचण आहे का? कोणी काही बोलले का?" सौदामिनीची आई काळजीने म्हणाली.

"अगं आई, काही नाही म्हणून सांगते ना, मग तू टेन्शन काय घेतेस." सौदामिनी म्हणाली.

"टेन्शन घेऊ नको तर काय करू? आधीच तुला काही कमी प्रॉब्लेम्स आहेत का? तुझ्यावर माझ्या चिमण्यांवर एखादे संकट आले की माझा जीव कासावीस होतो, मला काही सुचत नाही, माझ्या काळजाचे तुकडे आहात तुम्ही. तुम्ही दुःखी तर मी दुःखी, तुम्ही आनंदी तर मी आनंदी. माझे सर्व आयुष्याच तुमच्यावर अवलंबून आहे. तुमची काळजी वाटणारच ना? मी काळजीने विचारत आहे ग. तुला राग आला असेल तर राहू दे." सौदामिनीची आई म्हणाली.

"अग आई, खरंच काही झाले नाही. मी लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसले होते त्यामुळे वेळ कसा निघून गेला समजलेच नाही आणि आता बसमधून आले. तू वाट पाहत असशील म्हणून थोडीशी पळत आले त्यामुळे घाम आला. बाकी काही नाही ग तू काहीच काळजी करू नकोस." सौदामिनी म्हणाली.

सौदामिनी आल्यानंतर सगळ्यांनी बसून चहा घेतला. सौदामिनी पहिल्याच वर्षात होती. तिने आर्ट्सला ऍडमिशन घेतले होते. ते करत असताना तिचे आवडीचे विषय तिने घेतले होते आणि तेव्हाच तिला आणखी एक गोष्ट सारखी खुणावत होती. तिला त्याच्यापासून दुसरे काही सुचत नव्हते. आईला सांगावे की नको असे तिला वाटत होते. आई काय म्हणेल? हो म्हणेल नाही तर नाही, पण आईपासून आजपर्यंत काहीच लपवले नाही तर आत्ता का लपवावे? म्हणून तिने आईला सांगण्याचे ठरवले.

"आई, मी आणखी एक निर्णय घेतला आहे यामध्ये सुद्धा मला तुझी साथ हवी आहे. हा निर्णय थोडा वेगळा आणि धाडसी आहे. पण मी मी तो पूर्ण नक्की करणार, कारण माझी जिद्द आणि चिकाटी माझे स्वप्न पूर्ण करण्यास नक्की मदत होईल. मी सारे काही व्यवस्थित करेन आणि तुझी मान उंचावेल. यानंतर आपल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल बघ. तुला काय वाटतं? तुझा निर्णय मला सांग." हे सौदामिनीच्या तोडून ऐकताच तिच्या आईची धडधड वाढली. आपली लेक आणखी कोणता निर्णय घेणार आहे? असे तिला वाटू लागले.

"बाळा, आता कोणता निर्णय घेतला आहेस तू? तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट सांग ना. माझ्यापासून काय लपवायचे?" सौदामिनीची आई म्हणाली.

"आई, मला जनसेवा करायची आहे. समाजसेवा हेच माझे अंतिम ध्येय आहे. माझ्यासारख्या सासूने त्रास दिलेल्या, नवऱ्याने टाकलेल्या, ज्यांना माहेर देखील मिळत नाही अशा स्त्रियांना मला न्याय मिळवून द्यायचा आहे. स्त्रियांच्या सगळ्या समस्या सोडवायचे आहेत. समाजामध्ये होणारे अन्याय मोडून काढायचे आहेत. हा समाज सुधरवायचा आहे आणि बरंच काही काही करायचं आहे. यासाठी मला तुझी साथ हवी आहे." सौदामिनी बोलत होती आणि तिची आई ऐकत होती.

"म्हणजे तू नक्की काय करणार आहेस बाळा? समाजसेवा कशी करणार आहेस? या समाजाचे प्रश्न सोडवताना खुप त्रास होतो. ते काही साधे सोपे काम नाही. खूप अवघड आणि खडतर प्रवास असतो तो. तू कशी करणार आहेस?" सौदामिनीची आई काळजीने म्हणाली.

"आई, मी पीएसआयची परीक्षा देण्याचे ठरवले आहे. जर मी पोलीस झाले की माझ्या हातामध्ये थोडेफार कायदे येतात. त्यातून मला समाजाची सेवा करायची आहे. स्त्रियांचे प्रश्न समस्या मोडून काढायचे आहेत. त्यांना सन्मान आणि न्याय द्यायचा आहे. ही परीक्षा खूप अवघड असते. माझे बीए पूर्ण झाली की मी ही परीक्षा देईन. या तीन वर्षात त्याचा पूर्ण अभ्यास करेन. शिवाय शारीरिक चाचणीसाठी मी आत्तापासूनच प्रयत्न करेन. बघ तू मी नक्की एक दिवस ही परीक्षा पास होईन." हे सांगताना सौदामिनीच्या डोळ्यात तिचे उज्वल भविष्य चमकत होते.

"सौदामिनी, तू जे काही करशील त्यात मी तुझ्यासोबत नक्की असणार आहे. खरंच, मला आज तुझा खूप अभिमान वाटतो. तुझी इतकी स्वप्न असताना मी त्याचा विध्वंस केला. तुझे लग्न लावून दिले. तुझी स्वप्नं काय आहेत हे देखील तुला विचारले नाही. खरंच, मी खूप वाईट आई आहे ना? आई आपल्या मुलींसाठी किती काय काय करत असते. मी साधं माझ्या मुलीला साथ दिले नाही. तिची स्वप्नं पूर्ण होण्यासाठी पाठिंबा दिला नाही. तिची शिकण्याची इच्छा असताना तिचे लग्न लावून दिले. साधं तिला काय हवं नको ते सुध्दा विचारले नाही. मी खूप वाईट आहे." सौदामिनीची आई म्हणाली.

"नाही ग आई, तू खूप चांगली आहेस. तुझे कष्ट आम्हाला दिसतात ना. बाबा गेल्यानंतर तूच तर आम्हाला इतके सारे प्रेम दिलेस. आईबाबा दोन्ही झालीस. जे हवे नको ते तू पाहिलेस. आम्ही आजारी पडलो की रात्र-रात्र उशाशी बसून राहायची. परीक्षेमध्ये आम्हाला काय हवे काय नको ते तू पाहिलेस. एकटीने सगळे काही केलेस. कोणी मदतीला नसताना आमचा सांभाळ केलास. तुझ्यासारखी आई मिळायला खरंच भाग्य लागतं आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत. तू निश्चिंत रहा. आता आमची काहीच अपेक्षा नाही ग. फक्त आमचे ध्येय साध्य झाले की बास. फक्त तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे." असे सौदामिनी म्हणाली.

"माझा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहे." असे म्हणून सौदामिनीच्या आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा सौदामिनी तिच्या मिठीत शिरली. ते पाहून मागे उभी असलेली छकुली लगेच पुढे आली आणि तिने सुद्धा त्या दोघींना मिठी मारली.

सौदामिनीचा पुढील प्रवास कसा असेल? तिला यश मिळेल का? तिचे पुढे काय होईल? तिच्या संसाराचे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all