सौदामिनी 1

Marathi narivadi katha


"अॅवाॅर्ड गोज् टू सौदामिनी.." हे वाक्य ऐकताच ती खुर्चीतून उठली आणि तितक्याच दिमाखात स्टेजवर गेली. तिचा तो रूंद बांधा, ताठ मान, बारीक केस आणि सावळा रंग. ती पन्नास पंचावन्न पार केलेली, पण अजूनही तितकीच तडफदार, तीच जिद्द आणि तीच लढाऊ वृत्ती या सगळ्यामुळे तिचे तेज आणखीनच खुलून दिसत होते. तिने स्टेजवर जाऊन अॅवाॅर्ड घेतला, तेव्हा तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता. अॅवाॅर्ड घेतल्यानंतर तिला काही शब्द बोलण्यास सांगितले..

"जीवनाच्या अथांग सागरातून तरताना अनेक खाचखळग्याना सामोरे जावे लागते, महासागरातून पैलतीरी कसे जावे? याचा विचार करत न बसता जिकडून वाट निघेल तिकडून जावे, बाकी सर्व नियतीचा खेळ. तो जसा वागवेल तसे वागायचे, पण आपले प्रयत्न, जिद्द अजिबात सोडायचे नाही. वाट कितीही काट्याची असली तरी चालणे सोडायचे नाही. रक्ताळलेले पाय घेऊन नेहमी चालतच रहायचे. एक दिवस नक्कीच आपण ध्येयापर्यंत पोहचू. तुम्हाला एक गंमत सांगते. तुम्ही किमान तुमचे ध्येय तरी ठरवले असेल, पण माझे आयुष्य मला ध्येय ओळखायला शिकवले. आजचा क्षण माझ्या जीवनातील सार्थकी ठरल्यासारखे वाटले. मला हा अॅवाॅर्ड मिळाला म्हणून नाही, तर माझ्या मुलीच्या हस्ते मला हा अॅवाॅर्ड मिळाला म्हणून मला खूप आनंद झाला आहे." सौदामिनीचे हे वाक्य ऐकून हाॅलमध्ये एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.

कार्यक्रम पार पडल्यावर सौदामिनी आपल्या लेकीसह घरी गेली. घरात येऊन ती तिचे आवरून रूममध्ये खुर्चीत बसली आणि तिची तंद्री लागली. आजचा क्षण आणि पंचवीस वर्षांपूर्वीचा क्षण दोन्हीमध्ये खूपच तफावत होती. तो काळ तिच्या नजरेसमोरून अगदी चित्रपटाप्रमाणे पुढेपुढे सरकत होता.

पायात छुमछुम पैंजन घालून घरभर उड्या मारत फिरणारी सौदामिनी घरात सर्वांचीच लाडकी होती. पहिली मुलगी म्हणून सर्वांनी तिचे खूप लाड केले होते, तिचे सगळे हट्ट पुरवले होते. इकडे तिकडे तुरुतुरु चालणारी सौदामिनी आता शाळेत चालली होती, शाळेतील बोबडे बोल बोलत होती. त्या बोबड्या बोलाने ती कविता म्हणत होती, गाणे गात होती, इकडे तिकडे फिरत होती. घरभर नुसता तिचा आवाज होत होता. काही वर्षांनी त्यांच्या घरात आणखी एक चिमुकली परी आली. दोन मुली झाल्या म्हणून कोणालाही दुःख झाले नाही, उलट सगळेजण लक्ष्मी सरस्वती घरात जन्माला आल्या म्हणून आनंदित झाले होते. घरात गोकुळ भरले होते. घरात लक्ष्मी नांदत होती. सारे काही आलबेल सुरू होते पण अचानकच सौदामिनीचे वडील हे जग सोडून गेले आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

सौदामिनीची आई शिक्षिका होती. ती लहान मुलांना प्राथमिक शाळेत शिकवायला जात होती. तिच्या पगारावर त्यांचे घर चालू लागले. सौदामिनीचे बाबा गेल्याचे दुःख अनावर झाल्यामुळे तिचे आजी आजोबा देखील हे जग सोडून गेले आणि घरामध्ये फक्त सौदामिनीची आई, सौदामिनी आणि बहीण अशा तिघीजणी राहू लागल्या. घरात तिघी स्त्रिया, पुरुषांचा आधार नाही तेव्हा जगाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. इतर वेळी या स्त्रियांना मान देणारे हे जग आता त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले होते. कोठेही जायचे म्हटल्यावर त्या आईला दोन्ही मुलींना सोबत घेऊनच जावे लागत होते, कारण त्याकाळी परिस्थिती देखील तशीच होती; आजही तशीच आहे. आई दोन्ही मुलींचे संगोपन व्यवस्थित करत होती. ती शाळेत एक शिक्षिका असल्यामुळे स्वतःचे आवरून दोन्ही मुलींना सोबत घेऊन, सौदामिनीला आणि तिच्या बहिणीला शाळेत सोडून ती स्वतः शिक्षिकेचे काम बजावत होती, आपले कर्तव्य पूर्ण करत होती. कारण तिचे घर तर या नोकरीवरच चालत होते. इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे तिला ती नोकरी करावी लागली. शिवाय त्या नोकरीमध्ये तिला त्रास असा काहीच नव्हता. शाळेच्या वेळेनुसार मुलींना शाळेत सोडून ती शिकवायला जात होती आणि मुली स्वतःच्या नजरेसमोर होत्या त्यामुळे तिला मुलींबद्दलही कसलीच भीती नव्हती. अशाप्रकारे त्यांचे आयुष्य चालले होते.

चंद्राच्या कलेप्रमाणे या दोन मुली हळूहळू मोठ्या होऊ लागल्या. दिवसांमागून दिवस जात होते. इकडे सौदामिनी आणि तिची बहीण दोघीही मोठ्या होत होत्या. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळा आणि नंतर त्या कॉलेजमध्ये जाऊ लागल्या. कॉलेजला जाण्यासाठी शहरासारख्या ठिकाणी जावे लागे, त्यामुळे त्यांच्या आईने सौदामिनीचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि आता तिच्यासाठी स्थळे पाहू लागली.

"आई, मला आत्ताच लग्न करायचे नाही. मला देखील तुझ्यासारखे स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. मलादेखील काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे. आज तुझ्यावर अशी परिस्थिती आली, तुझ्या पाठीशी तुझे शिक्षण होते म्हणून तू नोकरी करू लागलीस. तसेच जर उद्या माझ्यावर काही वेळ आली, अचानक कोणतेही आर्थिक संकट आले तर.. मला शिक्षण घेणे खूपच गरजेचे आहे. तेव्हा तू मला शिक्षण घेण्यापासून रोखू नकोस. मला शिकू दे आई." सौदामिनी आईला म्हणाली.

"हे बघ बाळा, तू खूप शिकावं असे मला सारखे वाटते ग, पण मी काय करू? घरात आपण फक्त तिघी स्त्रिया. आपल्याकडे या जगाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो. आपण कितीही चांगले वागले तरी हे जग सुखाने जगू देणार नाही. तुमच्या दोघींची योग्य ठिकाणी लग्नं करून दिली तर मी निश्चिंत झाले. माझ्या डोक्यावरील भार थोडा हलका होईल. हे जग खूप वाईट आहे. इथे आपल्यासारख्या स्त्रिया यांच्या शिकार बनतात आणि आपल्या आयुष्याचं वाटोळं होतं. या जगाकडे पाहूनच मी तुमचे लग्न लावून द्यायचे असा विचार केला आहे." सौदामिनीची आई म्हणाली.

"आई, लग्न थोड्या दिवसांनी केलं तर चालणार नाही का? तू इतकी घाई का करत आहेस? मला तरी सध्या लग्न करण्याची मुळीच इच्छा नाही." सौदामिनी मनातील बोल बोलून मोकळी झाली.

"हे बघ बाळा, तुझा रंग असा सावळा. सध्याच्या स्थितीत सर्वांना गोर्‍यापान मुली हव्या असतात. तुला लवकर कोणी पसंत करेल असे वाटत नाही ग, म्हणून आत्तापासूनच जर स्थळे पाहायला सुरुवात केली तर तुझे लग्न होईल आणि तू सुखाने सासरी राहशील. तुझ्यानंतर तुझी बहीण आहे. दोघींची लग्नं झाली की मी निश्चिंत होईन. माझ्या डोक्यावरील भार थोडा हलका होईल. माझ्या एकटीचा उदरनिर्वाह काय कसाही होऊन जाईल. शिवाय माझी नोकरी आहेच की. बाळा, तुम्ही सुखी तर मी सुखी." सौदामिनीची आई तिला समजावत होती.

"आई, मला विचार करण्यासाठी थोडा वेळ दे ना. उद्यापर्यंत मी माझा निर्णय तुला कळवेन." असे म्हणून सौदामिनी आत गेली. काही केल्या तिचे कामात काही लक्ष लागेना. तिची इच्छा काही वेगळीच होती आणि घडत काही वेगळेच होते. तिचे ध्येय साकार करण्यासाठी तिला योग्य असे सहकार्य मिळत नव्हते, शिवाय परिस्थिती देखील तशी नव्हती म्हणून तिने सगळ्या बाजूंनी विचार केला. \"आईला त्रास होण्यापेक्षा, आपल्या स्वतःचा विचार करण्यापेक्षा तिच्या सुखाचादेखील थोडा विचार करायला हवा. ती जे म्हणत आहे ते काही अंशी सत्य आहे. आजच्या या स्थितीत मुली जास्त शिकत नाहीत. शिक्षण झाले तर नोकरी करत नाहीत. इतके पैसे घालून शिक्षण पूर्ण करायचे आणि लग्नानंतर घरातच बसायचे, यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा लग्न करून आईच्या डोक्‍यावरील भार थोडासा हलका केला तर तिला मदतच होईल.\" असा विचार करुन तिने लग्नाला करण्यास अनुमती दिली.

सौदामिनीच्या आईने स्थळे पाहण्यास सुरूवात केली. नातेवाईकांना मुलींसाठी स्थळे पाहण्यास सांगितले. तिच्या ओळखीच्या स्त्रियांनाही कुठे स्थळे असतील तर पहा असे सांगितले. त्यानुसार एकामागून एक तिला स्थळे येत होती. सौदामिनीचा रंग थोडासा सावळा असल्याने कितीही चांगले स्थळ आले तरी समोरून नकारच देत होते, त्यामुळे तिची आई हिरमुसली. आता हिला कशाप्रकारे स्थळ येतील? याचा ती विचार करू लागली. कसलेही स्थळ असले तरी सौदामिनीचा रंग पाहून सगळे नकार देत होते.

सौदामिनीचे शिक्षण बारावी झाले होते आणि आता तिला लग्नासाठी स्थळं पाहत होते. तिचे लग्न झाल्यानंतर तिने असे काय कर्तृत्व दाखविले? असे नेमके काय घडले? की ती इतक्या उच्च पदावर पोहोचली. पुढे काय होईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all