सौदामिनी 17

कथा सौदामिनीच्या संघर्षाची


"सौदामिनी, तू हे काय चालवले आहेस? तुझे असे वागणे मला अजिबात पटले नाही. असे वागणे तुला शोभते का? आतापर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवला त्याचे हे गुण दाखवलीस तू. एका गोष्टीनेही तुला सांगावसं वाटत नाही. तुझ्यावर विश्वास ठेवूनच माझी चूक झाली. कुठे उलतायला गेली होतीस? इतकं महत्त्वाचं काय काम होतं? जे तू दिवसभरात करू शकत नव्हतीस आणि जायचं झालं तर आईला एका गोष्टीने सांगून जायची तुला गरज वाटली नाही. आज तू माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरली आहेस. तुला माझी बायको म्हणायची देखील लाज वाटत आहे." राजन सौदामिनीला काही वाट्टेल ते बोलत होता.

"अहो, माझं ऐकून तरी घ्या." असे सौदामिनी त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण ऐकून घेईल तो राजन कसला? त्याने तिचे काहीच ऐकून घेतले नाही. तो तिथून निघून गेला.

सौदामिनीला राजनचा खूप राग आला होता. ती रागाच्या भरात खोलीस निघून गेली. रागाच्या भरात या दोघांनीही जेवण केले नाही, तसेच उपाशी दोघेही झोपी गेले. दोघांच्या मनामध्ये राग घुमसत होता. सौदामिनी गेल्याचे कारण राजनने ऐकून घ्यायला हवे होते पण तो तिचे काहीच ऐकून घेतला नाही. हा राग तिच्या मनामध्ये होता. शिवाय त्याने तिच्यावर अविश्वास दाखवला हा सुद्धा राग तिच्या मनात होता. राजनच्या मनामध्ये सौदामिनी न सांगता कुठे गेली असेल? का गेली असेल? कशासाठी गेली असेल? कुणाला भेटण्यासाठी गेली असेल? अशा अनेक विचारांनी त्याच्या मनामध्ये थैमान माजले होते. त्या विचारचक्रामध्ये त्या दोघांनाही रात्रभर झोप लागली नाही. ते फक्त कूस बदलत झोपले होते.

या सगळ्या गोष्टीचा आनंद मात्र सौदामिनीच्या सासूला झाला होता. तिने जसे ठरवले होते तसेच घडत जात होते. त्यांना राजन आणि सौदामिनी मध्ये फुट पडायची होती. सौदामिनीच्या आईने अजून उरलेले सोने दिले नव्हते आणि राजनचा मानपान देखील केला नव्हता. हा राग तिच्या मनात घुमसत होता. त्याचा बदला म्हणून ती या दोघांमध्ये फूट पाडत होती.

दुसरा दिवस उजाडला. घरामध्ये शांततेचे वातावरण होते कारण सर्वांनी अबोला धरला होता. सौदामिनीने नेहमीप्रमाणे तिची सगळी कामे पूर्ण केली होती. राजनने देखील नेहमीप्रमाणे उठून त्याचे सगळे आवरून घेतले. पण त्याने आज ऑफिसला जाताना डबा नेला नाही. सौदामिनीच्या मनामध्ये देखील राग होता त्यामुळे तिने त्याला फोर्स केला आला नाही. सौदामिनीची सासू मात्र सकाळी उठल्यापासून एकाच जागेवर बसून होती. एक प्रहर संपला. दुपारी घराबाहेर कोणीतरी येण्याची चाहूल लागली म्हणून सौदामिनीने बाहेर जाऊन पाहिले तर तिची आई आली होती. तिला पाहून सौदामिनीचे डोळे भरले. तिने आईला गच्च मिठी मारली. सौदामिनीच्या आईला पाहून तिच्या सासूला खूप आनंद झाला कारण नक्कीच ती सोने घेऊन आली असेल असा तिने अंदाज बांधला होता आणि ते खरेच होते. सौदामिनीच्या आईने उरलेले जे दोन तोळे सोने होते ते वर्ष पूर्ण होण्याअगोदर कबूल केल्याप्रमाणे घेऊन आली होती.

सौदामिनीने तिच्या आईला आत बोलावले. आईशी किती काय बोलू असे सौदामिनीला झाले होते. मनातील सारे दुःख तिला सांगावे असे तिला वाटत होते. मग तिला टेन्शन येईल आणि ती आणखीन आजारी पडेल असे वाटून तिने आईला काल घडलेल्या गोष्टीबद्दल काही सांगितले नाही. सौदामिनीच्या आईने जेव्हा सोने दिले तेव्हा सौदामिनीच्या मनामध्ये अनेक प्रश्न घोळत होते. तिने त्याबद्दल आईला विचारले.

"आई, तू प्रत्येकवेळी असे सोने का देतेस? मागच्या वेळेस मी तिकडून येताना मला सोने दिलेस, आत्तासुद्धा देत आहेस याचा अर्थ काय? तू अशी का करत आहेस? इतके पैसे तुझ्याकडे आले कुठून? प्रत्येकवेळी मला सोने द्यायला अजून आपल्या छकुलीच लग्न आहे त्याची तजवीज तुला करायची आहे आणि तू मलाच सोने देत आहेस? का?" अशा प्रश्नाने सौदामिनीची आई मनातून घाबरून गेली. आता लेकीला काय उत्तर द्यायचे या विचारात ती होती.

"अगं बाळा, माझ्या नोकरीचे जे पैसे शिल्लक राहतील ते मी बाजूला काढून ठेवते आणि त्याचेच तुम्हा दोघींना सोने करते. मला तुमच्या शिवाय कोण आहे? मी जे काही करणार ते तुम्हा दोघींना करणार ना? तू इतका विचार करु नकोस. सारं काही व्यवस्थित आहे." सौदामिनीची आई म्हणाली.

सौदामिनीची आई बराच वेळ बसून ती संध्याकाळी घरी जाण्यास निघाली. आईला थोडे दिवस इथेच ठेवून घ्यावे असे तिला वाटत होते पण घरांमध्ये बहिण एकटीच कशी राहील? असा विचार करुन तिने आईला जाऊ दिलं. आई होती तोपर्यंत सौदामिनी खूप आनंदात होती पण जेव्हा तिची आई गेली तेव्हा घरातील वातावरण पुर्ववत झाले.

संध्याकाळची वेळ झाली. सौदामिनीने रात्रीचा सगळा स्वयंपाक लवकरच बनवला होता कारण राजन आल्यानंतर थोड्यावेळाने सगळे जण जेवत होते. पण आज राजन थोडा लवकरच आला होता. ऑफिसमधील काम हे लवकर झाले होते शिवाय त्याला बस सुद्धा लवकर मिळाली होती त्यामुळे घरी पोचयला त्याला उशीर झाला नव्हता. घरी आल्यानंतर चहा घेऊन तो खोलीत जाऊन बसला. खोलीमध्ये तो पुस्तक वाचण्यात मग्न होता. पुस्तक वाचून झाल्यावर जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याला सौदामिनी कुठेच दिसली नाही. आता आईला विचारावे तर ती आणखी काही कांगावा करेल अशा विचाराने तो घराच्या बाहेर गेला तेव्हा त्याला बाहेर सौदामिनी शेजारच्या एका मुलाशी बोलताना दिसली. ते पाहून राजनला खूप राग आला. त्याच्या मनात नाही नाही ते विचार आले. सौदामिनीचे त्या मुलाशी काही संबंध असेल का? ती माझ्यासोबत अशी का वागत असेल? तिच्या मनात काय असेल? अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या मनात थैमान माजले होते.

राजन रागाच्या भरात खोलीत गेला. खोलीमध्ये जाऊन त्याने सौदामिनीचे सगळे सामान एका बॅगेत भरले आणि ती बॅग घेऊन तो बाहेर आला. इतक्यात सौदामिनी दारात आली होती. राजनने अशी तिची बॅग भरून बाहेर आणलेली पाहून तिला आश्चर्य वाटले. तिला काहीच समजेना. ती एकटक राजनकडे पाहत उभा राहिली.

"तुझी ही थेरं मी खपून घेणार नाही. तुझे काय चालले आहे? माझ्या डोळ्याने दिसत नाही असं तुला वाटत असेल पण मला सगळं समजलेलं आहे. तू मला माझ्या आयुष्यात नको आहेस. तू इथून चालती हो. मला मला काही एक ऐकून घ्यायचं नाही." राजन असे बोलत असताना सौदामिनीला खूप आश्चर्य वाटले. सौदामिनीच्या सासूने देखील राजनला अडवले नाही. कारण तिला आता सोन्याचा हव्यास लागला होता. सौदामिनी गेली की तिची आई आणखीन सोने आणून देईल असे तिला वाटत होते. तिच्या या लोभी स्वभावामुळेच या दोन जीवांना वेगळे राहावे लागत होते. पण आता आईमुळे राजनच्या मनातदेखील सौदामिनीबद्दल नाही नाही ते विचार येत असल्याने सौदामिनी हतबल झाली होती. तिला त्या घरामध्ये कुणाचीही साथ मिळत नव्हती.

यावेळी तिचा स्वाभिमान दुखावला होता, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले होते, तिच्यावर नाही नाही त्या आरोप आले होते त्यामुळे ती खुप दुःखी झाली होती. तिच्यातील एक स्त्री जागी झाली होती. सौदामिनी रागाच्या भरात पुढे आली आणि तिचे असलेले सामान घेतले. ती बाहेर जाऊ लागली. बाहेर जाताना तरी राजन तिला अडवेल, तिला थांबवेल अशी तिची अपेक्षा होती पण त्याने तिच्याकडे वळून देखील पाहिले नाही. तो पाठ फिरवून तिथेच उभा राहिला. ते पाहून सौदामिनीला खूप वाईट वाटले. तिने एक कटाक्ष सासूकडे टाकला तर तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. हे सर्व पाहून तिला खूप वाईट वाटले. अखेर ती घराबाहेर पडली.

आता सौदामिनी काय करेल? कुठे जाईल? कशी राहील? तिचे भविष्य काय? की राजन तिला पुन्हा आणायला जाईल? हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all