सौदामिनी 14

Marathi narivadi katha

सौदामिनीच्या आईने राजनच्या आईला खूप खडसावले. ते पाहून राजनची आई आश्चर्याने सौदामिनीच्या आईकडे पाहू लागली.

"असे का पाहताय? आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? पण परिस्थिती सगळे काही बदलायला भाग पाडते. मी माझ्या मुलींसाठी काहीही करू शकते हे तुम्हाला समजायला हवे म्हणून मी इतकं बोलले. तेव्हा आता तुम्ही माझ्या लेकीला सन्मानाने या घरात घेऊन या. आणि पुन्हा अशी तक्रार होता कामा नये." सौदामिनीची आई स्पष्टपणे म्हणाली.

"उरलेले सोने तुम्ही कधी देणार? हे कबूल करा. मग पुढे काय करायचं? ते पाहिन. जर ते घालायची तुमची ऐपत नसेल तर तेसुद्धा आताच सांगा. त्यानंतर काय करायचे? ते मी बघेन." राजनची आई म्हणाली.

राजनच्या आईच्या तोंडून हे वाक्य ऐकताच सौदामिनीच्या आईला राग आला. 'आतापर्यंत इतके बोलून सगळे व्यर्थ. पालथ्या घड्यावर पाणी.. काय बाई असेल? सौदामिनीला घरात आणण्याचे काही बोलत नाही, पण पुढचे सोने कधी देणार हे मात्र हक्काने विचारत आहे. खरं तर माझी चूक झाली. चांगले स्थळ म्हणून मी माझ्या लेकीचे लग्न केले. सौदामिनीला शिकण्याची खूप इच्छा होती, पण दोन मुलींच्या जबाबदारीतून मीच मुक्त होण्याची घाई केली होती. माझी खूप मोठी चूक झाली. आता ही चूक सुधारण्याची साधी संधी सुद्धा मला मिळत नाही. मुलीला इकडे आणून सोडावे तर पुन्हा ही बाई तिला त्रास देणार. उरलेल्या दोन तोळे सोन्याची लवकरात लवकर जुळणी करावी लागणार. नाहीतर ही माझ्या लेकीचा जीव घेईल.' असे सौदामिनीची आई मनातल्या मनात म्हणाली.

"काय विचार करताय? उरलेले सोने कधी घालणार? एक वर्षाची मुदत तुम्ही मागितली, पण आता वर्ष पूर्ण होण्यास चारच महिने बाकी आहेत. त्या चार महिन्यात जर तुम्ही दोन तोळे सोने दिले नाही तर पुढे कोणता निर्णय घ्यायचा ते मी पाहिन. जर तुम्हाला शक्य होत नसेल तर आत्ताच सांगा, म्हणजे जे काही करायचं आहे ते आत्ताच करता येईल." राजनची आई स्पष्टपणे म्हणाली.

"हो पुढच्या चार महिन्यात दोन तोळे सोन्याची जुळणी मी नक्की करेन. पण तुम्ही माझ्या लेकीला सन्मानाने या घरात आणलं पाहिजे. बाकी मला काही माहित नाही." सौदामिनीची आई म्हणाली. 

"तुम्ही मला आधी सांगा. तुम्ही तुमच्या जावयाचे मानपान कौतुक केलेत का? त्याला घरी बोलावून त्याचे मानपान केलेत का? लग्न होऊन सात आठ महिने झाले तरीही तुमची काही तयारी नाही आणि तुमच्या लेकीला आम्ही सन्मानाने घरात आणावे अशी तुमची इच्छा आहे? ते कदापि शक्य नाही." राजनची आई म्हणाली. 

"सौदामिनीला घेऊन जाण्यास जावईबापूंना पाठवून द्या म्हणजे आम्ही तेव्हा त्यांचे मानपान करू, त्यांचे कौतुक करू." असे सौदामिनीची आई म्हणताच राजनची आई आनंदून गेली. 'आता जावयाचे कौतुक म्हणजे पुन्हा काहीतरी सोने वगैरे ते घालणारच. अर्थातच सोन्यासारखा जावई मिळाला आहे त्यांना. शिवाय मानपान आलेच.' असे राजनची आई मनात विचार करत होती. 

राजनच्या आईने सौदामिनीच्या आईचे कोणत्याही प्रकारे मानपान केले नाही, मानपान तर दूरच साधा चहा सुध्दा त्यांना दिला नाही. तशीही सौदामिनीच्या आईने काहीच अपेक्षा केली नव्हती. एकतर आपली लेक इथे नसताना त्या आल्या होत्या शिवाय लेकीचा संसार वाचवायचा होता, म्हणून त्यांनी काहीच अपेक्षा केली नव्हती. 

"बरं. मी निघते. तुम्ही लवकरात लवकर जावईबापूंना आमच्याकडे पाठवून द्या." असे म्हणून सौदामिनीची आई निघू लागली.

"अहो, ते तुम्ही आणलेले सोने तर दिलेच नाही. ते देताय ना?" राजनची आई म्हणाली. 

"ते सोने मी माझ्या लेकीला घालूनच पाठवणार. तेव्हा तुम्ही लवकरात सौदामिनीला आणण्यास जावईबापूंना पाठवून द्या." सौदामिनीची असे म्हणताच राजनच्या आईचा चेहरा उतरला. राजनच्या आईला सोने, दागिने यांचा खूप हव्यास होता. जिकडून मिळेल तिकडून सगळे घ्यायचेच आणि जर मिळाले नाही तर ते हट्टाने घ्यायचेच असा त्यांचा स्वभाव होता. पण या स्वभावाचा सौदामिनी आणि तिच्या घरच्यांना खूप त्रास होत होता. आलीया भोगासी असावे सादर उक्तीप्रमाणे त्या सगळे सहन करत होत्या. 

सौदामिनीची आई गेल्यानंतर राजनच्या आईच्या लालची स्वभावानुसार त्यांनी राजनला सौदामिनीकडे पाठवण्यासाठी प्रयत्न करू लागले. 
"राजन, मी एकटीने अजून किती दिवस राबायचे? माझ्याने काही कामं होतं नाहीत. मी आता खूप थकले आहे. माझ्या शारिरीक तक्रारी सुरू झाल्या आहेत. मी काय करू?" आई असे बोलतेय म्हणजे ती नक्कीच दुसरे लग्न करायला सांगणार. तेव्हा इथून गेलेलेच बरे.' असे वाटून राजन तिथून निघाला.

"अरे, मी सौदामिनीबद्दल बोलतेय." आपली आई सौदामिनी बद्दल बोलत आहे याचे राजनला खूप आश्चर्य वाटले.

"आई, पण तिने तुझी माफी मागितली नाही ना? शिवाय ती काही काम करत नव्हती. तुलाच तर सगळी कामं करावी लागत होते. आता तूच म्हणतेस की सौदामिनीला घेऊन ये याचा अर्थ काय? ती काय कामाची? त्यापेक्षा राहू दे. मी काही तिला आणायला जाणार नाही. ती घरातून गेली आहे तर ती स्वतः इकडे येऊ दे." राजन आईला म्हणाला.

"अरे बाळा, तिच्या आईने तुला जावईपणासाठी बोलावले आहे. तू तिथे जा आणि येताना सौदामिनीला घेऊन ये. आता ती आल्यानंतर मी सगळ्या कामाची जबाबदारी तिच्यावरच सोपवणार आहे आणि मी निवांत बसणार आहे. मग तर झालं." राजनची आई म्हणाली. 

"ठीक आहे. ही पहिली आणि शेवटची वेळ. यापुढे जर तुमच्या दोघींचे काही भांडण झाले तर तुमचे तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये माझा काहीच संबंध नाही आणि इथून पुढे सौदामिनी जर घर सोडून गेली तर तिला मी आणण्यास जाणार नाही. ती जशी जाईल तशी घरात परत आली तर ठीक. मी प्रत्येकवेळी पडती बाजू घेणार नाही. हे तुला आजच स्पष्ट बोलून दाखवतो. इथून पुढे तू माझ्याकडे तक्रार करायची नाही शिवाय यामध्ये चूक तुझी दिसली तर आम्ही दोघे हे घर सोडून जाऊ. पुन्हा तुमचे तुम्ही पाहून घ्या. प्रत्येक वेळी मला तुमच्या मधे घेतलेले चालणार नाही." राजन आईला स्पष्टच म्हणाला.

"बरं बाबा, ठीक आहे." राजनची आई राजनला म्हणाली. 

राजनने आता नोकरीच्या ठिकाणी न राहण्याचा निर्णय घेतला होता, कारण त्याला घरामध्ये लक्ष द्यायचे होते. तो ऑफिसला येऊन जाऊन करत होता. बसने जावे लागत असल्याने तो सकाळी आठ वाजता घरातून निघत होता आणि रात्री घरी येण्यास त्याला आठ वाजत होते. तसे बारा तास तो घराबाहेर असायचा. संध्याकाळी आल्यानंतर घरात ज्या काही घडामोडी झाल्या आहेत त्या त्याला जाणवत होत्या. पुन्हा सकाळी जाताना सारे काही व्यवस्थित पाहून तो आनंदाने जायचा. 'आईचे सगळे व्यवस्थित आहे. आता सौदामिनी आल्यानंतर काय होते ते पाहू?' असे तो मनातच म्हणाला.

सौदामिनीला आणायला जायचे म्हणून राजनला खूप आनंद झाला होता. त्याने आदल्या दिवशी सगळी तयारी केली होती. कपडे इस्त्री करून आणले होते, एका मित्राची गाडी ठरवून तो आला होता. बर्‍याच दिवसांनी सौदामिनी घरात येणार आणि आता आमच्यामधील दुरावा कमी होणार असे त्याला वाटत होते. लग्न झाल्यापासून आमच्या दोघांमध्ये दुरावा वाढत गेला आहे. पण आता बास, या सगळ्याला आता मीसुद्धा कंटाळलो आहे. लग्न झाल्यानंतर आम्ही दोघे नेहमी दूरच गेलो होतो. आता मात्र आम्हाला एक होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.

घरी आल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी करायच्या याची स्वप्ने राजन रंगवत होता. इतक्या दिवसात आपण जे काही केले नव्हते ते सारे काही आता करायचे, आपल्या भावी भविष्याचा आपण विचार करायचा असाच विचार तो करत होता.

राजन दुसऱ्या दिवशी सौदामिनीला आणायला गेल्यानंतर काय घडते? आणि सौदामिनी घरात आल्यानंतर तिची सासू तिच्याशी कशी वागते? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all