सौदामिनी 13

marathi narivadi katha

सौदामिनीच्या आईने खूप प्रयत्न करून काही शिक्षकांकडे अक्षरशः तिने उसने पैसे घेऊन दोन तोळे सोन्याची सोय केली. कितीही प्रयत्न केले तरीही पैसे काही जमा होत नव्हते. आत्तापर्यंतचा घरखर्च, दवाखाना, पाहुण्यांची ये-जा हे सारे काही सौदामिनीच्या आईच्या पगारातून होत होते, शिवाय दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे सौदामिनीच्या आईला पगारातूनच काही रक्कम बाजूला काढावी लागत होती. तिचा पगार अपुरा पडत होता, तर ती मुलींसाठी दागिने कशी करणार? त्यातूनही तिने सौदामिनीचा संसार वाचवण्यासाठी काही रक्कम गोळा केली होती. पण अजूनही दोन तोळे सोने शिल्लक राहिले होते. सौदामिनीच्या आईच्या डोक्यावर कर्जाचा मोठा भार होता, शिवाय सौदामिनीची लहान बहीण देखील अजून लग्नाची होती. तिच्या लग्नासाठी सुद्धा तिला काही रक्कम जमा करून ठेवायचे होते.

सौदामिनीच्या आईने पैसे जमा करून सौदामिनीचे लग्न केले होते. लग्नाच्या वेळेस कर्जही काढले होते आणि चार तोळे सोने सौदामिनीच्या लग्नात घातले होते, पण अजूनही चार तोळे सोने बाकी होते. कारण सौदामिनीच्या आईने आठ तोळे सोने घालण्याची कबुली दिली होती. शिल्लक असलेले चार तोळे सोने वर्षभराच्या आत घालतो असा शब्द तिने दिला होता. पण सौदामिनीच्या सासूला काही त्यांच्यावर विश्वास नव्हता, म्हणून तिने राजन आणि सौदामिनीमध्ये दुरावा निर्माण केला होता.

या सोन्यासाठी सौदामिनीच्या आईला पै पै गोळा करताना खूप त्रास होत होता, पण तिने तिच्या चेहऱ्यावर कधीही आपल्याला झालेला त्रास, दुःख दाखवले नाही. ती नेहमी हसत असायची. सौदामिनीच्या आईचा स्वभाव शांत असल्याने त्या कधीच भांडू शकत नव्हत्या. आपल्या हक्कासाठी त्या कोणाशी लढत नव्हत्या. आपल्या वाट्याला जेवढे काम आले आहे ते मुकाट्याने करायचे आणि शांत राहायचे असा त्यांचा स्वभाव होता. या स्वभावाचा सौदामिनीच्या सासरच्यांनी गैरफायदा घेतला होता. सौदामिनीची आई शांत स्वभावाची असल्याने तिने आपल्या दोन्ही मुलींना ही तसेच संस्कार केले होते.

आता सौदामिनीच्या सासरच्यांचा असला लोभी स्वभाव पाहून सौदामिनीच्या आईला खूप वाईट वाटले. 'अशीच माणसे जर या जगात असतील तर आपल्या मुलींना आपण सक्षम बनवले पाहिजे. प्रत्येक परिस्थितीत त्यांना लढता आले पाहिजे. असे मुळमुळीत बसून त्यांचा संसार कधीच होणार नाही. परिस्थितीशी दोन हात करून सामना करता आला पाहिजे.' असे तिने मनोमन ठरवले. आपल्या मुलींमध्ये धाडस निर्माण व्हावे यासाठी ती प्रयत्न करत होती.

दोन तोळे सोने जमा झाल्यानंतर सौदामिनीची आई लेकीचा संसार वाचवण्यासाठी सौदामिनीच्याही नकळत तिच्या सासरला गेली. तिथे जाताना तिने नारळाची बर्फी बनवून घेतली होती. सौदामिनीच्या सासरमध्ये सौदामिनीची आई गेली तेव्हा तिला त्यांच्या घरात सासू सासरे आणि राजन बसलेले दिसले. सौदामिनीच्या आईला पाहताच तिच्या सासूबाईंच्या चेहर्‍यावर हसू आले. या नक्की सोने घेऊन आल्या असतील अशी त्यांना आशा वाटली. पण त्यांनी ते चेहऱ्यावर दाखवून दिले नाही. राजनसमोर हे दाखवले तर चुकीचे ठरेल असे त्यांना वाटले. सौदामिनीची आईला आत आली. आत आल्यानंतर त्यांना राजनच्या आईने आत बोलावून नेले, कारण राजनसमोर काहीच बोलता येत नव्हते.

"अरे, तुम्ही कशा काय येथे आलात? तुमची मुलीला तर इथे राहायची इच्छा नाही, म्हणून तर गेली आणि तुम्ही आता काय कारण घेऊन आलात?" राजनची आई टोचून सौदामिनीच्या आईला बोलत होती. पण तिच्या आईला माहित असल्याने आता या काय बोलणार याचा त्यांना अंदाज आला होता, म्हणून त्या शांत होत्या.

"आता इथपर्यंत आलात तर घरात या. रस्त्यावरील वाटसरूला ही पाणी देण्याचे संस्कार आहेत आमच्यावर. तुम्हीही येऊन पाणी पिऊन जा." सौदामिनीच्या आईने सोने आणले असेल असे ओळखून राजनच्या आईने त्यांना आत बोलावले. सौदामिनीची आई आत गेली आणि बाहेर हॉलमध्ये राजनचे बाबा आणि राजन दोघे बसले.

"तुमच्या मुलीने काय दिवे लावले ते तुम्हाला सांगितले असेल ना? आता तिच्या बाजूने बोलायला आला आहात की कामाचे काही बोलणार आहात? हे महत्त्वाचे तेवढेच बोला, नाहीतर फापटपसारा ऐकून घेण्यास मला वेळ नाही." राजनची आई स्पष्टच म्हणाली.

"मी सुद्धा महत्त्वाचं बोलायला आले आहे. तुम्ही जे काही वागत आहात ते योग्य नव्हे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने तुमच्या मुलाचा संसार उध्वस्त करत आहात. आम्ही सोने न देता तुमची फसवणूक करणार नाही. लग्नामध्ये जेवढे कबूल केले आहे तेवढे सोडणे आम्ही करणारच. फक्त आम्हाला थोडीशी मुदत हवी होती ती सुद्धा तुम्हाला धीर निघेना. काही कारणाने तुम्ही माझ्या मुलीला घरातून बाहेर काढलेत. खरंतर मला भांडता येत नाही आणि स्पष्ट बोलता येत नाही, पण आज माझ्या लेकीसाठी मी इतके धैर्य करत आहे. सोने, पैसा आज ना उद्या मिळतील पण तुटलेली नाती पुन्हा लवकर जोडता येत नाहीत. तुम्ही एकदा शांत मनाने विचार करून पहा आणि मग जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या." सौदामिनीची आई राजनच्या आईला स्पष्टपणे म्हणाली. 

"तुम्ही उगाच माझ्यावर आरोप करू नका. मी माझ्या मुलाचा संसार स्वतःच्या हाताने का मोडू? चूक तर तुमच्या मुलीची आहे. तीच उलट बोलते, लहान मोठे काही पाहत नाही. माझ्या मुलाशी सुद्धा ती वेडेवाकडे बोलते. तुम्ही तुमच्या मुलीला योग्य संस्कार केले नाहीत. लग्नात तुम्हीच सोने घालतो म्हणून कबूल केला होतात, तेव्हा तर दिलेच नाही आणि आता सुध्दा यावर तुमचे काही बोलणे नाही. यात चूक कोणाची? शब्द पाळता येत नाही तर कबूल कशाला करायचे? आम्ही तेव्हाच लग्न मोडले असते, पण तुम्हालाच घाई होती ना लग्न करण्याची? त्यात आमची काय चूक आहे? सगळी चूक तुमचीच आहे आणि तुम्ही त्या चुकीवर पांघरूण घालत आहात आणि आमची चूक कशी झाली? हे दाखवून तुम्ही आमच्याकडे बोट दाखवत आहात." राजनची आई म्हणाली. 

"आमची चूक झाली आम्हाला मान्य आहे, पण आता लग्न होऊन वर्ष होत येणार. तेव्हा भर मांडवात दोघांचीही इज्जत गेली असती म्हणून आम्ही सोने देण्याचे कबूल केले. तुम्ही आमची परिस्थिती थोडी समजून घ्या. आम्ही सोने घालतो म्हणून शब्द दिला आहे, पण तुम्हाला त्याचा धीर निघेना. हुंडा देणे घेणे कायद्याने गुन्हा आहे हे तुम्हाला आम्हाला माहीत असतानाही आपण या हुंडा बळी पडलो आहोत. आज जर माझ्या मनात आले तर मी पोलीस स्टेशनला जाऊन तुमच्याबद्दल गुन्हा दाखल करू शकले असते, पण मला माझ्या लेकीचा संसार वाचवायचा आहे म्हणून हा सगळा आटापिटा चालू आहे. तेव्हा तुम्हीच ठरवा की मी कोणते पाऊल उचलावे? सारे काही तुमच्यावरच अवलंबून आहे." सौदामिनीची आई म्हणाली. 

"तुम्ही आम्हाला धमकी देत आहात? तुम्ही असे काही करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या मुलीला घरात ठेवून घ्यायचे आहे का? तुम्ही चार लोकांमध्ये कबूल केले आहे आणि आता सोने द्यायला लागते म्हणून हे नाटकं करत आहात? तुम्ही जे मान्य केले आहे ते तुम्हाला पूर्ण करावेच लागणार." राजनची आई म्हणाली. 

"मला काही तुमच्यासारखी मुलांचे संसार मोडण्याची हौस नाही. मी माझ्या लेकीचा संसार वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून इकडे आले आहे, नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये गेले असते आणि तुमची तक्रार केली असती. माझ्या मुलीचे संस्कार म्हणाल तर तिचे संस्कार चांगले आहेत म्हणूनच तिने सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमची तक्रार केली नाही. नाहीतर तिच्यामध्ये तेवढी धमक आहे. फक्त माझ्या संस्कारामुळेच तिने इतके दिवस तुमच्या घरात संसार केला आहे ते सुद्धा नवरा इथे नसताना. खरंच तिच्या सहनशीलतेला सलाम." सौदामिनीची आई म्हणाली. 

सौदामिनीच्या आईने दोन तोळ्याचे मिनी नेकलेस केल्याचे राजनच्या आईला दाखवले आणि ती म्हणाली, "मी माझ्या परीने तुम्हाला कबूल केलेले सोने घालण्याचा प्रयत्न करत आहे. आता फक्त दोन तोळे शिल्लक राहिले आहेत. ते सुद्धा पुढच्या दोन महिन्यात देईन पण आता त्याच्या बदल्यात तुम्ही माझ्या लेकीला सन्मानाने घरात घ्यायला हवे. ती स्वतःहून येणार नाही. तुम्ही तुमच्या मुलाला तिला घेऊन येण्यास पाठवून द्या. बाकी मला काही माहित नाही. नाहीतर पुढच्या सगळ्या कारणासाठी तुम्हीच जबाबदार असाल."

राजनच्या आईला सौदामिनीच्या आईच्या बोलण्याचे नवल वाटले. 'या बाईच्या तोंडातून एक अक्षरही फुटणार नाही, पण आज ही इतके स्पष्ट बोलत आहे. त्यांच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावे?' या विचारातच राजनची आई होती.

यापुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all