सोशल मीडिया शाप की वरदान?

About Social Media


सोशल मीडिया शाप की वरदान


सोशल मीडिया म्हणजे \"सामाजिक माध्यम\" .
सोशल मीडिया म्हणजे \"वेबसाईट्स आणि अँप्सचे आभासी नेटवर्क\" . आपले आचार,विचार आदान- प्रदान करण्याचे माध्यम!

सोशल मीडिया इंटरनेटद्वारे एक आभासी जग तयार करते आणि त्याचा वापर करणारी व्यक्ती कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर करून या आभासी जगात वावरू शकते.

पूर्वी वर्तमानपत्र,पुस्तके
साप्ताहिके, मासिके इ. माध्यमातून लोकांना माहिती,ज्ञान मिळत असे. लोकांना जगात घडणाऱ्या गोष्टी,विविध विषयांवरील माहिती कळत होती आणि त्याबरोबर मनोरंजन ही होत होते. लेखक, कवी ,विचारवंत यासारखे लोक आपले विचार या प्रसार माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहोचवित होते.
रेडिओ, टेलिव्हिजन याद्वारे अनेक माहितीपर कार्यक्रम ऐकणे,पाहणे ही शक्य झाले. जगात कुठेही घडलेली घटना घरी बसून ऐकता, पाहता येऊ लागली. महत्त्वाचा संदेश,बातम्या एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांमुळे शक्य होऊ लागले.

पत्र,फोन,टेलिग्राम ,फॅक्स ही सर्व साधने माहितीच्या देवाणघेवाणाची साधने ठरली. आनंदाच्या,दुःखाच्या गोष्टी पटकन समजू लागल्या. आणि ही साधने विचार, भावना व्यक्त करण्याचे माध्यम ठरले.

इंटरनेट आले आणि ई-मेल,जी- मेल द्वारे काही क्षणातच आपला मेसेज जगाच्या पाठीवर कोठेही आपण पाठवू शकलो. सुरुवातीला ठराविक लोकच इंटरनेटचा वापर करीत होते. पण हळूहळू संगणक आणि इंटरनेटचे जाळे सर्वत्र पसरले.

सुरूवातीला संगणक,इंटरनेट कसे वापरावे? याची माहिती अनेकांना नव्हती आणि लोकांना थोडी भीतीही वाटायची. पण संगणक,इंटरनेटचा वापर कसा करावा हे लोकांना कळू लागले आणि मग त्याबद्दलची भीती जाऊन उत्सुकता वाढत गेली.

शाळा,महाविद्यालय,बँक,दुकाने, विविध कार्यालये इ. अनेक ठिकाणी संगणकाचा,इंटरनेटचा वापर वाढू लागला. संगणकामुळे मोठ्या प्रमाणात माहिती साठवणे शक्य झाले. कामाचा वेग वाढला . मानवी चुका कमी होऊन कामात पारदर्शकता आणि व्यवस्थितपणा निर्माण झाला. इंटरनेटमुळे हवी असलेली सर्व प्रकारची माहिती सहज मिळविणे शक्य झाले.
ज्ञानाचे एक मोठे भांडार सोशल मीडिया च्या साहाय्याने उपलब्ध झाले.

मोबाईल आला आणि लोकांना विज्ञानाचा अजून एक चमत्कार समजला.एखाद्याकडे मोबाईल असणे म्हणजे कुतूहलाचा विषय आणि तो व्यक्ती म्हणजे खूप श्रीमंत असा समज निर्माण झाला. टेलिफोनसाठी केबल नेटवर्क आवश्यक होते. वायरलेस फोन होते पण ते कोणी बरोबर घेऊन इतरत्र कुठे जात नव्हते. पण मोबाईल आपण जिथे जाणार तिथे बरोबर नेऊ शकत असल्याने हवे तेव्हा एकमेकांना फोन करणे,मेसेज करणे सोयीचे झाले.

पुढे बटणांच्या मोबाईल ची जागा टच स्क्रीन मोबाईल ने घेतली. मोबाईल मधील विविध प्रकारचे फीचर्स जसे- व्हॉइस मेसेज, विडिओ कॉल,कॅमेरा,इ. यामुळे एकमेकांशी बोलणे सोपे झाले.

तसेच विविध प्रकारचे अँप्स आले.कॅमरामुळे अनेक आठवणी फोटो रूपात पटकन टिपता येऊ लागल्या. त्या आठवणी फोटो गॅलरीत साठवून हव्या तेव्हा पाहता येऊ लागल्या. छान छान व्हिडिओस बनवता येऊ लागले.त्यामुळे लोक जीवनातील प्रत्येक गोष्ट आनंदाने जगण्याचा प्रयत्न करू लागले.
फेसबूक, व्हाट्सएप,मेसेंजर, टेलिग्राम, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारख्या अँप्स मुळे एकमेकांशी चॅटिंग करणे शक्य झाले.फोटो,मेसेजेस,व्हिडिओस शेअर करणे सोपे झाले.
युट्युब सारख्या अँप मुळे चित्रपट, मालिका, वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीचे व्हिडिओस पाहता येऊ लागले.

नेटबँकिंग मुळे बँकेचे व्यवहार घरी बसून करता येऊ लागले.
ऑनलाइन शॉपिंग साठी अनेक अँप्स उपलब्ध झाले. मूवी टिकिट्स, ट्रॅव्हलींग टिकिट्स हे सर्व बुकिंग घरूनच करता येऊ लागल्याने वेळ ही वाचू लागला .
गुगल मॅप मुळे प्रवास करताना मार्गदर्शन मिळू लागले. प्रत्येक क्षेत्रातील माहिती, प्रत्येक विषयाचे ज्ञान इंटरनेटमुळे मिळू लागले.मोबाईल,संगणक,लॅपटॉप,टॅब,स्मार्ट टीव्ही अशा साधनांद्वारे इंटरनेट वापरले जाऊ लागले.

कॅशलेस व्यवहारासाठी मोबाईल वापरणे गरजेचे ठरले.
इंटरनेट आणि मोबाईलचा वाढता उपयोग बघता प्रत्येकाकडे मोबाईल दिसायलाच लागला. कधी कामाची वस्तू म्हणून तर कधी करमणुकीचे साधन म्हणून मोबाईल, इंटरनेटचे आकर्षण वाढू लागले.

शिक्षणासाठी सोशल मीडिया चा चांगला उपयोग झाला. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात माहिती चे आदानप्रदान करण्याचे उत्तम साधन ठरले. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक अशी माहिती चांगल्या
प्रकारे कळू लागली. शाळा,महाविद्यालयांना विद्यार्थ्यांशी महत्त्वाचे मेसेजेस पाठवणे सोपे झाले.

व्यवसाय करणाऱ्या लोकांना सोशल मीडियाचा खूप फायदा झाला. आपल्या व्यवसायाची माहिती कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले. वस्तूंची जाहिरात करुन व्यवसाय वाढविण्यासाठी मदत झाली.

लेखक, कवी या लोकांना ई- साहित्याच्या माध्यमातून आपले साहित्य अनेक रसिक वाचकांपर्यंत पोहोचविणे सोपे झाले.

ऑनलाइन मीटिंग मुळे जाण्यायेण्याचा त्रास, खर्च वाचू लागला.

अनेक लोकांना आपल्यातील कलागुण दाखवता येऊ लागले आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळू लागला.

सारखे विचार, छंद ,आवड असणारे लोक सोशल मीडिया मुळे एकत्र येऊ लागली आणि समाजउपयोगी कामे करू लागली.

सोशल मीडीयामुळे अनेकांना आपल्या बालपणाचे सवंगडी मिळाले तर काहींना आपल्या जीवनाचे साथीदार ही मिळाले.

फक्त आपल्याच देशातील नाही तर परदेशातील व्यक्तींशी घरी राहूनच संपर्क साधता येऊ लागला.

पूर्वी लग्न झालेल्या मुलीं सासरी गेल्यावर आईवडिलांना तिच्या सुखाची काळजी असायची. आता तर व्हिडिओ कॉल करून तिच्या शी बोलून ती सुखात आहे की नाही ते समजते.
परदेशात नोकरी साठी,शिक्षणासाठी गेलेल्या मुलांशी बोलून बरे वाटते.

देशात कुठे पूर,भूकंप, वादळ यासारखे संकटे आली तर लोकांना मदत करणे सोपे होऊन जाते.
एखाद्या आजाराची किंवा एखाद्या समस्येची माहिती लोकांपर्यंत पोहोचविता येते.


कोरोना काळात तर मोबाईल ,इंटरनेट अगदी देवदूतच झाले होते. रूग्णांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नसल्याने मोबाईल वरच भेट होत होती. ऑनलाइन शिक्षण,वर्क फ्रॉम होम या सुविधांमुळे शिक्षण आणि विविध क्षेत्रातील कामे सुरू राहिलेत. या सर्व गोष्टींचा विचार करता इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडिया खरोखरच वरदान च ठरले.

पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्याप्रमाणे सोशल मीडियाचा अतिरेकी वापर हा घातक ठरत आहे.

कोणत्याही गोष्टीचा शोध हा गरजेमुळे लागत असतो आणि त्या गोष्टीचा उपयोग चांगल्या कामासाठी केला तर ती गोष्ट वरदान ठरत असते. त्यामुळे ती गोष्ट कशी वापरायची आणि कोणत्या कामासाठी वापरायची हे वापरणाऱ्याच्या विचारांवर अवलंबून असते.

जसे- चाकू,सुरी यांचा उपयोग फळे,भाज्या कापण्यासाठी होतो पण वाईट प्रवृत्तीचे लोक त्याचा घातक उपयोग ही करतात. अणुबॉम्ब चा शोध चांगल्या कामासाठी लावला पण विकृत लोक त्याचा उपयोग वाईट मार्गासाठी ही करतात.

सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर खरच ते सर्वांसाठी एक चांगले वरदानच आहे पण लोक त्याचा वापर जर चुकीच्या पद्धतीने करत असतील तर ते त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी ही शाप ठरू शकते.

खूप वेळ संगणक,लॅपटॉप,
मोबाईल वर काम करीत राहिले किंवा काम नसताना ही उगाचच टाईमपास म्हणून पाहत राहिले तर डोळे, मान, पाठ,डोके अशा अवयवांना त्रास तर होतोच आणि आरोग्य ही बिघडते. आयुष्यातील खूप वेळ खर्ची होतो आणि शारिरीक व्याधी ही सुरू होतात.
सोशल मीडियावर नको त्या गोष्टी शेअर केल्या जातात, बघितल्या जातात त्यामुळे सायबर गुन्हे वाढत जातात. अनोळखी व्यक्तिशी केलेली मैत्री,केलेले चॅटिंग या गोष्टी खूप त्रासदायक ठरतात.

पूर्वी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांची पत्र येण्याची वाट पाहण्यात
जी मजा होती ती आताच्या सोशल मीडियामुळे नाही राहिली.रोजच नाही तर दिवसातून अनेकदा बोलणे होते त्यामुळे अगोदरची नात्यांबद्दलची जी ओढ होती ,भावना होती ती हळूहळू बदलत चालली आहे. मनुष्य सोशल मीडियामुळे एकमेकांशी पटकन संवाद साधून जवळ तर आला पण मनाने एकमेकांच्या दूर जात आहे असे वाटायला लागले आहे.

पूर्वी जे नात्यांमध्ये प्रेम होते ,विश्वास होता .
आता ते जाऊन दिखाऊपणा वाढत चालला आहे. नवरा बायको घरात भांडत जरी असले तरी सोशल मीडिया वर जोडीचा छान फोटो टाकून \"मेड फॉर इच अदर\" असे लिहून लाईक्स आणि चांगल्या कंमेंट्स मिळाले की खूश होतात.

आपण किती सुंदर आहोत हे आपण टाकलेल्या फोटोला मिळालेल्या लाईक्स आणि कंमेंट्स वरून ठरते.

आपण बनविलेला पदार्थ हा देवाला नैवेद्य दाखविण्यापूर्वी स्टेटस ला ठेवणे,वेगवेगळ्या ग्रुप्स ला पाठवून आपल्याला किती चांगला स्वयंपाक येतो याची पोचपावती येणाऱ्या प्रतिक्रियातून कळल्यावर अतिशय आनंद होणे.
कोणाशी काही वादविवाद झाले असेल तर त्या व्यक्तीला उद्देशून तसे मेसेजेस टाकणे,स्टेटस ठेवणे . असे वागून मनःशांती मिळविणे. यासारखे अनेक प्रकार सोशल मीडियावर सुरू असतात.

जन्मदिवस असो की लग्नाचा वाढदिवस असो त्या दिवशी सर्वीकडून शुभेच्छांचा वर्षावच होत असतो. त्यात मोजकेच असतात जे मनापासून शुभेच्छा देत असतात .बाकी फक्त फॉर्मलिटी म्हणून करत असतात.
आणि कोणाचे शुभेच्छा देण्याचे चुकुन राहून गेले असेल तर मग त्या व्यक्तिचा राग येणे वगैरे गोष्टी सुरू होतात.

सणवार असो की अजून महत्त्वाचे दिवस त्यादिवशी तर शुभेच्छांचे मेसेजेस इकडून तिकडे फॉरवर्ड होतच असतात पण रोज कोणत्या तरी दिनाच्या शुभेच्छा देणे सुरू असतेच.

आपले फोटो पोस्ट करणे,आपण बनविलेला पदार्थ फोटो काढून पाठविणे ,एखाद्या गोष्टी बद्दल आपले विचार व्यक्त करणे अशा अनेक गोष्टींमुळे जेव्हा व्यक्ती सोशल मीडिया चा उपयोग करते तेव्हा चांगल्या प्रतिसादामुळे त्या व्यक्तीला आनंद होतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला सोशल मीडियाचे व्यसन जडते.
घरात व्यक्ती एकमेकांशी संवाद न साधता तासन् तास सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहू लागतो. पुरूष मंडळी कामाचा वेळ त्यात वाया घालवतात . महिला वर्ग आपल्या कुटुंबाला वेळ न देता सोशल मीडियालाच आपले विश्व समजतात.
मुले सोशल मीडियाचा अतिरेकी वापर करून अभ्यासात दुर्लक्ष करतात. नको त्या प्रलोभनांना बळी पडतात.
मुले मैदानी खेळ न खेळता सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह राहतात. त्यामुळे त्यांची शारीरिक वाढ व्यवस्थित होत नाही. मानसिक स्वास्थ्य ही बिघडते. मुलांमध्ये चिडचिड, भीती,मानसिक अस्थिरता असे अनेक प्रॉब्लेम्स येऊ लागतात. मोठ्या व्यक्तिंना ही सोशल मीडियाच्या अति वापरामुळे लठ्ठपणा, आळस,हायपरटेंशन, मानसिक असंतुलन, झोप न येणे अशा अनेक समस्या येत असतात.

घरातील प्रेमाची जागा ,एकमेकांसाठी असलेला वेळ सोशल मीडियाने घेतल्याने घरातील सुख शांती जाऊन घरात संशय,भांडणे,वादविवाद, कुटुंबकलह होऊ लागतात.

लाईक्स, कंमेंट्स मिळवण्यासाठी नको त्या पोस्ट टाकणे.देश,धर्म, जात वगैरे गोष्टींवरून पोस्ट टाकून वाद निर्माण करणे.

विविध विषयांवरील अफवा पसरून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे, चुकीचे मार्गदर्शन करून लोकांची दिशाभूल करणे, लोकांच्या पोस्टवर वाईट शब्दांत कंमेंट्स करून त्यांचा अपमान करणे.नको त्या लोकांच्या नको त्या पोस्टला कारण नसताना पाठिंबा देवून समाजात, देशात तेढ निर्माण करणे. नको तसे फोटो,व्हिडिओस काढून लोकांना ब्लॅकमेलिंग करणे.

राजकीय,खेळ,कला,
सामाजिक अशा अनेक क्षेत्रांतील लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावर पोस्ट टाकून त्यांना खूप चांगले ठरविणे नाही तर मग त्यांची बदनामी करून त्यांना वाईट ठरविणे.

अशा अनेक वाईट गोष्टींमुळे लोक आपल्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करतात किंवा सोशल मीडियाच्या जगात टिकून राहण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग तरी स्विकारतात.

जगातील शांतता आणि स्थैर्य हे सोशल मीडियामुळे धोक्यात आले आहे. सामाजिक अस्थिरता जाणवू लागली आहे. लोक कृतीपेक्षा मतांवर जास्त विश्वास ठेवू लागली आहेत .
सोशल मीडियाचा सावधपणे उपयोग केला पाहिजे नाही तर त्याचा दुरूपयोग होऊ शकतो.


सोशल मीडिया हे आजच्या काळात गरजेचे आहे. वैयक्तिक जीवनापासून ते जागतिक पातळीवर त्याचा परिणाम होत असतो.

सोशल मीडियाचा उपयोग स्वतः च्या प्रगतीसाठी, कुटुंबाच्या सुखासाठी ,समाजाच्या कामासाठी, देशाच्या सेवेसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी करून त्याला वरदान ठरवायचे की त्याचा दुरूपयोग करून आपल्या बरोबर इतरांसाठी ही त्याला शाप ठरवायचे याचा विचार प्रत्येकाने करून सोशल मीडियाचा वापर करावा.