सोबत आजीआजोबांची

आजीआजोबा व नातवंडे

#सोबत_आजीआजोबांची

गोट्या  पाचवीत गेला होता. त्याच्या मनात असंख्य प्रश्न असायचे. सगळ्याच बाबतीत कुतूहल. आईवडील दोघं सकाळी उठून कामाला जायचे. 

 गोट्या आजीआजोबांसोबत रहायचा. एकदा गोट्या शाळेतून आला तो थोडा नाराज होता. त्याने हातपाय धुतले व ओट्याजवळ सुरीने बाजूलाच पडलेली कांद्याची साल कापत उभा राहिला.

आजी-काय रे गोट्या,आज शांत शांत.

गोट्मा- तसं काही विशेष नाही पण न् आमचे शिंदे सर आज निव्रुत्त झाले. थोडं वाईट वाटलं. किती खोड्या काढायचो आम्ही त्यांच्या! टकल्या,झालर काय काय नावांनी संबोधायचो. आत्ता ती शिंदे सरांची झालर आम्हाला दिसणार नाही. खूप मोठे व्हा असं जातानाच्या भाषणात म्हणत होते तेंव्हा त्यांनी पाठी फिरुन त्यांचे डोळे पुसले. मुली तर खूप रडल्या माहितीय. मुलांनी रडायचं नसतं ना गं आजी. आम्हालाही कससंच होत होतं पण गप्प बसलो. 

आजी: अरे गोट्या, मनात येतं तेव्हा व्यक्त व्हायचं. त्यावेळी त्यांना चिडवत राहिलात. तुमच्या वयानुरूप वागलात पण त्यांना थोडा आदर दाखवला असता तर! ही चुटपुट राहिलीच नं मनात. पुन्हा अशी चुटपुट रहाणार नाही यासाठी प्रयत्न कर. लहानमोठा कोणीही का असेना,त्याचं काम तुला आवडलं तर तिथल्या तिथे दोन गोड शब्द बोलून तुझ्या मनातल्या भावना व्यक्त कर. आणि मुलांनी रडायचं नसतं वगैरे असं काही नसतं रे राजा. आपल्या मनातल्या भावना दाबून ठेवू नयेत. रडण्याने मन हलकं होतं. बरं चल मी थालिपीठं लावते तोवर तू ताटं घे. 

दुसऱ्या दिवशी..

गोट्या- आजी, पुर्वग्रहदुषित नजर म्हणजे कसली नजर ?

आजी: गोट्या, त्या भाजीत मीठ टाक रे जरा.

गोट्या: आजी हाताने टाकू.

आजी: हो टाक.

आजी: गोट्या माझे हात पीठाचे आहेत. जरा भाजीची चव घेऊन बघ बरं.

गोट्या: चमचा दे की.

आजी: नको. हातानेच पहा.

गोट्याने जराशी भाजी बोटांनी उचलून तोंडात घातली.

गोट्या: आजी गं, भाजी खारट झाली. 

आजी: बरं आत्ता नळाखाली हात धुवून परत चव घे बघू.

गोट्याने आजीने सांगितल्याप्रमाणे केलं.

गोट्या: नाही गं आजी, खारट. नॉर्मलच झालेय.

आजी: बघ गोट्या,मघा तू मिठाचा हात धुवायचा विसरलास व त्याच बोटांनी भाजी चाखलीस तेंव्हा ती खारट लागली .ती बोटं धुवून परत भाजी खाल्लीस तेंव्हा त्याच भाजीची चव तुला बरोबर वाटली. हेच नेहमीच्या आयुष्यात होतं बघ. एखाद्याकडे आपण पुर्वग्रहदुषित नजरेने पाहिलं म्हणजे तो माणूस वाईटच आहे अशा नजरेने पाहिलं तर त्या माणसातले चांगले गुण आपल्याला दिसत असुनही आपण त्यांकडे डोळेझाक करतो.

गोट्या: आत्ता आलं लक्षात आजी कसली हुशार आहेस गं तू!

गोट्याकडे त्याची मावसबहीण,प्राजक्ता रहायला आली. गोट्याला प्राजूताई फार आवडायची. प्रत्येक वेळेला सुट्टीत गोट्याकडे रहायला आली की ती त्याला छान छान गोष्टी सांगायची,गोष्टीची पुस्तकं आणायची. यावेळीही तिने गोट्याला गोष्टीची पुस्तकं आणलेली खरी पण तिला येऊन दोनतीन दिवस झाले तरी ती गोट्याशी जेवढ्यास तेवढं बोलायची,आजीआजोबांशीही.

गोट्या: आजोबा,मुलं कॉलेजला गेली की जास्त भाव खातात का हो?

आजोबा: का बॉ?

गोट्या: अहो आजोबा, ती प्राजूताई बघाना. माझ्याशी पहिल्यासारखी बोलतच नाही. नुसती गप्प गप्प असते. 

आजोबा: बरं मी बोलतो हं प्राजुताईशी.

आजी गोट्याला घेऊन भिसीपार्टीला गेलेली असते. 

आजोबा जुनी गाणी लावून ऐकत होते. त्या़ची तंद्री लागली होती. 
का रे अबोला का रे दुरावा
अपराध माझा असा काय झाला..
गाणं ऐकतच ते किचनमधे चहा करायला आले.
इतक्यात त्यांना मुसमुसणं ऐकू आलं. त्यांनी बेडरचमला कान लावला. तिथूनच रडण्याचा आवाज येत होता. आजोबांनी दरवाजावर टकटक करताच प्राजूताईने डोळे पुसत दार उघडलं.

 आजोबा-समथिंग सिरियस? प्रायव्हेट आहे का काही? 

प्राजू- म्हटलं तर आहे म्हंटल तर नाही.

आजोबा: माझ्याशी शेअर करशील का? जमल्यास मदत करेन मी. 

प्राजू: आजोबा,लहानपणापासून मावशीकडे येतेय मी. तुम्ही व आजीने माझे भरपूर लाड केले आहेत. माझ्या बऱ्याच गोष्टी माहित आहेत तुम्हाला. बोथ ऑफ यू आर माय क्लोज फ्रेंड.

आजोबा: ओके,देन शेअर युवर वरी वीथ अस. 

प्राजू: आजोबा,मी थोड्या विचित्र स्थितीत सापडलेय हो. मला नं आमच्या कॉलेजमधले राज सर फार आवडतात. खूप भारी पर्सनेलिटी आहे त्यांची. सहा फुट उंची,बोलण्यात अदब,मिश्किल स्वभाव,सरळसोट नाक,बोलके डोळे.. मला नं आजोबा कळतच नाही मी प्रेमात पडलेय की काय त्या सरांच्या. ते शिकवतात तेव्हा मी फक्त त्यांच्याकडे बघत रहाते. त्यांच्या तोंडातून येणारे शब्द माझ्या मेंदूपर्यंत पोहोचतच नाहीत. 

आजोबा: होतं गं असं. बऱ्याचजणांच होतं. तू मनमोकळं बोललीस हे बरं केलंस. या फेज असतात आयुष्यातल्या. तुच असं नाही बरीच जणं या म्रुगजळात अडकतात बघ. कधी आपल्या मित्राच्या,कधी बसस्टॉपवरती नेहमी दिसणाऱ्या एखाद्या तरुणाच्या तर कधी आपल्याच एखाद्या शिक्षकाबद्दल शारिरीक, मानसिक आकर्षण वाटतं. तुम्हा मुलींना वाटतं तसं ते मुलांनाही वाटतं. 

प्राजू: आजोबा,असं झालं की मला वाटतं मी फार चुकीचं काहीतरी करत आहे आणि मग स्वतःला दोष देते व अशी रडत बसते. तिथे मम्मा घरी नसते. तिला प्रमोशन मिळालंय ना सो ती फारच लेट येते घरी. पप्पा तर टूरवरच असतो. माझ्या मनातली सल सांगणार कोणाला? शेवटी कंटाळून इथे आले. मी माझे सख्खे आजोबा कधी पाहिले नाहीत पण दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे येत गेल्याने आजी व तुमच्याशी एक छान बॉण्ड तयार झाला आहे आजोबा.

आजोबा: एवढी शहाणी आहेस तू प्राजू आणि एकटी कुढत बसलीस. अगं आजीला तरी बोलायचं होतसं. 

प्राजू: बोलायचं होतं आजीशी पण..गोट्या सतत सोबत असतो नं तिच्या सो राहूनच गेलं. 

आजोबा: आत्ता डोळे पुस बघू. अगं अशी किती आकर्षणं येतील तुझ्या मनात दिवसागणिक. प्रेम नसतं गं ते. आत्ता मस्त अभ्यास करायचा आणि एखादा छंद जोपास गं जोडीला. पहिली किती आवडीने स्टोरीबुक्स वाचायचीस तू!

प्राजू: आजोबा,पण आई नको म्हणतो स्टोरी बुक वाचायला. उगा वेळ फुकट घालवू नको म्हणते. 

आजोबा: बरं मी समजावेन तुझ्या आईला. तीही शहाणी आहे तुझ्यासारखी. माझं नक्की ऐकेल. आपली शेल्फ भरलेली आहे पुस्तकांनी. तुला हवी ती वाच. लहानपणी तुला एडवेंचर स्टोरीज फार आवडायच्या. अगं प्राजू बुक्स हेच आपले खरे मित्र असतात. त्यांची साथ कधी सोडू नकोस. सुधा मुर्तींची छान छान पुस्तकं नुकतीच आणली आहेत मी एका प्रदर्शनातून ती वाच. 

प्राजू: थँक्यू आजोबा. चला मी चहा करते आपल्या दोघांसाठी. 

आजोबा: आजी व गोट्यासाठीही कर गं. येतील थोड्याच वेळात.

प्राजू: आजोबा जरा ती चहाची पात आणून द्या प्लीज. 

आजोबा: हो गं आणतो. हे गुडघे हल्ली जास्तच कुरकुरतात बघ. आधी मी हिला हसायचो पण आत्ता माझंही तसंच होतंय.

प्राजू: आजोबा,रोज दोन अंडी खायची हो उकडून.

आजोबा: त्याशिवाय तुझी आजी काढतेय मला घराबाहेर! मासळीबाजाराच्या बाजूने गेलं तरी उमासे येतात बाईला. मधे एकदा तुझ्या मावशीने ऑमलेट काय ते केलं होतं. ही बाहेर गेली होती. आम्ही दोघं सूनसासऱ्यांनी छान एन्जॉय करत खाल्लं ते. तुला सांगतो प्राजू ,अस्सा बारीक कांदा चिरला..तव्यावर तेल चुरचुरलं तसं बारीक चिरलेली कोथिंबीर परतली त्यात नंतर कांदा,हिरव्या मिरचीचे मध्ये चीर दिलेले तुकडे,जरासी हळद,मीठ व चांगलं बीट केलेली अंडी. असं फुललं होतं ऑमलेट..सोबतीला बटर लावलेले ब्रेड आणि हो वाफाळलेली कॉफी. पण ही आली दोनेक तासांनी नी असं नाक वरखाली करुन वास घेऊ लागली. उल्काने तवा घासूनबिसून ठेवलेला पण हिने पोळ्या करायला तो गरम केला आणि काय सांगू तुला,परत तो ऑम्लेटचा घमघमाट सुटला घरभर. हिला शंका होतीच. मग हिने उल्काला विचारलन..अहं विचारलं काय असं फैलावर घेतलं बिचारीला. तो.बीटर आणि तवाही भांडी धुणाऱ्या काशीला देऊन टाकला. 

प्राजू: चांगलीच फजिती झाली हो आजोबा तुमची. आजोबा,तुम्ही मश्चीफ्राय खाल्लय का ओ कधी?

आजोबा: कुणाला सांगू नको हां प्राजू. पुर्वी नोकरी लागली तेंव्हा परळला चाळीत भाड्याने रहायचो मी. तिथे एक  साठम म्हणून ग्रुहस्थ बाजूला रहायचे. त्यांची पत्नी फार पुर्वीच देवाघरी गेली होती. लेक होती त्यांना..सुषमा नावाची. माझ्यापेक्षा वयाने सहासात वर्षाने लहान होती. गोरीपान,दोन लांबलचक वेण्या अशा पुढे घ्यायची. फुलाफुलांचं परकरपोलकं घालायची. मी आपला वरणभात,आमटीभात करायचो पण कोळीण ओट्यावर आली की ते फडफडीत पापलेट,हलवे पाहून मला खावसं वाटायचं. 

सुषमाच्या घरी मी तिच्या बाबांसोबत बुद्धीबळ खेळायला जायचो तेव्हा सुषमा माशांच्या तळलेल्या तुकड्या व लालभडक सार हळूच माझ्या स्वैंपाकघराच्या ओट्यावर नेऊन ठेवायची. सुगरणच होती सुषमा. मला फार आवडायची. तिलाही मी आवडायचो बहुतेक पण दोघंही नेभळट. तिच्या लग्नात सरबतं वाटायला मीच होतो. पण तेही प्रेम नव्हतच गं. पुढे मला ऑफिसातल्या शामल मेडमबद्दलही थोडसं काहीतरी वाटायचं. तिचं लग्न झालेलं तरीही वाटायचं. वाटण्याला कोणी काही करु शकत नाही पण मनाला आवर मात्र घालावा लागतो तरच संसार सुरळीत होतो बघ. 

प्राजू: आजोबा तुम्ही मला त्यांची पुर्ण नावं सांगाल. मी त्यांचा ट्रेस लावते फेसबुकवरून.

आजोबा: नको गं नकोच ते. माझी आपली ही सांजसावळी रुक्मिणीच बरी. 

तेवढ्यात आजी व गोट्या आले. साऱ्यांनी मिळून चहाचा आस्वाद घेतला. प्राजूचंही मन हलकं झालं होतं व आजोबांनाही जुन्या आठवणी शेअर केल्याने खूप बरं वाटत होतं.

-------सौ.गीता गजानन गरुड.