स्माईल प्लिज

This is a short article kind of story of a women Sanjana. She is a working women and her maid is on holiday. So she has to do much household work and also she needs to go to office on time. She prepares tiffin for her husband and for herself and her

"ह्या कमलाला पण आजच सुट्टी घ्यायची होती का?", संजना स्वतः शीच पुटपुटली.

तिने डाव्या हाताने तिचे केस कानामागे लोटले व ती भाजी एकजीव करू लागली. सर्वेशला उशीर होऊ लागला होता. तो टिफिनची वाट बघत किचनच्या दरवाज्यात उभा होता. कमलाने तिला पूर्वकल्पना पण दिली नव्हती. नाहीतर ती निदान लवकर तरी उठली असती.

तिने पटपट टिफिन तयार करून सर्वेशच्या हाती दिला. तो लगेच निघून गेला. एक काम तर झालं. तिने स्वतःचा टिफिन भरला व शशांक चा पण भरला. नंतर ती तिची बॅग रेडी करू लागली. एक क्षण सुद्धा तिला मोकळीक नव्हती. तिला शशांक ला शाळेत पण सोडायचं होतं. तिने शशांक ला आवाज दिला.

ती म्हणाली, "शशांक, चल लवकर. शाळेत जायला उशीर झाला तर मॅडम रागावतील."

शशांक त्याचा टाय हातात घेऊन तिच्याजवळ आला. तिने दीर्घ श्वास घेतला व त्याचा टाय बांधू लागली. तिला जाणवलं की त्याचा चेहरा पडलेला होता.

तिने विचारलं, "काय झालं? होमवर्क पूर्ण नाही झाला का?"

तो हळू आवाजात म्हणाला, " झाला पूर्ण. "

तिला त्याच्या आवाजावरून व हावभावावरून जाणवलं की नक्कीच काहीतरी घडलं आहे.

तिने विचारलं, "कुणाशी भांडण झालं का?"

तो उत्तरला, "नाही."

नंतर तो खोकला. तिला जाणवलं की याला तर कफ झाला आहे. तिने त्याच्या डोक्याला हात लावला. थोडंसं गरम होतं त्याचं डोकं. तिला कळलं की याला तर ताप आहे.

ती म्हणाली, "तुला सांगितलं होतं ना बाहेरचं काही खाऊ नकोस. पैसे कुणी दिले? आजीने दिले असतील!"

त्याची आजी म्हणाली, "नाही मी नाही दिले."

ती म्हणाली, "बरं जाऊद्या. एक काम करता का? याला डॉक्टर कडे घेऊन जा ना प्लिज."

आजी म्हणाली, "अगं तूच जा ना. मला ते गोळ्या वगैरे कळणार नाही."

तिने घड्याळमध्ये बघितलं, तिला उशीर तर होणारच होता आज. ती शशांक ला डॉक्टर कडे घेऊन गेली. तिथे खूप गर्दी होती. ती हताश झाली होती. तिला चिडचिड होऊ लागली. ती सारखं घड्याळ बघू लागली. आज नक्की तिला बॉस कडून बोलणे ऐकावे लागणार होते.

ती चेहरा पाडून बसलेली होती. आजचा पूर्ण दिवस खराब गेला, ती स्वतः लाच म्हणाली. तेवढ्यात एक स्त्री एका लहान चिमुकल्या बरोबर येऊन तिच्या समोर बसली. संजनाची नजर त्या चिमुकल्यावर पडली. किती गोड हसत होता तो! तो तिच्याकडे बघू लागला. ती पण त्याला बघून हसली. ती अवाक झाली जेव्हा तिला जाणवलं की सकाळपासून झालेली चिडचिड, थकवा ती एका क्षणात विसरून गेली होती. तेही फक्त एका गोड हास्यामुळे. खरंच लहान मुलं सगळ्यांना उगाच नाही आवडत.

तिला एक कल्पना सुचली. ती नेहमी घाईत असायची. बऱ्याच वेळा कंटाळलेली, रागात, चिडलेली असायची. नाहीतरी कुणाला बोलतांना तिचा चेहरा स्थिर व गंभीरच असायचा. तिने ठरवलं की प्रत्येक व्यक्तीला हसून बोलून बघायचं. बघुत काय घडतं ते.

तिचा नंबर आला. ती शशांक ला घेऊन आत गेली. त्यांनी त्याला तपासलं व गोळ्या लिहून दिल्या.

ती हसून डॉक्टर ला म्हणाली, "थँक यु डॉक्टर."

डॉक्टर पण हसून म्हणाले, "काळजी करू नका. नॉर्मल कफ आहे."

नंतर त्यांनी शशांक च्या डोक्यावर हात फिरवला. तिला जाणवलं की माणसाच्या हावभावांचा समोरच्यावर खूप परिणाम होतो. आपण हसून, आनंदाने बोललो की समोरच्याला पण बरं वाटतं.

तिने शशांक ला घरी सोडलं. त्याला औषध दिलं.

ती त्याला हसून म्हणाली, "काळजी करू नकोस. लगेच बरा होशील. आता आराम कर."

तो खुश झाला. त्याने आईच्या गालावर पप्पी दिली व तो तिला बाय म्हणू लागला. औषधांचा परिणाम व्हायच्या अगोदरच तिच्या शब्दांनीच त्याला बरं वाटू लागलं.

ती ऑफिसमध्ये पोहोचली. तिला बराच उशीर झाला होता. बॉस तिच्या समोर उभी राहिली.

ती म्हणाली, "सॉरी मॅडम. मुलगा अचानक आजारी पडला होता."

बॉस म्हणाली," बरं ठीक आहे. "

ती हसून म्हणाली, " थँक्यू मॅडम. "

तिचं हास्य बघून बॉसच्या चेहऱ्यावर पण हास्य आलं. त्यांनी मुलाबद्दल विचारपूस केली. बॉसला असं बोलतांना ती खूप दिवसांनंतर बघत होती.

ती घरी परतली. शशांक हसू- खेळू लागला होता. तिने दूध गॅसवर चढवलं होतं. ती दुधाकडे बघत होती. तेवढ्यात शशांक ची आजी तेथे आली.

तिने हसून विचारलं, " त्रास तर नाही दिला ना याने तुम्हाला. "

आजी हसून म्हणाल्या, "नाही. कमलाने स्वयंपाक बनवला आहे. तू दूध राहूदे. तिने सकाळपुरतीच सुट्टी घेतली होती. तू आणि सर्वेश जेवून घ्या."

शशांक झोपला होता. सर्वांचं जेवण आटोपलं होतं. सर्वेश घराला कुलूप वगैरे लावून रूममध्ये आला.

तिने हसून विचारलं, "भाजी चांगली झाली होती ना?"

तो म्हणाला, "हो. छान होती."

नंतर तो तिच्या जवळ आला. तिच्या गालावर त्याने हात ठेवला.

तो म्हणाला, "आज खूप पळापळ झाली ना तुझी! झोप तू."

एरवी कधीही असं न बोलणाऱ्या सर्वेशला तिची इतकी काळजी करतांना बघून तिच्या मनात हसू फुललं. त्याने शशांकच्या डोक्यावर हात फिरवला व नंतर तिच्याकडे वळला.

तो म्हणाला, "गुड नाईट."

ती पण म्हणाली, "गुड नाईट."

तुम्हीही ट्राय करून बघा. कदाचित एवढे त्वरित परिणाम नाहीत दिसणार. पण हळूहळू फरक नक्की जाणवेल.

आवडल्यास share नक्की करा.

©Akash Gadhave