समाधानाचे हास्य ..

एका जिद्दी स्त्रीची कहाणी


कथेचे नाव : समाधानाचे हास्य..

विषय : आणि ती हसली

राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा


"बघावं तेव्हा तू आपली घाईतच, कधीतरी वेळ काढ स्वतःसाठी," घाईघाईत निघालेल्या वंदनाला प्रमिलाताईंनी हटकले.

"लक्षात आहे माझ्या मंडळाच्या सभासत्वाचं, थोडी सवड मिळाली की फॉर्म आणि पैसे घेवून येते" आपल्याला प्रमिलाताईंनी कशाकरिता थांबवलं हे लक्षात येताच वंदना म्हणाली.

हिला कधीच वेळ मिळणार नाही आणि ही काही येणार नाही अस पुटपुटत प्रमिलाताईंनी वंदनाला निरोप दिला.

मुलं लहान आहेत, त्यांच्या परीक्षा, अभ्यास, घरचं सगळं, अगणित काम वाट पहात आहेत माझी...सध्या बिलकुल जमायचं नाही मंडळ बिंडळ असं मनातल्या मनात म्हणत वंदना घरी आली.

वंदनाच्या शेजारणी, पाजारणी, सोसायटीतील मैत्रिणींनी मिळून समस्त महिला वर्गाला थोडा विरंगुळा मिळावा म्हणून सुयोग महिला मंडळ स्थापन केलं होत, हळदीकुंकू, कोजागिरी, भोंडला, वर्षाकाठी एक दोनदा सहल, अंगतपंगत असे अनेक कार्यक्रम या मंडळामध्ये केले जात. प्रमिलाताई या मंडळाच्या अध्यक्षा होत्या. घरसंसार, नोकरी सगळ्या आघाड्या समर्थपणे सांभाळताना वंदनाची होणारी धावपळ प्रमिलाताई गेली कित्येक वर्ष अगदी जवळून बघत होत्या आणि म्हणूनचं कधीतरी तिने स्वतःसाठी वेळ काढावा असे त्यांना मनापासून वाटे आणि त्या मंडळात येण्याबद्दल तिच्या मागे लागत.

पण वंदनाला मंडळात जाणे फारसे पटत नसे, तिला तिथे जाणे निव्वळ टाईमपास, वेळ वाया घालवणे वाटे. एवढ्या वेळात स्वयंपाक होईल, उद्याच्या डब्याची तयारी करता येईल म्हणत वंदना जायला टाळाटाळ करत असे.

लहानपणा पासूनच वंदनाला कामाचा भारी सोस, जेव्हा तिच्या बरोबरीच्या मुली खेळत असत तेव्हा ती शाळा, अभ्यास सांभाळून आईला घरकामात मदत करत असे.

पुढे लग्न झाल्यावर मोठी सून म्हणून सगळी जवाबदारी तिच्या अंगावर पडली, सणवार, कुलाचार सगळं करावे लागत असे. जावा मदतीला येत, हौशीने करत पण वंदनाला कोणी काही केलेलं पटत नसे, कोथिंबीर बारीक चिरावी, कणीक घट्ट मळू नये ती सारख्या सूचना देत असे, अगदी कपडे वाळत घालताना सुरकुती सुद्धा तीला चालत नसे. वंदना वहिनींना आपलं काम रुचत नाही, जावांच्या लक्षात येऊ लागले मग त्या कामाला हात लावेनाश्या झाल्या. पण वंदनाने कधीच तक्रार केली नाही, ती सगळ्यांचं सगळ तितक्याच प्रेमाने करत गेली.

ऑफिस सुटल्यावर मैत्रिणी खरेदी करत रेंगाळायच्या पण वंदना पटकन बाजारहाट करत घर गाठायची कारण साफसफाई, झाडलोट, हे धू, ते पूस, एक झालं की दुसरं कामांची यादी तिची तयार असायची.

"घर, ऑफिस सगळं सांभाळून तुझी दमछाक होते, बाई ठेव वरकामासाठी वंदना" मिस्टर तीला नेहमी म्हणत.

"कोण सहन करेल कामवाल्यांचे नखरे" म्हणत ती सगळंकाही स्वतःच निभावून नेत होती.

तिची अतिस्वच्छ्ता, टापटीप, नीटनेटकेपणा याची चर्चा फार रंगायची, कधी कौतुक तर कधी कमालीची टीका वाट्याला यायची, घरच्यांनाही तिचा हा स्वभाव फारसा आवडायचा नाही, पण कोण काय म्हणत आहे याकडे दुर्लक्ष करत ती आपल तेच खरं करायची.

या सगळ्या अट्टाहासात दिवस कधी उजाडतो, कधी मावळतो तीला कळायचं नाही, आपलं आयुष्य एकसुरी, घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावत आहे हे तिच्या लक्षात यायचं नाही.

मधल्या काळात बरीच स्थित्यंतर आली, पूलाखालून बरचं पाणी गेलं, वंदना रिटायर्ड झाली, मुलं शिकून सवरून मोठी झाली, नोकरीला लागली, लेक दिल्या घरी सुखाने नांदत होती, सूनबाई घरी आली होती. नातवंडं मांडीवर खेळत होती, वंदनाच्या मिस्टरांच अल्पशा आजाराने निधन झालं होत. ती पण आता वयोमानाने थकली होती, सांधेदुखी मागे लागली होती, सगळं स्वतःच करायचा अट्टाहास कायम असला तरी पूर्वीसारखी कामं होत नव्हती, शरीर साथ देत नव्हतं, तब्येतीच्या छोटया मोठया तक्रारी सुरू झाल्या होत्या.

एक ठराविक वय असतं, तरुण सळसळत रक्त असतं स्वतः काहीतरी करावसं वाटण्याचं, वय उलटून गेल्यावर आता काही करावसं तिला वाटत नव्हतं. वेळ नाही, वेळ नाही म्हणून सतत कुरकुरणाऱ्या वंदनाकडे आता वेळच वेळ होता पण पूर्वीचा उत्साह राहिला नव्हता...आता तिला कितीही कामं केली तरी कधीच न संपणारी, हे प्रमिलाताईंच बोलणं आठवू लागलं होतं, आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगलो, स्वतःसाठी जगणं राहूनच गेलं उमगू लागलं‌ होत.

इतक्या वर्षात कधीच कुठे न गेलेल्या, निवांतपणे कुठेच न रहीलेल्या वंदनाला तीची लहान बहीण "रहा ताई महिनाभर माझ्याकडे म्हणत"आपल्या गावी कोकणात घेवून गेली. पण प्रवासाचा क्षीण सहन न झालेली वंदना तिकडे लगेचच आजारी पडली, , दुसऱ्याच्या घरी जाऊन आजारी पडलो, त्यांना आपलं करावं लागतं यामुळे संकोचली. सुनेला, मुलाला धावत पळत गाडी घेवून यावं लागलं म्हणून ओशाळली. कुठे जाणं येणं झेपत नाही, जे के काही व्हायचं‌ ते माझ्या मठीतच होवू दे म्हणत वंदनाने घरबाहेर पडण बंद केलं.

सुनेने वंदनाची देखभाल करण्यासाठी, सगळ्या कामांसाठी बाई लावली, तिला काय हवं, नको ते सगळेजण बघत होते, प्रेमाने तिचं करत होते, पण कितीही झालं तरी सगळे आपल्या विश्वात व्यस्त. सारखा टिव्ही पाहून वंदनाला कंटाळा यायचा, दृष्टी अधू झाल्यामुळे वाचन फारसं करता येत नव्हतं, खूप काहीतरी हातातून सुटून गेलं आहे जाणवत होत, पण काही उपयोग नव्हता.

एक दिवस अशीच विचारांच्या तंद्रीत वंदना बसली असताना, "मला जमेल असं वाटतं नाही, चिनूची परीक्षा, सासूबाई आजारी...पुढच्या वेळी नक्की ट्राय करेन" असे काहीसे संवाद तिच्या कानावर पडले.

वंदनाने सुनेला श्रध्दाला बोलवत "काय झाले ? कोणाशी बोलत होतीस" विचारले.

"आई, आम्हा शाळा, कॉलेज मधील मैत्रिणींची बऱ्याच वर्षापासून भेट नाही, तेव्हा सगळ्यांजणी दोन दिवस पिकनिकला जाऊया, भेटूया असं म्हणत होत्या. पण मला जमणार नाही मी सांगून टाकलं."

"तुला जावंस वाटतं ना" वंदनाने तिला विचारले.

"पण तुम्हाला बरं नसताना" श्रद्धा पुटपुटली.

"पण बिण काही नाही, मी ठीक आहे आणि फक्त दोन दिवसांचा तर प्रश्न आहे, बाई आहेच सगळ्या कामांना, काही लागलं तर ऑर्डर करू, सुनील नव्हता गेला मला बरं नसताना चार दिवस गोव्याला, त्याच्या मित्रांबरोबर, तेव्हा तू सांभाळलं ना सगळं, आता तो बघेल, वेळ निघून जायच्या आत वेळ काढ स्वतःसाठी" वंदनाने सुनेला समजावलं.

सासूबाईंनी ग्रीन सिग्नल दिल्यावर श्रद्धाने मी येत आहे मैत्रिणींना लगेचच कळवलं व उत्साहाने तयारीला लागली.

घरसंसार, चुलमूल, कामंधामं या पलिकडचं जग बघायला निघलेल्या, काही काळ स्वतःसाठी जगायचं ठरवलेल्या, जे आपल्याला जमलं नाही ते करायला निघालेल्या आपल्या सुनेला आशीर्वाद देताना आज वंदना खूप दिवसांनी अगदी मनापासून हसली.

आपली अपूर्ण स्वप्न आपल्या सुनेमार्फत पूर्ण होणार या कल्पनेने तिच्या चेहऱ्यावर अनोखे समाधानाचे हास्य विराजले.



©️®️मृणाल महेश शिंपी.
09.08.2022.

ठाणे विभाग.