स्माईल प्लीज ( भाग तिसरा )

संसार सुखाचा होण्यासाठी गरज संवादाची असते आणि संवादा साठी शब्दांची गरज असतेच असं नाही.


स्माईल प्लीज....( भाग तिसरा  )

विषय: नातीगोती

आईने जे सांगितलं ते जरी हादरवून टाकणार असलं तरी मला त्यात माधवीची काही चुकी आहे असं वाटेना.
काय तर म्हणे लहानपणीच माधवी वरती कोणीतरी एका दुष्ट माणसाने बलात्कार केला होता. तो माणूस एवढा मोठा गुंड होता की त्याच्याविरुद्ध तक्रार करायची सुद्धा कोणाला हिम्मत नव्हती. मग सर्वसामान्य माणूस जे करतो तेच माधवीच्या आई-वडिलांनी केलं. माधवीला त्या माणसाला धडा शिकवण्याच्या ऐवजी, त्याच्याविषयी तक्रार करण्याच्या ऐवजी, माधवीलाच तिच्या मामांकडे राहायला पाठवून दिल गेल. बिचारी माधवी, तिच्या मनाचा कोणीच विचार केला नाही. एक तर कोवळ्या वयात झालेला हा शारीरिक आघात. त्यात आई-वडिलांपासून दूर राहण्याची शिक्षा. एकच प्रश्न तिच्या मनात नेहमी निर्माण होते असे की, यात तिची काय चुकी होती. पण बाहेरच्या जगाला तिच्यासारख्या सामान्य मुलीच्या मनाचा विचार करण्याची अजिबात गरज नव्हती. माधवीचे अश्रू असेच सुकून गेले. इतकच काय ती चांगली नाही हे सगळ्यांच्या मनात बिंबवलं गेलं.

" आई ,तुझे सांगतेस त्यात माधवीची काही चूक आहे असं मला अजिबात वाटत नाही. अजूनही माझा निश्चय तोच आहे की मी लग्न करीन तर माधवीशीच करीन."
माझं बोलणं ऐकल्यावर तिने स्वतःच्या कपाळावर बुक्क्या मारून घेतल्या.

त्यानंतर तिने अशी गोष्ट सांगितली की तिला वाटलं ते ऐकल्यानंतर मी कदाचित माधवीशी लग्न करण्याचा विचार कायमचा सोडून देईल. ती म्हणाली,

" मुर्खा तुला माहित आहे का माधवी जन्मजात मुकी आहे. तिला बोलता येत नाही."

एक क्षणभर मला देखील धक्का बसला. पण मी लगेच स्वतःला सावरलं. विचार केला आपला व्यवसाय आणि माधवीचे कला अशी आहे की जिथे शब्दांची गरजच नसते. आता राहिला प्रश्न संसाराचा. जर संसारात शब्दापासून संवाद घडत असेल तर, वाद कधी होणारच नाही. आपले जीवन फक्त रंगांनी आणि चित्रांनीच रंगून जाईल. तयापेक्षा अजून काय हवे असते मी माझ्या मतावर थांब राहील ठाम राहिलो ठाम

आठ दिवस असेच ताण-तणावात गेले. आईने तर अन्नाचा देखील त्याग केला होता. शेवटी माझ्या  हट्टा पुढे तिला झुकावे लागले. नंतर माझे आई-वडील माधवीच्या घरी गेले. बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली. तिच्या वडिलांनी देखील मला स्पष्ट कल्पना दिली.

" बाळ, माझी मुलगी म्हणून नाही सांगत. ती अतिशय गुणी मुलगी आहे. पण तुला तिच्या पेक्षा चांगली मुलगी नक्की मिळेल. पुन्हा विचार कर." पण तरीही माझा निश्चय ढळला नाही.

शेवटी दोघी घरांचा नाईलाज झाला. आता खरा प्रश्न राहिला होता माधवीच्या होकाराचा. तिचंही मत विचारात घेणं आवश्यक होतं.

आणि एक दिवस मी सकाळी लवकर जागा झालो आणि माझी नजर सवयीने अंगणात गेली आणि बघतो तर काय, माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

समोरचं अंगण झाडल गेलेलं होतं. सडा टाकला गेलेला होता आणि त्या ओल्या अंगणात जिच्या दर्शनाला मी तडफडत होतो ती माधवी मोरपिशी रंगाची सप्तरंगी रांगोळी काढत होती.

कितीतरी वेळ मी ते दृश्य अनिमिष नेत्रांनी बघत होतो. डोळयात साठवून घेत होतो.

*****

आज या गोष्टीला कितीतरी वर्ष झाली. माझा आणि माधवीचा संसार गुण्या गोविंदाने सुरु आहे. मी फोटोग्राफर ती चित्रकार त्या मुळे आम्हाला कधी ना व्यवसायात ना संसारात शब्दांची गरज लागली.

कधी कधी शब्दांची उणीव भासते. पण माधवी ती उणीव तिच्या वेड लावणाऱ्या हसण्याने भरून काढते. तेंव्हा मी तिचे असंख्य फोटो काढतो, तेही स्माईल प्लीज न म्हणता. ईतकी ती हसत असते.

(समाप्त)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all