स्माईल प्लीज ( भाग दुसरा )

संसार सुखाचा होण्यासाठी गरज संवादाची असते आणि संवादा साठी शब्दांची गरज असतेच असं नाही.


स्माईल प्लीज....( भाग दुसरा  )

विषय: नातीगोती

माधवी कुठं गेली. का गेली. तिला कोणी नेलं का ती स्वतःहुन गेली. काहीच समजल नाही. ती गेल्या नंतर मी सैरभैर होवून गेलो. मला काय झालं होतं ते मलाच कळेना. ना अभ्यासात ना कामात.कशातच मन लागत नव्हतं. नेहमी सकाळी उठल्यावर तिच्या अंगणात नजर जायची. अंगण तसचं होतं. पण आता ते कळाहीन झालं होतं. पुर्वी माधवी होती तर रोज उठल्यावर ती अंगण झाडत असे. मग सडा टाकत असे नंतर ती रांगोळी काढत असे. ह्या गोष्टी ईतक्या नेहमीच्या होत्या की ज्या दिवशी माधवी दिसत नसे त्या दिवशी काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटतं असे. आता तर ते अंगण सुनसूनं होऊन गेलं. माधवी गेल्यानंतर कोणी त्याची झाडलोट केली नाही की त्यावर रांगोळीही काढली नाही.

मी पुस्तकं तोंडासमोर धरून मधेच तिच्या घराकडे, चुकून माकून ती घरात असलीच तर नजरेला पडेल या विचाराने,  आशाळभूत पणाने बघत असे. पण आजकाल तर तिचं घर देखील जास्त वेळ उघडं राहात नसे. तिच्या घरातलं कोणीच बाहेर दिसतं नसे. त्या मुळे जास्तच चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं. पण असे किती दिवस लोटले समजलच नाही.

अर्थात आजूबाजूचे लोक काय काय बोलायचे. पण मला तेंव्हा जास्त समजत नव्हतं. माधवीच्या बाबतीत काहीतरी वाईट गोष्ट घडली आहे, त्या मुळे तिला तिच्या मामा कडे पाठवलं आहे . एव्हढच मला समजल होतं. पण माधवी वाईट वागेल या वर माझा अगदी स्वतः माधवीने सांगितलं असतं तरी विश्वास बसला नसता.

मी एकदा आईला, सहज म्हणून विचारलं की,

" आई आजकाल समोरची माधवी दिसतं नाही ग. कुठं बरं गेली असेल"

आईने माझ्याकडे रोखून पाहिलं आणि टोकदार आवाजात म्हणाली, " तुला काय करायच्या आहेत रे रिकाम्या पंचायती "

आणि मला हाकलल्या सारखं केलं. मी मुकाट्यानं बाहेर गेलो.

माधवी कुठं गेली हा प्रश्न मात्र माझ्या मनातून कधीच बाहेर गेला नाही.

माधवी कुठं असेल, काय करत असेल, आता कशी दिसतं असेल या बद्दल मला काहीच कल्पना नव्हती. बघता बघता मी पाचवीतून बारावीत गेलो. नंतर फोटोग्राफीचा डिप्लोमा करून फोटोग्राफी करायला लागलो. एक स्टुडिओ घेऊन त्याला मी छान सजवलं. बघता बघता फोटोग्राफीत माझा चांगला जमला बसला. मोठ मोठ्या ऑर्डर्स मला मिळत होत्या. माझा व्यवसाय खूप चांगला चालला होता. कारण माझा व्यवसाय आणि छंद हे दोघेही एकच होते.

आजकाल माझ्या असं लक्षात आलं होतं की घरामध्ये माझ्या लग्नाविषयी गोष्टी चालल्या असतात. आई मला आडून पाडून लग्नाविषयी विचारत असे. म्हणजे लग्न करतोस काय आणि जेव्हा मी नकार देत असे किंवा सध्या नको असं म्हणत असेल तेव्हा ती म्हणायची

" कोणी तूझ्या मनात आहे का  ? तसं असल्यास सांगून दे म्हणजे आम्हाला लग्न करून द्यायला बरं पडेल " असं मानभावी पण म्हणत असे.

तसं आज-काल व्यवसाय करणाऱ्या मराठी मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही. भले पगार कमी असो किंवा मुलगा शिपाई असो पण सरकारी नोकरीवाला असावा अशी मुलींची माफक अपेक्षा असते. त्यामुळे लग्नाच्या बाजारात माझी किंमत मला माहित होती.

पण खरी गोष्ट अशी होती मला माधवीशी लग्न करायचं होतं. एकदम आलेल्या मुलींना मी काहीतरी थातूर मातूर कारण सांगून नकार दिला. आईच्या ते लक्षात आलं आणि तिने मला मानगुटीला बसून विचारलं," नक्की तुझ्या मनात काय आहे ते सांग " आणि मी सांगितलं की ," आई, मला माधवीशीच लग्न करायचं आहे."

" तुझं प्रेम वगैरे आहे की काय तिच्यावर ? "आईने रागाने विचारले.

मी म्हणालो,"  माझं तर नक्की आहे. पण तिचं मला माहित नाही. इतकच काय, आजकाल ती कोठे आहे हे ही मला माहित नाही. पण माझं मन मला सांगतं की, ती मला नकार देणार नाही. आणि मी लग्न करेल तर फक्त माधवीशीच लग्न करेल. अन्यथा नाही." माझं निर्वाणीचं बोलणं ऐकल्यावर आईला एवढा धक्का बसला किती आजारीच पडली.

माझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला आहे असं तिला वाटलं. ती ओरडून म्हणाली," अरे जगातल्या सगळ्या मुली मेल्यात का, की तुला हीच मुलगी दिसली. मुर्खा माधवीच्या बाबतीत तुला काय माहिती तरी आहे का ? ती चांगली मुलगी नाही.  बैस इथं आणि मी काय सांगते ते ऐक " आईने मला खाली बसवलं आणि तीच बोलायला लागली.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all