भरून आलेलं आभाळ..❤️

A Poem On Nature

भरून आलेलं आभाळ...
नी शहारणारा गारवा...
डोळ्यात तुझिया रे
दिसतो मजला मारवा...


उधाणल्या सागरी
लाजरा किनारा नवा...
हसतात लाटा किनारी
तो स्पर्श तव हवा हवा...

सांज विरघळता पाण्यात
रंग मावळतीचा नारंगी चांदवा...
गगनी मनमुराद उडणारा
तो तू शुभ्र सारंग थवा...

भरलेल आभाळ अन् सोबतीस
बेभान बेधुंद ती मंद हवा...
माझ्या काळ्याभोर केसांत
दरवळणारा तूच दवणा नी तूच मरवा...

बरसणाऱ्या पावसातला
सुरेल मेघमल्हार नी बरवा...
डोळ्यांमधूनी ओघळणारा
तू थेंब टपोरा जरासा हळवा....

भरल्या आभाळास व्यक्त होण्या
छंद,वृत्त नी हृदये आर्जवा....
त्याच आभाळातून सांडलेला
तू माझ्या श्वासांतील एक काजवा.!!


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे