सीतारामम्- एक प्रेमकाव्य

प्रेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी एक अप्रतिम कलाकृती

# सीतारामम् - एक प्रेमकाव्य

©® आर्या पाटील

हळुवार स्पर्शत वाऱ्याची झुळुक मनाच्या आभाळाला भिडावी अन् एका अनामिक जाणिवेने डोळ्यांतून चिंब बरसावी आणि पुढच्याच क्षणी सुखाची सर अन् दुःखाचं ओलं ऊन यांच्या पाठशिवणीच्या खेळात प्रेमाचं इंद्रधनुष्य मनाच्या आभाळावर सजावं अशीच काहीशी जाणिव सीतारामम् हा चित्रपट पाहून आल्याशिवाय राहत नाही. चित्रपटाची कथा मनाला प्रेमाच्या अद्भूत दुनियेत घेऊन जाते.या चित्रपटाचा हिंदी रिमेकही कथेतील जिवंतपणा धरून ठेवण्यात शंभर टक्के यशस्वी ठरला आहे. 

दुलकर सलमानने साकारलेला, एक मिलिटरी ऑफिसर असलेला राम जगणं शिकवून जातो. आपण कधी राममय होऊन जातो कळतही नाही. त्याच्यावर चित्रित प्रत्येक प्रसंगाचे आपण अप्रत्यक्ष साक्षीदार बनतो. जम्मू काश्मिरच्या बर्फाच्छादित प्रदेशात देशाचे रक्षण करण्यासाठी उभा असलेल्या सैनिकाच्या रुपात तो देशाभिमान निर्माण करतो. हिंदू मुस्लिम सलोखा जपण्यासाठी प्रयत्न करणारा तो तेवढाच हळवाही करून जातो. त्याचं अनाथ असणं सिनेमाच्या अगदी वीस मिनिटांतच डोळ्यांतून अश्रू येण्यासाठी कारणीभूत ठरतं. 

मृणाल ठाकूरने साकारलेली सीतामहालक्ष्मीची एका पत्राद्वारे रामच्या आयुष्यात झालेली एण्ट्री अनोखी वाटते. आणि तिथूनच मग आपण सीता महालक्ष्मी आणि रामच्या प्रेमप्रवासाचे हळवे साक्षीदार होऊन जातो. राम सीतेची ही जोडी आपल्याला त्यांच्या प्रेमात पडायला भाग पाडते. सीतामहाक्ष्मीचे पात्र म्हणजे केवळ प्रेमपूजा वाटते. सीतेच्या आपण प्रेमात पडतो तर नूर जहाँचा आपण आदर करू लागतो. नूर जहाँ आणि सीता याचं रहस्य चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. मृणाल ठाकूरने या चित्रपटात हृदय जिंकलं आहे एवढं निश्चित.कथेतील इतर पात्रही आपलीशी होऊन आजूबाजूला वावरू लागतात.पाकिस्तानी आफ्रिनचे पात्र साकारलेली रश्मिका कधी आपलीशी वाटू लागते कळतही नाही.

ही प्रेमकथा सर्वच अनुषंगाने वेगळी ठरते.या कथेत निस्वार्थी प्रेम आहे आणि कातर करणारा विरहही.देशभक्ती, आपुलकी, प्रेम, सलोखा आणि आदर यासारख्या असंख्य गुणांनी नटलेला हा चित्रपट आपल्याला अनोख्या दुनियेत घेऊन जातो. नंतर किमान चार दिवस तरी आपण याच दुनियेचा भाग होऊन बसतो एवढं निश्चित. कोणतेही भडक दृश्य न वापरता प्रेमाची सुंदर कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे बोलके उदाहरण म्हणजे हा चित्रपट.

©® आर्या पाटील