सीता

एक विधवा गरोदर आहे. तरीही ती ठामपणे सांगते की हे मूल तिच्या पतीचे आहे. गश्मीर कस सिद्ध करेल तिचे पावित्र्य ? स्वातंत्र्य पूर्व काळातील एक कथा.

#सीता



श्रेणी : सामाजिक

" तुळस वंदावी वंदावी
माऊली संतांची सावली "

वासुदेव आपले सुंदर गीत गात रस्त्यावर चालला होता. तो स्वतःतच मग्न होता. एक इंग्रज तरुणी आणि पश्चिमात्य कपडे घातलेला भारतीय तरुण त्या वासुदेवाला दुरूनच बघत होते. दोघेही घोड्याखालून उतरले. ती इंग्रज तरुणी मुद्दामच वासूदेवापाशी गेली.

" कशी दिसत आहे मी ?" मोडक्या तोडक्या मराठीत ती इंग्रज तरुणी म्हणली.

वासुदेवाने एक स्मितहास्य दिले.

" खूप सुंदर माऊली. " वासुदेव म्हणला.

मग ती तरुणी त्या तरुणाकडे वळली.

" हे बघ. त्याने मला सुंदर म्हणले. " ती डोळा मारत म्हणाली.

" त्याने माऊली पण म्हणले. माऊली म्हणजे मदर !" तो तरूण हसला.

ती अवाक झाली. आजवर तिच्या सौंदर्याला भुलून तिचे कौतुक करणारे खूप बघितले पण तिच्यात आई शोधणारा पहिल्यांदाच कुणीतरी तिने बघितला होता.
तो तरुण दिसायला कुस्ती पहिलवान वाटत होता. बोलण्यावरून उच्चशिक्षित भासत होता. त्याचे नाव गश्मीर आणि त्या तरुणीचे नाव जेली होते.

" गावात एवढी सामसूम ?" गश्मीरने विचारले.

" एक सीता अग्निपरीक्षा देत आहे. तोच तमाशा बघायला गेलेत लोक. " वासुदेव म्हणाला.
◆◆◆
गावाच्या मधोमध असलेल्या वडाच्या झाडाखाली लोक जमा होत होती. सर्वत्र कुजबुज सुरू होती. काही म्हातारे आणि वृद्ध व्यक्ती डोक्यावर गुलाबी फेटे आणि हातात लाकडी काठी घेऊन झाडाच्या सावलीखाली कट्ट्यावर बसली. थोड्या वेळाने एका स्त्रीला हजर केले गेले. स्त्री नव्हे नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले फुल होते ते ! वय अठरा-वीस असावे. लाल सोवळे नेसले होते. रडून रडून कमळाच्या पाकळीप्रमाणे असलेले डोळे सुजले होते. तिचे सासुसासरे मान खाली टाकून उभे होते. निवाड्याला सुरुवात झाली.

" नाव काय ?" एका पंचाने विचारले.

" सीता !" ती हुंदके देत म्हणाली.

" नाव सीता आणि लक्षणे शूर्पणखा !" कुणीतरी म्हणले.

सर्वजण हसले.

" हिच्यासोबत जे करायचे ते करा पण आमच्या कुटुंबावर बहिष्कार नको. " सीताचा सासरा हात जोडून विनवणी करू लागला.

" बोल. कुणाचे पातक पोटात घेऊन फिरत आहेस ?" दुसऱ्या पंचाने विचारले.

" हे पातक नाही. माझ्या पतीचा अंश आहे. " सीता ठामपणे म्हणली.

" तुझा पती लग्न झाल्यावर दोनच दिवसात गेला पांढऱ्या पायाची. आधी माझा मुलगा गिळला आणि पूर्ण घराण्याची इज्जत चव्हाट्यावर आणली. " सीतेची सासू दात खात आणि बोटे मोडत म्हणली.

पंच एकमेकांशी चर्चा करू लागले.

" आपल्या पुराणात विधवांनी देवकार्यात मन रमवावे असे लिहिले आहे. पण ही सीता नावाची विधवा हिने घोर पातक केले आहे. मी या गावचा प्रमुख असल्याचा नात्याने हिला मरेपर्यंत चाबकाचे फटके देण्याची सजा सुनावतो कारण हिचा आक्रोश पाहून आपल्या कुलीन बायका स्वप्नात पण असली कामे करण्याचा विचार करणार नाहीत. " एकजण रागात म्हणाला.

काही तरूण चाबूक घेऊन आले. सीतेने कितीतरी शपथा घेतल्या. पण व्यर्थ ! एकजण सीतेला चाबूक मारायला पुढे सरसावला. तो चाबूक मारणार तोच कुणीतरी तो चाबुक पकडला.

" खबरदार कुणी पुढे आलात तर !" तो तरुण भारदस्त आवाजात म्हणला. तो तरुण गश्मीरच होता.

" तू कोण ? आमचे गाव , आमचे राज्य !" एक वृद्ध पंच खोकलत म्हणाला.

" मोगलाई संपली आजोबा. आता इंग्रजांचे राज्य आहे. कोर्टात न्यायनिवाडा होतो. " गश्मीर म्हणला.

" हटवा याला. अस तर नाही सीतेचा प्रियकर तूच आहेस ?" एकजण म्हणला.

सर्वजण हसले.

" हे गाव ज्या संस्थानात आहे त्या संस्थानाचा युवराज भगवानराव यांचा मित्र आहे मी. माझ्या किंवा हीच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा. " गश्मीर म्हणला.

गश्मीर सीताकडे वळला पण ती फार घाबरलेली होती. बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. लोक मात्र आरडाओरडा करू लागले. त्यांना फक्त सीतेचा मृत्यू हवा होता.

" मला तीन दिवस द्या. मी सीताला निर्दोष सिद्ध करतो. मग तुम्ही जे कराल ते मला मान्य असेल. " गश्मीर म्हणला.

गश्मीरने प्रकरणाची चौकशी केली. सीताला दुसऱ्या गावात असलेल्या एका मित्राच्या घरी नेले. तिला पाणी पाजवले. जेली पण सोबत होती.

" सीता , मला तुझा भाऊ समज. काय घडले ते खरखर सांग. " गश्मीर म्हणला.

" हे बाळ माझ्या नवऱ्याचेच आहे. मी अधर्म नाही केला. " सीता म्हणली.

" पण तुझा नवरा तर खूप वर्षांपूर्वीच गतप्राण झालाय ना. मग ?" गश्मीर म्हणला.

" मी नाही सांगू शकत काही पण मी पाप नाही केले हे खरे. "

जेलीने डोक्याला हात मारला. खिडकीतून जेलीला दोन कुत्रे संभोग करताना दिसले. जेली सीताला खिडकीकडे घेऊन गेली.

" हे बघ ! कुणी अस केले आहे तुझ्यासोबत ? कुण्या पुरुषाने तुला स्पर्श केला होता ?" जेलीने स्पष्टपणे विचारले.

" शी. कसले घाण बोलताय तुम्ही ?" सीता कसमूसे तोंड करते.

गश्मीरला कळून चुकले की सीतेकडून काही समजणार नाही. त्याने संस्थानाचा युवराज असलेल्या मित्राशी संपर्क केला आणि दोन राजसैनिक घेऊन तो परत सीताच्या गावात आला.
सर्वप्रथम त्याने सीताच्या कुटूंबाशी चर्चा केली.

" मला तीन मुले आहेत. त्यातले दोन तर निपुत्रिकच गतप्राण झाले. आता हा तिसराच उरलाय. घरात दोन विधवा होत्या. सीताने तोंड काळ केले. " सीताची सासू रडत म्हणली.

नऊ वर्षाचा मुलगा बाजूला बसून ऐकत होता. त्याचे नाव यशवंत होते.

" तुम्ही त्या पांढऱ्या पायाच्या बाईच्या नादाला लागू नका. " सीतेचे सासरे म्हणाले.

" सीतेची दुसरी विधवा जाऊ कुठेय ?" गश्मीरने विचारले.

" आम्ही परपुरुषांना सुनांसमोर येऊ देत नाही. " सासू म्हणली.

" मला सीतेची खोली तपासायची आहे !" गश्मीर म्हणला.

" यशवंत , घेऊन जा यांना. पण आधी यमुनाला बाहेर काढ. " सासूबाई म्हणली.

गश्मीर यशवंतसोबत गेला. यमुनाला दुसऱ्या खोलीत नेले गेले. यमुना पण सीतेइतकीच देखणी पण थोडी वयस्कर होती. असो. गश्मीरने सीतेची खोली तपासली. तिथे फारसे सामान नव्हते. फक्त एक पांढरी धोतर सापडली. सासूबाईंना विचारल्यावर गश्मीरला कळले की ती धोतर सीतेच्या मृत पतीची होती. आजूबाजूला चौकशी केल्यावर गश्मीरला अजून काही गोष्टी समजल्या. सीता असो वा तिची मोठी जाऊ यमुना दोघींना पतीचा सहवास कधीच लाभला नाही. दोघींचेही बालविवाह झाले होते. लग्न झाल्यावर दोघींचेही पती आजारपणात गेले. गश्मीर एका कागदावर सर्व गोष्टी रेखाटत होता.

" काही समजले ?" जेलीने विचारले.

" सीता विधवा आहे. तिची जवळची मैत्रीण मोठी जाऊ यमुना असावी. तिच काहीतरी सांगू शकते. " गश्मीर कागदावर गोलाकार आकृती काढत म्हणला.

रात्रीची भयाण शांतता होती. उसाच्या शेताजवळ असलेल्या खोल विहिरीपाशी एक लाल सोवळे नसून बाई चालत आली. तिने काही काळ वाट पाहिली. मग एक तरुण आला. त्या बाईने त्या तरुणाला घट्ट मिठी मारली. त्या बाईच्या हातात गाठोडे होते.

" चल बळवंत. पळून जाऊ शहरात. तिथेच थाटू नवा संसार. " ती बाई म्हणाली.

तो तरुण म्हणजेच बळवंत हसू लागला.

" मी तूझ्यासारख्या विधवेसोबत संसार थाटू ? थोबाड बघ आरश्यात. अग माझा डोळा तर तुझ्या छोट्या जावेवर होता. त्या सीतावर. मीच होतो त्या रात्री तिच्यासोबत. माझे काम संपले. आता मी एकटाच चाललो शहरात ?"

" तू फसवले मला ?" ती बाई म्हणजेच यमुना रडत म्हणली.

" हो. काय करशील ?" बळवंत हसत म्हणला.

यमुनाने रागात बळवंतचा गळा पकडला. इतका जोरात की त्याला श्वासही घेता येईना. जणू आयुष्यभराचे दुःख त्या हातात एकवटले आणि तो फास सुटेनासा झाला. मागून हे बोलणे ऐकत असलेला कुणीतरी धावत येत होता. पण तोपर्यंत जवळच्या विहिरीत यमुनाने बळवंतला ढकलले होते. पोहता न येणाऱ्या बळवंतने तिथेच प्राण सोडला. यमुना रडू लागली. मागे गश्मीर उभा होता.

" तुमच्या दिराने खूपदा तुम्हाला घराबाहेर पडताना बघितले होते पण तुम्हाला त्रास नको म्हणून कुणाला सांगितले नाही. तो खेळत असताना जेलीने त्याला विचारले होते. आता तुम्ही सत्य सांगा. " गश्मीर म्हणला.

यमुनाने सर्व सत्य सांगितले.

" मी बालविधवा होते. जसजसे वय वाढू लागले तसतसे माझ्यातल्या सुप्त इच्छा उफाळून येऊ लागल्या. मला पण नवऱ्याचे प्रेम हवे होते. पुरूषी स्पर्श हवा होता. बळवंत मुंबईहून आला होता. त्याला माझी गरज समजली. आमच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. रोज रात्री याच उसाच्या शेतात मी त्याच्या मिठीत शिरायचे. मी पुन्हा डोळ्यात स्वप्न सजवू लागली. मला पण संसार थाटायचा होता. एकदिवस बळवंत म्हणाला की त्याच्या एका भावाला माझ्या जाऊबाईसोबत रात्र घालवायची आहे. मी आधी खूप विरोध केला पण माझा स्वार्थ आडवा आला. जर हे काम झाले तर बळवंत मला पळवून शहरात नेणार होता. तिथे म्हणे असे विवाह होतात. म्हणून शेवटी मी राजी झाले. सीता खूपच भोळी होती. तिलापण पुरूषी स्पर्शाची ओढ जाणवू लागली पण ती त्या भावनांकडे दुर्लक्ष करत. मी तिच्या देहाची आस ओळखली. तिला सांगितले की ज्या पतींना पत्नीचा सहवास लाभत नाही त्यांचे आत्मे अतृप्त भटकत राहतात. जर तिचे आणि तिच्या पतीचे मिलन झाले तर आत्मा मुक्त होईल असे खोटेच सांगितले. पतीचा स्पर्श होणार म्हणून ती खुश झाली. मी तिला खोटाच विधी सांगितला. तिला मृत पतीचे वस्त्र सोबत घ्यायला सांगितले. डोळ्यावर काळी पट्टी बांधायला सांगितली. त्या रात्री खोलीची खिडकी उघडी होती. सीता पट्टी बांधून ती धोतर जवळ घेऊन मी सांगितलेले खोटे मंत्र उच्चारू लागली. खिडकीतून बळवंत आला आणि दोघात समागम झाला. मी दरवाजाबाहेरच होते रात्रभर. तिचे ते आवाज ऐकून मला पण वाटले की मी पण भविष्यात हेच सुख अनुभवेल. मी पण विरघळणार कुणाच्यातरी मर्दानी मिठीत. आम्हा विधवांचे वैधव्य महाकठीण. थंड पाण्याने आंघोळ करा. साधे जेवा. जेवणात मीठ नको की साखर. गोडधोड चालत नाही. सणावाराला बाहेर पडणे नाही. त्या हलकट इंग्रजांनी सती जाणे पण बंद केले. मी पण एकदाची होरपळून निघाले असते त्या आगीत आयुष्यभर दुःखाच्या आगीत होरपळण्यापेक्षा ! केस खूप प्रिय असतात बाईला पण केस कापून कुरूप केल जात विधवांना. पुरूषांना नाही कळायचे हे दुःख. त्यांच्या वासनेसाठी असतात की कुंटनखाने. आमचे काय ? आम्ही तरमळत बसू आयुष्यभर अश्या नवऱ्यासाठी ज्याचा चेहरा पण नीट बघितला नाही. " यमुना म्हणली.

" तू चूक केलीस. उद्या सर्वांसमोर तुझा गुन्हा कबूल कर. आता चल मी तुला घरी सोडतो. " गश्मीर म्हणला.

गश्मीर मागे वळून जाऊ लागला.

" सीतेला नका सांगू हे सर्व. परपुरुषाने तिला स्पर्श केलाय हे ऐकूनच मरून जाईल ती. माझे पाप खूप मोठे आहेत. पाप केले मी की स्वतःचा विचार केला. पाप केले मी की विधवा असून पुरुषाला स्पर्श केला. या पापाची शिक्षा मलाच द्यावी लागेल स्वतःला. सोन्याला फुंकर मारून आकार द्यावा लागतो पण लोखंडाला मार खावा लागतो. " यमुना म्हणली.

गश्मीर परत वळला तर यमुनाने उडी मारून विहिरीत प्राण सोडले. गश्मीरला पोहता येत नव्हते. काही लोक मशाल घेऊन शेताकडे येऊ लागले. हे लोक पुन्हा चुकीचा अर्थ काढतील म्हणून गश्मीर तिथून पळाला.

सकाळी गश्मीर सीताकडे आला.

" मी पवित्र आहे ना ? मला मरण द्या पण माझ्या बाळाला अनौरस असल्याचा कलंक नको. " ती म्हणली.

" तू पवित्र आहेस. पण तुझे पावित्र्य समजून घेण्याची कुवत लोकांमध्ये नाही. पुण्यात काही सूर्यासारखे महात्मा लोक राहतात जे तुझ्यासारख्या विधवासाठी आश्रम चालवतात. आपण तिथेच जाऊ. काही गरज नाही गावकऱ्यांना घाबरण्याची. " गश्मीर म्हणाला.

" पण गावातले लोक पुण्यात आले तर ? सीतेचे कुटुंब तर खूप बदनाम होईल. " जेलीने विचारले.

" सीतेच्या कुटुंबाची दुसरीकडे व्यवस्था करू. माझा मित्र युवराज आहे. तो ताकीद देईल सर्वांना. असेपण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. " गश्मीर म्हणला.

समाप्त