बहिणीची माया

Sister Loves As A Mother
"मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रुप।।

काळजी रुपी धाक
प्रेमळ तिची हाक।।"

खरचं किती छान लिहिले आहे बहिणीबद्दल .
आईच्या बरोबरीने किंवा आई नंतर जर कोणी आपल्या वर प्रेम करत असेल तर ती असते बहिण!
बहिण मोठी असो की लहान बहिणीचे आपल्या भावंडांवर प्रेम असते ,सर्वांची ती मनापासून काळजी घेते.भावंडांच्या सुखात चं आपले सुख मानते.
काही घरांमध्ये पालक मुलींपेक्षा मुलांना जास्त महत्त्व देतात ,तरीही मुली सर्व सहन करून आपल्या भावांवर निःस्वार्थ प्रेम करतात.

बहिण आपल्या भाऊबहिणींचे लाड पुरविते,मायेने समजाविते,आई वडील त्यांच्या वर रागवले तर भावंडांचा पक्ष घेते.आपल्या वाटेचा खाऊ भावाबहिणींना देते.खरचं किती मोठं मन असते बहिणीचं!
म्हणूनचं म्हटले आहे

"कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।

ममतेचं रान ओलचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।"

बहिण मोठी असली तर ती लहान भावंडांसाठी दुसरी आईचं असते.आईला घरकामात मदत करते.आई आजारी असली तर स्वतः सर्व कामे करते,आईची आणि इतर सर्वांची काळजी घेते.घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर नोकरी करून कुटुंबाला हातभार लावते.भावंडांच्या शिक्षणासाठी प्रसंगी आपले शिक्षण सोडते,आपल्या सुखांचा त्याग करते.


"कधी मन धरणारी
तर कधी कान धरणारी।।

कधी हक्काने रागवणारी
तर कधी लाडाने जवळ घेणारी।।"

असे बहिणीचे योग्य वर्णन केले आहे.


बहिण छोटी असली तरी ती मोठ्या हक्काने भावाबहिणीकडुन आपले लाड पुरवून घेते आणि तेवढा जीव ही लावते.बहिण लहान असली किंवा मोठी असली तरी तिचे प्रेम,तिची माया अगाध असते
म्हणून म्हणतात "वेड्या बहिणीची वेडी ही माया!"

आईला मायेचा सागर म्हणतात तर बहिण ही त्याच सागरातून भरलेली मायेची,प्रेमाची,वात्सल्याची घागर असते ,जी नेहमीचं भरलेली असते....

लहानपणी एकत्रपणे खेळणारे,हसणारे,लुटुपुटुचे भांडण करणारे बहिण भाऊ मोठे झाल्यावर कधी कधी कारणास्तव भांडले तर बहिणचं स्वतः हून भावाशी बोलणार .जरी भांडली तरी मनात प्रेमचं असते.
बहिण रक्षाबंधन आणि भाऊबीज या दिवशी भावांचे औक्षण करुन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.भावाने दिलेली भेट प्रेमाने स्विकारते.
बहिणी सासरी गेल्या तरी आपल्या भावाबहिणींची काळजी करीत असतात.आपले माहेरचे सर्व सुखात राहो असेचं त्यांना वाटत असते.बहिणी बहिणी या एकमेकांच्या मैत्रीणीचं असतात. लहानपणी आपली सुखदुःखे एकमेकांना सांगत असतात आणि लग्नानंतर ही आपले मैत्रीचे नाते जपत असतात.

कृष्णाला जखम झाली ,ती बांधण्यासाठी आपली भरजरी साडी फाडणारी द्रौपदी ही कृष्णाची बहिण ...
किती प्रेम तिचे आपल्या भावावर!
आताच्या काळात ही आपल्या भावांच्या सुखासाठी स्वतः त्रास घेणाऱ्या द्रौपदी सारख्या बहिणी असतात पण सर्व च भाऊ कृष्णासारखे असतात असे नाही .तरीही बहिणी आपले कर्तव्य करीत असतात,नाते जपत असतात कुठलीही अपेक्षा न ठेवता...

बहिण म्हणजे
आभाळाएवढी माया
बहिण म्हणजे
आईची दुसरी छाया...